गोडाधोडाचे दिस, तरी...

संतोष शेणई
Friday, 25 August 2017

श्रावण हा सणांचा महिना संपला तरी पुढचे दोन महिने सणांचेच आहेत. गणपती, नवरात्र, दिवाळी या सणांच्या निमित्ताने गोडाधोडाचेच दिवस असणार आहेत. साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणताना जरा जपून.  

निर्जळी उपवास करणे हे खरे तर आरोग्यासाठी चांगले नाहीच. पूर्ण उपवास करून शरीराची शक्ती कमी होते हेही लक्षात घ्यायला हवे. आरोग्यासाठी अधूनमधून लंघन करणे उपयुक्त असते, पण लंघन म्हणजे उपवास नव्हे. उपवास हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो. तरीही वाढत्या वयातील मुले, कष्ट करणाऱ्या स्त्रिया, वृद्ध व मधुमेही रुग्णांनी उपवास करताना आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तसेच सण म्हणून गोडधोड खातानाही आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. देवाची उपासना करायची तर देहमंदिर नीट राखायला हवे. 

सणांच्या काळात श्रद्धेने उपवास करताना डॉक्‍टरांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले जाते. विशेषतः मधुमेह असेल तर उपवास करता नये. कारण मधुमेहावरील औषधे घेताना, इन्सुलिन घेताना उपवास योग्य नसतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने कमी होऊ शकते. शरीरातील साखरेचे गणित बिघडले की आरोग्याचे संतुलन बिघडलेच म्हणून समजा. त्यातून रुग्णांना निर्जलीकरणाचा किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका वाढतो. काही जण तर दिवसभर उपवास करून रात्री अन्न घेतात. सकाळी भरपूर नाश्‍ता, दुपारी पुरेसे जेवण, संध्याकाळी थोडासा फराळ आणि रात्री जेमतेम जेवण असा आपला आहार हवा. रात्री फार जेवण घेता नये. येथे मात्र उपवासाच्या नावाखाली उलट व्यवहार होतो. ज्यावेळी खायचे त्यावेळी पोट उपाशी ठेवायचे आणि जेव्हा पोटाला विश्रांती द्यायला हवी तेव्हा ते भरपूर भरायचे हे योग्य नव्हे. दिवसभरातील उपवासामुळे यकृताकडून उर्जेसाठी रक्तात ग्लुकोज उत्सर्जित केले जाते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या प्रमाणात वाढ होते.

समजा, दिवसभर उपवास धरलाच, तर उपवास सोडण्यासाठी पेयाचा वापर करावा. शहाळ्याचे पाणी पिणे हे अधिक उपयुक्त ठरेल. तसेच आहारही कर्बोदकांनी परिपूर्ण असावा. त्यामुळे निर्जळीकरणाचा धोका टळू शकतो, तसेच पोषणही होते. काही जण महिन्याभराचा उपवास धरतात. म्हणजे दिवसभर उपाशी आणि रात्रीचे जेवण. अशावेळी तुमची औषधे थांबवण्यात येत नाहीत. जर उपवासामुळे औषधे टाळली, तर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांमधे समस्या उद्भवू शकते. त्यांच्या आरोग्याच्या समस्या तीव्रतेने वाढू शकतात. तीव्र डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या या सर्व कारणांमुळे तुमचा उपवास मोडू शकतो. उपवास काळात आपल्या लघवीचा रंग बदललेला दिसला तर शरीरातील पाणी वेगाने कमी होत असल्याचे ते लक्षण असू शकते. अशावेळी अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. 

मधुमेही रुग्णांनी उपवासात पांढरे तांदूळ किंवा बटाटे यांच्याऐवजी करडे तांदूळ, पूर्ण धान्यांचा ब्रेड आणि भाज्या यासारख्या कमी ग्लायसेमिक निर्देशांकाच्या अन्नपदार्थांची निवड करायला हवी. त्याचबरोबर प्रथिनांनी युक्त अन्नाचे सेवन करायला हवे. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवताना आपल्याला आवश्‍यक असलेली ऊर्जा मिळविण्यासाठी योग्य पदार्थांची निवड करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे उर्जा आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढविण्यासाठी मदत होऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor sweet dish health