शरीररूपी मंदिराच्या प्रवेशद्वारांचे आरोग्य (डॉ. श्री बालाजी तांबे)

शरीररूपी मंदिराच्या प्रवेशद्वारांचे आरोग्य (डॉ. श्री बालाजी तांबे)

शरीराच्या प्रवेशद्वारांची नीट काळजी घेणे हे महत्त्वाचे असते. अन्न असो वा औषध असो, कानांवर पडणारे शब्द असोत किंवा डोळ्यांमार्फत मेंदूपर्यंत पोचणारी प्रतिमा असो, नाकावाटे घेतलेला गंध असो किंवा त्वचेमार्फत समजणारा स्पर्श असो, या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी शरीरातील प्रवेशद्वारांचे आरोग्य नीट ठेवणे गरजेचे असते, तरच संपूर्ण आयुष्यभर निरामयता व सुखाचा आनंद घेता येतो.   

शरीराचे भरण- पोषण करण्यासाठी निसर्गाने शरीरात अनेक प्रवेशद्वारे योजलेली आहेत. ज्याप्रमाणे घराचे प्रवेशद्वार भरभक्कम असणे, सुशोभित व त्याहीपेक्षा स्वच्छ, शुद्ध असणे हे संपूर्ण घराच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे शरीराच्या प्रवेशद्वारांची नीट काळजी घेणे हेसुद्धा महत्त्वाचे असते. अन्न असो वा औषध असो, कानांवर पडणारे शब्द असोत किंवा डोळ्यांमार्फत मेंदूपर्यंत पोचणारी प्रतिमा असो, नाकावाटे घेतलेला गंध असो किंवा त्वचेमार्फत समजणारा स्पर्श असो, या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी शरीरातील प्रवेशद्वारांचे आरोग्य नीट ठेवणे गरजेचे असते. 

सर्वांत पहिले आणि सर्वाधिक वापरले जाणारे प्रवेशद्वार म्हणजे मुख. आहार, तसेच औषध मुखात प्रवेशित होताक्षणीच आपले काम करू लागते. अनेक औषधे तर अशी असतात, की ती सरळ पोटात जाऊन चालत नाहीत, खांद्यावरील सर्व अवयवांचे म्हणजे मेंदू, कान, डोळे, केस या सर्वांचे पोषण करण्यासाठी किंवा त्यांच्या रोगनिवारणासाठी नस्य केले जाते. रोज नस्य करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेले तेल किंवा गायीचे तूप (कोमट करून) वापरता येते, असे नस्य नियमित केल्याने इंद्रियांना ताकद मिळून त्यांची कार्यक्षमता वाढते. इंद्रियांचे पोषण होऊन बुद्धी, स्मृती वगैरे तल्लख होतात. चेहऱ्यावर तजेला येतो व अकाली सुरकुत्या येत नाहीत. खांदे, मान व छाती भरदार व बलवान होतात. केस अकाली गळणे किंवा पांढरे होणे थांबते. आवाज मधुर होतो. झोप शांत येते व सकाळी आपोआप व योग्य वेळी जाग येते. असे हे नस्य ‘आजन्ममरणं शस्तम्‌’ म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंत करणे उत्तम, असे आयुर्वेदात सांगितले आहे. 

यानंतर ज्याचे द्वार बंद करता येत नाही असे प्रवेशद्वार म्हणजे कान.

श्रोत्रेन्द्रियस्याधिष्ठानम्‌ म्हणजे पंचज्ञानेंद्रियांपैकी श्रोत्रेंद्रियांचे अधिष्ठान म्हणजे कान. तसेच, पंचमहाभूतांपैकी आकाश महाभूताचा संबंध श्रोत्रेंद्रियांशी आहे आणि जेथे जेथे आकाश म्हणजे पोकळी आहे, तेथे प्रत्येक ठिकाणी वायूचे साहचर्य असते. म्हणून कानाच्या आरोग्यासाठी कानात वातदोष वाढत नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक असते. तेल- तुपासारख्या स्नेहनद्रव्यांनी वाताचे शमन होते व कानाचे पोषण होते. 

कानांची काळजी घेण्यासाठी उत्तम आयुर्वेदिक उपचार म्हणजे कर्णपूरण. यात अगोदर कपाळ, कान व कानाभोवतीच्या जागेवर तेलाचा अभ्यंग व स्वेदन (शेक) करून नंतर कानात मावेल एवढे औषधी सिद्ध तेल किंचित गरम करून टाकले जाते व काही वेळ तसेच ठेवले जाते. नंतर कान तिरका करून तेल काढून टाकले जाते व वरून कापसाचा बोळा ठेवला जातो. कानाच्या आरोग्यासाठी तसेच बाधिर्य, कानातून आवाज येणे, कान दुखणे वगैरे कानाच्या अनेक तक्रारींवर कर्णपूरणाचा उत्कृष्ट उपयोग होताना दिसतो. याखेरीज झोप शांत लागणे, डोकेदुखी दूर होणे, तणाव नाहीसा होऊन डोके शांत होणे असे इतरही अनेक फायदे अशा प्रकारे केलेल्या कर्णपूरणामुळे होतात. पंचकर्म चिकित्सा केंद्रात अशा प्रकारचे कर्णपूरण अधूनमधून करवून त्यानंतर बिल्वादी तेल किंवा संतुलन श्रुती तेल यांसारखी तेले नियमित कानात टाकल्यास कानांचे आरोग्य चांगले राहण्यास उपयोग होताना दिसतो.

यापुढचे प्रवेशद्वार म्हणजे डोळे. सध्याच्या काळात डोळ्यांवर अतिताण येणार नाही, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरावे. बरोबरीने डोळ्यांची शुद्धी व्हावी आणि पोषण व्हावे यासाठी पुढील उपाय योजता येतात.

रोज सकाळी डोळे त्रिफळा-जलाने धुणे. यासाठी पाव चमचा त्रिफळा चूर्ण कपभर पाण्यात भिजत घालता येते. सकाळी चौपदरी सुती कापडातून गाळून घेऊन डोळे धुण्यासाठी मिळणाऱ्या खास कपात घेऊन डोळे धुता येतात. डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होऊ नये, एकंदर डोळे निरोगी राहावेत, दृष्टी चांगली राहावी यासाठी हा उपाय नियमित करणे फायद्याचे ठरते. डोळ्यांचे पोषण व्हावे, तसेच आरोग्य सुधारावे यासाठी डोळ्यांत नियमित अंजन घालणे उत्तम असते. त्रिफळा घृत, कापूर, मोती भस्म वगैरे द्रव्यांपासून बनविलेले ‘सॅन अंजन’सारखे आयुर्वेदिक अंजन यासाठी वापरता येते. रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा-मध-तुपाचे सेवन करणे. चमचाभर त्रिफळा चूर्ण, अर्धा चमचा मध व पाव चमचा तूप यांचे मिश्रण घेण्याने डोळ्यांचे, तसेच केसांचे आरोग्य चांगले राहते. 

याखेरीज नियमित पादाभ्यंग करणे हेसुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. कारण पायाचे तळवे व डोळे यांचा निकटचा संबंध असतो. तळव्यांना शतधौतघृत किंवा त्रिफळा घृत किंवा या दोघांच्या मिश्रणापासून तयार केलेले पादाभ्यंग घृत लावून काशाच्या वाटीने घासल्याने शरीरातील उष्णता कमी होते, डोळे शांत होतात. ‘सुनयन घृता’सारखे डोळ्यांना हितकर द्रव्यांसह संस्कारित तूप डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टी व्यवस्थित राहण्यासाठी उत्कृष्ट असते. दृष्टिदोष दूर होण्यासाठी, तसेच विविध नेत्ररोग बरे होण्यासाठीसुद्धा या घृताचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.

डोळे निरोगी राहावेत, प्रसन्न व तेजस्वी राहावेत यासाठी, तसेच नेत्ररोग झाले असल्यास बरे होण्यासाठी नेत्रबस्ती हा उपचार अतिशय प्रभावी असतो. यात उडदाच्या पिठाच्या साहाय्याने डोळ्यांभोवती पाळे तयार केले जाते आणि त्यात औषधांनी संस्कारित तूप, तेल किंवा दूध (कोमट करून) घालून काही वेळासाठी तसेच ठेवले जाते. डोळ्यांवर ताण येणाऱ्या व्यक्‍तींनी, संगणक किंवा तत्सम प्रखर स्क्रीनकडे फार वेळ राहावे लागणाऱ्या व्यक्‍तींनी, प्रखर प्रकाशात काम करणाऱ्या व्यक्‍तींनी तर नेत्रबस्ती अधूनमधून करून घेणे उत्तम होय.

संपूर्ण शरीराला व्यापून असणारे प्रवेशद्वार म्हणजे त्वचा. त्वचेवरील अगणित रंध्रांच्या द्वारा शरीरात अनेक गोष्टींचा प्रवेश होत असतो. आयुर्वेदातील अभ्यंग, लेप वगैरे उपचारांचा उपयोग या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून होत असतो.

त्वचा खूप संवेदनशील असते. ऊन, उष्णता, रासायनिक पदार्थ, अतिथंडी, जोराचा वारा वगैरे गोष्टींचा इतकेच नाही, तर मानसिक भावनांचाही त्वचेवर परिणाम होऊ शकतो. वयानुसार शरीरात जे बदल होत असतात, त्यानुसारही त्वचा बदलत जाते. मात्र त्वचा निरोगी राहावी, सतेज राहावी यासाठी प्रयत्नशील राहता येते. उदा. दुधावरची साय त्वचेसाठी खूप चांगली असते. चेहरा, हात, मान वगैरे नाजूक त्वचा असणाऱ्या ठिकाणी पंधरा- वीस मिनिटांसाठी साय लावून नंतर कोमट पाण्याने धुणे त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम असते. कोरफडीचा ताजा गरसुद्धा त्वचेसाठी चांगला असतो. स्नानाच्या आधी पाच- सात मिनिटांसाठी गर लावून ठेवता येतो. विविध औषधी द्रव्यांनी संस्कारित तेलाचा अभ्यंग हे तर त्वचेसाठी जणू वरदानच आहे. रात्री झोपण्यापूर्वी किंवा स्नानापूर्वी एक- दोन तास तेल जिरवून नंतर सुगंधी वनस्पतींच्या उटण्याने स्नान करण्याने त्वचा सतेज होते, वर्ण उजळतो व त्वचारोगांना प्रतिबंध होऊ शकतो. 

अशा प्रकारे शरीराच्या प्रवेशद्वारांची काळजी घेतली, तर संपूर्ण आयुष्यभर निरामयता व सुखाचा आनंद घेता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com