#FamilyDoctor स्तन्यपानाची महती

#FamilyDoctor स्तन्यपानाची महती

बाळ जन्माला आले की त्याचे परिपूर्णतेने पोषण व्हावे, यासाठी निसर्गाने अगोदरपासून योजना केलेली असते. ‘मातुरेव पिबेत्‌ स्तन्यम्‌’ अर्थात आईचे स्तन्य हाच बाळाचा आदर्श व सर्वोत्तम आहार असतो. आयुर्वेदात स्तन्याला ‘पयोऽमृत’ म्हटले आहे म्हणजे अमृताची उपमा दिलेली आहे. कारण बाळासाठी आईचे स्तन्य हे पूर्णान्नाप्रमाणे असते. बाळाच्या जन्मानंतर ३०-४० मिनिटांच्या आत पहिले स्तन्यपान करणे प्रशस्त समजले जाते. कारण या वेळेत प्यायला घेतल्यास बाळ दूध ओढण्याची क्रिया अगदी सहजपणे करू शकते. आणि एकदा ही क्रिया नीट जमली की नंतर स्तन्योपत्ती सहज व व्यवस्थित होण्यासही मदत मिळते. पहिले सहा महिने बाळाला फक्‍त स्तन्यपान देणे हे बाळाच्या पोषणासाठी; तसेच भावी आरोग्यासाठी उत्तम असते. 

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा स्तन्यपानाला समर्पित केलेला असतो, जेणेकरून स्तन्यपानाचे महत्त्व अधोरेखित व्हावे. सौंदर्याच्या भ्रामक कल्पनेला बळी पडून किंवा अन्य कोणत्याही कारणाने स्तन्यपान न करण्याचा निर्णय घेणे हे आई व बाळ या दोघांच्याही शारीरिक, मानसिक तसेच हॉर्मोन्सच्या संतुलनाला बिघडवणारे असते, हे आज आधुनिक वैद्यकशास्त्रानेही मान्य केलेले आहे. स्तन्यपानाचे थोडक्‍यात फायदे असे होत, 

स्तन्य बाळाच्या सवयीचे, त्याच्या शरीरात विनासायास स्वीकारले जाणारे असते. त्यामुळेच आरोग्यदायक असते.

बाळासाठी आवश्‍यक असणारी सर्व तत्त्वे स्तन्यात असल्याने स्तन्यपानाने बाळाची पुष्टी होते. 

आई जो काही पौष्टिक आहार, रसायने किंवा औषधे सेवन करते त्याचा साररूपी अंश स्तन्यामार्फत बाळाला मिळतो, त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्‍ती तसेच त्याचा बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकास सहज व उत्तम प्रकारे होतो. 

आईच्या दुधाबरोबरच तिचे प्रेम बाळाला मिळाल्याने बाळाला सुरक्षितता अनुभूत होते, ज्याचा त्याला पुढे आयुष्यभर उपयोग होतो.

बाळ स्तनातून दूध पीत असल्याने, दूध खराब होणे, शिळे असणे, जंतुसंसर्गाने युक्‍त असणे, फार गरम वा थंड असणे या प्रकारचे बाहेरच्या दुधाच्या बाबतीत उद्भवू शकणाऱ्या समस्या स्तन्यपानाच्या बाबतीत उद्भवण्याचा प्रश्‍नच येत नाही.

स्तन्यपान केल्याने बाळंतिणीचे आरोग्यही नीट राहते. जोवर बाळ अंगावर पीत आहे व दूध व्यवस्थित येत आहे तोपर्यंत स्त्रीला पाळी सहसा येत नाही आणि पाळी पाच-सहा महिन्यांच्या पूर्वी सुरू झाल्यास बाळंतिणीची तब्येत बिघडू शकते. आधुनिक संशोधनानेही आज सिद्ध झाले आहे की सुरुवातीपासून आईचे दूध पिणाऱ्या मुलांची रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम राहते व शरीर पोषणही व्यवस्थित होते. 

स्तन्यपान करताना काही नियम सांभाळणे भाग असते. स्तनांची काळजी घेणेही गरजेचे असते. यासाठी आयुर्वेदाने बाळंतपणाच्या आधीपासून ते बाळ अंगावर स्तन्यपान करत असेपर्यंत स्तनांना विशिष्ट तेलाचा अभ्यंग करावा असे सुचवलेले आहे. प्रत्यक्षातही असे दिसते की संतुलन सुहृद तेलासारखे तेल नियमित वापरात ठेवले तर दुधाच्या गुठळ्या होणे, स्तनावर गळू वगैरे होणे, स्तनाग्राला चिरा पडणे, दूध कमी होणे वगैरे तक्रारी सहसा उद्भवत नाहीत, शिवाय स्तनांचा आकार, सौंदर्य यालाही बाधा येत नाही. 

स्तन्य हा बाळाचा पूर्णाहार असतो म्हणूनच स्तन्यात काहीही विकृती नसणे फार गरजेचे असते. आयुर्वेदात शुद्ध स्तन्याची लक्षणे खालीलप्रमाणे दिलेली आहेत.

स्तन्यसम्पत्तु प्रकृतिवर्णगन्धरसस्पर्शम्‌, उदकपात्रे च दुह्यमानमुदकं व्येति प्रकृतिभूतत्वात्‌ तत्‌ पुष्टिकरमारोग्यकरं चेति ।...चरक शारीरस्थान

स्तन्य स्वच्छ, पातळ व शीतल (फार गरम नसलेले) असावे.
त्याचा रंग पांढऱ्या शंखाप्रमाणे पांढरा व स्निग्ध असावा.
चव गोड असावी.
काचेच्या स्वच्छ ग्लासात स्वच्छ पाणी घ्यावे व त्यात स्तन्याचे तीन-चार थेंब टाकावेत. जर स्तन्य पाण्यात सहज एकजीव झाले तर ते शुद्ध समजावे.
असे स्तन्य बाळाला आरोग्यकर व पोषक असते.
आजकाल बहुतेक स्त्रियांमध्ये स्तन्य कमी तयार होण्याची तक्रार आढळते. याची कारणे अनेक असू शकतात. 

क्रोधशोकावात्सल्यादिभिश्‍च स्त्रियाः स्तन्यनाशो भवति ।
...सुश्रुत शारीरस्थान

 

क्रोध, अति शोक, वात्सल्याचा अभाव, उपवास, अति व्यायाम, चिंता या कारणांमुळे स्तन्य कमी उत्पन्न होते. 

आजकाल बहुतेक स्त्रिया नोकरी करणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक ओढाताण होऊ शकते. शिवाय स्वतःकडे पुरेसे लक्ष द्यायला वेळही नसतो. यामुळे आचरण व आहारात योग्य काळजी घेतली जात नाही. परिणामतः स्तन्याची उत्पत्ती पुरेशा प्रमाणात होत नाही. स्तन्य व रसधातूचा खूप जवळचा संबंध आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे. रसधातू हा पहिला धातू असल्याने आहारातील बारीक-सारीक गोष्टींचा व मानसिक ताणाचाही रसधातूवर पर्यायाने स्तन्यावरही वाईट परिणाम होताना दिसतो. म्हणून पुढे दिलेल्या आहार-आचरणातल्या सूचनांबरोबरच स्त्रीला कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण येणार नाही याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. 

स्तन्य थोडेही कमी होते आहे असे जाणवू लागल्यास बाळंतिणीने पुढील उपाय सुरू करावेत.

शतावरी कल्प घालून दूध पुरेशा प्रमाणात घ्यावे.
सकाळ संध्याकाळ अहळीवाची खीर किंवा अहळीव-नारळाचा लाडू खावा. 
शिंगाड्याचा पिठाचा गूळ घालून केलेला शिरा खाण्यानेही स्तन्य वाढायला मदत मिळते.
दुपारच्या जेवणात तांदळाची, खसखशीची, रव्याची केशर, साखर किंवा गूळ घालून केलेली खीर खावी.
बरोबरीने घरचे ताजे लोणी-खडीसाखर, साजूक तूप यांचा आहारात समावेश असावा.
याखेरिज स्तन्य वाढवण्यासाठी औषध योजनाही करता येते. 
अर्धा चमचा शतावरी चूर्ण व अर्धा चमचा विदारी चूर्ण दुधात मिसळून घेणे. 
पाव चमचा पिंपळी, पाव चमचा सुंठ, पाव चमचा हिरडा चूर्ण, अर्धा चमचा गूळ व जरुरीपुरते तूप हे मिश्रण दुधासह घेणे. 
स्तन्य कमी होऊ शकते, त्याचप्रमाणे बिघडूही शकते. मातेला अजीर्ण झाल्याने, चुकीचे किंवा फार कडू वा खारट अन्न, शिळे अन्न खाल्ल्याने, दुपारी झोपल्याने, पनीर, दही वगैरे पदार्थ खाल्ल्याने; अतिप्रमाणात राग, शोक किंवा ताण आल्याने; खूप जागरण झाल्याने; स्तन्याचा रंग, चव, गंध वगैरे बिघडतात.
अशा प्रकारची स्तन्यदुष्टी होऊच नये यासाठी अगोदरपासून प्रयत्न करता येतात. 

बाळंतिणीच्या आहारात पुरेशा प्रमाणात शुद्ध, शक्‍यतो घरी केलेल्या हळदीचा समावेश करणे. ओली हळद, मिळत असेल तर त्याचे आले-मिठाबरोबर तयार केलेले लोणचे आहारात ठेवता येईल. एरवी भाजी-आमटीमध्ये हळद भरपूर प्रमाणात वापरली, रोजच्या फोडणीत हिंग वापरल्यासही स्तन्य शुद्ध राहायला मदत होते.

भाजी, आमटीच्या फोडणीत मोड आलेल्या मेथ्या टाकल्यानेही स्तन्य शुद्ध राहायला मदत मिळते. तसेच स्तन्योत्पत्तीसाठीही मदत मिळते.

जिरेसुद्धा स्तन्यशुद्धीकरता उत्तम द्रव्य आहे. भाज्यांना जिऱ्याची फोडणी देता येईल, ताकामध्ये जिरे पूड टाकता येईल. भाज्या बनवतानाही जिरे पूड टाकता येईल.

जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून भाजलेला ओवा, बाळंतशेपा, तीळ यांची सुपारी खाण्यानेही स्तन्य शुद्ध राहायला मदत मिळते.

आठवड्यातून दोन वेळा कुळथाचे सूप घेण्यानेही स्तन्य शुद्ध राहण्यास मदत मिळते. तुपावर जिऱ्याची फोडणी व आवडत असल्यास थोडासा लसूण टाकून कुळथाचे चविष्ट सूप बनवता येते.

या प्रकारे काळजी घेतल्यास स्तन्यदुष्टी होणार नाही. तरीही चुकीच्या आहारा-आचरणामुळे स्तन्यदुष्टी झालीच तर औषधयोजना करवी लागते. यासाठी दशमूलारिष्ट, दशमूळ काढा, पंचतिक्‍तघृत, सुंठीची मूळ-तुपाबरोबर केलेली गोळा, विशेष वनस्पतींचे स्तनांवर करायचे लेप वगैरे औषधोपचारांची योजना करता येते. 

थोडक्‍यात, स्तन्य हा बाळाचा परिपूर्ण आहार आहे. शुद्ध आणि योग्य प्रमाणात स्तन्य मिळणे हा जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाचा अधिकार आहे. यासाठी बाळंतिणीने स्वतःच्या आहार-आचरणाकडे लक्ष ठेवणे व घरातील इतरांनी तिला पुरेशी विश्रांती मिळेल, तिची मानसिकता आनंदी व प्रसन्न राहील यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com