प्रश्नोत्तरे

Question and Answer
Question and Answer

मी नियमित योगासने, ध्यान, वगैरे करतो. २०१० मध्ये मला हातापायात मुंग्या येत होत्या, निसर्गोपचार, एलोपॅथिक औषधे घेऊन काही फरक पडला नाही. त्यानंतर मी नियमित अभ्यंग करायला सुरुवात केली, यामुळे आता मला ९० टक्के बरे वाटते. मला सध्या डोक्‍यात आवाज येण्याचा त्रास होतो आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सूर्याच्या विरुद्ध बाजूने हा आवाज येतो असे जाणवते. कृपया यावर काही उपाय सुचवावा. 
.... कुंभार 
हातापायाला मुंग्या येणे आणि डोक्‍यात आवाज येणे या दोन्ही तक्रारी वातदोषाशी संबंधित आहेत. नियमित अभ्यंग हा यावरचा उत्तम उपाय आहेच, तो चालू ठेवणे उत्तम. बरोबरीने तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली दशमूळतेलाच्या बस्ती घेण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात नस्यसॅन घृताचे तीन-चार थेंब टाकण्याने ‘शिरोगत वात’ म्हणजे मस्तकातील वातदोषाचे शमन होते असा अनुभव आहे. टाळूवर संतुलन ब्रह्मलीन तेल लावणे हे सुद्धा चांगले. महायोगराज गुग्गुळ, संतुलन वातबल गोळ्या घेणे, जेवणानंतर दशमूलारिष्ट व अश्वसारस्व आसव घेणे हे सुद्धा उत्तम. 


 माझ्या नातवाचे वय दोन वर्षे झालेले आहे. सहा महिन्यांपासून तो तोंडातून आवाज काढतो, पण शब्द बोलत नाही. कृपया काही उपाय सुचवावा. 
..... चिंचोलीकर 
बोलायला सुरुवात करणे हा विकासाचा टप्पा थोडाफार पुढे-मागे होऊ शकतो. तरीही बोलणे सुरू व्हावे, उच्चार स्पष्ट व्हावेत यासाठी नातवाला संतुलन ब्रह्मलीन सिरप हे ब्राह्मी, शंखपुष्पी वगैरे द्रव्यांपासून बनविलेले सिरप देण्याचा उपयोग होईल. अक्कलकरा, जटामांसी, पिंपळी वगैरे वनस्पतींचे चूर्ण मधात मिसळून जिभेला चोळण्याचाही उपयोग होईल. चैतन्य कल्प घालून दूध, च्यवनप्राशसारखे रसायन नातवाला देण्याने त्याचा एकंदर विकास व्हायला, शक्‍ती वाढायला मदत मिळेल, शिवाय बोलणेही सुरू व्हायला मदत होईल. 

आयुर्वेदात मोतीबिंदूसाठी उपचार आहे का? 
.... पाटील 
वयापरत्वे शरीरात जे बदल होणे स्वाभाविक असतात, त्यापैकी मोतीबिंदू हा एक होय. तो अकाली होऊ नये यासाठी प्रयत्न करता येतात, मात्र वयानुसार म्हणजे साधारण ६०-७० वर्षांनंतर मोतीबिंदू निदान झाले असल्यास नेत्रतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे शस्त्रकर्म करून घेणे हेच श्रेयस्कर असते. अकाली वयात मोतीबिंदू होऊ नये तसेच डोळ्यांचे एकंदर आरोग्य उत्तम राहावे यासाठी डोळ्यांत नियमित अंजन करणे उत्तम असते. यासाठी शास्त्रशुद्ध व पारंपरिक पद्धतीने तयार केलेले ‘सॅन अंजन’ वापरता येईल. नियमित पादाभ्यंग आणि नस्य हे उपचारही डोळ्यांसाठी हितकर असतात. रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर त्रिफळा चूर्ण मध व तूप मिसळून घेणे सुद्धा चांगले. 

माझे वय ६९ वर्षे आहे. मला २००५पासून मधुमेह आणि २००० पासून उच्चरक्‍तदाब आहे. याकरिता एलोपॅथीची औषधे चालू आहेत. माझी मुख्य तक्रार अशी आहे, की मला रात्री दोन-तीन वाजेपर्यंत झोप येत नाही. मी रात्री दूध व हळद घेत असतो. तसेच रात्री नाक बंद होते, थोडा कफ सुद्धा जाणवतो. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... कुलकर्णी 
 दूध-हळद घ्यायला हरकत नाही, पण रात्री झोपण्यापूर्वी न घेता सकाळी घेणे सुरू केले तर कफ जाणवणे, नाक बंद होणे ही लक्षणे आपोआप कमी होतील. रात्री झोप वेळेवर यावी यासाठी रात्रीचे जेवण लवकर करणे, पचण्यास सोपे असणे या गोष्टी सांभाळणे आवश्‍यक असते. वेळेवर व हलके जेवण करून शतपावली केली व नंतर संपूर्ण अंगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेला’सारख्या संस्कारित तेलाचा अभ्यंग केला, पादाभ्यंग केला व वेळेवर झोपायला गेले तर झोप यायला मदत मिळते. काही दिवस रात्री झोपण्यापूर्वी ‘निद्रासॅन’ या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. आम्ही अभ्यासपूर्वक तयार केलेली ‘योगनिद्रा’ ही ध्वनिमुद्रिका ऐकत ऐकत झोपण्याने मन शांत होऊन झोप लागते असा अनेकांचा अनुभव आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मधुमेह व उच्चरक्‍तदाब हे नियंत्रणात ठेवण्याच्या बरोबरीने त्यांची मूळ संप्राप्ती मोडणे म्हणजे मुळावर काम करणारे उपचार करणे अत्यावश्‍यक असते. या दृष्टीने वैद्यांचा सल्ला घेणे, पंचकर्मासारखे उपचार करून घेणे श्रेयस्कर. 

माझे वय ३५ वर्षे असून गेल्या सहा वर्षांपासून मला किडनीचा त्रास आहे. क्रिॲटिनीनची पातळी वाढलेली आहे. यामुळे मला गर्भधारणा होण्यातही अडचण येते आहे. डॉक्‍टरांनी ‘किडनी ट्रान्सप्लान्ट’ सुचवलेले आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... हेमलता 
 ‘ट्रान्सप्लान्ट’ हा अगदी अखेरचा पर्याय असतो, तो निवडावा लागू नये यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उत्तम फायदा होताना दिसतो. किडनीसंबंधित जो त्रास आहे तो बरा झाल्याशिवाय गर्भधारणेचा विचार करणे सयुक्‍तिक ठरणार नाही. वैद्यांचे मार्गदर्शन घेऊन प्रकृतीनुरूप योग्य औषधे, पथ्याहार, तसेच पंचकर्मातील काही विशेष उपचार घेऊन प्रथम किडनीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तत्पूर्वी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, पुनर्नवाघनवटी, घेण्याचा उपयोग होईल. ताजे गोमूत्र उपलब्ध होत असल्यास रोज घ्यावे. ताजे गोमूत्र सात वेळा सुती वस्त्रातून गाळून घेऊन त्यात समभाग पाणी मिसळून त्यातील तीन-चार चमचे सकाळी व संध्याकाळी घेणे चांगले. 

 

 
 

प्रश्‍न कसे पाठवाल? 

आपला आरोग्यविषयक प्रश्‍न नेमकेपणाने लिहा. रुग्णाचे नाव, वय, त्याची प्रकृती याविषयी आवर्जून लिहा. आपल्याला आधी आजार होता का, शस्त्रक्रिया झाली होती का? कोणती औषधे घेत आहात? काही विशेष तपासणी झाली असल्यास त्या तपासणीचे निष्कर्ष काय आहेत, हेही लिहा. 
आपले प्रश्‍न पाठवताना ‘फॅमिली डॉक्‍टर’साठी असे पाकिटावर, पोस्ट कार्डावर ठळक दिसेल असे लिहा. अंतर्देशीय पत्र चिकटवताना काळजी घ्या. अयोग्य पद्धतीने चिकटवलेले अंतर्देशीय पत्र फाडताना मजकूरही कापला जात असल्याने प्रश्‍न नीट कळत नाही. पाकिट चिकटवतानाही आतील कागद चिकटून त्यावरचा मजकूर जाणार नाही याची काळजी घ्या. 
आपण प्रश्न ‘ई-मेल’द्वाराही पाठवू शकता. इ-मेल पाठवतांना ‘सब्जेक्ट’मधे ‘फॅमिली डॉक्‍टर’साठी असे लिहावे. 


ई-मेल पत्ता ः editor@esakal.com 


टपालासाठीचा पत्ता ः संपादक, दै. सकाळ (‘फॅमिली डॉक्‍टर’), 595, बुधवार पेठ, पुणे, 411002. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com