प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

माझे वय ४६ आहे. मला पाच वर्षांपासून मधुमेह आहे. मधुमेह झाल्यापासून माझी दृष्टी कमजोर झाली आहे. सध्या डोळे लाल होतात. मधुमेहासाठी मी एक गोळी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घेतो. तरी आयुर्वेदिक औषध सुचवावे ही विनंती.
- भास्कर भिसे

माझे वय ४६ आहे. मला पाच वर्षांपासून मधुमेह आहे. मधुमेह झाल्यापासून माझी दृष्टी कमजोर झाली आहे. सध्या डोळे लाल होतात. मधुमेहासाठी मी एक गोळी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घेतो. तरी आयुर्वेदिक औषध सुचवावे ही विनंती.
- भास्कर भिसे

उत्तर -  मधुमेहावर फक्‍त रक्‍तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध घेणे पुरेसे ठरत नाही, तर शरीरधातूंची झीज होऊ नये यासाठी बरोबरीने प्रयत्न करणे भाग असते. आयुर्वेदाच्या मदतीने या दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप आणि मधुमेहाची संप्राप्ती मोडणारी औषधे सुरू करणे श्रेयस्कर. बरोबरीने डोळ्यांच्या शक्‍तीसाठी व आरोग्यासाठी ‘संतुलन सुनयन घृत’ घेण्याचा उपयोग होईल, नियमित पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा, एक चमचा मध व अर्धा चमचा तूप हे मिश्रण घेण्याचाही फायदा होईल. मधुमेहामुळे इतर महत्त्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होऊ नये यासाठी तसेच मूळ मधुमेह आटोक्‍यात राहावा यासाठी पंचकर्म करून घेणे उत्तम असते. या दृष्टीने  २२ दिवसांचे संतुलन पंचकर्म, त्यात शरीरशुद्धीच्या बरोबरीने नेत्रबस्ती करून घेण्याचा फायदा होईल.

माझ्या आईचे वय ५० वर्षे असून एक वर्षापूर्वी तिची रजोनिवृत्ती झाली. मात्र तिला हवामान थंड असूनही खूप गरम होते. घामही खूप येतो. यामुळे तिची मानसिकता अस्वस्थ राहते. हे सर्व कशामुळे? यावर काय उपाय करावा?
- सुरनीस
उत्तर -
रजोनिवृत्ती झाली तरी त्यापाठोपाठ होणारे स्त्रीसंतुलनातील बदल हे याप्रकारच्या त्रासाला कारणीभूत असतात. हा बदल सहजतेने व्हावा यासाठी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी यांचा वापर करता येईल. बरोबरीने चंद्रप्रभा, कामदुधा, ‘कॅल्सिसॅन’, ‘सॅनरोझ’ रसायन घेण्याचा उपयोग होईल. अनुलोम-विलोम हा प्राणायाम, सकाळ-संध्याकाळ पाच-पाच मिनिटांसाठी ज्योतिध्यान, ‘संतुलन अमृत क्रिया’ याप्रकारे योग करण्याचाही फायदा होईल. स्त्रीसंतुलनाला मदत होण्यासाठी विशेष स्तोत्र-मंत्ररचना, वीणावादन वगैरेंचा समावेश असणारी ‘स्त्री-संतुलन’ ही सीडी ऐकण्याचाही उपयोग होईल. 

माझ्या आईला चालताना व उभे राहताना खूप त्रास होतो. गुडघे व पाय दुखतात. तिचे वय ६५ वर्षे आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
- भूपेंद्र चौधरी
उत्तर -
 वय वाढले तरी त्यामुळे शरीराच्या ताकदीवर व आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी शास्त्रशुद्ध पंचकर्म हा उत्तम व अनुभवाचा उपाय आहे. तेव्हा वातदोष कमी होण्यासाठी तसेच शरीरशक्‍ती सुधारण्यासाठी मृदू विरेचन, बस्ती, त्याआधी स्नेहन-स्वेदन-घृतपान हे उपचार करून घेणे सर्वांत चांगले. तत्पूर्वी आईला ‘संतुलन वातबल’ गोळ्या तसेच ‘कॅल्सिसॅन’ गोळ्या देता येतील. गुडघ्यांना संतुलनचे ‘शांती सिद्ध तेल’ आणि पायांना खरे, तर संपूर्ण अंगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. दूध, खसखस, बदाम, घरी बनविलेले साजूक तूप, डिंकाचे लाडू यांचा आहारात समावेश असू द्यावा. वातूळ अन्न टाळावे हे चांगले.  

प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपण जे मोलाचे मार्गदर्शन करता त्याचा आम्हाला नेहमीच फायदा होतो. प्रश्न असा आहे की, माझा मुलगा २२ वर्षांचा आहे. लहानपणी त्याला बालदमा होता, नंतरही इन्हेलर घ्यावा लागत असतो. बारावीत असताना त्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या. सततच्या गोळ्या-औषधांमुळे त्याची प्रतिकारशक्‍ती खूप कमी झाली आहे. त्याला खूप अशक्‍तता जाणवते. कृपया मार्गदर्शन करावे.
श्रद्धा
उत्तर -  
मुलाला अनेक वर्षांपासून दम्याचा त्रास आहे. तो फक्‍त नियंत्रणात ठेवण्यापेक्षा मुळापासून बरा कसा होईल हे पाहणे, त्यादृष्टीने योग्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे. यादृष्टीने मुलाला वैद्यांच्या सल्ल्याने श्वासकुठार, ज्वरांकुश, संतुलनचे ‘प्राणसॅनयोग’ हे चूर्ण मधाबरोबर देण्याचा उपयोग होईल. अशक्‍तपणा कमी होण्यासाठी संपूर्ण अंगाला नियमित अभ्यंग करण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा छाती-पाठीला अगोदर ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावून नंतर रुईच्या पानांचा शेक करण्याचा उपयोग होईल. सकाळ-संध्याकाळ ‘ब्राँकोसॅन सिरप’ घेण्याचाही फायदा होईल. प्रतिकारशक्‍ती चांगली राहावी, याशिवाय फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारावी यासाठी ‘सॅन रोझ’ रसायन सकाळ-संध्याकाळ घेणे, प्यायचे पाणी उकळून घेतलेले असणे, शक्‍य असल्यास सुवर्णसिद्ध करून घेणे हे सुद्धा उत्तम.

माझ्या मुलाचे दोन्ही पाय व्हेरिकोज व्हेन्समुळे भरले होते, काळेही पडले होते. ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये वाचून मी मुलाला सकाळ-संध्याकाळ सुवर्णसिद्धजल द्यायला सुरुवात केली, तर एका महिन्यात शिरा पूर्ववत झाल्या, काळा रंग फिका पडू  लागला. माझ्या एका मित्रालाही व्हेरिकोज व्हेन्समुळे पायावर जखमा झाल्या होत्या, त्यांनाही खूप चांगला गुण आला. महिन्याभरात एका पायाची जखम पूर्ण भरून आली, बॅंडेज करण्याचाही आवश्‍यकता राहिली नाही. सुवर्णसिद्धजल दीर्घकाळ घेतले तर चालते का?
डॉ. कुलकर्णी
उत्तर -
 सुवर्णसिद्धजल कायम घेतले तरी उत्तमच असते. सुवर्ण रसायनांनी युक्‍त असल्याने त्याचे इतर कोणतेही दुष्परिणाम नाहीत. रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहावी, हृदय, मेंदू वगैरे महत्त्वाच्या अवयवांचे आरोग्य उत्तम राहावे, रक्‍ताभिसरणाला मदत मिळावी म्हणून सुवर्णासारखे दुसरे औषध नाही. याच्याबरोबरच संतुलनचे ‘जलसंतुलन’ वापरण्याचेही अनेक फायदे मिळतात. व्हेरिकोज व्हेन्सवर असाच एक प्रभावी उपाय म्हणजे पायांना खालून वर या दिशेने हलक्‍या हाताने अभ्यंग करणे. व्हेरिकोज व्हेन्सची सुरुवात होते आहे असे लक्षात आले की, लगेचच पायांना ‘संतुलन अभ्यंग खोबरेल सिद्ध तेल’ लावण्याची सुरुवात केली तर त्रास वाढत नाही, उलट व्हेन्स पुन्हा पूर्ववत होतात असा अनेकांचा अनुभव आहे. जखमा असतील तर प्रथम त्या भरून आणण्यासाठी उपाय करावे लागतात, नंतर अभ्यंगाच्या साहाय्याने चांगली सुधारणा होऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer