आरोग्यासाठी सूर्य 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Monday, 16 January 2017

भारतीय परंपरेत गुळाची पोळी खाऊन, तीळ-गूळ वाटून संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मैत्रीतील जुनी कटुता संपवावी व नवीन मित्र जोडावे, तिळाचे तेल व तीळ वाटून काढलेले दूध अंगाला लावून स्नान करून सूर्यनमस्कार व सूर्योपासना करावी, अशी प्रथा आहे. विशेषतः तरुणांनी शरीरसौष्ठव व बुद्धी-मेधा-प्रज्ञा वाढविण्यासाठी थंडीत सुरू केलेली ही सूर्योपासना, योगासने, प्राणायाम व व्यायाम पुढे वर्षभर चालू ठेवला म्हणजे तारुण्य वाढून दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते.

सूर्यप्रकाशाची ओढ सर्व सजीव प्राणिमात्राला असते. स्वतःहून हालचाल करू न शकणाऱ्या झाडाचाही शेंडा सूर्याच्या दिशेला वळलेला दिसतो, सूर्यफूल सूर्याच्या दिशेने वळत जाते, अन्नधान्य तयार होण्यासाठी पाण्याची जेवढी गरज असते, त्याहून जास्त गरज सूर्यप्रकाशाची असते. सूर्याला वेदात तसेच आयुर्वेदात खूप महत्त्वाचे स्थान आहे असे दिसते. आयुर्वेदात सूर्याचा दृष्टीशी म्हणजे डोळ्यांशी संबंध जोडलेला दिसते. सुश्रुतसंहितेत याबद्दल एक कथा सांगितलेली आढळते. विदेह देशाच्या राजा जनकाने यज्ञात प्राण्यांचा बळी दिल्याने भगवान विष्णू कोपित झाले व त्यांनी जनकराजाच्या दृष्टीचा नाश केला. यानंतर राजा जनकाने कठोर तपस्या केली, तेव्हा संतुष्ट झालेल्या सूर्यदेवाने त्यांना पुन्हा दृष्टी प्रदान केली व बरोबरीने चक्षुर्वेदाचे ज्ञानही दिले. आयुर्वेदातही दृष्टी तेजस्वरूप असते, असे सांगितलेले आढळते. "सूर्यश्‍चक्षुषः' म्हणजे सूर्य हे डोळ्यांचे अधिदैवत आहे, असाही उल्लेख आयुर्वेदात आहे. उगवणाऱ्या सूर्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व वेदातही सांगितलेले आढळते. 

उद्यन्नादित्य कृमीन्‌ हन्ति । म्हणजे उदय होणाऱ्या सूर्यामुळे कृमी, सूक्ष्म जीव जंतू, अदृष्ट दुष्ट शक्‍ती, प्रचलित भाषेतले जिवाणू, विषाणू वगैरे नष्ट होतात. याच कारणासाठी वेदात सूर्याप्रती प्रार्थनास्वरूप मंत्र याप्रमाणे सांगितले आहेत. 
नः सूर्यस्य सदृशे ना युयोथाः ।...ऋग्वेद 
सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्‍च ।...ऋग्वेद 
सूर्यप्रकाशापासून आमचा कधीही वियोग न होवो. 
सूर्य या स्थावर-जंगमरूपी संपूर्ण सृष्टीचा आत्मा आहे. 

प्रश्नोपनिषदातही, आदित्यो ह वै बाह्यः प्राणः उदयति एष ह्येनं चाक्षुषं प्राणं अनुगृह्णानः । सूर्य हा विश्वातला बाह्य प्राण आहे आणि या सूर्यामुळेच डोळ्यांत प्राण असतो, असे सांगितलेले आहे. अथर्ववेदामध्ये उगवता सूर्य व मावळणारा सूर्य आपल्या किरणांनी कृमींचा नाश करो, विशेषतः जे कृमी गाईंच्या शरीरात राहतात, त्यांचा समूळ नाश होवो, या प्रकारचे वर्णन केलेले आहे. आजही जी गाय सूर्यप्रकाशात चरते, तिचे दूध अधिक आरोग्यदायक समजले जाते. 

शरीराचा फिकटपणा, निस्तेजता कमी होण्यासाठी सूर्यकिरण उत्तम होत. लाल सूर्यकिरणांनी वाढलेल्या पित्ताचा पिवळेपणा आणि हिरवेपणा नाहीसा होतो व सौंदर्य तसेच बलाची प्राप्ती होते, निरोगी दीर्घायुष्याचा लाभ होतो, शिरोरोग दूर होतात, असेही अथर्ववेदात सांगितलेले सापडते. सूर्याचा प्रकाश जास्तीत जास्त मिळावा, विशेषतः कृमींचा नाश करण्यास समर्थ असणाऱ्या उगवत्या सूर्याचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी आयुर्वेदात चिकित्सागार, सूतिकागार (बाळंतघर), कुमारागार पूर्वाभिमुख असावे, असे सांगितलेले आहे. 

आपल्या शरीरातील सूर्याचा प्रतिनिधी म्हणजे पित्त. उन्हात फार वेळ राहिल्याने पित्त वाढून चक्कर येणे, डोके दुखणे वगैरे त्रास प्रत्यक्षातही होताना दिसतात; पण शरीरातील स्वाभाविक क्रियांसाठीही पित्त, पर्यायाने सूर्यशक्‍ती कारणीभूत असते. उदा. त्वचा तेजस्वी असणे हे आरोग्याचे लक्षण समजले जाते. ही तेजस्विता त्वचेतल्या भ्राजकपित्ताद्वारे मिळत असते. आजही निस्तेज गोरा रंग आकर्षक होण्यासाठी थंड प्रदेशातल्या म्हणजे नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणचे स्त्री-पुरुष प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा किंवा सूर्यकिरणांप्रमाणे असणाऱ्या विशिष्ट किरणांचा उपयोग करतात. तसेच तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडू शकते, हेही सर्वज्ञातच आहे. 
पित्ताशी संबंधित असलेल्या रक्‍तधातूचा व या दोघांशी संबंधित यकृत, प्लीहा (स्प्लीन) यांचाही सूर्याशी संबंध असतो. कावीळ ही यकृतदोषामुळे होते हे सर्वज्ञातच आहे. रक्‍तधातू बिघडल्याने, अशुद्ध झाल्याने त्वचारोग होतात, त्यावर रक्‍तशुद्धीकर औषध-आहार उपचारांसमवेत सूर्याराधना करावी, असे वाग्भटाचार्य सांगतात. 

सूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते. आधुनिक विज्ञानही हेच सांगते की सूर्याच्या किरणांतून मिळणाऱ्या ड जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता उत्पन्न झाली, जी सूर्याचे दिवसेंदिवस दर्शन न होणाऱ्या अतिथंड व बर्फाळ प्रदेशातील व्यक्‍तींमध्ये उद्भवू शकते, तर तोल जाणे, चक्कर येणे, पाठीमागे पडायला होणे वगैरे त्रास उद्भवू शकतात. लहान मुलांमध्ये हाडे मृदू झाल्याने हात-पाय वाकू लागणे. उदा. मुडदुस, तर आधुनिक वैद्यकातही "सौरचिकित्सा' म्हणजे सूर्यप्रकाशात बसवणे याच उपायाचा अवलंब केला जातो. 

आयुर्वेदातही विविध शिरोरोगांसाठी "महानील तेल' नावाचे तेल नस्य, अभ्यंग तसेच खाण्यासाठी सांगितले आहे. त्यात तेल सिद्ध करण्यासाठी पहिले द्रव्य सांगितले आहे आदित्यवल्लीचे मूळ. या तेलाचे वैशिष्ट्य असे की, हे तेल सिद्ध करण्यासाठी अग्नीचा उपयोग केलेला नाही, तर "आदित्यपाक' करायला सांगितला आहे. 

कुर्यात्‌ आदित्यपाकं वा यावत्‌ शुष्को भवेत्‌ रसः ।... अष्टांगसंग्रह उत्तरतंत्र 
आदित्यपाक करण्यासाठी सर्व गोष्टी लोखंडाच्या भांड्यात एकत्र करून भांडे उन्हात ठेवले जाते व सूर्याच्या उष्णतेने हलके हलके त्यातला जलांश उडून गेला की उरलेले तेल गाळून घेऊन वापरले जाते. आयुर्वेदाने शिरोरोगावर उपचार करताना सूर्यशक्‍तीचा असाही वापर करून घेतलेला आहे. 

एकंदरच, वेद-आयुर्वेदात प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा, सूर्योपासनेचा आरोग्यासाठी उपयोग करून घेण्याबाबत बरेच काही सांगितलेले आहे. 

प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा उपचार म्हणून उपयोग करण्याला "आतपस्वेद' असे नाव दिले आहे. आतपस्वेद हा मुख्यत्वे त्वचारोगात घ्यायला सांगितला आहे. सध्या डी व्हिटॅमिनची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसते आहे. यासाठीही सकाळ संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ राहणे उपयुक्‍त असते. 

सुश्रुतसंहितेमध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग जलशुद्धीसाठीसुद्धा सांगितला आहे. 
व्यापन्नस्य चाग्निक्वथनं सूर्यातपप्रतापनं....। सुश्रुत सूत्रस्थान 
दूषित पाणी निर्दोष करण्यासाठी अग्नीच्या उष्णतेने कढवावे किंवा सूर्यप्रकाशात (उन्हात) सडकून तापवावे. 

"सूर्यनमस्कार' हा व्यायामप्रकारही सहज करता येण्यासारखा व अनेक आसनांचा एकत्रित फायदा करून देणारा आहे. सूर्यनमस्कार करताना श्वासाच्या लयबद्धतेकडे लक्ष दिले तर आसन व श्वसनक्रिया असा दुहेरी फायदा होऊ शकतो. नियमित व योग्य प्रकारच्या सूर्यनमस्कारामुळे हृदय, फुप्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास, एकंदर शरीरशक्‍ती-स्टॅमिना वाढण्यास, स्नायूंना बळकटी आणण्यास अतिशय चांगला उपयोग होतो. सूर्यनमस्कार करताना श्वसनाकडे व शरीरस्थितीकडे लक्ष देण्याबरोबर सूर्याच्या नावाचे बारा मंत्र म्हटले तर अधिकच चांगला उपयोग होतो. 

भारतासारख्या देशात सुदैवाने सूर्यप्रकाशाची कमतरता नाही. उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची पूर्वीपासूनच प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये होती. आज शब्दशः अर्घ्य देता आले नाही तरी सकाळच्या, शक्‍यतो सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात पंधरा-वीस मिनिटे बसणे अशक्‍य ठरणार नाही. बरोबरीने ध्यान, प्राणायामादी क्रिया केल्या तर दुग्धशर्करायोगच म्हणावा लागेल. 

सूर्याराधनेचे, सूर्यप्रकाशाचे याप्रकारे अनेक फायदे असले तरी तीव्र सूर्यप्रकाश पित्तदोष वाढवून आरोग्यास हानिकारक ठरू शकतो, तेव्हा दुपारच्या प्रखर उन्हापासून संरक्षणच करावे. प्रखर सूर्याकडे सरळ बघितल्याने किंवा सूर्यग्रहण बघितल्याने अंधत्व येऊ शकते, असेही आयुर्वेदात सांगितले आहे. 

प्रत्येक वर्षी पौषात 14 जानेवारीला मकरसंक्रांत येते. मकर राशीत असताना सूर्याचा प्रभाव कमी होतो. म्हणून त्या दृष्टीने, आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार, भारतीय परंपरेत गुळाची पोळी खाऊन, तीळ-गूळ वाटून संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मैत्रीतील जुनी कटुता संपवावी व नवीन मित्र जोडावे, तिळाचे तेल व तीळ वाटून काढलेले दूध अंगाला लावून स्नान करून सूर्यनमस्कार व सूर्योपासना करावी, अशी प्रथा आहे. विशेषतः तरुणांनी शरीरसौष्ठव व बुद्धी-मेधा-प्रज्ञा वाढविण्यासाठी थंडीत सुरू केलेली ही सूर्योपासना, योगासने, प्राणायाम व व्यायाम पुढे वर्षभर चालू ठेवला म्हणजे तारुण्य वाढून दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते. 

डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health sun family doctor