प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
शुक्रवार, 1 जून 2018

मी  फॅमिली डॉक्‍टरमधील लेख कायम वाचते. मी २३ वर्षांची असून माझे केस फार गळतात. तसेच, चेहऱ्यावर बारीक पुळ्या सतत येत असतात. कृपया आपण सल्ला देऊन माझी समस्या सोडवावी.
... कु. अर्चना

मी  फॅमिली डॉक्‍टरमधील लेख कायम वाचते. मी २३ वर्षांची असून माझे केस फार गळतात. तसेच, चेहऱ्यावर बारीक पुळ्या सतत येत असतात. कृपया आपण सल्ला देऊन माझी समस्या सोडवावी.
... कु. अर्चना
उत्तर -
केस गळणे, चेहऱ्यावर पुळ्या येणे हे त्रास सहसा शरीरात उष्णता वाढण्याशी, अशक्‍ततेशी आणि स्त्री असंतुलनाशी निगडित असतात. त्यामुळे यावर फक्‍त बाहेरून नाही, तर आतूनही उपचार करायला हवेत. यादृष्टीने किमान तीन महिन्यांसाठी ‘हेअरसॅन’ व ‘संतुलन पित्तशांती’ या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू वापरण्याचा फायदा होईल. रोज सकाळी शतावरी कल्प टाकून दूध घेणे, खारीक, खसखस, घरी बनविलेले साजूक तूप यांचा आहारात समावेश असू देणे, सकाळी उठल्यावर पोट साफ होते आहे ना याकडे लक्ष देणे हेसुद्धा आवश्‍यक. आठवड्यातून कमीत कमी दोनदा केसांना ‘संतुलन व्हिलेज हेअर तेल’ लावण्याचा व केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, नागरमोथा यांसारख्या वनस्पतींचे मिश्रण किंवा तयार ‘संतुलन सुकेशा’ हा हेअर वॉश वापरण्याचा उपयोग होईल. चेहऱ्यालाही रात्री झोपण्यापूर्वी ‘संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल’ लावण्याचा व स्नानाच्या वेळी साबणाऐवजी मसुराचे पीठ किंवा ‘सॅन मसाज पावडर’ हे उटणे लावण्याचा फायदा होईल. अंगावरून पांढरे जाणे किंवा पाळी अनियमित येणे वगैरे त्रास असले तर तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे श्रेयस्कर होय.

************************************************
फॅमिली डॉक्‍टरमधून बहुमोल मार्गदर्शन करत असल्याबद्दल आपले व ‘सकाळ’चे अभिनंदन. मला उत्तरे तुमच्या प्रश्‍नांची या सदराचा खूप उपयोग झालेला आहे. माझ्या भावाला ४-५ वर्षांपासून एक हात थरथरण्याचा त्रास होतो आहे, हातात चमका येतात व त्या हाताने कामही करता येत नाही. बऱ्याच डॉक्‍टरांना दाखवले; पण नेमका दोष सापडला नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
... सौ. राऊत
उत्तर
- ४-५ वर्षांपासून त्रास होतो आहे आणि नेमके निदान झालेले नाही, तेव्हा भावाला तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. सहसा अशा त्रासावर वातशमनासाठी मृदू विरेचन, बस्ती, पिंड स्वेदन अशा उपचारांची योजना करावी लागते. तत्पूर्वी पाठीच्या कण्याला व हाताला रोज रात्री झोपण्यापूर्वी हलक्‍या हाताने ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्यास सुरवात करता येईल. नाकात ‘नस्यसॅन घृत’ टाकणे, ‘संतुलन वातबल’ गोळ्या, तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे हे उपायही सुरू करता येतील. वातदोषाचे शमन करून, हातातील नसांना ताकद मिळण्यासाठी ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ घेण्याचाही उपयोग होईल. मात्र वाताचे कोणतेही दुखणे अंगावर काढणे चांगले नसल्याने प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन नेमके उपचार सुरू करणे सर्वांत श्रेयस्कर.

************************************************
आपल्या अमूल्य मार्गदर्शनाचा माझ्याप्रमाणेच अनेकांना दैनंदिन जीवनात चांगला उपयोग होत असतो. मला गेल्या ४-५ वर्षांपासून आम्लपित्ताचा त्रास होतो, छातीत धडधड होते, चक्कर येते, शौचाला जाऊन आल्यावर चक्कर जास्त येते, तसेच थकवाही जाणवतो. माझे वय ३८ वर्षे आहे. नाशिकमध्ये एका वैद्यांना दाखवले असता त्यांनी धातुगत ज्वर, कोष्ठशुष्कता असे निदान केले. कृपया उपाय सुचवावा.
... श्री. अतुल 
उत्तर -
चांगल्या प्रतीचे भेसळविरहित गुळवेल सत्त्व मिळाले तर ते सकाळ- संध्याकाळ पाव-पाव चमचा या प्रमाणात दूध-साखरेसह घेण्याचा उपयोग होईल. उत्तम प्रतीची खात्री नसेल तर वैद्यांच्या सल्ल्याने ‘सॅन अमृत’ या गोळ्या घेतल्या तरी चालतील. चक्कर कमी होण्यासाठी बरोबरीने ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा, ‘सॅन ब्राह्मी’ या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. सकाळी गुलकंद, मोरावळा किंवा धात्री रसायन घेण्याचा उपयोग होईल. रोजच्या आहारात किमान ४-५ चमचे घरी बनविलेले साजूक तूप समाविष्ट करणे, रात्री झोपण्यापूर्वी कपभर कोमट पाण्यात चमचाभर तूप, चिमूटभर सैंधव मिसळून घेणेसुद्धा चांगले. मुगाची खिचडी, भात, ज्वारीची भाकरी, साजूक तुपात केलेल्या फळभाज्या यांसारख्या पचायला सोप्या; पण शक्‍तिवर्धक पदार्थांचा समावेश करणे चांगले.

************************************************
मी  २४ वर्षांचा असून माझा विवाह दोन महिन्यांपूर्वी झाला. बाळासाठी प्रयत्न करण्यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्ला घेण्यासाठी गेलो तेव्हा पत्नीला एकच किडनी असल्याचे समजले. तसा तिला काहीच त्रास होत नाही. मात्र, भविष्यात काही त्रास होईल का, याची भीती वाटते. सध्या आम्ही परदेशात आहोत. कृपया मार्गदर्शन करावे.... 
- श्री. महेश

उत्तर - किडनी एकच असली व ती पूर्ण क्षमतेने काम काम करत असली तर घाबरण्याचे कारण नाही. फक्‍त इतरांमध्ये जे काम विभागले जाते, त्याचे ओझे एकाच किडनीवर, हे समजून घेऊन किडनीवर अजून काम लादले जाईल असे खाणे, पिणे, औषधे घेणे वगैरे टाळणे चांगले होय. यादृष्टीने चवळी, गवार, रासायनिक खते वापरून उत्पादित केलेल्या भाज्या, फळे यांचा वापर टाळता येईल. प्यायचे पाणी कायम उकळून घेतलेले (२० मिनिटे) व गाळून घेतलेले असणे चांगले. शीतपेये, अतिप्रमाणात चहा-कॉफी किंवा तत्सम उत्तेजक पेये, तसेच रासायनिक औषधे घेणे टाळणेसुद्धा आवश्‍यक. किडनीला मदत करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उत्तम औषधे, रसायने (टॉनिक्‍स) असतात. त्यादृष्टीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे, पुनर्नवासव घेणे, गोक्षुरादी गुग्गुळ घेणे हे उपाय योजता येतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वयाच्या पस्तिशीच्या आसपास शास्त्रशुद्ध पंचकर्म करून घेतले व शरीरातील विषतत्त्वांचा निचरा करून घेतला की किडनीवर अतिरिक्‍त भार घेणे टाळता येईल, शिवाय किडनीची कार्यक्षमता सुधारण्यास, चांगली राहण्यासही मदत मिळेल.

************************************************
फॅमिली डॉक्‍टरमधून आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता. माझे जावई ५२ वर्षांचे आहेत व त्यांना दोन वर्षांपासून मायग्नेनचा तसेच कानात शिटी वाजण्याचा त्रास आहे. न्यूरॉलॉजिस्ट व इतर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या औषधांनीही बरे वाटत नाही. तरी कृपया मार्गदर्शन करावे.
... श्री. गुजराथी 

उत्तर - शरीरात कुठेही वेदना होत असल्या, अनैसर्गिक आवाज किंवा हालचाल होत असली, तर ते वात वाढण्याशी संबंधित असते. त्यातही कान हे वातदोष राहण्याचे एक स्थान आहे. स्वतःच्या घरात बिघडलेला वातदोष आटोक्‍यात आणणे तितकेसे सोपे नसते. मात्र, नियमित आणि योग्य उपचारांनी गुण येऊ शकतो. यात नुसती औषधे घेण्यापेक्षा पंचकर्माने शुद्धी करून घेऊन, त्यानंतर विशेष बस्ती, शिरोबस्ती घेण्याचा अधिक चांगला फायदा होताना दिसतो. यादृष्टीने जावयांना एकदा प्रत्यक्ष तपासणीसाठी  पाठवणे उत्तम ठरेल. तत्पूर्वी कानात ‘संतुलन श्रुती तेल’, नाकात ‘नस्यसॅन घृता’चे थेंब टाकण्याचा उपयोग होईल. नियमित पादाभ्यंग करण्याने मायग्रेनचा त्रासही कमी होईल. ‘संतुलन वातबल’, ‘संतुलन पित्तशांती’, प्रवाळपंचामृत घेणे, मायग्रेनमुळे डोके दुखते त्याठिकाणी ‘संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल’ लावणे, रोज सकाळी पंचामृत घेणे, तिखट, तेलकट, आंबवलेले पदार्थ, ढोबळी मिरची, वांगे, गवार, चवळी, वाटाणे, चणे, पावटा वगैरे वातूळ गोष्टी आहारातून टाळणे चांगले. वेळेवर जेवणे व रात्री अकरा ते सातच्या दरम्यान झोपणे, हेसुद्धा श्रेयस्कर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer