प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

दर शुक्रवारी ‘सकाळ’सोबत येणारी ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी मी अगदी  सुरवातीपासून शेवटपर्यंत वाचतो. मला झोपेची गोळी घेऊनही बऱ्याच वेळा शांत झोप लागत नाही. अर्थहीन, अवास्तव स्वप्ने पडतात. अपुरी झोप झाल्याने दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. मध्यंतरी पायाला दुखापत झाल्याने गुडघा वाकवता येत नाही, त्यामुळे पादाभ्यंग करता येत नाही. शांत झोप लागण्यासाठी काही उपाय सुचवावा.
.... सुरेश  
उत्तर -
आरोग्यासाठी शांत व पुरेशी झोप महत्त्वाची असते. रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे, विशेषतः डोक्‍याला ब्राह्मी, जटामांसी वगैरे मन शांत करण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित तेल उदा. ‘संतुलन ब्रह्मलीन सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. नाकात घरी बनविलेल्या साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकण्याचाही उपयोग होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘संतुलन योगनिद्रा’ ही ध्वनिमुद्रिका ऐकत ऐकत झोपण्याने शांत झोप लागायला मदत तर मिळतेच, पण अर्थहीन स्वप्ने पडत नाहीत असा आत्तापर्यंत अनेकांचा अनुभव आहे. कानामध्ये ‘संतुलन श्रुती तेला’चे दोन-तीन थेंब टाकण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते असे दिसते. गुडघा दुखावल्याने वाकवता येत नाही, त्यावर वातशामक द्रव्यांनी संस्कारित ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल.
-------------------------------------------------------
मला गेल्या दहा वर्षांपासून मधुमेह आहे. सध्या बरीच ॲलोपॅथिक औषधे सुरू आहेत, पण तरीही साखर वाढलेली असते. जेवणानंतरची साखर तर अडीचशेच्या आसपास असते. साखर कमी होण्यासाठी आणि ॲलोपॅथीची औषधे कमी होण्यासाठी कृपया काही उपाय सुचवावा.
.... पोतदार
उत्तर -
मधुमेहाचा कालावधी आणि औषधे घेऊनही नियंत्रणात न येणारी रक्‍तशर्करा यांचा विचार करता आपणास शास्त्रोक्‍त पंचकर्म करून घेण्याची आवश्‍यकता आहे. पंचकर्माने शरीरातील विषद्रव्ये दूर झाली, शरीरातील सर्व अवयवांचे काम जोमाने आणि स्फूर्तीने सुरू झाले की शरीराकडून साखर पचवणे आणि स्वीकारणे शक्‍य होईल आणि क्रमाक्रमाने सध्या चालू असलेली औषधे कमी करता येऊ शकतील. तत्पूर्वी नियमित चालायला जाणे, सूर्यनमस्कारासारखी योगासने करणे, रात्रीचा आहार अतिशय साधा, शक्‍यतो द्रवस्वरूपात असणे, सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे यासारखे उपाय योजता येतील.  चिकू, सीताफळ, आंबा, जड मिठाया, चणा, वाटाणा, दही, मांसाहार वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करणे चांगले. 
-------------------------------------------------------
मी   गेल्या सात वर्षांपासून त्वचाविकाराने ग्रस्त आहे. वर्षातील बाराही महिने माझ्या त्वचेला खूप खाज येते. खाजवल्यामुळे कधी कधी रक्‍त येते. अनेक त्वचाविकारतज्ज्ञांकडून उपचार करून पाहिले, मात्र काहीच उपयोग झाला नाही. कृपया आपण काही मार्गदर्शन करावे.
... चंद्रशेखर निरंतर  
उत्तर -
या प्रकारच्या त्रासावर रक्‍तशुद्धीसाठी उपचार आणि खाण्या-पिण्याचे पथ्य अशा दोन्ही बाजूंनी उपचार करावे लागतात. रक्‍तशुद्धीसाठी शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन व बस्ती उपचार करून घेणे सर्वोत्तम होय. बरोबरीने सकाळ-संध्याकाळ पंचतिक्‍त घृत घेणे, जेवणानंतर ‘संतुलन मंजिसार’ किंवा महामंजिष्ठादी काढा घेणे, ‘संतुलन यू. सी. चूर्ण’ तसेच कामदुधा गोळ्या घेणे चांगले. आहारात काही दिवस तेल आणि गहू पूर्ण वर्ज्य करण्याचा अशा केसेसमध्ये उत्तम उपयोग होताना दिसतो. साजूक तुपात स्वयंपाक करणे आणि मुख्य भर तांदूळ, ज्वारी, नाचणी, मूग, मसूर या धान्यांवर ठेवणे चांगले. वेलीवर्गीय फळभाज्या उदा. दुधी, तोंडली, घोसाळी, दोडकी, पडवळ, परवर, कारले, कोहळा वगैरे रोजच्या आहारात वापरणे चांगले. या उपायांनी बरे वाटेलच, परंतु बऱ्याच वर्षांपासून त्रास असल्याने वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विरेचन, बस्ती, हे उपचार करून घेणे श्रेयस्कर होय. 
-------------------------------------------------------
मी  ५८ वर्षांची गृहिणी आहे. २०१० मध्ये उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालच्या हाडाचे फ्रॅक्‍चर झाले होते. त्या वेळी रॉड टाकला होता, तो २०१३ मध्ये काढला. परंतु सध्या त्या ठिकाणी अतिशय वेदना होत आहेत. अपघात झाला तेव्हा माकडहाडाजवळ मुका मार लागला होता, त्या ठिकाणी तसेच उजव्या मांडीच्या हाडाच्या ठिकाणी सुद्धा अतिशय वेदना होतात. मी रोज नियमित चालते, योगासने व इतर व्यायाम न चुकता करते. मला वेदनाशामक गोळ्या घ्यायच्या नाहीत. तरी आपण उपचार सुचवावेत. ...
शोभा दाते

उत्तर - अपघातामुळे झालेले वाताचे असंतुलन हे या सर्व त्रासांचे कारण आहे. यावर पायाला तसेच पाठीला नियमितपणे तेल लावण्याचा उपयोग होईल. पायांना ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ तर, पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावता येईल. वातसंतुलनासाठी योगराजगुग्गुळ, ‘संतुलन वातबल गोळ्या’, हाडांच्या ताकदीसाठी प्रवाळपंचामृत, ‘कॅल्सिसॅन गोळ्या’ घेण्याचाही उपयोग होईल. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली दशमूळ सिद्ध तेलाच्या बस्ती घेण्याचा, तसेच पायांना व पाठीला पिंडस्वेदन म्हणजे वातशामक द्रव्यांच्या पोटलीने मसाज व शेक घेण्याचाही फायदा होईल. अपघात होऊन बरीच वर्षे झाली आहेत, तेव्हा दुखणे अंगावर न काढता वातशामक उपचार करून घेणे श्रेयस्कर होय.

-------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com