esakal | योगशास्त्र
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

योगशास्त्र

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

इंद्रियांचे आरोग्य टिकवण्यामध्ये मनाचे महत्त्वाचे योगदान असते आणि या दोघांवर नियंत्रण ठेवणारा वायू असतो. याचे पाच उपप्रकार असतात, त्यांना पंचप्राण म्हटले जाते. पंचप्राणांचे काम व्यवस्थित चालावे यासाठी प्राणायाम, योगाभ्यासाचा उत्तम उपयोग होत असतो. अग्नीच्या आधिपत्याखाली चालणारे संप्रेरकांचे कामही योगाच्या मदतीने सुरळीत चालते असे दिसते. म्हणूनच नुसता व्यायाम करण्यापेक्षा किंवा जिममध्ये जाण्यापेक्षा योगासने, प्राणायाम, दीर्घश्वसन वगैरे योगशास्त्रातील क्रिया करण्याचा अनेक पटींनी उपयोग होतो. 

पातंजल योगसूत्रांमध्ये विशद केलेल्या आठ भागांमुळे त्याला ‘अष्टांग योग’ असेही म्हणतात. ‘संतुलन क्रियायोग’ हा एक प्रकारचा कर्मयोग आहे. ‘कर्म’ आणि ‘क्रिया’ हे दोन्ही शब्द संस्कृतातील ‘कृ’ धातूपासून उत्पन्न झालेले आहेत. त्याचा अर्थ कृती. योग या शब्दाची उत्पत्ती प्रेरणा आणि चलनवलन किंवा संचारणाशी निगडित असलेल्या ‘यं’ या ध्वनीपासून झालेली आहे.

म्हणून ‘योग’ म्हणजे प्रेरणा किंवा श्वासाच्या संचरणाशी निगडित तंत्र अथवा शास्त्र असेही म्हणता येईल. ‘योग’ शब्दाचा अर्थ जुळणे, एकत्र येणे असाही आहे. ‘संतुलन क्रियायोगा’मध्ये शरीराचे चलनवलन आणि आसने यांच्या सोबतच श्वासोच्छ्वासाचाही विचार केला जातो.

इंद्रियांचे आरोग्य टिकवण्यामध्ये मनाचे महत्त्वाचे योगदान असते आणि या दोघांवर नियंत्रण ठेवणारा वायू असतो. याचे पाच उपप्रकार असतात, त्यांना पंचप्राण म्हटले जाते. शरीर-मनाशी संबंधित बहुतेक सर्व महत्त्वाची कामे या पंचप्राणांकरवी होत असतात. हे पंचप्राण कोणते व त्याच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या असतात हे आपण सुरवातीला पाहू या. 

१. प्राण - संपूर्ण अस्तित्वात भरून राहिलेली चैतन्य संकल्पना (प्रोग्राम) एका विशिष्ट मर्यादेत वैयक्‍तिक जीवनासाठी उपलब्धता व स्वीकारण्याची व आत ओढण्याची क्षमता.

प्राणवायूचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे श्वास आत घेणे. हा प्राणवायू सर्व प्राणिमात्रांचे जीवन श्वसनाद्वारे चैतन्यमय ठेवतो व प्रकर्षाने चैतन्यशक्‍तीला श्वासाबरोबर आत ओढतो. हृदय, इंद्रिये, बुद्धी, मन यांना कार्यरत ठेवण्याचे व त्यांचे स्वास्थ्य कायम ठेवण्याचे कार्य प्राणवायूचे आहे. खाल्लेल्या अन्नाचा स्वीकार करणे व ते पोटापर्यंत पोचवणे हेही काम प्राणवायू करत असतो. 

२. अपान - प्राणशक्‍तीची बहिर्मुखता व बाहेर टाकण्याची संकल्पना. मलविसर्जन, मूत्रप्रवृत्ती, शुक्रस्खलन, स्त्रीमध्ये रजोस्राव व गर्भाला बाहेर काढणे या सर्व क्रिया अपान वायूच्या आधीन असतात. 

३. व्यान - वस्तूचे विघटन करून त्यातील शक्‍ती मोकळी व रूपांतरित करणे. शरीरातील पचन क्रिया, रक्‍ताभिसरण, विविध अवयवांचे आकुंचन-प्रसरण, पापण्यांची उघडझाप, चालणे, पळणे वगैरे विविध हालचाली व्यानवायूच्या आधिपत्याखाली येतात. अन्नपचनानंतर सारभाग व मलभाग एकमेकांपासून निराळे करणे हेही व्यानामुळेच होत असते. 

४. समान - शक्‍तीचे संवहन. समानवायू जाठराग्नीला फुलवण्याचे, त्याला प्रज्वलित करण्याचे काम करत असतो. तसेच जाठराग्नी जेथे राहतो त्या भागात अन्नाचा स्वीकार करणे, जाठराग्नीकरवी अन्नाचे पचन पूर्ण होईपर्यंत अन्न त्या भागात धरून ठेवणे व पचन झाल्यानंतरच पुढे जाण्यासाठी सोडणे या पचनासाठीच्या तिन्ही अत्यावश्‍यक क्रिया समानाकरवीच होत असतात. 

५. उदान - शक्‍तीचे उत्थान. उदानाच्या सहाय्याने श्वास बाहेर सोडण्याची क्रिया होऊ शकते. तसेच बोलणे, गाणे या क्रिया उदानामुळे होत असतात. उत्साह, शरीराचे बल, वर्ण या गोष्टीही उदानाच्या आधीन असतात.
या पंचप्राणांचे काम व्यवस्थित चालावे यासाठी प्राणायाम, योगाभ्यासाचा उत्तम उपयोग होत असतो. अग्नीच्या आधिपत्याखाली चालणारे संप्रेरकांचे कामही योगाच्या मदतीने सुरळीत चालते असे दिसते. म्हणूनच नुसता व्यायाम करण्यापेक्षा किंवा जिममध्ये जाण्यापेक्षा योगासने, प्राणायाम, दीर्घश्वसन वगैरे योगशास्त्रातील क्रिया करण्याचा अनेक पटींनी उपयोग होतो. 
यावद्‌ वायुः स्थितो देहे तावज्जीवनमुच्यते । 
मरणं तस्य निष्क्रान्तिस्ततो वायुं निरोधयेत्‌ ।। ... हठयोगप्रदीपिका

जोपर्यंत वायू म्हणजे प्राण शरीरात आहे तोपर्यंत जीवन आहे आणि प्राणाचे सोडून जाणे म्हणजे मृत्यू.

या प्राणावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा प्राणाचा शरीराशी असणारा अनुबंध अधिकाधिक टिकविण्यासाठी योग-प्राणायामासाखा उत्तम मार्ग नाही. 

याचा विचार करून ‘संतुलन क्रियायोग (स्काय)’ हा शिकायला व रोज सराव करायला तसेच सुरक्षित अशी योगपद्धती विकसित केली. याच्या नियमित सरावाने शरीर लवचिक होते, शरीरातील जडपणा, कडकपणा, जखडलेपणा, दूर होण्यास मदत मिळते, एकंदर शरीरशक्‍ती (स्टॅमिना) वाढतो. यामध्ये श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवण्याचाही सराव होत असतो. यामुळे प्राणशक्‍ती अधिक चांगल्या प्रकारे आकर्षित होऊ शकते व शरीरात प्रत्येक पेशीपर्यंत व्यवस्थित पोचू शकते. मेंदू, हृदय, फुफ्फुसे, शरीरातील मर्मस्थाने वगैरे महत्त्वाच्या ठिकाणी प्राणाचे संचरण नीट होऊ शकले की एकंदर उत्साह, चैतन्य, जाणीवशक्‍ती वाढायलाही मदत मिळते.

संप्रेरकांचे कामही यथाव्यवस्थित होऊ लागते, मनाची एकाग्रता वाढते, स्मृती सुधारते, मृदुभाष्य, सौजन्यभाव विकसित होतो, आसपासच्या लोकांबरोबरचे संबंध सुधारण्यास मदत मिळते. 

संतुलन क्रियायोगापेकी काही महत्त्वाच्या क्रिया आपण पाहू या. 

समर्पण
समर्पण क्रियेच्या नियमित अभ्यासाने पाठीचा कणा लवचिक होतो, मानेला व्यायाम होतो, पचनक्रिया सुधारते, वायू सहजपणे सरायला मदत होते, समर्पणाची भावना निर्माण होते.  
ही क्रिया जास्तीत जास्त सात वेळा करावी.
१. वज्रसनात बसावे. 
हात ‘नमस्ते’च्या स्थितीत जोडून, छातीजवळ ठेवावेत व श्वास पूर्णपणे आत घ्यावा. 
२. हात जोडलेल्या स्थितीतच ठेवून शरीरासमोर सरळ करावेत. या वेळी अंगठे बाकीच्या बोटांशी काटकोनात असावेत तर अंगठे आकाशाच्या दिशेला व बाकी बोटे जमिनीला समांतर असावीत. 
३. करंगळीचे टोक गुडघ्याला टेकेपर्यंत हात खाली आणावेत. 
४. थोडेसे पुढे वाकून बोटांची टोके जमिनीला टेकवावीत. या वेळी पाठीचा कणा सरळ असावा.
५. नजर हाताच्या अंगठ्यांच्या टोकावर ठेवावी व श्वास हळूहळू बाहेर सोडत बोटांची टोके जमिनीवर टेकवूनच हात शक्‍य तेवढे पुढे सरकवावे. या वेळी पोट व छाती मांड्यांना टेकलेली असावी.
६. श्वास पूर्णपणे बाहेर सोडून हात थोडेसे फाकवून डोके जमिनीला टेकवावे. या वेळी हाताचे तळवे जमिनीला टेकलेले असावेत. या वेळी श्वास पूर्णपणे बाहेर सोडलेला असावा व हात सरळ असावेत. या वेळी नितंब टाचांना टेकलेलेच राहील यावर लक्ष ठेवावे.
याच स्थितीत क्षण-दोन क्षण राहावे.
७. दोन्ही तळवे पुन्हा एकमेकांना जोडून नजर अंगठ्यांच्या टोकावर ठेवून व श्वास हळूहळू आत घेत हात जमिनीलगत ठेवून शरीराकडे सरकवत सरळ व्हावे.
८. ताठ बसून हात छातीसमोर ‘नमस्ते’ च्या स्थितीत आणून श्वास पूर्ण बाहेर सोडावा. 
श्वास आत घेऊन पुढचे आवर्तन सुरू करावे.
९. एक एक करून दोन्ही पाय सोडवून पूर्वस्थितीला यावे. 
सूचना - ही क्रिया वज्रासनात बसून करता येणे शक्‍य नसल्यास सुखासनात बसून करावी.

मानवता
या क्रियेच्या अभ्यासाने वृत्ती स्थिर होते व मनुष्यात असलेली पशुत्ववृत्ती कमी होते. हिच्या अभ्यासाने पाठीचा कणा ताणला जातो व पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूचा ताण कमी होतो.
ही क्रिया प्रत्येक पायाने जास्तीत जास्ती सात वेळा करावी. 
१. भिंतीच्या समोर सरळ हाताच्या अंतरावर उभे राहावे. हात शरीरालगत दोन्ही बाजूला सरळ असावेत.
२. दोन्ही हात वर उचलून शरीराशी काटकोनात आणावेत व बोटांच्या टोकांनी भिंतीला स्पर्श करावा. या वेळी पाठीचा कणा ताठ व जमिनीशी काटकोनात असावा.
३. हात एकमेकांना समांतर ठेवून थोडेसे पुढे झुकून हाताच्या तळव्यांनी भिंतीत दाबावे, दृष्टी दोन्ही हातांच्या मध्ये असावी. 
४. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाकडे आणावी.
५. श्वास नाकाद्वारे झटक्‍यात बाहेर सोडत असतानाच उजवा पाय जोरात मागे झटकावा (या वेळी पायाचा जमिनीला स्पर्श होऊ नये).
६. उजवा पाय जमिनीवर ठेवावा.
ही क्रिया काही वेळा करावी.
७. नंतर हीच क्रिया डाव्या पायाने करावी. 

अनुलोम-विलोम
अनुलोम-विलोम हा एक प्राणायामाचा प्रकार आहे. यालाच लोम-विलोम, नाडीशोधन किंवा नाडीशुद्धी प्राणायाम असेही म्हटले जाते. यात प्रथम उजव्या नाकपुडीतून श्वास आत घेतला जातो व डाव्या नाकपुडीतून सोडला जातो, नंतर डाव्या नाकपुडीतून श्वास आत घेतला जातो व उजव्या नाकपुडीतून सोडला जातो. यात श्वास आत धरूनही ठेवला जातो. 

अनुलोम-विलोमच्या नियमित अभ्यासाने श्वसनमार्गाची शुद्धी होते, नैसर्गिकपणे डाव्या व उजव्या बाजूने चालणाऱ्या श्वासोच्छ्वासाचे नियमन होते, हृदयाचे ठोके नियमित पडायला मदत होते तसेच अन्न व ‘प्राणा’चे शोषण चांगल्या प्रकारे होते. याच्या अभ्यासाने प्राणायामाच्या अभ्यासाची पूर्वतयारी आपोआपच होते.