esakal | पावसाळ्यात घरी असावीत अशी औषधे
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात घरी असावीत अशी औषधे

पावसाळ्यात घरी असावीत अशी औषधे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)

दुर्बल शरीरशक्‍ती, दुर्बल पचनशक्‍ती, पित्तचय (पित्त साठणे) आणि वातप्रकोप इतक्‍या सगळ्या गोष्टी पावसाळ्यात घडत असतात आणि म्हणूनच पावसाळ्यात पचनशक्‍ती कमी होते, प्रतिकारशक्‍ती क्षीण होते. शरीरातील एकंदर क्रिया ज्या उत्साहाने व गतीने व्हायला हव्यात तशा होत नाहीत, मनही मरगळते. या काळात विशेषतः वातदोषाचा प्रकोप होतो व पित्तदोष साठण्यास सुरवात होते. 

टोळ व मुंगीची गोष्ट सर्वांना माहिती असेल. पावसाळ्याच्या आधी शहाणी मुंगी तिच्या घरात अन्नाचा पुरेसा साठा करून ठेवते, तर नाठाळ टोळ काम न करता नुसतीच मजा करतो. पावसाळा सुरू झाल्यावर मुंगीला राहायला घर आणि खायला अन्न उपलब्ध असते, टोळाला मात्र या दोहोंपासून वंचित राहावे लागते. अर्थात यातून बोध घ्यायचा तो असा की पावसाळ्याची सुरवात होण्यापूर्वीच आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने आवश्‍यक ती काळजी घ्यायला हवी. 

निसर्गाचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो हे अनुभवातून समजते. भारतीय कालगणनेनुसार आणि आयुर्वेदशास्त्रानुसार संपूर्ण वर्ष सहा ऋतूंमध्ये विभागलेले असते आणि यातील आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांत अवघड आणि सर्वाधिक काळजी घ्यावा लागणारा ऋतू म्हणजे वर्षा ऋतू, अर्थात पावसाळा. ग्रीष्म ऋतू संपून वर्षा ऋतू सुरू होतो तेव्हा आदान काळ संपून विसर्ग काळ सुरू होत असतो. पण आदानकाळात शरीरशक्‍ती आधीच कमी झालेली असते, त्यात पावसाळा आल्यामुळे वातादी दोष बिघडण्याची भर पडते व त्यामुळे शरीरशक्‍ती अजूनच कमी होते.

भूबाष्पान्मेघनिस्यन्दात्‌ पाकादम्लाज्जलस्य च ।
वर्षासु अग्निबले क्षीणे कुप्यति पवनादयः ।। ...चरक सूत्रस्थान

 

जमिनीतून निघणारी वाफ, आकाशातून पडणारे पाणी आणि आम्ल विपाकाचे पाणी या सर्वांमुळे अग्नीची ताकद क्षीण होते, वातादी गोष्टी बिघडतात. विशेषतः वातदोषाचा प्रकोप होतो व पित्तदोष साठण्यास सुरवात होते. 

थोडक्‍यात सांगायचे तर, दुर्बल शरीरशक्‍ती, दुर्बल पचनशक्‍ती, पित्तचय (पित्त साठणे) आणि वातप्रकोप इतक्‍या सगळ्या गोष्टी पावसाळ्यात घडत असतात आणि म्हणूनच पावसाळ्यात पचनशक्‍ती कमी होते, प्रतिकारशक्‍ती क्षीण होते. शरीरातील एकंदर क्रिया ज्या उत्साहाने व गतीने व्हायला हव्यात तशा होत नाहीत, मनही मरगळते. पाऊस पडतो तेव्हा वातावरणात ज्याप्रमाणे वादळ, वारा, ढगांचा गडगडाट, विजा याप्रकारे अति प्रमाणात हलनचलन होत असते, तसेच शरीरातही वायुतत्त्वाचा प्रकोप होत असतो. म्हणूूनच पावसाळ्यात दम्याचा त्रास वाढणे, पाठदुखी-कंबरदुखी-गुडघेदुखी अधिक तीव्र होणे, पटकन थकवा येणे, धडधडणे यासारखी लक्षणे अनुभूत होत असतात. एकंदर पावसाळ्याचे हे दिवस आरोग्याच्या दृष्टिकोनातून अवघडच असतात. पावसाळ्यात मच्छर-डासांचे, माशांचे प्रमाण वाढते, ठिकठिकाणी बुरशी येते, हा आपल्या सर्वांचा अनुभव असतो. मच्छर, कीटक, माशा आपल्याला डोळ्यांनी दिसतात, त्यामुळे त्यांच्यापासून रक्षण करणे त्यामानाने सोपे असते. मात्र वातावरणातील बदलांमुळे डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म जंतू, जीवाणू, विषाणू हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार होत असतात. मंदावलेल्या अग्नीमुळे क्षीण झालेली रोगप्रतिकारशक्‍ती एका बाजूला आणि याप्रकारे वातावरणात तयार झालेले सूक्ष्म जीवजंतू दुसऱ्या बाजूला यांच्यामध्ये आरोग्य अडचणीत न आले तरच नवल. 

मात्र वेळेवर काळजी घेतली, आहारात आवश्‍यक ते बदल केले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्रास होण्यापूर्वी किंवा त्रासाची सुरुवात होताना लागलीच योग्य उपाययोजना आखली तर आरोग्य सुखरूप राहू शकते. यासाठी काही घरगुती, काही तयार पण साधी, कोणालाही सहजतेने घेता येतील अशी औषधे घरात आणून ठेवणे उत्तम होय. 

आरोग्याच्या दृष्टीने वास्तविक वर्षभरच उकळलेले पाणी पिणे उत्तम असते, पण पावसाळ्यात उकळलेले पाणी पिण्याची दोन कारणे असतात. एक तर मंदावलेल्या पचनव्यवस्थेवर भार येऊ नये आणि दुसरे म्हणजे पावसाळ्यातील दूषित पाण्यामार्फत होणाऱ्या इन्फेक्‍शनला प्रतिबंध व्हावा. ‘जलसंतुलन’ सारखी सुगंधी, पाचक द्रव्ये टाकून उकळलेले पाणी थर्मासमध्ये भरून ठेवून दिवसभर पिणे, किमान जेवताना तरी पिणे या ऋतूत उत्तम होय. वातदोषाचा त्रास होणाऱ्यांनी, वातरोग उदा. संधिवात, आमवात, पाठ-कंबरदुखी, सायटिका, अर्धांगवात वगैरे त्रास असणाऱ्यांनी या प्रकारे गरम पाणी पिणे, रोज सकाळी सुंठ-गूळ-तुपाची छोट्या सुपारीच्या आकाराची गोळी घेणेही चांगले. याने पचनसंस्थेची ताकद वाढायला, वातदोष संतुलित राहायला चांगला हातभार लागतो. सुंठ-गूळ-तुपाच्या गोळ्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच करून ठेवल्या तरी चालतात. पावसाळ्यात मंदावलेल्या अग्नीला ताकद मिळण्याच्या दृष्टीने ‘संतुलन अन्नयोग’ सारख्या गोळ्या घेण्याचाही फायदा होतो असे दिसते. 

पावसाळ्याच्या सुरवातीला घसा दुखणे, सर्दी होणे, तापामुळे कसकस वाटणे असे त्रास हमखास होतात. यावर घरगुती द्रव्यांपासून बनविलेला काढा किंवा ‘हर्बल चहा’ उत्तम असतो. कपभर पाण्यात गवती चहाची एक पात, दोन-तीन तुळशीची पाने, दोन-तीन पुदिन्याची पाने, थोडेसे किसलेले आले, अर्धा चमचा बडीशेप, चवीप्रमाणे साखर घालून एक उकळी आणली, नंतर गॅस बंद करून तीन-चार मिनिटे पातेले झाकून ठेवले आणि गाळून घेऊन प्यायले तर त्यामुळे पचनाला उत्तम मदत मिळते, वातदोष कमी व्हायला हातभार लागतो, घसादुखी-सर्दी-खोकला यासारख्या त्रासांवर उत्तम गुण येतो. सर्दी होते आहे असे जाणवले किंवा कधी पावसात भिजणे झाले तर लगेच सितोपलादी चूर्ण पाण्याबरोबर किंवा मधाबरोबर मिसळून तयार केलेले चाटण घेण्याचा उपयोग होतो. चांगल्या प्रतीचे सितोपलादी चूर्ण पावसाळ्यात घरोघरी असायलाच हवे. दम्याचा त्रास होण्याची प्रवृत्ती असेल किंवा पावसाळ्यात ताप-खोकला होण्याची प्रवृत्ती असेल त्यांनी पावसाळ्यापूर्वीच वैद्यांच्या सल्ल्याने श्वासकुठार गोळ्या किंवा ‘प्राणसॅन योग’सारखे औषधे घरी आणून ठेवावे  आणि पाऊस सुरू झाला की दिवसातून एकदा किंवा दोन दिवसातून एकदा घेत राहणे चांगले असते. 

पावसाळ्यात बऱ्याच व्यक्‍तींना, विशेषतः मधुमेही व्यक्‍तींना किंवा ज्येष्ठ व्यक्‍तींना पायाच्या बोटांमध्ये चिखल्या होण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी पावसातून घरात आल्यावर पाय नीट कोरडे करण्याचा उपयोग होतो. तसेच चिखल्यांची सुरवात होते आहे असे वाटले तर लगेच त्यावर ‘संतुलन वाय्‌, एस्‌. ऑइंटमेंट’सारखे मलम लावण्याचा, तसेच पायांना धुरी देण्याचा उपयोग होतो. असेही पावसाळ्यात हवेतील दमटपणा आणि त्यामुळे होऊ शकणारा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी घरात सकाळ-संध्याकाळ धूप करणे उत्तम असते. यासाठी ओवा, कडुनिंबाची पाने, वावडिंग, गुग्गुळ, कापूर वगैरे द्रव्ये किंवा तयार ‘संतुलन प्युरिफायर धूप’ वापरता येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी अशी धूपनद्रव्ये सुद्धा नक्की घरात आणून ठेवावी. 

पावसाळ्यात, थोड्या प्रमाणात का होईना पण वाताचे दुखणे वाढते हा अनेकांचा अनुभव असेल. त्यामुळे पावसापाठोपाठ वात वाढणार आहे हे लक्षात घेऊन आधीपासूनच सांध्यांना, अंगाला नियमितपणे तेल लावणे उत्तम असते. बरोबरीने योगराज गुग्गुळ किंवा ‘संतुलन वातबल’ गोळ्यांसारख्या गोळ्या आणून ठेवणे आणि गरजेनुसार घेणे श्रेयस्कर असते. 

खाण्यापिण्यात नीट काळजी घेतली तर खरे तर पावसाळ्यात जुलाब होणारच नाहीत, पण तरीही पोट बिघडते आहे अशी शक्‍यता वाटल्यास जेवणापूर्वी आल्या-लिंबाच्या रसासह संजीवनी गुटी किंवा जेवणानंतर कुटजघनवटी घेता येते. अधून मधून जेवणानंतर बिल्वावलेह किंवा ‘बिल्वसॅन’ अवलेह घेण्याचाही उपयोग होतो.

तोंडाला चव नसणे, मळमळणे, जुलाब होणे, भूक न लागणे वगैरे तक्रारी पावसाळ्यात खूप लोकांना जाणवतात. यावर लिंबाचे पाचक उपयुक्‍त असते. हे बनवण्याची पद्धत अशी- लिंबू अर्धे कापावे. आतील बिया काढून टाकाव्या. यावर दोन चिमूट जिरे पूड, एक चिमूट हळद, एक चिमूट ओव्याची पूड, अर्धी चिमूट हिंग आणि दोन चिमूट काळे मीठ टाकून छोट्या कढईत किंवा पळीमध्ये ठेवून मंद आचेवर गरम करण्यास ठेवावे. वर टाकलेले चूर्ण लिंबाच्या रसाने ओले झाले व लिंबाचा गर थोडासा उलून वर आला की आच देणे थांबवावे. दोन मिनिटे थांबून या लिंबाचा रस काढावा. याप्रकारे तयार झालेले लिंबाचे पाचक जेवणापूर्वी घेता येते किंवा वेळी-अवेळी मळमळ वगैरे होत असल्यास कधीही घेता येते. 

अशा प्रकारे खबरदारी घेतली, पावसाळ्यात लागणारी औषधे घरात आणून ठेवली आणि गरजेनुसार वापरली तर त्रासही टळेल, ऐन वेळी धावाधाव करावी लागणार नाही आणि पावसाळा सुखरूप पार करता येईल.