प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 7 December 2018

माझे वय ५८ वर्षे असून, मला कोणताही मोठा व्याधी नाही. अधूनमधून मला पित्ताचा व उष्णतेचा त्रास होतो. पोटात गरमपणा जाणवतो, तसेच घशात सूज व गिळताना त्रास होतो. यावर मी वैद्यांच्या सल्ल्याने साधा सूतशेखर व कामदुधा घेते आहे. घशातील सूजेवर आपण काही वेगळे औषध सुचवाल का? ...सौ. सुनंदा 

माझे वय ५८ वर्षे असून, मला कोणताही मोठा व्याधी नाही. अधूनमधून मला पित्ताचा व उष्णतेचा त्रास होतो. पोटात गरमपणा जाणवतो, तसेच घशात सूज व गिळताना त्रास होतो. यावर मी वैद्यांच्या सल्ल्याने साधा सूतशेखर व कामदुधा घेते आहे. घशातील सूजेवर आपण काही वेगळे औषध सुचवाल का? ...सौ. सुनंदा 
उत्तर - शुद्ध वंशलोचनापासून बनविलेले चांगल्या प्रतीचे सितोपलादी चूर्ण गरम पाण्याबरोबर घेण्याने (उदा. ‘संतुलन सितोपलादी’) घेण्याने घशाची सूज कमी होते व गिळताना होणारा त्रासही कमी होतो. साधा सूतशेखर व कामदुधा घेणे चालू ठेवता येईल. रोजच्या आहारात साळीच्या लाह्या, राजगिरा, घरी बनविलेले साजूक तूप या गोष्टी समाविष्ट करण्याचाही फायदा होईल. ‘संतुलन सुमुख सिद्ध तेल’ ८-१० मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवले, अधूनमधून गालातल्या गालात खुळखुळवले, तर त्यामुळेही घसा दुखणे, गिळताना त्रास होणे या तक्रारी कमी होतील.

********************************************

माझे दोन्ही गुडघे दुखतात, यामुळे मी जास्ती वेळ उभा राहू शकत नाही, अधिक अंतर चालू शकत नाही. चालताना गुडघ्यांमधून कटकट आवाज येतो. आळीपाळीने दोन्ही गुडघे दुखतात. थोडेही जास्ती खाल्ले, तर अपचन होते, उपाशी असेपर्यंत बरे वाटते. माझे वय ४६ वर्षे आहे. माझी रक्‍तदाबासाठी एक गोळी सुरू आहे. कृपया मार्गदर्शन करावे. ....श्री. चंद्रकांत पाटील 
उत्तर -
वयाच्या मानाने त्रासाची तीव्रता बरीच आहे. रक्‍तदाबसुद्धा आहे तेव्हा यावर वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्‍त पंचकर्म करून घेणे आणि शरीराला पुन्हा सशक्‍त, पुनर्जीवित करणे सर्वांत चांगले. बरोबरीने तूप-साखरेत मिसळून ‘संतुलन प्रशांत’ चूर्ण, ‘संतुलन वातबल’ गोळ्या, दशमूलारिष्ट घेण्याचा उपयोग होईल. दिवसातून २-३ वेळा गुडघ्यांवर ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ जिरविण्याचा उपयोग होईल. जेवताना, तसेच एरवीही अगोदर उकळलेले गरम पाणी पिणे, दोन्ही जेवणानंतर पाव किंवा अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण घेणे, काही दिवसांसाठी जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या घेणे या उपायांचाही फायदा होईल. 

********************************************
फॅमिली डॉक्‍टरमध्ये सांगितलेल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या माहितीचा आम्ही वेळोवेळी उपयोग करून घेत असतो. मला असे विचारायचे आहे, की बीपीची गोळी बंद करता येऊ शकते का? कशी? कृपया उत्तर द्यावे....श्री. जगदाळे
उत्तर -
बीपीची गोळी म्हणजे वाढलेला रक्‍तदाब कमी करण्यासाठी घ्यायची गोळी. जर मुळातच रक्‍तदाब वाढत नसला, तर अशी गोळी घेण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आहार, आयुर्वेदिक औषध, उपचार, योगासने, सकारात्मक मानसिकता या सर्वांच्या योगे जर रक्‍तदाब सुस्थितीत राहिला, तर क्रमाक्रमाने रक्‍तदाबाची गोळी कमी करता येते. अनेक केसेसमध्ये पंचकर्मानंतर गोळी पूर्णतः बंद झालेली दिसते. अर्थात, प्रत्येकाच्या उच्चरक्‍तदाबामागे वेगवेगळे कारण असते. उदा. रक्‍ताभिसरण कमी असणे, वजन जास्ती असणे, मूत्रसंस्थेत दोष असणे, अतिमानसिक ताण असणे वगैरे. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या प्रकृतीनुसार योग्य निदान करून त्यानुसार योग्य उपचार, जीवनशैलीत अनुकूल बदल करणे आवश्‍यक असते. नियमित पादाभ्यंग, अंगाला अभ्यंग तेलाचा अभ्यंग, रात्री झोपण्यापूर्वी ‘नस्यसॅन घृता’चे नस्य, हे काही उपाय उच्चरक्‍तदाबावर हमखास उपयोगी ठरतात. 

********************************************

या अगोदरही मला आपल्या मार्गदर्शनाचा खूप लाभ झाला. याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत. आता मला योनीद्वारा पांढरे पाणी जाण्याचा त्रास होतो आहे. माझे वय ४४ वर्षे आहे आणि पाच वर्षांपूर्वी माझे गर्भाशय काढलेले आहे. तेव्हापासून मला फार अशक्‍तपणा जाणवतो. कृपया मार्गदर्शन करावे......
श्रीमती मनाली.
उत्तर -
आपल्या आभारांबद्दल धन्यवाद. गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सल्ला घेतला असता, तर कदाचित गर्भाशय वाचले असते आणि सध्या होतो तो त्रास, अशक्‍तपणा हे सर्व टाळता आले असते. अजूनही स्त्री संतुलनासाठी आणि गर्भाशय गमावल्यामुळे शरीराचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग करून घेता येईल. यादृष्टीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी, ‘सॅन रोझ’ रसायन सुरू करता येईल. रोज सकाळ-संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा पुष्यानुग चूर्ण मधात मिसळून घेतले व वरून कपभर तांदळाचे धुवण घेतले, तर  त्यानेही अंगावरून पांढरे जाणे कमी होईल. काही दिवस ‘अशोक-ॲलो सॅन’ गोळ्या घेण्याचा, तसेच जेवणानंतर अशोकारिष्ट घेण्याचा फायदा होईल. गर्भाशय काढावे लागलेले आहेत, निदान हा त्रास तरी पूर्ण बरा होण्यासाठी आवश्‍यक ते प्रयत्न नक्की करावेत, हे चांगले. 

********************************************

मी २८ वर्षांची आहे. अकरावीत असल्यापासून मला अंगावर पित्ताच्या गांधी उठण्यास सुरुवात झाली. यावर मी सर्व प्रकारची औषधे घेतली, आत्ताही डॉक्‍टरांच्या सल्ल्याने मी ॲलर्जीची गोळी घेते, पण यामुळे दोन दिवस बरे वाटते, नंतर पुन्हा पुरळ येतात. अधूनमधून पित्ताच्या उलट्या, डोकेदुखी हेही त्रास होतात. मला या सर्वांमुळे फार त्रास होतो. कृपया योग्य मार्गदर्शन करावे.....कु. राशी
उत्तर -
या प्रकारच्या त्रासावर आहार नियमन व औषधे यांच्या समन्वयातून चांगला परिणाम साधता येतो. औषधांबद्दल सांगायचे झाले, तर जेवणानंतर ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा, प्रवाळपंचामृत या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचाही उपयोग होईल. दुधाबरोबर ‘संतुलनचा अनंत’ कल्प, ‘अनंतसॅन’ गोळ्या घेता येतील. आहाराच्या बाबतीत काही दिवस गव्हाऐवजी तांदूळ व ज्वारी या धान्यांचा वापर करणे, डाळींमध्ये फक्‍त मुगाची डाळ खाणे आणि फक्‍त वेलीवर्गीय फळभाज्या  उदा. दुधी, तोंडली, घोसाळी, दोडके, परवर, पडवळ, कारले, कोहळा वगैरे भाज्यांना साजूक तुपाची साधी फोडणी देऊन तयार केलेल्या भाज्या सेवन करणे यांचा उपयोग होईल. रोजच्या आहारात साळीच्या लाह्या, घरी बनविलेले साजूक तूप, खडीसाखर, ताज्या आवळ्याचा रस, गुलकंद, काळ्या मनुका वगैरेंचा समावेश करणे हेसुद्धा उत्तम.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer