प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 18 October 2019

 मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ व ‘सकाळ’ची वाचक आहे. लोकांना तुमच्या औषधांचा आलेला गुण पाहून मलाही प्रश्न विचारायचा आहे. माझे वय ३७ वर्षे असून आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. अजून गर्भधारणा झालेली नाही. आम्हा दोघांच्या तपासण्या करून घेतल्या. त्यात स्त्रीबीजाची प्रत हवी तितकी चांगली नसल्याचे आढळून आले. यासाठी तीन वेळा स्त्रीबीज वाढण्यासाठी इंजेक्‍शन घेऊन कृत्रिम गर्भधारणेचा प्रयत्न करून पाहिला, पण यश आले नाही. कृपया आपण मार्गदर्शन करावे. 
..... सुनीता 

 मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ व ‘सकाळ’ची वाचक आहे. लोकांना तुमच्या औषधांचा आलेला गुण पाहून मलाही प्रश्न विचारायचा आहे. माझे वय ३७ वर्षे असून आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. अजून गर्भधारणा झालेली नाही. आम्हा दोघांच्या तपासण्या करून घेतल्या. त्यात स्त्रीबीजाची प्रत हवी तितकी चांगली नसल्याचे आढळून आले. यासाठी तीन वेळा स्त्रीबीज वाढण्यासाठी इंजेक्‍शन घेऊन कृत्रिम गर्भधारणेचा प्रयत्न करून पाहिला, पण यश आले नाही. कृपया आपण मार्गदर्शन करावे. 
..... सुनीता 

गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज व पुरुषबीज हे शक्‍तीने आणि सर्व गुणांनी परिपूर्ण असणे ही प्राथमिक गरज असते. स्त्रीबीज वाढण्यासाठी तात्पुरती किंवा उसनी शक्‍ती घेता आली तरी ती गर्भधारणा होण्यासाठी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे पुढे नऊ महिने गर्भाचा विकास व्यवस्थित होण्यासाठी पुरू शकते असे नाही. तेव्हा याप्रकारे कृत्रिम पद्धतीचा अवलंब करण्याऐवजी नैसर्गिक उपचार, औषध-रसायने, प्रकृतीनुरूप आहारातून मुळातील शक्‍ती, गर्भधारणेची सक्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हेच श्रेयस्कर. या दृष्टीने एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे उत्तम. वयाचा विचार करताना शास्त्रशुद्ध पंचकर्म व उत्तरबस्ती करून घेणे, उभयतांनी तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे, आपण शतावरी कल्प, ‘सॅन रोझ’ ही रसायने घेणे, ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू वापरणे, यजमानांनी ‘संतुलन चैतन्य कल्प’, ‘मॅरोसॅन’ ही रसायने, ‘संतुलन पुरुषम्‌ तेल’ वापरणे हे सुद्धा उत्तम तसेच गर्भधारणेसाठी आयुर्वेदाने सुचविलेली औषधे दोघांनीही घेणे उत्तम. 

माझ्या घरी कुंडीमध्ये कोरफड लावलेली आहे. मी अधूनमधून कोरफडीचा ताजा गर खातो. याचे प्रमाण किती असावे. कोरफड जेथून कापली जाते तेथून पिवळसर रस पाझरतो, तो चवीला अतिशय कडू असतो. तो खावा की न खावा? कृपया मार्गदर्शन करावे. 
.... शेगडे 

कोरफडीचा ताजा गर रोज सकाळी एक चमचा या प्रमाणात खाणे चांगले असते. छोट्या कढईत दोन-तीन थेंब तूप घेऊन त्यावर चमचाभर कोरफडीचा गर परतून घेतला की, त्यातील चिकटपणा बराचसा कमी होते. मग त्यावर चिमूटभर हळद टाकून तो खाण्याने पचन सुधारते, विशेषतः यकृताची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळते. आपण उल्लेख केलेला पिवळसर रस हा कोरफडाची चीक असतो व तो फारच उष्ण, तीक्ष्ण असल्याने न खाणेच चांगले. कोरफड तोडल्यावर दोन मिनिटांसाठी तशीच ठेवली तर हा चीक निथळून जातो. नंतर कोरफड धुवून घेऊन वापरता येते. 

माझे वय १७ वर्षे असून मला बऱ्याच दिवसांपासून गॅसेसचा त्रास होतो आहे. कधी कधी पोटात गुडगुड होते, अंधारी आल्यासारखे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... सौरभ 

गॅसेस, पोटात गुडगुड ही अग्नीची कार्यक्षमता मंदावल्याची लक्षणे आहेत. यासाठी काही दिवस जेवणापूर्वी आल्या-लिंबाचा रस घेण्याचा तसेच जेवताना गरम पाणी पिण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी दहा-बारा सूर्यनमस्कार करण्याचा तसेच किमान वीस मिनिटे चालण्याचाही उपयोग होईल. आहारातून दोन-तीन महिन्यांसाठी तेल व गहू पूर्णपणे टाळण्याचाही उपयोग होईल. फार कोरडे, निःसत्त्व अन्न खाणे टाळून त्याऐवजी घरी बनविलेले ताजे जेवण घेण्याचाही उपयोग होईल. वरण-भात, खिचडीसह किमान चार-पाच चमचे घरी बनविलेले साजूक तूप घेण्याचाही उपयोग होईल. 

माझे वय 33 वर्षे आहे. मला पाळी वेळेवर येते, परंतु अंगावर फक्‍त दोन दिवसच जाते, तसेच गाठीही पडतात. तरी यात सुधारणा होण्यासाठी काही उपचार करता येतील का? 
..... स्नेहा 

उत्तर - नक्कीच उपचार करता येतील. उपचार करून हा त्रास पूर्णपणे बरा करणेही गरजेचे आहे. कारण स्त्री-संतुलनातील कोणताही बिघाड दुर्लक्षित राहिला तर पुढे अनेक त्रास होऊ शकतात. रसधातूची अशक्‍तता दूर व्हावी आणि वातदोष कमी व्हावा यासाठी शतावरी कल्प घालून दूध घेणे, तसेच धात्री रसायन, "सॅन रोझ'सारखे रसायन घेण्याचा उपयोग होईल. स्त्री-संतुलनासाठी "फेमिसॅन सिद्ध तेला'चा पिचू वापरणे, "संतुलन फेमिनाईन बॅलन्स आसव' किंवा कुमारी आसव घेणे, रोज सकाळी चमचाभर ताजा कोरफडीचा गर घेणे हे सुद्धा चांगले. नियमित अभ्यंग व सूर्यनमस्कारादी योगासने हे सुद्धा उत्तम. 

आपले आरोग्यविषयक मार्गदर्शन अप्रतिम आहे. माझे वय 36 वर्षे आहे. मला मधुमेह नाही, मात्र वारंवार लघवीला जावे लागते. अशक्‍तपणा व थकवा फार जाणवतो. लघवी करताना जळजळ होते. कृपया मार्गदर्शन करावे. 
.... सागर 

लघवीनंतर थकवा जाणवत आहे, तेव्हा लघवीवाटे प्रोटिन शरीराबाहेर जाते आहे का यासाठी एकदा तपासणी करून घेणे चांगले. बरोबरीने तूप-साखरेसह "संतुलन यू. सी चूर्ण' किंवा चोपचिन्यादी चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. स्नानानंतर "संतुलन पुरुषम्‌ तेल' वापरण्याचा, "संतुलन चैतन्य' घालून दूध घेण्याचाही उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी मूठभर साळीच्या लाह्या कपभर पाण्यात भिजत ठेवल्या व सकाळी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर त्यामुळे लघवीची जळजळ कमी होईल, थकवा भरून येण्यासही मदत मिळेल. ताजे आवळे उपलब्ध असतील तेव्हा दोन आवळ्यांचा रस काढून त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेण्याचाही उपयोग होईल. मात्र तपासण्यांमध्ये प्रोटिनचा उल्लेख असला तर त्वरेने तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे आवश्‍यक होय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe