esakal | #FamilyDoctor प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सदतिसाव्या वर्षी माझे गर्भाशय काढावे लागले, तेव्हापासून थोडी चिडचिड वाढल्यासारखी वाटते. जास्त वेळ बसले किंवा पाठीवर झोपले तर पाठीला रग लागते. तसेच शस्त्रकर्मानंतर पोट वाढण्यासही सुरुवात झाली आहे. या सर्वांवर काही उपाय सुचवावा.
... देशमुख

उत्तर - स्त्रीआरोग्य, स्त्रीसंतुलन यासाठी गर्भाशय हा एक महत्त्वाचा आधार असतो. त्यामुळे शक्‍यतो गर्भाशय गमवावे लागू नये यासाठी प्रयत्न करणे चांगले असते. मात्र काही अपरिहार्य कारणाने गर्भाशय काढावे लागले तर स्त्रीसंतुलन बिघडू नये, वाढलेला वातदोष कमी व्हावा यासाठी योग्य उपचार वेळीच घेणे आवश्‍यक होय. आत्ताही नियमित अभ्यंग करणे, विशेषतः पोटावर, नितंबावर ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तीळ तेल’ जिरवणे, स्नानाच्या वेळी ‘सॅन मसाज पावडर’ चोळून लावणे, ‘फेमिसॅन तेला’चा पिचू रोज वापरणे, चालायला जाणे, स्त्रीसंतुलनाला मदत करणारी समर्पण, फुलपाखरू, अनुलोम-विलोम, पश्‍चिमोत्तानासन यासारखी योगासने करणे; ‘संतुलन वातबल’ गोळ्या घेण्याने तसेच पाठीला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याने पाठीला रग लागणे कमी होईल. टाइम्स म्युझिक द्वारा प्रकाशित ‘स्त्रीसंतुलन’ हे खास स्त्रियांसाठी बनविलेले संगीत रोज एकदा ऐकण्याने चिडचिड कमी होण्यास तसेच एकंदर आरोग्य चांगले राहण्यासही उत्तम हातभार लागतो असा अनुभव आहे.

---------------------------------------------------------------------
आम्हाला नऊ वर्षांची मुलगी आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांपासून दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करतो आहेत. माझी पाळी सुरुवातीपासून अनियमित आहे. मुलीच्या वेळी सुद्धा दोन-तीन महिने औषधे घेऊनच गर्भधारणा झाली होती. सध्याही स्त्रीबीज कधी नीट तयार होते, कधी होत नाही. पाळी कधी नियमित येते, कधी दोन-तीन महिने येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
..... रेखा

उत्तर - गर्भधारणा होण्यासाठी व नंतर नऊ महिने गर्भाचा विकास व्यवस्थित होऊन निरोगी बाळ जन्माला येण्यासाठी स्त्रीसंतुलन नीट असणे, स्त्रीबीज व पुरुषबीज सशक्‍त असणे, गर्भाशय व एकंदर स्त्रीप्रजनन संस्थेचे काम सुरळीत चालू राहणे हे गरजेचे असते. आणि याचे एक मुख्य निदर्शक लक्षण म्हणजे नियमित पाळी व स्त्रीबीज आपणहून किंवा नैसर्गिक उपचारांच्या मदतीने तयार होणे. यासाठी रोज सकाळी चमचाभर ताजा कोरफडीचा गर घेणे, जेवणानंतर ‘संतुलन फेमिनाइन बॅलन्स’ आसव घेणे,‘ सॅन रोझ’, शतावरी कल्प ही रसायने घेणे, ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे हे उपाय सुरू करता येतील. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी करून उत्तरबस्ती करून घेणे सर्वांत चांगले. शरीरावर जबरदस्ती न करता नैसर्गिक उपायांच्या मदतीने शरीरशक्‍ती वाढवली की गर्भधारणा सहजपणे होते तसेच आई व बाळ दोघांचेही आरोग्य उत्तम राहते असा आजपर्यंतचा अनुभव आहे.

---------------------------------------------------------------------

माझे वजन जास्ती आहे. जास्त वजनामुळे अंग दुखणे, पोटऱ्यांत गोळे येणे, अंगाची डावी बाजू दुखणे यासारखे त्रास होऊ शकतात का? कृपया उपाय सुचवावा.
... देखमुख
उत्तर -
प्रश्नात उल्लेखलेले सर्व त्रास तसेच वाढलेले वजन हे सुद्धा वातदोषातील बिघाडाचे निदर्शक आहे. त्यामुळे वातामुळे हे सर्वच त्रास होऊ शकतात. यावर उत्तम उपाय म्हणजे अंगाला ’संतुलन अभ्यंग सिद्ध तीळ तेल’ व पाठ-मानेला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावणे. बऱ्याचदा जेवण वेळेवर होत नसले, रात्रीची जागरणे जास्ती होत असली तरी वात वाढून हे त्रास होऊ शकतात. तसेच फार मानसिक किंवा मानसिक श्रम होणार नाहीत याकडे लक्ष ठेवणेही चांगले. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वातशामक व मेदनाशक बस्ती घेण्याचा, उद्वर्तन म्हणजे विशेष औषधी चूर्णाच्या साहायाने मसाज घेण्याचा, योगराज गुग्गुळ, ‘संतुलन वातबल’ गोळ्या, ‘कॅल्सिसॅन’ गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल.

---------------------------------------------------------------------

मधुमेह असणाऱ्या व्यक्‍तीला जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही, पण चुकून जखम झालीच तर लगेच काय उपाय योजायला पाहिजेत?
..... शर्मा
उत्तर -
रक्‍तात साखरेचे प्रमाण वाढलेले असले की जखम लवकर भरून येत नाही हे खरे, मात्र अनुभव असा आहे की ज्या व्यक्‍ती साखर फक्‍त कमी करण्यापेक्षा मधुमेहाची संप्राप्ती तोडण्यासाठी, मधुमेहामुळे अजून समस्या उद्भवू नयेत यासाठी उपचार घेत असतात, त्यांच्यामध्ये जखम भरून येणे सोपे असते. कारण मधुमेहावर काम करणारी हळद, दारुहळद, आवळा, किराततिक्‍त यासाखी द्रव्ये शरीरातील अतिरिक्‍त ओलावा (क्‍लेद) कमी करण्यास सक्षम असतात व त्यामुळे जखम भरून येण्यात अडथळा राहात नाही. त्यामुळे मधुमेहाचे निदान झाले की फक्‍त साखर नियंत्रणात ठेवणे हा एकच उद्देश न ठेवता मधुमेहाच्या मुळावर उपचार करणे हा उद्देश ठेवणे हे एकंदर आरोग्यासाठी उत्तम असते. तरीही जखम झालीच तर रक्‍तस्राव थांबल्यावर तूप-मधाचे मिश्रण लावणे, ‘सॅनहील मलम’ लावणे श्रेयस्कर. वैद्याच्या सल्ल्याने ‘संतुलन आत्मरस’ घेणे चांगले. जखम खोलवर असली तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे.

---------------------------------------------------------------------
माझे वय २८ वर्षे आहे. मला एका महिन्यापासून रोज रात्री अंगावर पित्त उठते, खाजही येते. यामुळे झोपही नीट लागत नाही. सकाळी उठल्यावर पोटात उष्णता जाणवते. मी आहारात सध्या वरण-भात, तांदळाची भाकरी घेते आहे. पण त्रास होतोच आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
... जोशी
उत्तर -
आहारात बदल करणे चांगलेच. वरण करण्यासाठी तुरीऐवजी मुगाची डाळ वापरणे चांगले. तेलाऐवजी घरी बनविलेले साजूक तूप वापरणे हे सुद्धा चांगले. पोटातील उष्णता, शरीरात वाढलेले पित्त निघून जाण्यासाठी जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण घेणे किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे, सकाळ-संध्याकाळ कामदुधा व ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेणे, आठ-दहा दिवसांतून एकदा दोन चमचे एरंडेल घेऊन पोट साफ होऊ देणे, सकाळी उठल्यावर मूठभर साळीच्या लाह्या खाणे हे उपाय योजता येतील. बऱ्याचदा भुकेकडे दुर्लक्ष होणे हे पित्त वाढण्याचे एक मुख्य कारण असते. त्यामुळे मुगाचा लाडू, लाह्या, राजगिऱ्याची चिक्की यापैकी काहीतरी कायम जवळ असू देणे आणि भूक लागली की लगेच खाणे हे चांगले. या उपायांनी बरे वाटलेच, तरीही एकदा वैद्यांच्या मार्गदर्शनाने शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्मोक्‍त विरेचन करून घेणे श्रेयस्कर.