esakal | मोतीबिंदू
sakal

बोलून बातमी शोधा

MotiBindu

दृष्टिमण्डलं मूसरदलमात्रं पञ्चभूतप्रसादजम्‌ । ...सुश्रुत उत्तरतंत्र
लिंगनाश हा तिमिर रोगाची एक अवस्था सांगितली आहे व तो दृष्टिमंडळाला बिघडवणारा एक मुख्य रोग आहे.

मोतीबिंदू

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

मोतीबिंदू होऊ नये, यासाठी डोळ्यांची काळजी घेणे आवश्‍यक असते; पण वयोपरत्वे मोतीबिंदू होतो. उतारवयात मोतीबिंदू झाला तर शस्त्रक्रिया करून घेणेच उत्तम. 

वयोपरत्वे शरीरात काही ना काही बदल होणे नैसर्गिक असते, उदा. केसांचा रंग तसेच पोत, त्वचेची कांती. मोतीबिंदूचेही असेच काहीसे असते. वाढत्या वयाचा परिणाम म्हणून डोळ्यांत मोतीबिंदू होऊ शकतो. नावाप्रमाणेच यात लेन्सची (दृष्टिमंडळ) पारदर्शकता हलके हलके नाहीशी होऊन ती मोत्याप्रमाणे म्हणजेच अपारदर्शक किंवा धूसर होऊ लागते. 

दृष्टी कमी होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक कारण मोतीबिंदू होय. वयाच्या ६५-७० नंतर बहुतांशी लोकांमध्ये मोतीबिंदू थोड्या फार प्रमाणात आढळतोच. मात्र, काही मुलांना मोतीबिंदू जन्मतःच असतो तर काहींना डोळ्याला इजा पोचल्यामुळे किंवा काही तीव्र औषधांचा दुष्परिणाम झाल्यामुळे, तसेच मधुमेहाच्या काही रुग्णांमध्ये हा विकार लवकर उद्भवू शकतो. मात्र मोतीबिंदू हा वयोपरत्वे होणारा विकार आहे.
मोतीबिंदूला आयुर्वेदात ‘लिंगनाश’ म्हणतात. 

लिं चक्षुरिन्द्रियशक्तिस्तस्य नाशो यस्मिन्‌ स लिनाशदोषः । 
....सुश्रुत उत्तरतंत्र

लिंग म्हणजे डोळ्यांची दृष्टी, तिचा नाश ज्या रोगात होतो, तो लिंगनाश अर्थात मोतीबिंदू होय.

आयुर्वेदात डोळ्यांची रचना समजावताना पाच वर्तुळाकार मंडले सांगितली आहेत. पक्ष्म, वर्त्म, शुक्‍ल, कृष्ण व दृष्टी अशी ही पाच मंडले होत. पक्ष्म म्हणजे पापण्यांचे केस, वर्त्म म्हणजे पापण्या, शुक्‍ल म्हणजे पांढरा भाग, कृष्ण म्हणजे काळा भाग व दृष्टी म्हणजे डोळ्यातील बाहुली होय. दृष्टिमंडळ मसुराच्या डाळीएवढ्या आकाराचे असून ते पाचही महाभूतांच्या सारांशापासून बनलेले आहे, असेही सुश्रुताचार्य म्हणतात. 

दृष्टिमण्डलं मूसरदलमात्रं पञ्चभूतप्रसादजम्‌ । ...सुश्रुत उत्तरतंत्र
लिंगनाश हा तिमिर रोगाची एक अवस्था सांगितली आहे व तो दृष्टिमंडळाला बिघडवणारा एक मुख्य रोग आहे.

लिनाशः कफोत्थं पटलम्‌ । ... अष्टांगहृदय सूत्रस्थान
दृष्टिमंडळातील दृष्टिमणी (लेन्स) च्या ठिकाणी कफदोष वाढल्यामुळे लिंगनाश (मोतीबिंदू) होतो. सुरवातीला अशा व्यक्‍तींना जवळचे दिसते, मात्र दूरचे पाहताना धुके दाटल्यासारखे वाटते. दोष थोडे असल्यास मोतीबिंदू झालेल्या व्यक्‍तीला काही वस्तू दिसू शकतात. उदा. आकाशातील चंद्र, सूर्य, नक्षत्र, तेजस्वी अग्नी, विजा, टी. व्ही. किंवा कॉम्प्युटरचा स्क्रीन दिसू शकतो, मात्र दोषांची तीव्रता वाढत गेली तर संपूर्ण दृष्टिनाशही होऊ शकतो.

मोतीबिंदूचा प्रतिबंध होण्यासाठी उपाय करणे सर्वोत्तम होय. मोतीबिंदू अगदी सुरवातीच्या अवस्थेत समजला तर तो अजून वाढू नये किंवा त्याच्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी काही उपचार करता येणे शक्‍य आहे. 

मात्र वाढलेल्या मोतीबिंदूवर शस्त्रकर्म हाच उपाय होय. प्राचीन काळी आयुर्वेदिक पद्धतीने मोतीबिंदूवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली जात असल्याचे उल्लेख उपलब्ध आहेत. सुश्रुतसंहितेत तसेच अष्टांगसंग्रहात आजही शस्त्रक्रियेचे वर्णन आढळते. मात्र, शल्यकर्म विभागात आधुनिक शास्त्राने उत्कृष्ट प्रगती केलेली असल्याने आजकाल आयुर्वेदिक पद्धतीच्या शस्त्रकर्माची गरज पडत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय 
 दृष्टिमंडळात कफदोष अवाजवी प्रमाणात वाढल्याने मोतीबिंदू होत असल्याने कफसंतुलन करणाऱ्या व एकंदर दृष्टीची शक्‍ती वाढविणाऱ्या पुढील उपायांनी मोतीबिंदू न होण्यास मदत होते.
  त्रिफळा, मूग, शतावरी, साजूक तूप, मध, घरचे ताजे लोणी या गोष्टी नियमित सेवन करणे. 
  पायाच्या तळव्यांना काशाच्या वाटीने तूप चोळणे. 
  सकाळ संध्याकाळ डोळे थंड पाण्याने धुणे. 
  डोळ्यांत आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले शुद्ध व औषधांनी सिद्ध केलेले तुपाने युक्‍त असे काजळ, अंजन घालणे. 
  प्रखर, चमकदार वस्तूकडे एकटक न पाहणे. विशेषतः दिवसभर कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांनी दर तास-दीड तासाने पाच-दहा मिनिटे डोळे बंद करून विश्रांती घेणे. 
  रात्रीची जागरणे व दिवसाची झोप हे दोन्ही टाळणे.
  चिंता, राग, फार रडणे वगैरे गोष्टी टाळणे.
  रात्री झोपताना बंद डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे.
  आहारात श्रीखंड, मिठाई, दही, सीताफळ, फणस, पेरू वगैरे गोष्टींचा अतिरेक टाळणे. केळे खायचे असल्यास मधासह खाणे. फ्रीजचे थंड पाणी, कोल्ड्रिंक्‍स, रात्री आईस्क्रीम खाणे वगैरे गोष्टी टाळणे.
  याउलट आहारात यव, ज्वारी, बाजरी, नाचणी, जुने तांदूळ, लाह्या, मध, साजूक तूप, मूग वगैरे गोष्टींचा अंतर्भाव करणे.

मोतीबिंदू झाला तर...
मोतीबिंदूची अगदी सुरवात असल्यास पुढील उपाय सुरू करावेत.
  रात्रभर त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी गाळून घेणे व त्याने डोळे धुणे.
  रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर त्रिफळाचूर्ण तूप व मधासह सेवन करणे.
  कफनाशक द्रव्यांनी तयार केलेले विशेष अंजन डोळ्यात घालणे.
  औषधीयुक्‍त तेलाने किंवा गोमूत्राच्या सिद्ध घृताने साहाय्याने नेत्रतर्पण करणे. 
  तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने त्रिफळा घृत, सप्तामृत लोह वगैरे औषधे सुरू करणे.
प्रत्यक्षातही अधूनमधून पंचकर्म करणाऱ्यांना, नेत्रबस्ती करून घेणाऱ्यांना मोतीबिंदू सावकाश आणि उशिरा होतो, असे दिसते. सध्याच्या काळात डोळ्येंवर येणारा ताण लक्षात घेतला तर वयाच्या चाळिशीनंतर संतुलन सुनयन घृत घेणे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रबस्ती करून घेणे चांगले होय. 

अशा प्रकारे मोतीबिंदूवर उपचार करता येतात. मात्र, डोळ्यांची दृष्टी कमकुवत होत आहे असे जाणवायला सुरवात झाली की, एक वेळ नेत्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक असते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करणे उत्तम होय.