दातांची भन्नाट दुनिया

दातांची भन्नाट दुनिया

‘सेलिब्रिटीं’चे ‘दाखवायचे दात’ वेगळे असतात का? सुंदर दातांमागचे रहस्य असते तरी काय? दंतपंक्ती मोहक असेल तर त्या व्यक्तीचे हास्यही सुंदर असते. दातांचे सौंदर्यशास्त्र ही काही ‘दंतकथा’ नाही, तर त्यामागे भन्नाट कहाणी आहे.

एखाद्याचे दात त्याच्याच घशात घालण्याची संधी साधली, की दात दाखवून आनंद व्यक्त केला जातो. पण आपलेच दात आपलेच ओठ म्हणण्याची वेळ आली, की दुसऱ्याला दाताड वेंगाडून दाखवायला आपण कमी करीत नाही. एखाद्याची बत्तिशी बाधत असल्याचा अनुभवही काही जण सांगतील. एखाद्यावर दात धरणे किंवा दात ओठ खाणे हे व्यवहारात खूपदा घडते; पण एकदा का दात दुखायला लागला, की ‘दाती धरूनिया तृण, शरण तुज’ इतके नरम होऊन जातो. कोणी काहीही म्हणो; पण आपले खायचे दात व दाखवायचे दात वेगवेगळे नसतात. त्यामुळे आपण दाताच्या दुखऱ्या नसेवर उपचार करण्यापुरते दंतवैद्यासमोर आ वासून बसून राहतो. पण, सेलिब्रिटींना दात दाखवायचेही असतात आणि दंतवैद्य केवळ दुखऱ्या नसेवर उपचार करून थांबत नाहीत, ते चेहऱ्याचे सौंदर्य बिघडू नये याचीही काळजी घेतात. दातांचे सौंदर्यशास्त्र जाणणारे दंतवैद्य सबंध चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात, आपले हास्य सुंदर करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे समजून घेण्यासाठी, लोकांचे दात शोभिवंत करणे व निरोगी ठेवणे ही एक कला आहे असे मानणारे डॉ. संदेश मयेकर यांचे ‘एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी’ हे पुस्तक वाचायला हवे. 

सर्वसामान्याला आपल्या दातांच्या आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेता यायला हवी, त्यासाठी दातांबाबतचे प्राथमिक वैद्यकीय ज्ञान आणि त्यांची काळजी कशी घ्यावी याची किमान माहिती असायला हवी. अशी माहिती या पुस्तकात अत्यंत साधी, सोपी, ओघवती अशी येते. या माहितीत तांत्रिकता टाळली गेली आहे. कॅव्हेटी, फिलिंग असे शब्द आपल्याला माहिती झाले आहेत; परंतु स्प्लिंट, बाइट प्लेट, मॉकअप, कॉम्पोझिट रेझिन असे अपरिचित शब्द, त्यांची माहिती आणि उपयोग यांसह दंतवैद्यकीय ज्ञान आपल्याला सहज मिळते. अक्कलदाढा, दंतरोपण, श्वासांना येणारी दुर्गंधी, साधी रोजची दात घासण्याची योग्य क्रिया, कृत्रिम दात यांबाबतची माहितीही मिळते. डॉक्‍टरांची शैली थोडी गंमत आणणारी अशी आहे. म्हणजे पाहा, ‘मी त्याचे दात तपासले तेव्हा लक्षात आलं त्याच्या दातांमध्ये खूपच मोठ्या फटी आहेत. एखादी कारसुद्घा त्यातून जाऊ शकेल.’ एखाद्या मित्राने गप्पांच्या ओघात काही मौल्यवान माहिती द्यावी, इतक्‍या सहजशैलीत डॉ. मयेकर आपल्याला ही ‘दंत-कथा’ सांगतात. म्हणजे असे की, ‘अक्कलदाढा तोंडात शेवटी कोपऱ्यामध्ये अगदी सुरक्षित ठिकाणी असतात. तिच्या एका बाजूला गाल तर दुसऱ्या बाजूला जिभेचं संरक्षण असतं. मॅंडीब्यूलर नर्व्ह या दाढांच्या अगदी जवळ - धोकादायक ठिकाणी असते. मला शक्‍य असतं तर अक्कलदाढ करताना मी तोंडाशी - सावधान, अपघातप्रवण क्षेत्र - अशी पाटीच लावली असती.’ आता या माहितीत त्यांनी अक्कलदाढेचे महत्त्व, तिचे स्थान, तिची संरक्षक म्हणून कामगिरी आणि त्याचबरोबर एका महत्त्वाच्या नसेजवळ ती असल्याने तिची काळजी का घ्यायची हेही ते नकळत मनावर बिंबवतात. ‘गोंधळात टाकणाऱ्या अक्कलदाढा’, ‘हरवलेल्या दातांची कहाणी’, ‘बापरे... केवढा खोल खड्डा’, ‘गुप्त मार्ग आणि भुयारं’, ‘दातांना आवडणाऱ्या सवयी’ यांसारखी आकर्षक शीर्षके आपल्याला पुढच्या लेखांकडे खेचून घेतात. 

आपण जाहिरातीत किंवा सौंदर्यस्पर्धेतील ललनांचे सुंदर हास्य पाहतो. ते नैसर्गिक असावे असे आपल्याला वाटते. किंबहुना, एखादी मॉडेल रॅम्पवरून प्रेक्षकांकडे हास्य फेकते, ते किती नैसर्गिक वाटते आणि असे नैसर्गिक हसता यायला हवे, असे क्षणभर वाटून जाते. एखादा दंतवैद्य आपल्या करामतीने हास्य दुरुस्त करू शकतो, हे आपल्याला कुठे माहीत असते? आपल्या कल्पनेच्या पलीकडची ही गोष्ट असली तरी ते वास्तव आहे. डॉ. मयेकर हे सेलिब्रिटींना सुंदर, नैसर्गिक, मोहक ‘हसवत’ स्वतःच सेलिब्रिटी झाले आहेत. याबाबत डॉ. मयेकर यांनी सांगितलेले किस्से वाचायलाच हवेत. चित्रपटसृष्टी, फॅशनविश्व अशा क्षेत्रांत राहूनही आणि स्वतःच सेलिब्रिटी झाल्यानंतरही डॉक्‍टरांच्या भाषेला कुठेही अहंबाधा झालेली नाही. लता मंगेशकर, शाहरूख खान यांच्यापासून सौंदर्य स्पर्धेतील सुंदरींपर्यंत अनेकांना त्यांनी दिलेल्या दंतसल्ल्याचे मनोरंजक किस्से या पुस्तकात आहेत. हे सारे वाचताना दंतआरोग्याबरोबरच सौंदर्याबाबतची नवी जाणीवजागृती होते.

डॉ. अरुण मांडे यांनी अत्यंत प्रवाही असे भाषांतर केले आहे. लता मंगेशकर यांनी स्वानुभवावर आधारित लिहिलेली प्रस्तावना आणि त्याचे पुढे पुस्तकात येणारे प्रत्यंतर हाही एक चांगला अनुभव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com