प्रश्नोत्तरे question and answer sinus cold headache child bread health fever | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sinus

प्रश्नोत्तरे

प्रश्र्न १ - माझी नात बारावीत आहे. सगळे एन्ट्रन्स टेस्ट वगैरेकरता दिवसरात्र अभ्यास करत असते. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात तिचा घोळणा नक्की फुटतो. डॉक्टरांना सुद्धा दाखवून झाले आहे, पण कारण समजत नाही. डोक्याला पाणी लावले, बर्फ लावला तर तिला सर्दीचा त्रास होतो, त्यामुळे अभ्यासात मन लागत नाही. अशा वेळी काय उपाय करता येईल ते सांगावे.

- प्रशांत शहा, पुणे

उत्तर - शरीरात अतिरिक्त उष्णता असल्यास अशा प्रकारे घोळणा फुटायची सवय १८-१९ वर्षांपर्यंत होताना दिसते. रात्रीच्या जागरणांमुळे व सध्या असलेल्या उन्हाळ्यामुळे हा त्रास अनेकांना होताना दिसत आहे. याकरता बाहेरून बर्फ लावून शीतलता आणणे हा तात्कालिक उपाय म्हणून ठीक आहे पण शरीरातील उष्णता कमी करण्याकरता प्रयत्न करणे जास्त इष्ट ठरेल. त्याकरता सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम संतुलन गुलकंद स्पेशल घ्यावा तसेच सकाळ-संध्याकाळ संतुलन पित्तशांतीसारख्या पित्तशामक गोळ्या घेतल्याचाही फायदा होऊ शकेल.

रात्री झोपण्यापूर्वी शक्यतो संतुलन पादाभ्यंग घृताने पादाभ्यंग करणे तसेच दिवसातून २-३ वेळा नाकात नस्यसॅन घृताचे १ ते २ थेंब टाकलेले बरे. रात्रीचे जागरण होत असल्यास लाह्यांचे पाणी, शहाळ्याचे पाणी, धणे-जिऱ्याचे पाणी वरचेवर घेणे उत्तम ठरेल. रात्री भूक लागल्यास जंक फूड खाण्यापेक्षा सामान्य तापमानाच्या दुधात संतुलन शतानंत कल्पासारखा कल्प घालून दोन-दोन घोट घेणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम. सध्याच्या काळात फॅशनच्या नावाखाली मुले डोक्याला तेल लावणे टाळतात. पण निदान अभ्यासाच्या काळात तरी संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेलासारखे आयुर्वेदिक सिद्ध तेल आठवड्यातून २-३दा तरी केसांच्या मुळांना लावलेले चांगले, जेणेकरून डोक्यालाही थंडावा मिळायला मदत मिळू शकेल.

प्रश्र्न २ - सध्या लहान मुलांना ब्रेड अतिशय आवडतो. ब्रेड खाणे कितपत योग्य आहे. तसेच बिस्किटही मैद्यापासून बनविलेले असते त्यामुळे लहान मुलांना बिस्किटे द्यावीत की नाही? आजारी माणसांनाही, विशेषतः ताप असला किंवा जुलाब होत असले तर, ब्रेड खाण्याचा सल्ला दिला जातो. आजारी व्यक्तींनी ब्रेड खावा की नाही याबद्दल मार्गदर्शन करावे.

- विजया खडके, पुणे

उत्तर - सगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळी पिठं वापरून पोळीसारखा प्रकार करण्याची पद्धत असते, त्याला ब्रेड म्हटले जाते. आपल्याकडे पोळी वा भाकरी कशापासून बनविलेली आहे त्यावरून त्याची गुणवत्ता ठरते तसेच ब्रेड कशापासून बनविलेला आहे तो चांगला आहे की वाईट आहे हे ठरविता येते. ब्रेड बनवताना होल व्हीट फ्लॉवरपासून बनविणे सर्वांत उत्तम ठरते. गव्हाच्या पिठात बरोबरीने ओट, नाचणी, राजगिरा वगैरे धान्ये वापरूनही ब्रेड बनवता येतो. मैद्यापासून बनविलेला ब्रेड शक्यतो टाळलेला बरा. ब्रेड किती फर्मेंट केला आहे यावरूनही त्याचे शरीरात पचन-अपचन ठरत असते.

तसेच ब्रेड बनिताना त्यात कुठली कृत्रिम रसायने टाकली गेली आहेत याचाही विचार करावा लागतो. पाश्र्चिमात्य देशांत, विशेषतः युरोपमध्ये, ब्रेड, केक वगैरे बनविण्याचे कल्चर आपल्यापेक्षा अधिक समृद्ध असते. पण फॅक्टरीत बनविताना बरीच कृत्रिम रसायने वापरली जातात, जी स्वास्थ्यासाठी चांगली नसतात. पोळी वा भाकरी झाल्यावर आपण त्यावर तूप लावून खातो, तसेच परदेशांत ब्रेडचा टोस्ट करून त्यावर लोणी लावून खाण्याची पद्धत असते. त्यामुळे ब्रेड खायचाच झाला तर तो व्यवस्थित भाजून त्यावर लोणी लावून खाल्ल्यास कमी अपायकारक ठरतो. लहान मुलांना वा आजारपण असताना ब्रेडसारखा पदार्थ टाळलेलाच बरा, कारण अशा वेळी मऊ भात, खिचडी, भाज्यांचे सूप वगैरे देणे स्वास्थ्याच्या दृष्टीने जास्त उत्तम ठरते.