#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शन, तसेच सुचविलेले उपाय हे फारच उपयुक्‍त असतात व त्यांचा आम्हाला चांगला फायदा होतो. माझी मासिक पाळी एरवी नियमित असते, मात्र गौरी-गणपतीच्या दिवसांत पाळी येऊ नये यासाठी औषधे घेण्यात आली, तेव्हापासून पाळीमध्ये अधिक प्रमाणात रक्‍तस्राव होतो, तसेच अंगावरून पांढरेही जाते. सोनोग्राफीमध्ये सर्व व्यवस्थित असल्याचे समजले. कृपया मार्गदर्शन करावे.  ....श्रीमती खोले
उत्तर - पाळी पुढे-मागे होण्यासाठी अशा प्रकारे औषधे घेणे शक्‍यतो टाळणे चांगले होय. कारण यामुळे सोय झाली तरी नंतर स्त्रीसंतुलनावर दुष्परिणाम होऊ शकतात. सध्या होणाऱ्या त्रासाचा विचार करता तांदळाच्या धुवणासह पुष्यानुग चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. ‘अशोक-ॲलो सॅन’ या गोळ्या तसेच स्त्रीसंतुलन पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी तसेच गर्भाशय व एकंदर संपूर्ण प्रजननसंस्थेला ताकद देण्यासाठी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे, खालून ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे, दिवसातून दोन वेळा शतावरी कल्प मिसळलेले दूध घेणे हे सुद्धा उत्तम होय. तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे सर्वांत चांगले.  

-------------------------------------------------------------------------
माझे वय ३२ असून मी गृहिणी आहे. दोन मुले झाल्यावर परिवारनियोजनाचे शस्त्रकर्मही झाले. माझ्या पोट व नितंबाचा घेर वाढलेला आहे. सूर्यनमस्कार व चालणे सुरू ठेवले तरी वजन कमी होत नाही. लग्नाआधी मी खूप सडपातळ होते. कृपया काही उपाय सुचवावा. बाळंतपणाच्या वातामुळे असे होऊ शकते का?
....सुनिता 

उत्तर ः बाळंतपणानंतर वातशमनासाठी आवश्‍यक ते उपचार केले नाहीत, त्यातच शस्त्रकर्माची भर पडल्यामुळे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. नियमित चालणे व सूर्यनमस्कार चालू ठेवणे उत्तमच. बरोबरीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरण्याचा उपयोग होईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी वजन वाढलेल्या ठिकाणी ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ जिरवणे तसेच स्नानाच्या वेळी ‘सॅन मसाज पावडर’सारखे उटणे चोळून लावणे, तज्ज्ञ परिचारकाकडून उद्वर्तन, लेखन बस्ती करून घेणे, जेवणानंतर गरम पाणी-लिंबू हे मिश्रण पिणे, रात्रीच्या जेवणात कढण, सूप, मऊ खिचडी, मऊ भात, ज्वारीची भाकरी असे पचण्यास हलके पदार्थ योजणे हे सुद्धा उपयोगी पडेल.

-------------------------------------------------------------------------
शरीरात कफदोष वाढला तर लक्षणे काय असतात? आणि हा कफदोष कमी करण्यासाठी आहार-आचरणात काय काळजी घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे.   .... अभ्यंकर 
उत्तर ः शरीरात कफदोष वाढला की आळस, सुस्ती, शरीरात जडपणा, जखडलेपण, भूक न लागणे, खाल्लेले अन्न पचण्यास वेळ लागणे, छातीत कफ साठणे, डोके जड होणे यांसारखी अनेक लक्षणे उद्‌भवू शकतात. हा वाढलेला कफदोष कमी करण्यासाठी लंघन हा सर्वोत्तम उपाय असतो. भूक लागेल तेव्हा आणि भूक असेल तेवढ्याच प्रमाणात ताजे, गरम अन्न सेवन करणे, उकळलेले गरम पाणी पिणे, आहारात कडू, तिखट, तुरट या चवींचे प्रमाण अधिक ठेवणे, नियमित व्यायाम करणे, दिवसा न झोपणे यांसारखे उपाय योजता येतात. छातीत कफ किंवा खोकला झाला असला, तर मधाबरोबर सितोपलादी चूर्ण घेणे, ‘ब्राँकोसॅन’ किंवा‘ सॅन कफ सिरप’ घेणे, वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्राणसॅन योग’, श्वासकुठारसारखी औषधे घेणे असे उपायही योजता येतात.

-------------------------------------------------------------------------

माझे दोन्ही गुडघे दुखतात, शिवाय उजव्या पायामध्ये कंबरेच्या मणक्‍यापासून ते टाचेपर्यंत वेदना होतात. उजव्या पायाची मांडी व पोटरी कडक होते. तेल लावले की तात्पुरते बरे वाटते. उन्हाळ्यातही त्रास होतोच. कृपया उपाय सुचवावा.  .... कुटे
उत्तर - एकंदर सर्व लक्षणांवरून वातदोष कमी करण्यासाठी उपाय योजायला हवेत. वातदोषासाठी अभ्यंग हा सर्वोत्तम उपाय असतो. त्यामुळे दुखत असो वा नसो, पाठीला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ आणि दोन्ही  पायांना ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ रोज रात्री झोपण्यापूर्वी लावणे चांगले. तूप-साखरेत मिसळून ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, ‘संतुलन वातबल गोळ्या’, योगराज गुग्गुळ घेण्याचाही उपयोग होईल. वातशामक द्रव्यांबरोबर सिद्ध केलेल्या तेलाची बस्ती घेणे, तज्ज्ञ आयुर्वेदिक परिचारकाकडून पोटली मसाज करून घेणे हे सुद्धा चांगले. आहारात किमान चार-पाच चमचे साजूक तुपाचा समावेश करणे, वांगे, गवार, ढोबळी मिरची, वाटाणा, पावटा, चणा वगैरे वातूळ गोष्टी आहारातून वर्ज्य करणे हे सुद्धा उत्तम होय.

-------------------------------------------------------------------------

माझे वय २५ वर्षे आहे. थायरॉइडसाठी गोळी चालू आहे. गोळी घेतली की थायरॉइडचे रिपोर्टस्‌ व्यवस्थित येतात, मात्र माझे केस खूप गळतात. कृपया यावर उपाय सुचवावा.  ...  रूपाली 
उत्तर - गोळी घेऊन रिपोर्टस्‌ व्यवस्थित आले तरी मुळात थायरॉइड ग्रंथीच्या अकार्यक्षमतेचे दुष्परिणाम शरीराला सोसावेच लागतात. म्हणून काही दिवस गोळी घ्यावी लागली तरी बरोबरीने ग्रंथीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, योग्य ते उपचार घेणे अत्यावश्‍यक असते. यासाठी वैद्यांचे मार्गदर्शन घेणे सर्वोत्तम. बरोबरीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे, अनुलोम-विलोम, ज्योतिध्यान करणे, रासायनिक मिठाऐवजी नैसर्गिक मीठ किंवा सैंधव मीठ वापरणे हे उपाय सुरू करता येतात. केसांसाठी ‘हेअरसॅन’ गोळ्या, ‘संतुलन व्हिलेज सिद्ध तेल’, ‘संतुलन सुकेशा’ हा हेअर वॉश वापरणे हितावह होय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com