प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milk and Food

मला लहानपणापासून दूध फार आवडते. गेली ४-५ वर्षे शिक्षणासाठी अमेरिकेत राहिल्यापासून दूध पचायला जड वाटू लागले आहे.

प्रश्नोत्तरे

मला लहानपणापासून दूध फार आवडते. गेली ४-५ वर्षे शिक्षणासाठी अमेरिकेत राहिल्यापासून दूध पचायला जड वाटू लागले आहे. दुधामुळे पोटात गॅस धरल्यासारखे वाटते व कधी कधी पातळ शौचाला होते. या त्रासासाठी मला काय उपाय करता येईल?

- केदार देसाई, पुणे

उत्तर - सध्याच्या काळात दुधावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जात असल्यामुळे दुधाचे एकूण संघटन बिघडून गेलेले आहे. त्यामुळे सध्या अनेकांना दूध पचायला त्रास होत असल्याचे दिसते. नैसर्गिक दूध मिळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तूर्तास आपल्याला असे करता येईल. पाऊण कप दुधात अर्धा कप पाणी व अर्ध्या इंचाचा सुंठीचा तुकडा चेचून घालून हे मिश्रण मंद आचेवर एक कप मिश्रण उरेपर्यंत उकळावे. नंतर गाळून घेऊन त्यात संतुलन अनंत कल्प वा चैतन्य कल्प मिसळून घ्यावे. असे तयार केलेले दूध सकाळच्या वेळी अर्धा कप घेऊन पाहावे. ते पचते आहे असे वाटल्यास हळू हळू मात्रा वाढवावी. आरोग्यासाठी दूध घेणे अत्यंत आवश्यक असते, त्यामुळे कोणीही दूध घेणे थांबवू नये.

रोजचा आहार सकस असावा असे म्हटले जाते. आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे ते सांगावे. कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे तेही समजवावे.

- नरेंद्र पाटील, अहमदनगर

उत्तर - आरोग्य टिकवून ठेवायचे असल्यास योग्य आहाराची निवड करणे आवश्यक असते. नैसर्गिक दूध व लोणी, ताक, ताजे दही अशा दुधापासून बनविलेल्या गोष्टींचा वापर नक्की करावा. आहारात वेगवेगळ्या प्रकारची धान्ये, डाळी, मोड आलेली कडधान्ये, फळभाज्या, पालेभाज्या यांचा वापर दिवसातून एकदा तरी पुरेशा प्रमाणात होत आहे याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. आवडते म्हणून कुठल्यातरी एकाच गोष्टीचा सतत वापर करणे चुकीचे असते. कुठलाही पदार्थ वापरताना तो नैसर्गिक आहे याची खात्री करून घेणे उत्तम.

सध्या बाजारात जेनेटिकली मॉडिफाइड, हायब्रीड अशी वेगवेगळ्या प्रकारची धान्ये उपलब्ध असतात, या गोष्टी कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा. फळे, शेंगदाणे, तेल, गूळ, सुका मेवा, घरी केलेले मसाले वगैरेंचा आहारात समावेश असावा. ऋतुनुसार एक प्रकारचे फळ तरी रोजच्या आहारात असावे. सध्या वेळेच्या अभावी बाहेर खाण्याचे प्रमाण बरेच वाढलेले आहे. पिझ्झा, बर्गर, केक, वडा-पाव वगैरे गोष्टी टाळणेच उत्तम. आहार सकस असला पण रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे, झोप कमी होणे वगैरे आचरण असले तर यांचाही शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो आयुर्वेदिक दिनचर्येचे पालन करणे उत्तम.