पितृपक्ष - जनुकदोषावरचा इलाज 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 20 September 2019

जनुकदोष न यावेत म्हणून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये जवळच्या नात्यात लग्न न करणे, दोघांमधल्या एकातही काही जनुकदोष असल्यास व गर्भ राहिल्यास गर्भावस्थेतच गर्भाची जनुकदोषासाठी तपासणी करणे, वारंवार गर्भपात किंवा मृत अपत्य जन्मास येत असल्यास स्त्री-पुरुषांनी स्वतःच्या जनुकांची तपासणी करून घेणे वगैरे खबरदारीचे उपाय आज केले जातात. आयुर्वेदाप्रमाणे विचार करता बीजभाग, बीजभागावयव वगैरेंची दुष्टी नको असेल, तर मूळचे बीज संपन्न असायला हवे. बीजाच्या संपन्नतेसाठी प्रथम शुद्धी व नंतर शक्‍ती-वृद्धीसाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. 
 

जनुकदोष न यावेत म्हणून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये जवळच्या नात्यात लग्न न करणे, दोघांमधल्या एकातही काही जनुकदोष असल्यास व गर्भ राहिल्यास गर्भावस्थेतच गर्भाची जनुकदोषासाठी तपासणी करणे, वारंवार गर्भपात किंवा मृत अपत्य जन्मास येत असल्यास स्त्री-पुरुषांनी स्वतःच्या जनुकांची तपासणी करून घेणे वगैरे खबरदारीचे उपाय आज केले जातात. आयुर्वेदाप्रमाणे विचार करता बीजभाग, बीजभागावयव वगैरेंची दुष्टी नको असेल, तर मूळचे बीज संपन्न असायला हवे. बीजाच्या संपन्नतेसाठी प्रथम शुद्धी व नंतर शक्‍ती-वृद्धीसाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. 
 

आयुर्वेद हे जीवन जगण्याचे शास्त्र आहे किंवा आरोग्याचे रक्षण कसे करावे हे सांगणारे शास्त्र आहे हे सर्वांना माहिती असते. दिनचर्या-ऋतुचर्या हे शब्द परिचयाचे असतात किंवा स्वस्थवृत्त, सद्‌वृत्त हे शब्द कधीतरी ऐकलेले असतात. पण ‘आरोग्य’ हे जसे शरीरापुरते मर्यादित नसते, तसेच आरोग्याच्या रक्षणासाठी करावयाचे प्रयत्नही आहार योजना, रसायनसेवन, व्यायाम यापुरते मर्यादित नसतात. म्हणून आयुर्वेदात फक्‍त औषधोपचार किंवा पंचकर्म चिकित्सा सांगितलेली नाही, तर ‘दैवव्यपाश्रय’ चिकित्सेलाही महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. यातील उपचार औषधोपचाराच्या सामान्य परिभाषेत बसत नाहीत; पण ज्या रोगांचे निदान होते पण कारण समजत नाही, तो बरा कसा करायचा हे समजत नाही अशा रोगांवर उपचार करताना या चिकित्सेतील मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यायला लागतो. ‘जनुकदोष’ हा यापैकीच एक होय. 
 

जनुक हा शब्द जन्माशी संबंधित आहे. जन्मानंतर वातावरणातील दोष, अपथ्यकर आहार- आचरण, एकूणच प्रज्ञापराध रोग होण्यास कारण ठरतात हे समजणे अवघड नाही; मात्र जेव्हा मूल रोग घेऊन जन्माला येते, तेव्हा त्यामागेही काहीतरी कारण असणारच. हे कारण जनुकाशी निगडित असते. असेही म्हणता येईल की असा दोष पूर्वजांच्या किंवा जन्माला येणाऱ्या व्यक्‍तीच्या पूर्वजन्मातील प्रज्ञापराधामुळे आलेला असू शकतो. सध्या जनुकशास्त्र विकसित होते आहे. विशेषतः वारंवार गर्भपात होणे, मुलाला जन्मजात व्यंग असणे, मतिमंदत्व, अवयवांची अपूर्ण किंवा चुकीची वाढ यासारखे त्रास लक्षात आल्यास त्यामागे डी.एन.ए., गुणसूत्रांमध्ये दोष असतील का हे पाहता येते. जसजसे संशोधन होईल तसतसे या विषयावरील अनेकविध पैलू लक्षात येतील. 
 

गुणसूत्र, जनुक हे शब्द जरी आयुर्वेदाच्या ग्रंथात सापडले नाहीत, तरी त्याविषयीचा स्पष्ट उल्लेख या सूत्रामध्ये आलेला आहे, 
यस्य यस्य हि अवयवस्य बीजे बीजभागे वा दोषाः प्रकोपमापद्यन्ते, तं तमवयवं विकृतिराविशति ।। 
...चरक शारीरस्थान 
गर्भ तयार होताना, विकसित होताना, ज्या ज्या अवयवाच्या बीजात अथवा बीजभागात दोष असतो, तो तो अवयव विकृत तयार होतो. 

 

म्हणजे नेमके काय होते, हे सांगण्यासाठी पुढे उदाहरणही दिलेले आहे. 
यदा ह्यस्याः शोणिते गर्भाशयबीजभागः प्रदोषमापद्यते तदा वन्ध्यां जनयति, यदा पुनरस्याः शोणिते गर्भाशययबीज भागावयवः प्रदोषमापद्यते तदा पूतिप्रजां जनयति । 
...चरक शारीरस्थान 
जेव्हा स्त्रीच्या शोणितातील म्हणजेच स्त्रीबीजातील गर्भाशय या अवयवाला कारणीभूत असणारा बीजभाग दूषित असतो, तेव्हा जन्माला येणारी मुलगी वंध्या निपजते. जर स्त्रीबीजातील गर्भाशयाला कारण असणारा बीजभाग व त्याचा बीजभागावयव दूषित असला तर पूतिप्रजा म्हणजे मृत अपत्य जन्माला येते. 

 

या संस्कृत सूत्रांकडे बारकाईने पाहिले तर लक्षात येईल, की ‘बीजभाग’, ‘बीजभागावयव’ हे शब्द बीजातील सूक्ष्म रचनेचे निदर्शक आहेत व जवळजवळ ते जनुकासाठीच वापरलेले आहेत. 
आधुनिक शास्त्रानेही हेच सिद्ध केले आहे, की शरीरातील प्रत्येक पेशीच्या केंद्रात डी.एन‌.ए. असते. डी.एन.ए.पासून बनलेल्या घट्ट गुंडाळ्यांना गुणसूत्रे म्हणतात. डी.एन.ए.ची रचना एकमेकांत गुंडाळलेल्या सर्पाकार पट्ट्यासारखी असते आणि या पट्ट्यांमध्ये चार विशिष्ट रसायनांची विशिष्ट सांगड घातलेली असते. या विशिष्ट रचनेलाच ‘जनुक’ म्हणतात. यांना जनुक म्हणण्याचे कारण जन्मतःच येणारे गुणदोष या सूत्रांद्वारे कळतात. 

 

अर्थात, पेशी आधीच सूक्ष्म, पेशीचे केंद्र हा तिचा एक भाग व या पेशीकेंद्राचा एक छोटा भाग म्हणजे ‘जनुक’. स्त्रीबीज हेदेखील आधुनिक शास्त्राप्रमाणे एक पेशीच असते. या बीजाचा बीजभाग, बीजभागाचा एक अवयव, त्याचा एक अवयव या क्रमाने आयुर्वेदशास्त्राने या ठिकाणी ‘जनुक’ संकल्पनाच समजावली आहे. 
 

शिवाय, आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र दोघेही या प्रकारचे दोष जन्मजात असतात असेच म्हणतात. चरकाचार्यांनी हा विषय ‘गर्भविकृती’ समजावताना सांगितलेला आहे. जन्मजात असलेला हृदयरचनेतील दोष, जन्मापासूनच आतड्यांची अयोग्य वाढ, मज्जातंतूंमध्ये अनैसर्गिक बदल, थायरॉईड ग्रंथींचे जन्मजात दोष, अस्वाभाविक बुटकेपणा, स्त्रियांमध्ये पाळी न येणे, वारंवार गर्भपात होणे, स्त्रीबीज तयार न होणे, स्त्रीत्वाची लक्षणे नसणे, पुरुषबीज तयार न होणे, पुरुषत्वाची लक्षणे नसणे वगैरे त्रास आढळल्यास या प्रकारचा दोष असण्याची शक्‍यता सर्वाधिक असते व त्यादृष्टीने तपासण्या करण्याचा आधुनिक शास्त्रही सल्ला देते. 
 

स्त्री असूनही स्तन अविकसित राहणे, स्त्रीसुलभ विकास न होणे किंवा पुरुषामध्ये लिंगाची व वृषणाची वाढ कमी असणे, दाढी-मिशा नसणे, शुक्राणू तयार न होणे या विकृतीतही बऱ्याचदा ‘जनुकदोष’ कारणीभूत असतो, हे आज संशोधनाने सिद्ध झालेले आहे. नेमके हेच आयुर्वेदशास्त्रानेही सांगितले आहे, 
यदा त्वस्याः शोणिते गर्भाशयबीजभागावयवः स्त्रीकराणां च शरीरबीजभागानामेकदेशः प्रदोषमापद्यन्ते, तदा स्त्र्याकृतिभूयिष्ठामस्त्रियं वार्तां नाम जनयति ।

यदा त्वस्य बीजे बीजभागावयवः पुरुषकराणां च शरीरबीजभागानामेकदेशः प्रदोषमापद्यन्ते, तदा पुरुषाकृतिभूयिष्ठमपुरुषं तृणपुत्रिकं नाम जनयति । 
...चरक शारीरस्थान 
जेव्हा स्त्रीबीजात स्त्रीविशिष्ट भाव म्हणजेच स्तन, योनी, गर्भाशय वगैरे गोष्टीस कारणीभूत असणाऱ्या बीजभागावयवात दोष असतो, तेव्हा स्त्रीचा देह असणारी पण ‘स्त्री’ नसणारी ‘अपूर्ण स्त्री’ जन्मास येते. त्याचप्रमाणे जेव्हा पुरुषबीजात पुरुषविशिष्ट भावास म्हणजे लिंग, वृषण, टेस्टीज वगैरे गोष्टीस कारणीभूत असणाऱ्या बीजभागावयवात दोष असतो, तेव्हा पुरुषाचा देह असणारा पण ‘पुरुष’ नसणारा ‘अपूर्ण पुरुष’ जन्मास येतो. या अपूर्ण स्त्री-पुरुषांना अनुक्रमे ‘वार्ता’ व ‘तृणपुत्रिक’ अशी संज्ञा दिलेली आहे. 

 

आपल्या शास्त्रात तर सुरवातीलाच ‘अतुल्यगोत्र स्त्री-पुरुष संबंध’च ग्राह्य सांगितला आहे. एका गोत्रातच नाही तर त्यांच्या उपविभागातही (प्रवर) लग्न करणे निषिद्ध सांगितले आहे. एका विशिष्ट घराण्यात गुणसूत्रांची ठेवण एकसारखी असल्याने समान गुणसूत्राचे एकत्रीकरण योग्य प्रकारे होऊ शकत नाही व त्यातून विगुण व विकृत संतती जन्माला येऊ शकते. 
 

जनुक दोष न यावेत म्हणून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये जवळच्या नात्यात लग्न न करणे, दोघांमधल्या एकातही काही जनुक दोष असल्यास व गर्भ राहिल्यास गर्भावस्थेतच गर्भाची जनुक दोषासाठी तपासणी करणे, वारंवार गर्भपात किंवा मृत अपत्य जन्मास येत असल्यास स्त्री-पुरुषांनी स्वतःच्या जनुकांची तपासणी करून घेणे वगैरे खबरदारीचे उपाय आज केले जातात. आयुर्वेदाप्रमाणे विचार करता बीजभाग, बीजभागावयव वगैरेंची दुष्टी नको असेल तर मूळचे बीज संपन्न असायला हवे, बीजाच्या संपन्नतेसाठी प्रथम शुद्धी व नंतर शक्‍ती-वृद्धीसाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. 
 

याच दृष्टीने आयुर्वेदाने सुनियोजित अपत्याची संकल्पना मांडली, त्यासाठी विविध उपाय सुचवले. गर्भधारणेपूर्वी शरीरशुद्धी; नंतर बीजसंपन्नतेसाठी रसायनसेवन; संस्कारांनी युक्‍त गर्भाधान; गर्भावस्थेत गर्भाच्या सुयोग्य विकासासाठी योग्य गर्भसंस्कार; जन्मानंतर सुवर्णप्राशनादी जातकर्म संस्कार वगैरे अनेक उपाय सुचवले. 
 

गर्भारपणात काही चुकीची वा तीव्र औषधे घेतली गेल्यास त्यामुळेही गर्भामध्ये जनुकदोष निर्माण होऊ शकतात, असेही सांगितले जाते. म्हणूनच गर्भारपणात शक्‍यतो आयुर्वेदिक, तीही सौम्य गुणधर्माची औषधे व रसायने घेणे चांगले. वारंवार गर्भपात होत असला किंवा जन्मानंतर अपत्य मृत होत असले, तर त्यादृष्टीने आयुर्वेदात काही विशिष्ट योगही सुचवलेले आहेत. 
 

कधी कधी कुटुंबामध्ये इतर कोणालाही असा त्रास नसताना अचानक ‘जनुकदोष’ उद्‌भवताना दिसतो. ‘जनुकांमध्ये अचानक होणारा बदल’ हे त्यामागचे एक कारण असते, असे संशोधन सांगते. अर्थात, हा बदल जसा वाईट म्हणजे ‘दोषस्वरूप’ होतो, तसाच असे काहीतरी निश्चित असायला हवे, की ज्यामुळे चांगला वा ‘गुणस्वरूप’ बदल होऊन असलेले दोष किमान पुढच्या पिढीकडे तरी संक्रमित होणार नाहीत. 
 

अर्थात, जनुकदोष टाळायचे असतील तर जनुकांमध्ये दडलेल्या प्रोग्राममध्येच बदल करावे लागतील. सध्या प्रचलित असलेल्या जनुकदोषांच्या चिकित्सापद्धतीचा भर जनुकदोषांमुळे रोगसंभव होऊ नये याकडे जास्त आहे. एकदा जनुकदोष तयार झाला की मग तो दूर करणे अवघड व जवळजवळ अशक्‍यच समजले जाते. जन्मापूर्वीचे जनुकदोष किंवा नंतर प्रज्ञापराधानंतर आलेले जनुकदोष काढायचे असतील, शरीरात किंवा जनुकांमध्ये बिघाड होऊन रोग झाले असतील तर त्यावर आयुर्वेदाने आठ अंगांतील ग्रहचिकित्सेद्वारे योग, ध्यान, मंत्र, स्वास्थ्यसंगीत आणि तोडगे वगैरे उपाय सुचवले आहेत. तसेच, जनुकदोषशुद्धीसाठी भाद्रपद कृष्णपक्ष म्हणजेच पितृपक्ष हा कालावधी अधिक योग्य आहे हेही सुचवले आहे. 
 

मुळात जनुकदोष येऊच नयेत म्हणून प्रतिबंधात्मक योजना करून किंवा नंतर जनुकदोष येण्याचा संभव असला तर त्यासाठीही योग्य खबरदारी घेऊन त्यांना निष्प्रभ करता आले तर संपन्न, आरोग्यपूर्ण पिढी पुनश्च साकार होणे शक्‍य होईल.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paternal side-treatment for genital mutilation