प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 6 December 2019

मी हरियानामध्ये राहते. माझे बाळ एक महिन्याचे आहे. त्याला गुटी चालू आहे. सध्या त्याला सर्दी झाली आहे. कृपया सर्दी जाण्यासाठी औषध सुचवावे. धन्यवाद. 
....श्रीमती भुवनेश्‍वरी 

मी हरियानामध्ये राहते. माझे बाळ एक महिन्याचे आहे. त्याला गुटी चालू आहे. सध्या त्याला सर्दी झाली आहे. कृपया सर्दी जाण्यासाठी औषध सुचवावे. धन्यवाद. 
....श्रीमती भुवनेश्‍वरी 
- लहान मुलांची प्रतिकारशक्‍ती चांगली राहावी यासाठी ‘संतुलन बाळगुटी’, ‘संतुलन बालामृत’ यासारखी खास बालकांसाठीची रसायने नियमित देणे उत्तम असते. या व्यतिरिक्‍त सर्दी असेल तेव्हा इतक्‍या छोट्या बाळाला पाव चमचा ‘संतुलन सीतोपलादी चूर्ण’ मधात मिसळून दिवसभरात थोडे थोडे चाटवण्याचा उपयोग होईल. ओवा भाजून त्याची पुरचुंडी करून ती नाकाजवळ धरण्याने व बाळाला त्याचा वास देण्यानेही बरे वाटेल. नाक बंद होत असले तर नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा घरच्या साजूक तुपाचे १-२ थेंब नाकात टाकण्यानेही श्‍वास घेणे सोपे होईल. सकाळ-संध्याकाळ २-३ थेंब ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचाही उपयोग होईल. बाळ स्तन्यपान करत असेल तर आईने गरम पाणी पिणे, गवती चहा, आले, पुदिना वगैरेंचा हर्बल चहा घेणे, एक-एक चमचा ‘ब्राँकोसॅन सिरप’ घेणे याचाही बाळाला फायदा होईल. आपण राहायला दूर आहात पण इथे उल्लेखलेली सर्व ‘संतुलन उत्पादने’ ऑनलाइन उपलब्ध आहेत. 

मी फॅमिली डॉक्‍टर पुरवणीचा नियमित वाचक आहे व मला त्याचा फार फायदा होतो. प्रथम आपले धन्यवाद. माझा मुलगा १२ वर्षांचा आहे. तो झोपेत खूप दात खातो, त्या वेळी खूप आवाज येतो. काही जण म्हणतात, की हा मानसिक आजार आहे. कृपया उपाय सुचवावा. 
...श्री. सुनील 
- लहान मुलांमध्ये दात खाणे ही बऱ्याचदा आढळणारी समस्या आहे व ती सहसा जंतांशी संबंधित असते. या दृष्टीने मुलाला १५ दिवसांसाठी रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंग चूर्ण मधात मिसळून देता येईल व नंतर एक दिवस रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा कपिला चूर्ण गुळामध्ये मिसळून देण्याने दुसऱ्या दिवशी २-३ जुलाब झाले की जंत पडून जाण्यास मदत मिळेल. याच्या बरोबरीने त्याला विडंगारिष्ट देत राहण्याचाही उपयोग होईल. याप्रकारे दर दोन महिन्यांनी असे तीन वेळा करूनसुद्धा जर दात खाण्याच्या त्रासात सुधारणा झाली नाही तर तज्ज्ञ वैद्यांनी प्रकृती दाखवणे चांगले. मुलाच्या आहारातून दही, चीज, पनीर, जड किंवा बाहेरून विकत आणलेल्या मिठाया, गोळ्या-चॉकलेट वगैरे वर्ज्य करणे, प्यायचे पाणी नीट २० मिनिटे उकळून, गाळून घेतलेले असणे हे सुद्धा आवश्‍यक. 

मला आपल्या सल्ल्यांचा नेहमीच फायदा होतो. माझी मुलगी २० वर्षांची आहे. तिला सतत पिंपल्स व तोंड येण्याचा त्रास होतो. डॉक्‍टरांनी रक्‍त अशुद्ध झाल्याचे सांगितले आहे. कृपया उपाय सुचवावा. 
...सौ. भिसे 
- रक्‍तशुद्धीच्या बरोबरीने या वयात स्त्रीसंतुलनासाठीही उपाय योजणे आवश्‍यक असते. या दृष्टीने मुलीला ‘संतुलन शतानंत कल्प’ घालून दूध देणे, ‘अनंतसॅन’ तसेच ‘संतुलन पित्तशांती’ या गोळ्या देणे चांगले. काही दिवस रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. कपभर पाण्यात अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा बडीशेप आणि दोन चमचे लाह्या पाच-सहा तास भिजवून नंतर हाताने कोळून घेऊन गाळून पिण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी अर्धा चमचा इरिमेदादी तेल किंवा ‘संतुलन सुमुख तेल’ नुसते किंवा पाण्यात मिसळून तोंडात ७-८ मिनिटांसाठी चूळ धरल्याप्रमाणे धरून ठेवण्याचा तोंड येणे व पिंपल्स या दोघांवर उपयोग होईल. पाळीसंबंधित काही त्रास असला, तर त्यासाठी वेळेवर तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे, ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे हे सुद्धा श्रेयस्कर. 

मी निवृत्त प्राचार्य आहे. वय ६५ असून गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून अनामिक भीती वाटते., मनात नकारार्थी विचार येतात व मन तणावग्रस्त होते. पूर्वीचा उत्साह लोप पावला आहे. पूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. तसा कोणताही मोठा आजार आजार नाही. कृपया यातून बाहेर पडण्याचा उपाय सुचवावा. 
...श्री. म्हाडगूल 
- निवृत्तीनंतर जीवनशैलीत मोठा बदल होते, विशेषतः प्राचार्यपद सांभाळल्यानंतर आता एकदम रिकामपण येऊ नये यासाठी काही ना काही काम, छंद, समाजसेवा करत राहणे चांगले होय, जेणेकरून मन चांगल्या गोष्टीत गुंतले की नकारात्मक विचार येणार नाहीत. बरोबरीने मनाच्या शक्‍ती व शुद्धीसाठी ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ घेणे, सुवर्णसिद्ध जल पिणे, सकाळी नाश्‍त्यापूर्वी पंचामृत व रात्रभर पाण्यात भिजविलेले ४-५ बदाम नीट चावून खाणे हे उपाय सुरू करता येतील. योगासने येत असली तर त्यांचा नियमित सराव करणे, अनुलोम-विलोम करणे, सकाळ-संध्याकाळ सोमध्यानातील ज्योतिध्यान करणे या सर्व गोष्टींचाही फायदा होईल. जीवनातील बदल सहजतेने व्हावा यासाठी तसेच मनाला पूर्ववत तंदुरुस्त करण्यासाठी शास्त्रशुद्ध पंचकर्म हा उत्तम उपाय असतो. यालाच शिरोधारा, योग, मंत्रपठण, ॐकार, सात्त्विक आहार व जीवनशैली यांची जोड देऊन तीन आठवड्यांचे ‘संतुलन पंचकर्म’ करणे उत्तम होय. 

मी ३१ वर्षांची गृहिणी आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्स कळण्यासाठी काही तपासण्या करता येतात का? मला ओव्ह्यूलेशननंतर प्रत्येक महिन्यात छातीत जडपणा जाणवू लागतो व वेदनाही होतात. यावर काय उपाय करावा? 
....सौ. मुग्धा 
- प्रत्येक प्रकारचा दोष तपासणीमध्ये दिसतोच असे नाही. विशेषतः स्त्री-संतुलनाच्या बाबतीत कित्येकदा स्त्रीला पाळीसंबंधी त्रास असतोच पण तपासण्यांत काही आढळत नाही असे बऱ्याचदा दिसते. तरीही तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही स्त्री हॉर्मोन्सच्या तपासण्या करून घेता येतात. छातीत जडपणा व वेदना होण्याचा त्रासावर स्त्रीसंतुलनासाठीच प्रयत्न करायला हवेत. यादृष्टीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, दिवसातून दोन वेळा स्तनांवर ‘संतुलन सुहृद तेल’ हलक्‍या हाताने जिरवणे, शतावरी कल्प घालून दूध घेणे हे उपाय सुरू करता येतील. अनुलोम-विलोम, ‘संतुलन समर्पण क्रिया’, फुलपाखरू वगैरे योगासने, सूर्यनमस्कार नियमित करणे, ‘स्त्री-संतुलन’ ही खास स्त्रियांच्या संतुलनासाठी तयार केलेली संगीतरचना नियमित ऐकणे हे सुद्धा चांगले. काही दिवस सकाळी एक चमचा कोरफडीचा ताजा गर तसेच ‘अशोक-ऍलो सॅन’ या गोळ्या सकाळ-संध्याकाळ घेण्याचा उपयोग होईल.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe