दुखणी

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 11 August 2017

‘वात आणला दुखण्याने’ असे आपण म्हणून जातो, पण खरे तर ते उलट असते. म्हणजे की, वाताने दुखणे आणलेले असते. सर्व दुखणे चलनवलनाच्या अतिरेकामुळे किंवा अभावामुळे असते, म्हणजेच दुखणे हे वातामुळे असते. ताप आल्यास वाढणारा वात वेगळा आणि अपचनामुळे वाढणारा वात वेगळा. शरीरात कुठल्याही प्रकारे त्रिदोषांमध्ये असंतुलन निर्माण झाले तरी त्याचे पर्यवसान दुखण्यात होतेच. तेव्हा ज्याला दुखणे नको आहे त्याला वाताला सांभाळणे खूप आवश्‍यक असते.

‘आई गं... आई आई गं ऽ ऽ’
‘‘काही होत नाहीए, ऊठ!’’ आई तिकडून सांगते. 
‘‘अजून थोडा वेळ तरी झोपू दे.’’ 

‘‘अरे, शाळा कितीची आहे हे लक्षात घे. तू काय आता लहान आहेस का?’’

अशा तऱ्हेचा संवाद सकाळी चालू राहतो. नंतर मात्र आईचा धीर सुटतो. आई येऊन मुलाला हालवते. 

‘‘आई, नुसते हालवण्यापेक्षा थोडे अंग दाबून दिले तर मी लगेच उठतो.’’ मुलाचे समाधान करण्यासाठी का होईना आई पाठीवर खालून वरपर्यंत थोडा भार देऊन  दाबते.

‘‘अरे तुझे रोजचे हे काय चालले आहे? झोप होत नाही का तुझी?’’ 

अशी प्रश्नोत्तरे घरोघरी चालतात. सकाळी उठवत नाही याचे कारण सहसा आळस असे समजले जाते, पण हा आळस आलेला असतो अंग दुखण्यातून. अंग दुखण्याचे कारण आम किंवा वातदोष असला तरी अंग दुखले की जन्मदात्या, अन्न खाऊ घालणाऱ्या आईची आठवण होणे साहजिक आहे. आईने स्वयंपाक उत्तम केला होता, पण रात्री दोन घास कमी खाल्ले असते तर चालले असते, आईने केलेले पदार्थ पोटात जागा नसताना ढोसायचे कारण नव्हते, असे वाटू शकते. 

पण मुळी रात्री मी घरी जेवलोच नव्हतो. मग काय केले होते तर बाहेर जाऊन पाव-भाजी खाल्ली होती. मग पोटदुखी येणार हे बरोबरच आहे. पाव हा मुळात यीस्ट घालून केलेला पदार्थ. त्यावर लावलेले बटर हे खरे लोणी होते की, कच्च्या दुधावरची फॅट होती हे कळायला मार्ग नाही. अशा फॅटमध्ये भाजलेले पाव, त्याबरोबर वाटाणे, फ्लॉवर वगैरे वातूळ पदार्थ घालून केलेली भाजी. त्यातून बाहेर खाताना एखादी डिश जास्तीच खाल्ली जाते. अशा वेळी पोटदुखी, अपचन असे त्रास झाले नाहीत तरच नवल. 

हे सर्व वर्णन करायचे कारण एवढेच की, अंगदुखी किंवा एकंदर दुखणी अशा प्रकारच्या आहारातून उद्भवलेली असतात. हल्ली तर फॅशन झालेली आहे की संध्याकाळचे जेवण घरी करायचेच नाही. कधीतरी बाहेर खायला हरकत नसते. नियमाने प्रवास करणारे अनेक असतात किंवा नोकरी निमित्ताने बाहेर राहणारेही अनेक असतात. ही मंडळी रोज बाहेरचे अन्न खातात. पण ते स्वतःच्या प्रकृतीला न मानवणारे, वात वाढवणारे, रात्री-बेरात्री व कंठापर्यंत येईल एवढ्या प्रमाणात जेवत नाहीत. प्रकृती बिघडण्यासाठी ‘बाहेरचे जेवण’ हे एकमेव कारण होऊ शकत नाही, कारण बाहेरही डाळ-भात-भाजी-पोळी असे खाता येतेच. 

साधारणतः प्रत्येक आजाराला ‘दुखणे’ असे म्हणतात. कारण आजारात दुःख हे असतेच. अगदी गुडघे, डोके, शरीर दुखत नसले तरी मानसिक दुःख हे खरेच. सर्व दुखणे चलनवलनाच्या अतिरेकामुळे किंवा अभावामुळे असते, म्हणजेच दुखणे हे वातामुळे असते. ताप आल्यास वाढणारा वात वेगळा आणि अपचनामुळे वाढणारा वात वेगळा. शरीरात कुठल्याही प्रकारे त्रिदोषांमध्ये असंतुलन निर्माण झाले तरी त्याचे पर्यवसान दुखण्यात होतेच. तेव्हा ज्याला दुखणे नको आहे त्याला वाताला सांभाळणे खूप आवश्‍यक असते. जसे सकाळी मुलांना उठवणे ही घरातील मोठ्यांची डोकेदुखी असते तसे रात्री झोप येत नाही या कारणामुळे मुले टीव्ही पाहात बसतात किंवा इतर काहीतरी करत बसतात. अशा मुलांमध्येही वाताचा प्रकोप झालेला असल्याने त्यांचा चित्तप्रक्षोभ झाल्याने ती अति उल्हसित झालेली असतात. अशा वेळी रात्री वेळेवर झोप येण्यासाठी अंगाला तेल लावून घेणे हे उपयोगी ठरतेच, तसेच रात्री लावलेल्या तेलामुळे वात कमी होण्यासही फायदा होतो. पोटात अपचन झालेले असले, पोटात आम तयार झालेला असला तर मात्र तेल लावून उपयोग होत नाही. 

जवळ जवळ सर्व प्रकारच्या दुखण्यांवर बस्ती, म्हणजे आयुर्वेदातील औषधी एनिमा, देणे आवश्‍यक असते.  एखाद्या दिवशी रात्री जडान्न खाल्ले गेले किंवा जास्ती खाल्ले गेले तर आले-लिंबाचा रस किंवा एखादी पाचक गोळी घेऊन झोपणे इष्ट असते. परंतु तसे न करता हल्ली जरा रोज अंग दुखते, जरा आळस वाढलेला आहे, तेव्हा सकाळी धावायला वा चालायला जायला सुरुवात केली की बरे वाटेल, अशी स्वतःची समजूत काढून त्यानुुसार वागले तरी दुखणे बरे होत नाही. कारण दुखण्याचे मूळ वेगळेच काहीतरी असते. तेव्हा दुखण्याचे मूळ कारण शोधून काढून त्यावर इलाज करणे आवश्‍यक असते. केवळ रात्रीच जडान्न खाणे टाळायला हवे असे नाही तर, ज्यांना काही दुखणे आहे, काही त्रास आहे त्या सर्वांनाही आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. 

तसे पाहिले तर पडले, झडले, शरीरावर आघात झाला तर ‘आई गं’ हा शब्द मुखातून आपसूक निघतो. पण पडल्यावर साधे खरचटलेले आहे की हाड मोडलेले आहे की भळाभळा रक्‍त वाहायला लागलेले आहे हे नंतर पाहिले तरी, शरीरावर झालेल्या आघाताचे सुरुवातीला दुःख होतेच. यावरही लगेच उपचार करावे. हाड मोडले असले तर चालता येत नाही, त्यामुळे व्यक्‍ती लगेच उपचार करण्यास जाते. पण खरचटणे, रक्‍त येणे वगैरे असल्यास कशामुळे खरचटले आहे, काय टोचल्यामुळे रक्‍त येते आहे हे नीट पाहून त्यानुसार उपचार करावे. कारण असे दुखणे क्षणिक असले तरी त्यातून मोठा आजार उद्भवू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्‍यक असते.

एकूण ‘दुखणे’ नको असे वाटत असल्यास शरीराची एकूण अंगकाठी सांभाळून ठेवायला हवे. म्हणजेच पंचधातूंतून झालेल्या शरीरात पंचधातूंचे समत्व हवे. शरीरातील वात-पित्त-कफ या त्रिदोषांचे समत्व हवे. मला शौचाला एक दिवसाआड जावे लागते, पण जेव्हा होते तेव्हा साफ होते, तेव्हा सर्व ठीक आहे असे सांगणारे अनेक असतात. परंतु रोज सकाळी शौचाला होणे (वय वाढले असल्यास सकाळी व रात्री अशा दोन वेळा शौचाला होणे) चांगले असते. प्रत्येकाला लघवी साफ व्हावी. लघवी झाल्यावर पुन्हा पंधरा-वीस मिनिटांत मूत्रत्यागाची भावना येऊ नये. असे होणे हे मूत्राशय नीट रिकामा होत नसल्याचे लक्षण आहे. असे झाल्यास तेथे जडत्व निर्माण होऊन जांघेत दुखणे, ओटीपोटात दुखणे असे त्रास होऊ शकतात. मूत्रपिंडाचे विकार असतील, मूत्रमार्गाला सूज आली किंवा अवरोध झाला तरी दुःख उत्पन्न होते. 

सर्वांत लक्षात ठेवण्यासारखे दुखणे म्हणजे डोकेदुखी. डोकेदुखी होण्याची अनेक कारणे असतात. काही बाह्य कारणांमुळे डोके दुखू शकते तसे, लोकांचे वागणे ही डोकेदुखी असू शकते. परंतु त्यावर लोकांचे वागणे हसण्यावारी नेऊन स्वतः शांत राहणे हा श्रेष्ठ उपाय आहे. ज्यावेळी डोकेदुखी मानसिक नसते, त्यावेळी त्या डोकेदुखीचे कारण समजणे आवश्‍यकच असते. ‘मायग्रेन’ हे दुखणे स्त्रियांच्या अधिक परिचयाचे असते. मूत्र तपासून घेणे, अंगावर लाल-पांढरे जात नाही याची खारतजमा करणे, वारंवार सर्दी होते नाही ना याकडे लक्ष ठेवणे, हिमोग्लोबिन कमी झालेले नाही ना हे पाहणे आवश्‍यक असते. याचा सविस्तर विचार याच अंकात पुढे मुखपृष्ठकथेत केलेला आहे. अर्धे डोके न दुखता संपूर्ण डोके दुखत असेल तेव्हा पित्त डोक्‍यापर्यंत गेले असल्याची शक्‍यता असते. असे असल्यास रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर ब्राह्मीने संस्कारित केलेले ब्रह्मलीन तेल चोळणे, नाकात तुपाचे थेंब सोडणे वगैरे उपचार करून पित्ताची बाधा दूर होते का हे पाहणे आवश्‍यक असते. कोणत्या कारणाने पित्त वाढून डोक्‍यात गेले आहे याचे अवलोकन करावे. शरीरात उष्णता ज्यातून उत्पन्न होते ती भट्टी तर पोटात असते. तेव्हा या पित्तप्रकोपाची सुरुवात आहारापासूनच झालेली आहे हे लक्षात घ्यावे. यासाठी सूतशेखर, प्रवाळपंचामृत, कामदुधा घेतली, चमचाभर गुलकंद वा मोरावळा खाल्ला तरी उपयोग होतो. सितोपलादी टाकून दूध घेण्यानेही डोकेदुखीला आराम मिळू शकतो. पण असे इलाज करूनही डोकेदुखी थांबत नसली तर डोळ्याचा नंबर तपासून घ्यावा. तरीही डोकेदुखी थांबली नाही तर डोक्‍याचा एक्‍स रे, एम्‌आर्आय्‌ करणे वगैरे तपासण्या करणे आवश्‍यक असते. यातून मेंदूत कुठलाही कायमस्वरूपी विकार होत नाही ना याकडे लक्ष ठेवता येते.

आणखी एक महत्त्वाची डोकेदुखी म्हणजे छातीत दुखणे. खालून आलेल्या वायूच्या प्रेशरमुळे छातीत दुखू शकते. आल्या-लिंबाचा रस घेण्याने किंवा एखादा ढेकर येऊन गॅस सरण्याने असे दुखणे कमी झाले तर हे दुखणे हृदयाचे नाही हे लक्षात येते. व्यायाम न करणाऱ्याच्या किंवा कायमची जागरणे वगैरे करणाऱ्याचे पित्त वाढून त्याच्या फासळ्या आकुंचन पावतात व त्या तेवढ्या प्रमाणात प्रसरण न झाल्यामुळे हृदयावर दाब येऊन छातीत दुखू शकते. श्वास कमी पडणाऱ्यांच्या हृदयाला त्रास होऊ शकतो व छातीत दुखू शकते. हृदयाच्या धमन्यांमध्ये अवरोध, हृदयाचा झटका वगैरे अन्य कारणांमुळेही  छातीत दुखू शकते, यामुळे खांद्यापासूून हातात कळा येऊ शकतात. अशा वेळी हृदयाची तपासणी करून घेऊन योग्य उपचार करणे आवश्‍यक असते.  

ऑफिसमध्ये बसून अनेक तास काम केल्यामुळे मान, खांदे यांचे स्नायू ताठ झाल्याने दुखू शकते. यावर मेरुदंडाला कुंडलिनी सारखे तेल लावणे, खांद्याला थोडा मसाज करणे, मान चारही बाजूला फिरविण्यासारखे व्यायाम करणे, बुबुळे फिरवून डोळ्याने खाली-वर पाहणे असे व्यायाम करणे इष्ट असते. अशा त्रासांकडे दुर्लक्ष केले तर त्यातून स्पाँडिलोसिस, स्लिप्ड डिस्क असे चिवट त्रास होऊ शकतात. 

अंग दुखते आहे पण काही महत्त्वाचे काम आहे, कामाला जाण्याशिवाय पर्याय नाही म्हणून वेदनाशामक गोळी घेणे हे एखाद्या वेळी चालू शकते, पण अशा वेदनाशामक गोळ्या वारंवार घेणे इष्ट नव्हे. शरीरात कुठल्याही प्रकारचे दुःख असले तर मुळापासून योग्य उपचार करावेत. चाळिशीनंतर पंचकर्माद्वारा अधून मधून शरीरशुद्धी करून घ्यावी. कुठल्याही प्रकारचे दुखणे अनुभवावे लागूू नये यासाठी ही योजना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Illness