जखमेचे व्रण भरण्यासाठी...

जखमेचे व्रण भरण्यासाठी...

चेहरा व मानेवरील व्रण हे एकूणच रुपाला बाधा पोहोचवणारे ठरतात. ते व्रण बुजवण्याला अजून परिणामकारक उपाय नव्हता. व्रणांवरील उपचारांसाठी कॉर्टिकॉस्टेरॉइड्‌स इंजेक्‍शन, इर्रेडिएशन, अल्ट्रासाउंड, सिलकॉन ॲप्लिकेशन आणि शस्त्रक्रिया या पद्धतींचा वापर करण्यात येत असतो. पण यापैकी एकाही उपचार पद्धतीमुळे जखमेतील पॅथॉलॉजिक प्रक्रियेला प्रतिबंध घालता येत नाही किंवा व्रण कमी करण्यास मदत होत नाही. मात्र आता असे व्रण भरून काढण्यासाठी उपचार उपलब्ध झाले आहेत. गुंतागुंतीचे व्रण आणि शस्त्रक्रियेनंतर झालेली जखम भरून काढण्यासाठी नवे तंत्र विकसित करण्यात आले आहे. चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करणारे डॉ. देबराज शोम आणि त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी केलेले हे संशोधन अमेरिकन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जनच्या ‘प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्‍टिव्ह सर्जरी जर्नल’मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. 

एक ते सात इंच रुंदीचे व्रण असलेल्या शंभर रुग्णांवर या तंत्राद्वारे यशस्वी उपचार करून हे संशोधन सिद्ध करण्यात आले. एकोणीस ते सत्तेचाळीस वयोगटातील रुग्णांवर साधारण सहा महिने उपचार करण्यात आला आहे. या संशोधनात ७६ टक्के रुग्णांमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली. म्हणजे व्रण आजुबाजूच्या त्वचेमध्ये मिसळून गेला. अन्य रुग्णांमध्ये सहा महिन्यांच्या उपचारानंतर व्रण ऐंशी टक्‍क्‍यांहून अधिक भरून निघाले.

जखमेनंतर, आधी झालेल्या शस्त्रक्रियांमुळे किंवा भाजणे, ॲसिड अटॅक किंवा फेशिअल ट्रॉमामुळे चेहऱ्यावर व्रण येतात. चेहऱ्यावरील व्रण रुंद असतील तर तो डाग राहता. त्यामुळे रुग्ण व शल्यविशारद हे दोघेही निराश होतात. चेहऱ्याच्या स्नायूंची सतत हालचाल होत असते. त्याचा जखम बरी होण्यावर आणि व्रण परिपक्व होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. परिणामी व्रण रुंद होतात व अधिक दिसून येतात. या नव्या तंत्रामध्ये सर्वप्रथम व्रणाभोवती दोन बोटॉक्‍स इंजक्‍शन्स देण्यात येतात. त्यानंतर दोन आठवड्यांनी रिव्हिजन सर्जरी (पुनर्शस्त्रक्रिया) करण्यात येते. त्यानंतर पुढील सहा महिने ‘सेंटेनेला एशियाटिका’ (भारतीय उपखंडात सापडणारी वनौषधी) त्या व्रणावर लावण्यात येते आणि कार्बन डायऑक्‍साइड लेझर स्कीन रिसरफसिंगची अनेक सत्रे घेण्यात येतात. बोटॉक्‍सच्या माध्यमातून चेहऱ्यावरील स्नायूंना तात्पुरते बधीर करून तेथील स्नायूंमुळे जखमांवर येणारा ताण टाळणे ही या तंत्रामागची मूलभूत संकल्पना आहे.

या नव्या तंत्राबाबत डॉ. देबराज शोम म्हणाले, ‘जखम भरून निघण्यासाठी किंवा व्रण बुजविण्यासाठी विशेषत: आशियाई भारतीय, आफ्रिकन आणि हिस्पॅनिक मूळ असलेल्यांसाठी गेल्या तीन दशकांमध्ये अत्यंत कमी तंत्रांचा शोध लावण्यात आला आहे, हे पाहता या संशोधनाला खूप महत्त्व आहे. व्रण बरे करण्यासाठी आम्ही ज्या क्रांतिकारी पद्धतीने बोटॉक्‍सचा वापर केला आहे त्या पद्धतीने आजपर्यंत कुणीही वापर केला नव्हता. केलॉइड्‌ससाठी बोटॉक्‍सचा वापर करण्यात आला आहे, पण व्रण बरे करण्यासाठी, व्रण रुंद होण्याला प्रतिबंध करण्यासाठी आणि जखम भरून निघण्यासाठी त्याचा वापर केल्याचा कोणताही दाखला मिळत नाही. जगात प्रथमच याचा अशा प्रकारे वापर करण्यात आला आहे. या संशोधनाचा अर्थ हा आहे की ज्यांच्या शरीरातील मेलॅनिनच्या (गडद त्वचेचे पिगमेंट) अस्तित्वाचा परिणाम व्रण भरून निघण्यावर होत असतो त्यांच्या आता शरीरावरील कुठलेही व्रण किंवा जखमा भरून निघू शकतात.’’ 

या संशोधनामुळे लेझर उपचारांसदर्भात असलेला गैरसमजही दूर होऊ शकेल, असा विश्‍वास डॉ. रिंकी कपूर यांनी व्यक्त केला. ‘कार्बन डायऑक्‍साइड लेझर असुरक्षित समजला जात असे आणि ‘पिगमेंटेड स्कीन’मध्ये तो जोखीमयुक्त आहे, असे वाटत असे. पण आमच्या अनुभवावरून योग्य तीव्रतेचा लेझर उपचार चेहऱ्यावरील व्रणांसाठीही उत्तम उपचार आहे. ही व्रण उपचारपद्धती भारतीय आणि पिगमेंटेड स्कीन असलेल्या इतर लोकांच्या व्रणांवरील उपचारांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बोटॉक्‍स उपचार पूर्वी केवळ डोळ्यांमधील दोष, स्नायू ताठर होणे किंवा गोळा येणे, हालचालींशी संबंधित आजार किंवा सुरकुत्यांवर वापरण्यात येत असत. गेल्या दशकभरात प्राण्यांच्या जखमांचे व्रण कमी करण्यासाठी बोटॉक्‍सचा कसा परिणाम होतो याबाबत संशोधन होत होते. ही नवीन उपचारपद्धती मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली तर जगभरातील फेशिअल प्लास्टिक सर्जन्सतर्फे चेहऱ्यावरील व्रणांवरील उपचार करण्याच्या पद्धतीत क्रांती घडून येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com