ज्ञानेंद्रियांचे आरोग्य 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Tuesday, 7 March 2017

शरीर पंचमहाभूतांपासून झालेले असल्यामुळे पंचमहाभूतांचे गुण शरीराला लागू होतात. आपल्याला बाह्य विश्‍वाचा आणि एकूणच सर्व अस्तित्वाचा बोध व्हावा यासाठी त्या गुणांचा आपल्याला उपयोग करता येतो. असा उपयोग करून घेणारी ती ज्ञानेंद्रिये. या प्रत्येक इंद्रियाची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदाने जणू मिनी पंचकर्म म्हणता येईल असा नित्यक्रम सांगितलेला आहे. 

शरीर पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर ज्या काही व्यवस्था अस्तित्वात होत्या त्यात पंचमहाभूते येतात. ही द्रव्ये पाच आहेत. पंचमहाभूते, शक्‍ती व जाणीव या तीन गोष्टी त्रिकालाबाधित आहेत, म्हणजे त्या पूर्वीपासून आहेत व कायम राहणारच आहेत. पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व आहे पृथ्वीतत्त्व. पृथ्वीतत्त्व म्हणजे माती नव्हे, तर पृथ्वीतत्त्व म्हणजे जडत्व. ज्या कशाला आकार देता येतो ते सर्व पृथ्वीतत्त्व होय. पंचमहाभूतातील दुसरे तत्त्व आहे जलतत्त्व. पृथ्वीतत्त्व एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. तेच पृथ्वीतत्त्व पातळ झाले तर ती वाहू शकेल, हेच जलतत्त्व. वाहणे हा जलतत्त्वाचा गुण. त्यानंतरचे तत्त्व आहे अग्नितत्त्व. अग्नी ही उष्णता आहे व या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊ शकते व उष्णता कमी कमी करत गेल्यास पाण्याचा बर्फही होऊ शकतो. अग्नीतत्त्वामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता असते. त्यानंतर येणारे वायुत्तत्व हे चलनवलनाशी आवश्‍यक असणारी व्यवस्था आहे. चलनवलन अति झाले, वायू वाढला तर त्रास होतो, तसेच चलनवलन थांबले तरी जीव गुदमरतो. पाचवे तत्त्व आहे आकाशतत्त्व. ही पोकळी ज्यामध्ये पंचमहाभूते आपला सर्व व्यवहार चालवतात. 

ही पाचही तत्त्वे कधीही शंभर टक्के शुद्ध स्वरूपात नसतात. म्हणजे पृथ्वीतत्त्वामध्ये काही अंश ओलाव्याचा असतो, ते त्यात असलेले जलतत्त्व. हवेत कण असतात ते वायुतत्त्वात असलेले पृथ्वीतत्त्व. ही सर्व तत्त्वे आकाशतत्त्वामध्ये असल्याने ज्या ठिकाणी अत्यंत शुद्ध आकाश आहे असे वाटते तेथे पन्नास टक्के आकाशतत्त्व असते आणि उरलेली चार तत्त्वे प्रत्येकी साडेबारा टक्के असतात. यास पंचीकरण म्हणतात. शरीर या पंचमहाभूतांपासून झालेले असल्यामुळे पंचमहाभूतांचे गुण शरीराला लागू होतात. आपल्याला बाह्य विश्‍वाचा आणि एकूणच सर्व अस्तित्वाचा बोध व्हावा यासाठी त्या गुणांचा आपल्याला उपयोग करता येतो. असा उपयोग करून घेणारी ती ज्ञानेंद्रिये. उदा. सुगंध आला तर तो पृथ्वीतत्त्वाचा द्योतक आहे. जेथे सुगंध आहे तेथील अवकाशात कुठले तरी कण असतात हे नक्की. समाविष्ट करून घेणे हा आकाशाचा गुण आहे. 
आकाशतत्त्वामुळे ध्वनी येतो, स्पर्शज्ञान वायुतत्त्वामुळे होते, अग्नीतत्त्वामुळे दाहकता अनुभवता येते, जलतत्त्वामुळे वस्तूची चव कळते आणि पृथ्वीतत्त्वामुळे वास येतो. 
कानांनी ध्वनी ऐकता येतो. त्वचेमुळे स्पर्शज्ञान होते म्हणजे त्वचा आजूबाजूला असलेल्या वातावरणाशी आपला संबंध जोडते. आजूबाजूच्या परिसराचा परिणाम त्वचेच्या मार्फत होतो. त्वचारोग असणाऱ्याला इतरांपासून लांब ठेवले जाते, त्याला इतरांच्या संपर्कात येऊ दिले जात नाही. जीभ हे इंद्रिय ज्याच्यामुळे जलतत्त्वाचे ज्ञान होऊ शकते आणि नाकाद्वारे वास घेतला जातो. 

या सर्व इंद्रियांचे आरोग्य नीट ठेवणे आवश्‍यक आहे. मुळात शरीर जर अन्नापासून बनलेले असेल तर अन्न हे सात्त्विक, शुद्ध व प्रकृतीला मानवणारे, ऋतुमानाला अनुरूप, काळाला अनुरूप पाहिजे. मला हे आवडते, ते आवडते असे प्रत्येक जण म्हणत असतो. परंतु आवडण्यापेक्षा आपल्या शरीराला काय मानवते हे पाहणे अधिक आवश्‍यक असते. तसेच जीभ किंवा घसा कोरडा पडणार नाही एवढे पाणी घेणे प्रत्येकालाच आवश्‍यक असते. नाकाने वास येतो. मेंदूशी जोडल्या जाणाऱ्या नाकाच्या शेजारी असलेल्या पोकळ्या नेहमी भरलेल्या असतील किंवा कायम सर्दी होत असेल, कायम कफवृद्धी झालेली असेल, तर त्यामुळेही नाकाने वास कमी येऊ शकतो. वास येण्यामुळे वस्तूचे प्राथमिक ज्ञान होते, त्यात असलेले पृथ्वीतत्त्वाचे गुण ओळखले जातात. पदार्थ गोड आहे हे आपल्याला वासावरून कळते, तसेच पदार्थ तिखट आहे हेही वासावरून कळते. वास येणे कमी झाल्यास किंवा वास येईनासा झाल्यास हे ज्ञान होऊ शकणार नाही. श्‍वसनसंस्थेचे आरोग्य पृथ्वीतत्त्वावर व वायुतत्त्वावर अवलंबून असते. श्‍वासाबरोबर हवा व प्राण आत ओढले जातात. ते नंतर फुप्फुसांमध्ये रक्‍ताच्या संपर्कात येतात व रक्‍त शुद्ध होते. हे शुद्ध झालेले रक्‍त शरीरभर शक्‍तीसारखे पोचविले जाते. जसे एका गोठ्यात असलेल्या अनेक गाईंचे दूध काढल्यानंतर बाटल्यांमध्ये वा पिशव्यांमध्ये भरून घरोघरी पोचविले जाते, तसे फुप्फुसांमध्ये शुद्ध झालेले रक्‍त प्रत्येक इंद्रियाला, प्रत्येक पेशीला पोचविले जाते, ज्यामुळे इंद्रिये काम करू शकतात. या दृष्टीने नाकाचे व श्‍वसनसंस्थेचे आरोग्य नीट ठेवणे आवश्‍यक असते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्‍ती नाकाच्या आत असलेल्या अस्तरांशी, एकूणच श्‍वसनसंस्थेशी खेळ करत असतात. 
कानांनी आपण ध्वनी ऐकतो. ध्वनी हा आकाशतत्त्वाचा आहे आणि आकाशतत्त्व असेल त्या प्रमाणात वायूचा संचार असतो. खूप मोठा किंवा सतत मोठा आवाज कानावर पडल्यामुळे तसेच सतत इअरफोन लावण्याने कानात उत्पन्न होणाऱ्या उष्णतेमुळे कानातील जल, वायू, आकाशतत्त्वामध्ये बिघाड होऊ शकतो. तेव्हा कानाची काळजी घेणे आवश्‍यक असते. 

प्रत्येक इंद्रियाची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदाने जणू मिनी पंचकर्म म्हणता येईल असा नित्यक्रम सांगितलेला आहे. संतुलनने असे ऊर्ध्वगत खांद्याच्या वरच्या शरीराचे पंचकर्म घरच्या घरी करण्यासाठी औषधे तयार केलेली आहेत. तेलाने टाळू भरावी. नाकात नस्यसॅन घृतासारख्या सिद्ध तुपाचे चार-चार थेंब टाकावेत, डोळ्यांत काजळ घालावे, डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या वा निरशा दुधाच्या घड्या ठेवाव्यात किंवा सुनयन तेलाचे थेंब टाकावेत, दात, हिरड्या, जीभ यांच्यासाठी (मुखशुद्धीसाठी) सुमुख तेल वापरावे, संगणकासारख्या चमकदार प्रकाशाकडे फार वेळ पाहू नये, अति उष्ण, अति थंड, अति तिखट पदार्थ खाऊ नयेत. त्वचेची काळजी घेण्याच्या दृष्टीने उटण्याने मसाज करणे, आठवड्यातून दोन-तीन वेळा तेलाने अभ्यंग करावा. कानात औषधी तेलाचे दोन-दोन थेंब टाकावेत. अशा प्रकारे सर्व ज्ञानेंद्रियांची काळजी घेता येऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health