पथ्यापथ्य- जंत

पथ्यापथ्य- जंत

‘जंत’ हा एक असा विकार आहे, की जो प्रत्येकाला कधी ना कधी होत असतो. लहान मुलांमध्ये जंत होण्याचे प्रमाण जास्ती असले, तरी मोठ्यांनाही अधून मधून जंतांचे औषध घेणे भाग असते. जंतरोगावर उपचार सांगताना आयुर्वेदाने त्रिसूत्री मांडलेली आढळते. 

१) अपकर्षण - म्हणजे शरीरात झालेले जंत शरीराबाहेर काढून टाकणे.

२) प्रकृतीविघात - म्हणजे जंत पुन्हा पुन्हा तयार होण्याची प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी योजना करणे.

३) निदान परिवर्तन - म्हणजे ज्या कारणांमुळे जंत होतात, त्या कारणांपासून दूर राहणे. 

यापैकी प्रकृतीविघात म्हणजे जंतांची प्रवृत्ती नष्ट करण्यामध्ये आहाराचे योगदान महत्त्वाचे असते. कारण जंत काढून टाकणारे औषध रोज रोज घेता येत नाही. तसेच औषध घेतल्यामुळे बहुसंख्य जंत पडून गेले तरी काही जंत, त्यांची अंडी वगैरे शिल्लक राहिलेले असते. त्यामुळे त्यातून पुन्हा जंत फोफावू नयेत यासाठी आहारातून जंतनाशक द्रव्यांची योजना करणे सर्वोत्तम असते. या संदर्भात चरकसंहितेत म्हटलेले आहे, 

र्वार्क-सहचर-नीप-निर्गुडी-सुमुख-सुरकुठेरक-गण्डीरकालमालक-पर्णासक्षवफणिञ्झक-बकुल-कूटज-सुवर्णक्षीरी स्वरसानाम्‌ अन्यतमस्मिन्‌ कारयेत्‌ पूपलिका- ।....भैषज्य रत्नाकर

माका, पांढरी रुई, कोरांटी, कदंब, निर्गुडी, तुळशी, काळी तुळशी, पुदिना, बकुळ, कुडा, स्वर्णक्षीरी यापैकी कोणत्याही एका द्रव्याचा रस काढावा व त्या रसात धान्याचे पीठ भिजवून पोळी किंवा भाकरी तयार करावी. 

तथा किणिही-किराततिक्‍तक-सुवहामलक-हरीतकी-बिभीतक स्वरसेषु कारयेत्‌ पूपलिका- ।....भैषज्य रत्नाकर

आघाडा, काडेचिराईत, आवळा, हिरडा किंवा बेहडा यांच्या रसात पीठ भिजवून त्यापासून बनविलेली पोळी किंवा भाकरी सेवन करावी. तसेच यापैकी मिळतील त्या द्रव्यांचा रस काढून त्यात मध मिसळून जेवणापूर्वी प्यावा.

नारीकेलजलं पीतं सक्षौद्रं क्रिमिनाशनम्‌ ।....भैषज्य रत्नाकर

नारळाच्या पाण्यात मध मिसळून पिण्याने जंत तसेच जंतांमुळे उद्‌भविणारे रोग नष्ट होतात.

अपक्वं क्रमुकं पिष्टं पीतं जम्बीरजै- रसै- ।....भैषज्य रत्नाकर

कच्ची सुपारी उगाळून बनविलेले गंध लिंबाच्या रसाबरोबर घेण्याने मळामधून पडणारे जंत नष्ट होतात. 

यवानीं लवणोपेतां भक्षयेत्‌ कल्प उत्थित- ।....भैषज्य रत्नाकर

ओव्याच्या चूर्णात सैंधव मीठ मिसळून सकाळी उठल्या उठल्या घेण्याने जंत नष्ट होतात. 

विडंग-पिप्पलीमूल-शिग्रुभिर्मरिचेन च । तक्रसिद्धा यवागु- स्यात्‌ क्रिमिघ्नी ससुवर्चिका ।।....भैषज्य रत्नाकर
 

वावडिंग, पिंपळीमूळ, शेवग्याचे बीज, काळी मिरी मिसळलेल्या ताकात बनविलेली यवागू सज्जीखार टाकून सेवन करण्याने जंत नष्ट होतात. 

विडंग-सैंधव-क्षार-कम्पिल्लक-हरीतकी- ।पिबेत्‌ तक्रेण संपिष्य सर्वक्रिमिनिवृत्तये ।।....भैषज्य रत्नाकर
 

वावडिंग, सैंधव, यवक्षार, कपिला, हिरडा यांचे चूर्ण ताकात मिसळून घेण्याने सर्व प्रकारे जंत नाहीसे होतात. 

जंतांवर पथ्यकर आहार - जुने लाल तांदूळ, कारले, परवर, शेवगा, बांबूचे अंकूर, मोहरीच्या पानांची भाजी, कच्च्या केळ्यांची भाजी, कात, कवठ, महाळुंग, ताक, कुळीथ, तूर, गोमूत्र वगैरे.

जंतांवर अपथ्यकर आहार - मैदा, अति प्रमाणात गहू, उडीद, चवळी, सीताफळ, रताळी, अळू, दही, मांसाहार, मिठाया, अति प्रमाणात दूध व दुधाचे पदार्थ, विरुद्ध आहार वगैरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com