भीती

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 23 March 2018

‘कर नाही त्याला डर कशाची?’ चुकीचे काहीच केलेले नसेल, स्वतःमधली कार्यशक्‍ती पुरेपूर विकसित केली असेल, आत्मविश्वास असेल आणि मुख्य म्हणजे अज्ञानाला जागा नसेल तर ‘भीती’ जाणवणारच नाही. आचरण-नीतीनियमांचे उल्लंघन केले नाही तर व विचारपूर्वक चारही बाजूंनी व्यवस्थित अभ्यास करून पावले उचलली, तर आकस्मिक परिस्थिती उद्‌भवण्याची भीती राहणार नाही.

भीती ही मनाला जाणवणारी एक संवेदना असते. रोग होऊ नयेत यासाठी मानसिक संवेदनांवर नियंत्रण ठेवायला हवे असे आयुर्वेदशास्त्र सांगते, त्यात भीतीचा समावेश केलेला आहे. भीती हा एक मानसवेग आहे असे आयुर्वेदात म्हटले आहे. 

‘कर नाही त्याला डर कशाची?’ चुकीचे काहीच केलेले नसेल, स्वतःमधली कार्यशक्‍ती पुरेपूर विकसित केली असेल, आत्मविश्वास असेल आणि मुख्य म्हणजे अज्ञानाला जागा नसेल तर ‘भीती’ जाणवणारच नाही. आचरण-नीतीनियमांचे उल्लंघन केले नाही तर व विचारपूर्वक चारही बाजूंनी व्यवस्थित अभ्यास करून पावले उचलली, तर आकस्मिक परिस्थिती उद्‌भवण्याची भीती राहणार नाही.

भीती ही मनाला जाणवणारी एक संवेदना असते. रोग होऊ नयेत यासाठी मानसिक संवेदनांवर नियंत्रण ठेवायला हवे असे आयुर्वेदशास्त्र सांगते, त्यात भीतीचा समावेश केलेला आहे. भीती हा एक मानसवेग आहे असे आयुर्वेदात म्हटले आहे. 

लोभशोकभयक्रोधमानवेगान्‌ विधारयेत्‌ ।
नैर्लज्ज्येर्ष्यातिरागाणामभिध्यायांश्‍च बुद्धिमान्‌ ।।...चरक सूत्रस्थान
लोभ, शोक, भय, क्रोध, अहंकार, निर्लज्जता, असूया, एखाद्या गोष्टीत किंवा एखाद्या व्यक्‍तीत अति प्रमाणात गुंतणे, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा असणे हे सर्व मानस वेग होत. बुद्धिमान व्यक्‍तीने हे मानस वेग धारण करावेत म्हणजेच अडवून ठेवून त्यावर नियंत्रण असू द्यावे. चरकाचार्य सांगतात, यामुळे मनुष्याचे मानसिक आरोग्य कायम राहते,  धर्म, अर्थादी चारही पुरुषार्थ साध्य होतात, सुखाची प्राप्ती होते व जीवनाचा आनंद उपभोगता येतो. 

विनाकारण भीतीची सवय
आपल्याला भीती वाटली की शरीर थरथरते, हाताला कंप सुटतो, छातीत धडधडते, बोलता येत नाही, पोटात खड्डा पडतो, कानशिले गरम होतात, घसा कोरडा पडतो हे आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभवले व पाहिले असेल. ही सर्व वात वाढल्याची लक्षणे होत. यातूनच झोप न लागणे, अस्वस्थता, नैराश्‍य जाणवणे, रक्‍तदाब वाढणे, भूक न लागणे पर्यायाने पचन बिघडणे, शरीरातील अग्नीतत्त्वाचे (ज्यात संप्रेरकांचा समावेश असतो) असंतुलन होणे असे अनेक बिघाड हळूहळू होताना दिसतात. शिवाय, भीतीवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न वेळेवर केले गेले नाहीत तर विनाकारण भीती वाटण्याची सवय जडू शकते. ही मानसिक विकारांची सुरवात असू शकते. आयुर्वेदाने भीतीचे कारण सांगितले आहे, 

असमर्थता भयकराणाम्‌ । ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
भीती उत्पन्न करणाऱ्या गोष्टीत सर्वांत मुख्य असते ‘असमर्थता’! म्हणूनच ‘समर्थ’ झाल्यास भीती नामशेष होणे शक्‍य आहे. उदा. अंधारात भीती वाटते कारण समोर रस्ता आहे की खड्डा आहे हे दिसत नाही, मात्र प्रकाशाच्या मदतीने अंधार दूर झाला की भीती आपसूक दूर होते. अभ्यास नीट केलेला असला तर परीक्षेची भीती राहणार नाही, तसेच आरोग्याची नीट काळजी घेतलेली असली तर आजारपणाची भीती राहणार नाही. कधीतरी असेही होऊ शकते की, शक्‍तीचा चुकीचा उपयोग केलेला आहे असे वाटत 

राहिल्यासही भीती उत्पन्न होते. बोलता बोलता आपण सहज म्हणून जातो, ‘कर नाही त्याला डर कशाची?’ चुकीचे काहीच केलेले नसेल, स्वतःमधली कार्यशक्‍ती पुरेपूर विकसित केली असेल, आत्मविश्वास असेल आणि मुख्य म्हणजे अज्ञानाला जागा नसेल तर ‘भीती’ जाणवणारच नाही. आचरण-नीतीनियमांचे उल्लंघन केले नाही तर व विचारपूर्वक चारही बाजूंनी व्यवस्थित अभ्यास करून पाऊल उचलले तर आकस्मिक परिस्थिती उद्भवण्याची भीती राहणार नाही; चुकीचे काही केले नाही, आपापली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली तर समाजाची, वडिलधाऱ्यांची किंवा बॉसची भीती राहणार नाही.

भीतीचा बागुलबुवा
समर्थतेची जोड नसली तर मात्र भीतीचा बागुलबुवा मानगुटीला बसू शकतो. ताप, उलटी, शुक्रधातूचा क्षय, मनोभ्रम, वेड लागणे, अपस्मार-झटके येणे, या प्रकारचे साध्यापासून ते अवघडातले अवघड विकार भीतीपायी होऊ शकतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे. परीक्षेची खूप भीती वाटत असली की ऐन परीक्षेत ताप येतो किंवा एकाएकी जुलाब होतात, पोटात ढवळायला लागते हा अनेकांचा अनुभव असतो. आयुर्वेदाच्या ग्रंथात ‘भयज्वर’ व ‘भयातिसार’ असे अनुक्रमे तापाचे व जुलाबाचे विशेष प्रकार सांगितले आहेत व याची लक्षणे वातज्वर किंवा वातातिसारासारखी असतात असेही सांगितले आहे.

भय, क्रोध वगैरे मानसिक वेग बळेच उत्पन्न केले जाणार नाहीत याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे होय, आयुर्वेदाने ‘साहस’ ही एक संकल्पना मांडलेली आहे, साहस म्हणजे ज्या गोष्टीची माहिती नाही, खात्री नाही, ज्यामुळे भीतिदायक परिस्थिती उत्पन्न होऊ शकते अशा गोष्टी मुद्दाम  करणे.

फाजील उत्साहाने काहीतरी करायला घ्यायचे आणि अचानक असा प्रसंग ओढवून घ्यायचा की ज्यामुळे भीती वाटेल, हे आयुर्वेदाला संमत नाही. याचसाठी आचरणासंबंधीचे नियम सांगताना मनुष्यमात्राचा वावर नसलेल्या अनोळखी ठिकाणी जाऊ नये; रात्री अंधारात एकट्याने किंवा हातात काठी, दिवा घेतल्याशिवाय जाऊ नये; जेथे कोणी राहात नाही अशा ओसाड घरात रात्री झोपू नये; अनोळखी बुवा-साधू किंवा अनोळखी पाणी म्हणजे ज्या नदी, तलावाची आपल्याला माहिती नाही, ओळख न करून घेतलेला म्हणजेच दीक्षा न घेतलेला मंत्र यापासून सावध राहावे; अशा अनेक लहानमोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. 

आजच्या काळाला धरून सांगायचे झाले तर भीती निर्माण करणारे चित्रपट, मालिका पाहणेही ‘भयवेग’ प्रवृत्त करण्याचाच एक प्रकार आहे. समोर आहे ते सर्व खोटे आहे हे जरी मेंदूला माहिती असले तरी त्याचा संवेदनशील व तरल मनावर व्हायचा तो परिणाम होतोच. किमान लहान मुले, गर्भवती महिला किंवा संवेदनशील मन असलेल्या व्यक्‍तींनी असे भीतिदायक चित्रपट न पाहणेच चांगले. 

प्राणभयाचा उपचार थोर
आयुर्वेदात भीतीचा उपचार म्हणूनही उपयोग केलेला आढळतो. ‘उन्माद’ नावाचा मानसिक विकार आयुर्वेदात सांगितला आहे. यात मनुष्याचे मन संभ्रमित होते, व तो वेड्यासारखा वागू लागतो. अशा वेळेला शरीरशुद्धी, बुद्धी-स्मृतीवर्धक औषधे वगैरे उपचारांबरोबर ‘भयचिकित्सा’ करायला सांगितली आहे. यात उन्मादग्रस्त व्यक्‍तीच्या जिवाला धोका उत्पन्न झाला आहे असे भासवले जाते. चरकसंहितेत यासाठी विष व दात काढलेले सर्प अंगावर सोडणे, राजाने मारावयाचा हुकूम दिला आहे अशी खोटी बातमी रुग्णाला देणे अशा प्रयोगांनी रुग्णाला भयभीत करावे असे सांगितलेले सापडते. याचे कारण काय, तर 
देहदुःखभयेभ्यो हि परं प्राणभयं स्मृतम्‌ । 
येन तानि शमं तस्य सर्वतो विप्लुतं मनः ।।
...चरक चिकित्सास्थान 

प्राणभय हे इतर सर्व भयांपेक्षा किंवा इतर कोणत्याही शरीर-मानस दुःखांपेक्षा अधिक तीव्र असते. मन थाऱ्यावर नसलेल्या व्यक्‍तीला जर प्राणभय जाणवले तर त्याचे संभ्रमित मन ताळ्यावर यायला मदत मिळते. मात्र असा उपचार जाणत्या व्यक्‍तीच्या संमतीनेच करणे आवश्‍यक असते. भीतीमुळे किंवा मनावर आघात झाल्याने मनोविकार उत्पन्न झाला असताना हा उपाय करून चालत नाही. उलट अशा वेळी आश्वासन देऊन, भीती घालवून मन शांत आणि स्थिर होण्यासाठी उपाययोजना केली जाते.

भीतीमुळे झालेले वात असंतुलन अनेक शारीर-मानस रोगांना कारण ठरते. रोग झालेला असताही त्यातून बाहेर पडण्यासाठी ‘रोगाची भीती’ मनात असून चालत नाही. मनाने खंबीर नसलेल्या व्यक्‍तीवर रोगावरचे आवश्‍यक ते सर्व उपचार करताही येत नाहीत. तेव्हा भीती ही केवळ मानसिक संवेदना आहे याचे भान ठेवून, क्षणभर भीती वाटणे स्वाभाविक असले, तरी तिच्या आहारी न जाणे, भीती वाढू नये यासाठी लागणारी समर्थता मिळविण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Fear