घोर लागे जिवा 

डॉ मनीष मोटवानी
Friday, 27 September 2019

वजन वाढले की घोरणे सुरू होते. माणूस घोरतो म्हणजे त्याला श्र्वसनाची समस्या निर्माण झाली आहे, असे समजावे. योग्य उपचारांनी हे घोरणे थांबवता येते. 

वजन वाढले की घोरणे सुरू होते. माणूस घोरतो म्हणजे त्याला श्र्वसनाची समस्या निर्माण झाली आहे, असे समजावे. योग्य उपचारांनी हे घोरणे थांबवता येते. 

आपले वजन दररोजच्या आहारावर आणि व्यायामाच्या सवयींवर अवलंबून असते. शिवाय, वजनामध्ये आनुवंशिकतेचा भागही असतो. आपल्या शरीरातील मेदाचे विभाजन कसे आहे, यावर घोरण्याची क्रिया अवलंबून असते. मोठ्याने घोरणे ही बहुतेकदा स्लीप अॅप्नीयासारख्या निद्रावस्थेतील श्वसन समस्येची पहिली पायरी असते आणि त्याचा शरीराच्या वजनाशी स्पष्ट संबंध असतो. स्त्री व पुरुषांच्या शरीरांमध्ये मेदाचे विभाजन वेगवेगळे असते. म्हणूनच पुरुषांमध्ये या मेदाच्या विभाजनामुळे घोरण्याचे प्रमाण अधिक असते. मध्यवर्ती भागात म्हणजे मान, छाती व पोटावर मेद साठणे पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे त्यांच्यात घोरण्याचे प्रमाण अधिक असते. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांच्या शरीरामधील मेदाचे विभाजनही बदलते. त्यांच्याही शरीराच्या मध्यवर्ती भागात मेद साचू लागते आणि घोरण्याचे प्रमाण वाढते. 

साधारणतः ७५ ते ८० टक्के व्यक्तींमध्ये घोरण्याचे कारण स्थूलत्व हेच असते. याशिवाय नाकातील अडथळा हे आणखी एक कारण घोरण्यामागे असते. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नीया ही एक जुनाट अवस्था आहे. यामध्ये शरीरातील वायुमार्ग निद्रावस्थेत बंद होतो किंवा त्यात अडथळे निर्माण होतात. यामुळे श्वसनाची क्रिया उथळपणे किंवा थांबून थांबून होते. वजन जेवढे अधिक, तेवढा श्वसनक्रिया खंडित होण्याचा धोका अधिक असतो. घोरणे, दिवसा अधिक झोप येणे, प्रचंड थकवा जाणवणे आणि झोपून उठल्यानंतर शक्ती व उत्साह न वाटणे, ही याची सर्वाधिक आढळणारी लक्षणे आहेत. अशा व्यक्तीला उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या आणि हार्ट फेल्युअर हे विकार होण्याची शक्यता अधिक असते. स्थूलत्व हा मुख्य घटक असणाऱ्या रुग्णांमध्ये बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेमुळे स्लीप अॅप्नीया बरा झाला आहे. रात्री दोन तास सलग झोपू न शकणारे रुग्ण बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेनंतर सात-आठ तास अखंड झोपू शकतात. 

स्थूलपणा व स्लीप अॅप्नीयामुळे रुग्णाला दिवसभर झोप येत राहते. यामुळे त्याची उत्पादनक्षमता कमी होते आणि कामाच्या ठिकाणी प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया घोरणे व स्लीप अॅप्नीयावरील उपचारांमध्ये उपयुक्त ठरते. यामुळे झोप चांगली लागते, दिवसभर व्यक्ती अधिक सावध असते आणि तिची कार्यक्षमताही वाढते. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यातील प्रगतीच्या संधी वाढतात. 

घोरण्यामुळे तुमचे वजन कसे वाढते? 
घोरणे व स्थूल असणे या दोन्ही बाबी परस्परांशी जोडलेल्या आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, स्थूलपणामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते आणि घोरण्यामुळे स्थूलपणा वाढू शकतो. त्यामुळे चांगले परिणाम हवे असतील तर, वजन कमी करणे हा घोरण्यावर उपयुक्त उपाय आहे. 

अतिरिक्त आहार घेतल्याने तसेच शारीरिक व्यायाम कमी केल्याने आपले वजन वाढते, हे तर प्रत्येकाला माहीत आहे. पण, घोरण्यामुळेही वजन वाढू शकते, हे फारसे कुणाला माहीत नाही. घोरण्यामुळे झोप पुरेशी होत नाही आणि परिणामी आपल्या सवयी व भूक, यांमध्ये बदल होतात. झोप नीट न झाल्याने आपली शक्ती कमी होते. आपल्याला हवी तेव्हा झोप मिळत नाही आणि झोपेच्या अभावामुळे निर्माण झालेली शक्तीची कमतरता आपण अन्नाने, विशेषत: साखरयुक्त अन्नाने, भरून काढू लागतो. आपल्याला भूक लागल्यासारखे वाटते. पण, प्रत्यक्षात ती भूक नसते, आपली झोप पूर्ण झालेली नसते. व्यायाम कमी करणे हेही थकवा व दमल्यासारखे वाटण्याचेच लक्षण आहे आणि त्याच्या मुळाशीही अपुरी झोप हेच कारण आहे. 

उपचार काय? 
सातत्यपूर्ण सकारात्मक वायुमार्ग दबावयंत्र हा यावरील प्रारंभिक उपचार आहे. मात्र, याला सहकार्य करण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये कमी आहे. केवळ पन्नास टक्के रुग्णच हे उपकरण नियमित वापरतात. याच्या वापरासाठी शरीराचे वजन दहा टक्क्यांहून अधिक घटणे आवश्यक आहे. वास्तववादी विचार करता एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झालेले वजन फार थोड्या रुग्णांबाबत टिकून राहते. वजन कमी करण्यासाठी सर्वांत प्रभावी व शाश्वत उपचार बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया हाच आहे. बहुतेक रुग्ण बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेनंतर एक ते तीन महिन्यांतच यंत्राशी जुळवून घेऊ शकतात. बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन वर्षांनी यंत्र वापरण्याचा दर ९०-९५ टक्के होतो. स्थूलपणावर उपचार झाले, केवळ दहा टक्के जास्तीचे वजन कमी झाले तरी स्लीप ॲप्नीयाची लक्षणे मोठ्या प्रमाणात कमी होतात. विकाराच्या स्तरावरील स्थूलत्वासाठी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. ही शस्त्रक्रिया स्थूलपणा व स्लीप अॅप्नीया यांवर कायमस्वरूपी उपचार करू शकते. मद्यपान, धूम्रपान व सेडेटिव्ह्ज टाळावी. नियमित झोप घ्यावी, घशाचे व्यायाम करावे यामुळे लक्षणे कमी होण्यात मदत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obesity and snoring article written by Dr Manish Motwani