प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये वाचून कुंडलिनी तेलाचा वापर केल्याने माझ्या पत्नीचा मणक्‍याचा विकार पूर्णपणे बरा झाला, याबद्दल आपले आभार. माझा प्रश्न असा आहे की, माझ्या मुलाचे वय नऊ वर्षे असून त्याच्या हृदयाला छिद्र असल्यामुळे त्याचे शस्त्रकर्म केलेले आहे. मात्र त्याला सतत सर्दी, पडसे, खोकला यांचा त्रास होतो. त्याला दोन वेळा न्यूमोनियाचाही त्रास झाला आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
..... संतोष वनारसे

उत्तर - अशा प्रकारच्या केसेसमध्ये शस्त्रकर्म केलेले असले तरी बरोबरीने हृदयाला ताकद देण्यासाठी, शरीराची एकंदर ताकद, प्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी उपाय करणे गरजेचे असते. यादृष्टीने मुलाला रोज रात्री झोपण्यापूर्वी ‘संतुलन अभ्यंग (खोबरेल) सिद्ध तेला’चा संपूर्ण अंगाला अभ्यंग करण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा छातीला अगोदर तेल लावून वरून रुईच्या पानांनी शेक करण्याचाही फायदा होईल. रोज सकाळ-संध्याकाळ पाव-पाव चमचा सितोपलादी चूर्ण आणि पाव-पाव चमचा ‘कार्डिसॅन प्लस चूर्ण’ मधात मिसळून दिवसातून दोन वेळा घेण्याचा, ‘संतुलन च्यवनप्राश’ घेण्याचा उपयोग होईल. या उपायांनी बरे वाटेलच, मात्र हृदयाचे शस्त्रकर्म झालेले आहे, त्यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे उत्तम.  

मी  ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीचा नियमित वाचक आहे. माझे वय ५४ वर्षे असून मला गेल्या दोन वर्षांपासून सांधेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. इतक्‍यात रक्‍ताची तपासणी केली, त्यात कोलेस्टेरॉल २२६ इतके आढळले आहे. तरी यावर उपाय व पथ्य-अपथ्य याविषयी कृपया मार्गदर्शन करावे.
..... कमलाकर शिर्के
उत्तर -
  कोलेस्टेरॉल २२६ असेल तर त्याची चिंता करण्याची गरज नाही. रात्रीचे जेवण वेळेवर व पचायला हलके ठेवले तर कोलेस्टेरॉल प्रमाणापेक्षा जास्ती वाढत नाही, असा अनुभव आहे. सांधेदुखीवर घरच्या साजूक तुपाबरोबर ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल, ‘संतुलन वातबल’ गोळ्या घेता येतील. सांध्यांवर दिवसातून एक-दोन वेळा ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ हलक्‍या हाताने चोळून लावण्याचाही उपयोग होईल. चांगले दूध, खारीक, खसखस, बदाम, घरी बनविलेले साजूक तूप यांचा आहारात समावेश करण्याचा उपयोग होईल. या उलट चवळी, चण्याची डाळ, राजमा, वाल, कोबी, फ्लॉवर, मैद्याचे पदार्थ, बेकरी उत्पादने, तळलेले पदार्थ खाणे टाळण्याचा फायदा होईल.  

मी, माझे संपूर्ण कुटुंब, तसेच माझे सर्व मित्र-मैत्रिणी ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या वाचक आहोत आणि आम्हा सर्वांना याचा खूप छान उपयोग होतो. माझा प्रश्न असा आहे, की दिवसातून किती वेळा खावे? रात्री जेवण किती वाजता करावे आणि रात्रीच्या जेवणानंतर चालण्यास जावे की नाही? ... संतोष 
उत्तर -
सर्वसाधारणतः दिवसातून तीन-चार वेळा खाणे चांगले असते. म्हणजे सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान नाश्‍ता, साडेबारा-एकच्या दरम्यान दुपारचे जेवण, संध्याकाळी पाच-साडेपाचला पुन्हा हलका नाश्‍ता आणि रात्री आठ-साडेआठच्या दरम्यान रात्रीचे जेवण अशा प्रकारे जेवणाच्या वेळा ठरवून घेणे चांगले होय. यात दुपारचे जेवण भाजी-पोळी, वरण-भात, कोशिंबीर ताक वगैरे सर्व पदार्थांचा समावेश असावा. रात्रीचे जेवण दुपारच्या निम्म्या प्रमाणात असावे. काही प्रकृती किंवा काही रोगांमध्ये या सामान्य नियमांत बदल करणे आवश्‍यक असते. यासाठी एकदा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ला घेणे चांगले. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे श्रेयस्कर ठरते.

‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीचा ७५० वा अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभीष्टचिंतन. उत्तरोत्तर आम्हाला असेच दर्जेदार व उपयुक्‍त मार्गदर्शन मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना. माझा प्रश्न असा आहे की, माझी एकंदर तब्येत सुधारण्यासाठी गरम पाण्यातून डिंक व हळद घेतले तर चालेल का? का डिंक तळून खाणेच चांगले असते. कृपया मार्गदर्शन करावे. ... सुचित्रा
उत्तर -
 बाभळीचा चांगल्या प्रतीचा डिंक तब्येतीसाठी चांगला असतो. मात्र कच्चा डिंक मलावष्टंभ करणारा असल्याने प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्‍तीसाठी अनुकूल असेलच असे नाही. मात्र साजूक तुपात तळून घेतलेला डिंक म्हणजेच डिंकाची लाही ही सर्वांना अनुकूल असते. त्यामुळे तळलेला डिंक, खारीक, खसखस वगैरे घटक आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून तयार केलेला लाडू  खाणे उत्तम होय. प्यायचे पाणी उकळून घेतलेले असणे व गरम असताना पिणे हे उत्तम होय. ओली हळद, आले, लिंबू, मीठ यांपासून तयार केलेले लोणचे जेवताना घेणे सुद्धा चांगले.

‘फॅमिली डॉक्‍टर’ मधील उपाय खूप छान असतात, त्यांचा आम्हाला खूप उपयोग होतो. माझा प्रश्न असा आहे की, मी मेनोपॉझच्या जवळ आहे, वजन वाढायला सुरुवात झाली आहे. योनीच्या ठिकाणी खाज येते, कोरडेपणा जाणवतो. कृपया यावर उपाय सुचवावा. ... सुचित्रा प्रधान
उत्तर -
 पाळी जाताना शरीरात अनेक बदल होत असतात आणि हे बदल सहजतेने व्हावेत यासाठी उपाय योजता येतात. स्त्रीसंतुलनासाठी सर्वांत उत्तम उपाय म्हणजे ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे, तसेच आठवड्यातून दोन-तीन वेळा ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे. यामुळे खाज, कोरडेपणा या दोन्ही तक्रारी लागलीच कमी होतील. याव्यतिरिक्‍त या दिवसांमध्ये नियमित चालायला जाणे, अनुलोम-विलोम करणे, सकाळ-संध्याकाळ पाच-पाच मिनिटांसाठी ज्योतिध्यान करणे या उपायांचा चांगला उपयोग होईल. वजन अजून वाढू नये, पूर्ववत व्हावे यासाठी अंगाला नियमित अभ्यंग करण्याचा उपयोग होईल. चंद्रप्रभा, त्रिफळा गुग्गुळ, ‘संतुलन वातबल’ ही औषधे घेण्याचाही उपयोग होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com