उचकी

उचकी

उचकी लागण्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला आलेला असतो. एखाद्या वेळेस उचकी लागणे हे कोणत्याही गंभीर दोषाचे लक्षण नसते. सातत्याने (काही तास, काही दिवस) उचकी लागत राहिली तर मात्र ही दखलपात्र स्थिती असते. उचकी लागते तेव्हा शरीरातील काही अनैच्छिक हालचाली होतात. छाती आणि पोट यामध्ये असणाऱ्या स्नायूंच्या विभाजक पटलाच्या दोन्ही बाजू अकस्मात आकुंचित पावतात. त्याच्या जोडीला फासळ्यांच्या मध्ये असणारे बाह्य आवरणातील स्नायूंचेदेखील आकुंचन होते. याचवेळी स्वरयंत्रणेतील पट्ट्या एकमेकाजवळ येतात. व्हेगस आणि फ्रेनिक नर्व्हस यांच्या उत्तेजनामुळे अशी उचकी लागते. सामान्यपणे उचकी लागली तर ती दर मिनिटाला चार वेळापासून साठ वेळेपर्यंत लागू शकते.

जठरात अन्न, मद्य अथवा हवा झपाट्याने गिळली गेली, की उचकी लागते. शिवाय, मन अस्वस्थ झाले किंवा हवामानात (अगर जठरात) तापमानात एकदम मोठा फरक पडला (खूप गरम अथवा अगदी थंड अन्न सेवनाने) तरी उचकी लागते. दीर्घकाळ उचकी लागत राहिली तर त्याचे कारण शोधून काढणे हिताचे असते. ही कारणे छातीत, पोटात किंवा मेंदूत असू शकतात. उचकी लागत असताना विभाजक पटलाचे कार्य होऊ शकत नाही, त्यामुळे श्‍वास घेणे आणि सोडणे अडचणीचे होते. स्वाभाविकपणे गुदमरल्याची भावना रुग्णाला भीती निर्माण करते आणि पाहणाऱ्या व्यक्तीला काळजी वाटते. जेव्हा उचकी चालू राहते तेव्हा उचकीचे कारण शोधणे आवश्‍यक असते. सामान्यतः ही कारणे छातीत, उदराच्या पोकळीत, मेंदूत किंवा क्वचित अन्यत्र सापडतात. छातीत काही महत्त्वाच्या ज्ञानतंतूच्या शिरा असतात. त्यातील फ्रेनिक नर्व्हला दाह झाला तर एका पाठोपाठ उचकी लागू लागते. प्रौढ किंवा वयस्कर व्यक्तीमध्ये या भागात कॅन्सरच्या गाठीमुळे असे होणे अनेकदा शक्य असते. फुफ्फुसे, अन्ननलिका यांतील प्राथमिक आजारांमुळे इतरत्र वाढलेल्या लसिका ग्रंथी यांतील वाढ कारणीभूत ठरते. महारोहिणीत फुगा निर्माण झाला तरी तसेच होऊ शकते. या भागात केलेल्या शस्त्रक्रियेनंतर अथवा या भागात दाह झाल्यासदेखील उचकी लागू लागते. छाती आणि पोट यात विभाजन पडदा असतो. त्याच्या आजूबाजूला दाह झाल्यास उचकी लागू लागते. फुफ्फुसाच्या खालच्या भागात न्यूमोनिया झाला तर विभाजक पडद्याला दाह होतो व उचकी लागते. हृदयविकाराचा झटका हृदयाच्या खालच्या भागात आल्यास अथवा हृदयाच्या बाजूने असणाऱ्या अभ्र्याचा दाह झाला तरी उचकी लागते.

विभाजक पडद्याच्या वरच्या पृष्ठभागावर फुफ्फुसांभोवती असणाऱ्या आभ्य्राचा पदर येतो. येथे प्लूरसी अथवा एम्लाएमा असे विकार झाले तरी उचकी लागू लागते. विभाजक पडद्याला लागून असणाऱ्या हृदयाच्या भागाला हार्ट ॲटॅक अथवा पेरिकार्डाटिससारखा आजार झाला, तरी विभाजक पडद्याचा दाह होऊन उचक्‍या लागू शकतात.

विभाजक पडद्याचा दाह उदराच्या पोकळीतील अवयवांच्या आजारानेदेखील होतो. डायाफ्रॅगमॅटिक हर्निया या विकारात या विभाजक पडद्यातून जठराचा काही भाग छातीत सरकतो. त्यामुळे या विभाजक पडद्याला दाह होतो व उचकी लागते. पडद्याच्या उदराच्या पोकळीकडच्या पृष्ठभागाला तेथे गळू झाल्यास दाह होतो. याला सब डायाफ्रॅगमॅटिक ॲब्‌सेस म्हणतात. पेप्टिक अल्सर किंवा अपेंडिक्‍स अशा ठिकाणी झालेल्या गळवामुळे असे आजार होतात. स्वादुपिंडाला (पॅन्क्रिया) झालेल्या दाहामुळेदेखील उचक्‍या लागू लागतात. यकृत उजव्या बाजूच्या विभाजक पडद्याला चिकटून खालच्या भागात असते. यकृतात गळू झाल्यास (लिव्हर ॲब्सेस) किंवा यकृतात शरीराच्या इतर भागातून कॅन्सरचा प्रसार झाला तर उचक्‍या लागू लागतात. जठराच्या कॅन्सरमुळेदेखील उचक्‍या लागू शकतात. विभाजक पडद्याच्या वरच्या अथवा खालच्या भागातील विकारामुळे विभाजक पडद्याचा दाह झाल्यास उचक्‍या होऊ लागतात. गर्भाशयाचा कॅन्सर किंवा मोठ्या आतड्याच्या खालच्या भागात (सिग्मॉईड कोलॉन) कॅन्सर जेव्हा होतो, तेव्हा विभाजक पडद्याला काही दाह न होताच उचक्‍या लागतात. उदराच्या आतील अवयवाची शस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेनंतर जठराचा आकार वाढणे अशा वेळीदेखील उचक्‍या लागू लागतात.

विभाजक पडद्याचे काम फ्रेनिक आणि व्हेगस या दोन ज्ञानतंतूच्या शिरांमार्फत होत असते. या शिरांची केंद्रे मेंदूच्या आत असतात. मेंदूत विषाणूमुळे झालेल्या दाहाचा परिणाम म्हणून या केंद्राचे कार्य उद्विप्त होते. हा विषाणू हवेतून पसरतो त्यामुळे आजूबाजूच्या मंडळींनादेखील असा त्रास होणे शक्‍य असते. या आजारामुळे रुग्णाला आठ ते दहा दिवस सतत उचकी लागत राहते. ‘Liofen २५ mg’ या गोळीचा अनेकांना फायदा होतो. मेंदूतील मेड्युला या भागात आणि मानेच्या तिसऱ्या व चौथ्या सेगमेंटमध्ये अशी सूज येण्याने हा त्रास होणे संभवते. कवटीच्या आत मेंदूला झालेल्या गाठीमुळेदेखील उचकी लागू शकते. मूत्रपिंडाचे कार्य नीट न झाल्याने रक्तात युरिया या पदार्थ साचू लागतो. या पदार्थामुळे जठराच्या अस्तराला दाह होतो व उचकी लागू लागते. टॉयफॉइड (मुदतीचा ताप) आणि पटकी (कॅन्सर) या आजारातसुद्धा उचकी लागते. माणसाच्या शारीरिक आजाराचे मूळ अनेकदा मनात असू शकते. हिस्टेरिकल प्रकारच्या मानसिक विकारात उचक्‍या लागतात. परंतु, झोपेमध्ये त्या थांबतात. झोपेच्या औषधांचा वापरदेखील उचकी लागण्याचा परिणाम होऊ शकतो.

उचकी लागणे दर खेपेस गंभीर विकाराचे लक्षण नसते. परंतु, कधी कधी मूत्रपिंडांचे कार्य न होणे असे गंभीर आजार नाहीत ना हे पाहणे आवश्‍यक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com