आरोग्य दीपावली

आरोग्य दीपावली

दीपावली या शब्दाचा अर्थ आहे दिव्यांच्या रांगा, आवली म्हणजे ओळी. घराबाहेर अनेक पणत्या, रोषणाईचे दिवे लावले जातात तो हा सण. नुसता मेकअप करून आणलेले उसने तेज हा काही खरा प्रकाश नव्हे. हातापायात ताकद असणे, शरीरसौष्ठव आणि सुंदर केशसंभार असणे, डोळे तेजस्वी, मुंग्यांचे बोलणे ऐकू शकणारे कान व अक्रोड फोडू शकणारे दात असणे आणि षड्रसपूर्ण आहार स्वीकारण्याची शरीराची, चवीची व पचनाची क्षमता शाबूत असणे, जीवनाचा सहचर्यानंद लुटता येण्याची क्षमता असणे ही झाली शरीराची रोषणाई. 

दिव्याला लागते तेल, वीज असा कुठला तरी करंट. मनुष्याला तेजासाठी-सक्रियतेसाठी लागते वीर्य, लागतो अग्नी. त्यातून प्रकट होते कर्म. दीपावलीच्या सणात खरे आरोग्य अनुभवायचे असेल तर आत-बाहेर पूर्ण रोषणाई प्रकट होण्याची आवश्‍यकता आहे. दीपावलीमध्ये नाना तऱ्हेची पक्वान्ने तयार होतात, त्यात अनारसे, मोतीचूर, चिरोटे, चकली यांना खूप महत्त्व असते. हे सर्व पदार्थ पौष्टिक आहेत, पण आज हे पदार्थ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत असे दिसते. कारण अनेकांना हे पदार्थ करता येत नाहीत. त्यामुळे या पदार्थांची जागा भेळपुरी, पावभाजी, नूडल्स, ढोकळा, दाबेली अशा पदार्थांनी घेतली जाते असे दिसते. सर्व खाद्यपदार्थांचा श्रेष्ठ रस म्हणजे मधुर रस. हा रस रसज्ञेला (जिभेला) खूप आवडतो. पण ‘गोड खाण्याने वजन वाढते’ हे वाक्‍य व्हायरल झाल्यामुळे अनेकांनी गोड खाणे बंद केले. मुलांनी अतिप्रमाणात चॉकलेट खाल्ल्यावर दात खराब होऊ शकतात हे जेवढे खरे आहे, तेवढेच हेही खरे आहे की एखादे चॉकलेट खाल्ल्यावर त्यात असलेल्या दुधामुळे, कोकोमुळे, चॉकलेटमुळे जो आनंद होतो, जो गोडवा अनुभवता येतो, त्यामुळे केवळ शरीरालाच नाही तर मनाला आनंद होऊन मनात गोडवा उत्पन्न होतो. याचा विचार न करता चॉकलेट खाऊन दात बिघडतात हे सांगण्यामुळे सगळेच गोड पदार्थ सोडण्याची प्रवृत्ती तयार होते. तेव्हा शरीराचे तेज म्हणजेच ओज प्रकट व्हायचे असेल तर शरीरात वीर्य उत्पन्न व्हायला पाहिजे व त्यासाठी शरीराला पुरवायला हवे षड्रसयुक्‍त अन्न. हे अन्न वीर्ययुक्‍त असणेही महत्त्वाचे असते. प्रत्येक वस्तू विकत घेताना ती ताजी आहे की नाही, त्यातील वीर्य टिकून राहिलेले आहे की वस्तू शुष्क झालेली आहे हेही बघावेच लागते. या अन्नाचा व आपल्या पाककृतींचा सांगोपांग विचार व्हावा म्हणून योजलेला सण म्हणजे दीपावली. थोडी हळद मिसळून दुधाची साय चेहऱ्यावर लावली तर काही दिवसात चेहरा उजळून निघतो, कांती चांगली राहते, आरोग्यवान दिसू लागते. चेहरा नुसता गोरापान दिसणे वेगळे आणि चेहऱ्याची त्वचा आरोग्यवान असणे वेगळे.

पण आज या शिवाय दूध-सायीचा उपयोग राहिलेला नाही. ‘दूध व दुधापासून बनविलेले पदार्थ चरबी वाढवितात, वजन वाढते, रक्‍तवाहिन्यांमध्ये अवरोध उत्पन्न होतात’ ही दुसरी अफवा कुणीतरी पसरवलेली आहे. यात एक गोष्ट तथ्य आहे की, जसे वनस्पती तूप हे मुळात तूपच नव्हे, तसे संकरित गाईचे दूध हे मुळात दूधच नव्हे. ज्या दुधाचे गोडवे आरोग्यशास्त्राने गायले ते हे दूध नव्हे. केवळ देशी गायच आरोग्याला उपयोगी असणारे दूध देते ही जुनी संकल्पना आज नव्याने पुन्हा एकदा रूढ होत आहे आणि हेच वास्तव मनुष्यमात्राला कदाचित वाचवू शकेल. तेव्हा देशी गाईचे दूध गरम करून त्यावरची साय वेगळी करून, त्या सायीला प्राणिज बॅक्‍टेरियांचे विरजण लावून दही करावे. हे दही घुसळून काढलेले लोणी खाण्याने वीर्यवृद्धी होते, ओजवृद्धी होते. हे लोणी कढवून तयार केलेले लोणकढे तूप लोण्याहून श्रेष्ठ असते व ते टिकतेही अनेक दिवस. अशा लोणकढ्या तुपात बनविलेले पदार्थ केवळ दीपावलीच्या दिवसातच नव्हे, तर रोजच्या आहारात असणे उत्तम. 

सकाळच्या वेळी कुठल्यातरी गरम पदार्थाबरोबर थोडा फराळ (चिवडा, चकली, शेव, लाडू वगैरे) करणे, दुपारी संतुलित साग्रसंगीत जेवण घेणे, मन स्वस्थ ठेवून आपले आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवणे, दुपारी चहाच्या वेळी पाहुण्यांबरोबर पुन्हा कुठल्यातरी विशेष पाककृतीचा आस्वाद घेणे आणि रात्री साधे जेवणे घेणे ही दीपावलीच्या सणाची परंपरा होय. 

बरोबरच या ऋतूत वाढलेल्या वाताला कमी करणेही अपेक्षित असते व थंडीपासून संरक्षण करायचे असते. यादृष्टीने दीपावलीच्या मुहूर्तावर सुरू केलेला सिद्ध आयुर्वेदिक तेलाचा अभ्यंग मसाज पुढेही चालू ठेवणे आवश्‍यक असते. त्याचप्रमाणे वातावरणात असलेला कोंदटपणा व धूसरपणा यामुळे वाटणारी भीती घालवून सुरक्षित वाटावे, दृष्टी स्वच्छ व्हावी या हेतूने औक्षण, ज्योतिध्यान वगैरे केले जाते. लहानांना मोठ्यांनी, मोठ्यांना लहानांनी दिलेल्या अभिनंदनामुळे हुरूप येऊन आनंदाने जीवन जगण्याची आशा वाढविण्याचाही हा प्रसंग. 

प्रेम हा तर नवरसांचा राजा. या प्रेमाची वृद्धी केल्यावर आरोग्यासाठी जास्त काही करावे लागणार नाही, हाही दीपावलीचा एक संदेश. दीपावलीचे आरोग्य म्हणजेच एकूण सर्वांचे आरोग्य. मनुष्यापासून, प्राण्यांपासून सर्व देवतांपर्यंत, मंदिरांपर्यंत स्वच्छता, श्रद्धा, सेवा व प्रेम वाढविण्याचा हा दीपावलीचा उत्सव.

अशी ही आरोग्य दीपावली तुम्हा सर्वांना आनंदाची व प्रेमाची जावो, हीच सदिच्छा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com