प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीतून आम्हाला फार उपयुक्‍त माहिती मिळते. माझी अडचण अशी आहे की, मला गेल्या तीन आठवड्यांपासून डाव्या तळपायाला कुरूप झाले आहे. अनवाणी  पायाने चालल्यास कुरुपाच्या ठिकाणी दुखते. तरी यावर आयुर्वेदिक उपाय सुचवावा.... कृष्णनाथ राजगुरू
उत्तर - कुरुपाच्या ठिकाणी होणारी वेदना कमी होण्यासाठी, तसेच क्रमाक्रमाने कुरुप बरे होण्यासाठी नियमित पादाभ्यंग करणे उत्तम असते. यासाठी तळपायाला शतधौतघृत किंवा ‘संतुलन पादाभ्यंग घृत’ लावून शुद्ध काशाच्या वाटीने दहा-दहा मिनिटांसाठी तळपाय चोळायचे असतात. रोज किंवा आठवड्यातून दोन-तीन वेळा असा पादाभ्यंग करण्याने बरे वाटेल. तसेच आठवड्यातून दोन वेळा कुरुपाच्या ठिकाणी पोटिसाच्या साह्याने शेकण्याचाही उपयोग होईल. यासाठी गव्हाच्या पिठात हळद, मीठ, तेल मिसळून कणीक मळावी. या कणकेपासून लंबगोलाकार गोळी तयार करावी. या गोळीचे एक टोक तव्यावर गरम करून कुरुपाच्या ठिकाणी गरम लागेल, पण भाजणार नाही अशा प्रकारे शेक करता येतो.

माझे वय ४२ वर्षे असून मला तीन वर्षांपूर्वी फुप्फुसाचा टीबी झाला होता. तेव्हा ॲलोपॅथिक तसेच ‘संतुलन’ची औषधे घेतली होती. सध्या सर्व रिपोर्टस्‌ व्यवस्थित आहेत, त्रास असा काहीही होत नाही. पण पुन्हा टीबी होऊ नये यासाठी प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी काय करायला हवे?... शोभना
उत्तर - प्रतिकारशक्‍ती नीट राहण्यासाठी, तसेच वाढविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करता करायला हवेत. यासाठी सकाळ, संध्याकाळ एक-एक चमचा च्यवनप्राश तसेच ‘सॅनरोझ’ रसायन घेणे चांगले. रोज सकाळी ‘संतुलन अमृतशतकरा’युक्‍त पंचामृत घेणे, रात्रभर भिजविलेले चार-पाच बदाम खाणे, घरी बनविलेल्या साजूक तुपाचा (चार-पाच चमचे) आहारात समावेश असणे हे सुद्धा प्रतिकारशक्‍ती सुधारण्यास मदत करणारे उपाय होत. रोज पंधरा-वीस मिनिटे मोकळ्या हवेत चालायला जाणे, अनुलोम-विलोम, सूर्यनमस्कार, तसेच साधी योगासने करणे हे सुद्धा उत्तम होय. सध्या सर्व तपासण्या व्यवस्थित आहेत हे उत्तम आहे, मात्र घेतलेल्या औषधांचा दुःष्परिणाम शरीरातून काढून टाकण्यासाठी एकदा शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म, विशेषतः विरेचन, बस्ती करून घेणे उत्तम होय.

उच्च न्यायालयाने ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकासंदर्भातील आरोपातून मुक्‍त केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे की, मला दुचाकी चालविताना दोन्ही हातांना खूप त्रास होतो. पंधरा-वीस किलोमीटर गाडी चालवली की, दोन्ही हातांची बोटे वाकडी तिकडी होतात. त्यामुळे गाडी थांबवून बोटे चोळून सरळ करावी लागतात. तरी कृपया यावर उपाय सुचवावा.
.... पंढरीनाथ लांडगे. 

उत्तर - अभिनंदनाबद्दल धन्यवाद. बोटे वाकडी तिकडी होणे, वळणे हे लक्षण वातदोषाशी संबंधित आहे. यासाठी काही दिवस रोज संपूर्ण अंगाला, विशेषतः दोन्ही हातांना अभ्यंग करणे आणि खांदे, मान, पाठीला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेला’सारखे तेल लावणे हा उत्तम उपाय होय. रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकण्याचाही उपयोग होईल. बरोबरीने तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे, योगराज गुग्गुळ, ‘संतुलन वातबल’ गोळ्या घेणे हे सुद्धा चांगले. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही वाताशी संबंधित लक्षण असल्याने एकदा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे, आवश्‍यकता असल्यास वातशामक तेलाच्या बस्ती घेणे हे सुद्धा चांगले.

माझा मुलगा सहा वर्षांचा आहे. तीन महिन्यांपूर्वी तो दुचाकीवरून हातावर पडला होता. तेव्हा पंधरा दिवस कच्चे प्लॅस्टर केले होते. पण त्याचा हात कोपरातून पूर्णपणे वाकत नाही. सांधा आखडला आहे. बाकीच्या क्रिया तो व्यवस्थित करतो. हात पूर्वपदावर येण्यासाठी आयुर्वेदात काही उपचार आहेत का?... विजयसिंह

उत्तर - कच्चे प्लॅस्टर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने केले होते की कसे, याचा उल्लेख प्रश्‍नात नाही. कारण नीट काळजी घेऊन सांधा योग्य पद्धतीने बसवून प्लॅस्टर केले नाही आणि सांधा चुकीचा बसला तर नंतर तो पूर्ववत होणे अवघड ठरू शकते. तेव्हा यावर अजूनही तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेणे चांगले. बरोबरीने सांध्यांची लवचिकता, तसेच दृढता कायम राहावी आणि सुधारावी यासाठी सांध्यांना औषधांनी संस्कारित केलेले  ‘संतुलन शांती सिद्ध तेला’सारखे तेल लावण्याचा उपयोग होईल. तसेच कोपरावर अगोदर तेल लावून वरून एरंडाची पाने, निर्गुडीची पाने, शेवग्याची पाने यातील मिळतील ती पाने वाफवून त्याचा शेक करण्याचाही उपयोग होईल. बरोबरीने प्रवाळपंचामृत, ‘कॅल्सिसॅन गोळ्या’, ‘संतुलन वातबल गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. हाडांना, सांध्यांना बळकटी येण्यासाठी खारीक पूड टाकून उकळलेले दूध घेणेही चांगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com