#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

question answer
question answer

मी यापूर्वी माझ्यासाठी व माझ्या छोट्या मुलाकरिता आपल्याकडून सल्ला घेतला होता. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. माझा मोठा मुलगा तेरा वर्षांचा आहे. त्याचे दोन वर्षांपूर्वी ॲडिनॉइड ग्रंथीचे शस्त्रकर्म झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्याची सर्दी बरी होत नाही म्हणून डॉक्‍टरांनी स्कोपी केली, तर ॲडिनॉइड ग्रंथी पुन्हा वाढल्याचे दाखवते आहे. त्यांनी पुन्हा शस्त्रकर्माचा सल्ला दिला आहे, पण आम्हाला पुन्हा शस्त्रकर्म करायचे नाही. संतुलनचे सीतोपलादी चूर्ण घेणे सुरू आहे, नस्यसॅन घृतही वापरतो आहोत. कृपया उपाय सुचवावा.
..... सविता

उत्तर - उत्तरातून केलेल्या मार्गदर्शनाचा तुम्हा दोघांना फायदा झाला हे कळवल्याबद्दल धन्यवाद. ॲडिनॉइड ग्रंथी या टॉन्सिलप्रमाणेच रोगप्रतिकार संस्थेमधील महत्त्वाचा घटक असतात. त्यामुळे या ग्रंथी काढून टाकणे शक्‍यतो टाळणे श्रेयस्कर असते. मुलाला मधात मिसळून सीतोपलादी चूर्ण देणे, ‘नस्यसॅन घृता’चे नस्य करणे हे चांगलेच आहे, बरोबरीने प्रतिकारशक्‍ती सुधारण्यासाठी एक-एक चमचा च्यवनप्राश देण्याचा; ब्राँकोसॅन सिरप, ‘समसॅन गोळ्या’ देण्याचा उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने ज्वरांकुश गोळ्या, ‘श्वाससॅन चूर्ण’ घेण्याचाही उपयोग होईल. पाण्यात हळद भिजत घालून, त्यात मीठ मिसळून गुळण्या करण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून एक-दोन वेळा गरम पाण्यात तुळशीची पाने, ओवा टाकून वाफारा घेणे, ‘संतुलन प्युरिफायर’सारख्या औषधी द्रव्यांचा घरात सकाळ- संध्याकाळ धूप करणे वगैरेंचाही फायदा होईल. 

मला किरकोळ प्रमाणात उच्च रक्‍तदाबाचा त्रास सोडला, तर इतर कसलाही आजार नाही. परंतु गेल्या वर्षभरापासून माझ्या डोळ्यांसमोर कधी काजवे, कधी रंगीत डिझाइन चमकत राहते, कधी अंधारी येते. यामुळे वाचण्यास त्रास होतो. कधी आठ-दहा फुटांवरील व्यक्‍ती ओळखू येत नाही. नेत्रतज्ज्ञांच्या मतानुसार डोळ्यांमध्ये काहीही दोष नाही. कृपया या समस्येवर आपण मार्गदर्शन करावे.
..... पंडित

उत्तर - त्रासाची तीव्रता लक्षात घेता अजून एखाद्या नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे असे वाटते. बरोबरीने डोळ्यांची, एकंदर दृष्टीची शक्‍ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे उत्तम होय. यासाठी सर्वांत चांगला उपाय म्हणजे सकाळ- संध्याकाळ एक-एक चमचा ‘संतुलन सुनयन घृत’ घेणे. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घृतमंडाची किंवा विशेष औषधी घृताची नेत्रबस्ती घेणे हेसुद्धा उत्तम. नेत्रबस्तीमुळे डोळ्यातील वात-पित्तदोष संतुलित होण्यासही उत्तम फायदा होतो असा अनुभव आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण, अर्धा चमचा तूप, पाव चमचा मध हे मिश्रण घेण्याचा, तसेच नाकात घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकण्याचा उपयोग होईल. दिवसातून एक-दोन वेळा ‘सॅन अंजन (रंगविरहित)’ हे खास पुरुषांसाठी बनविलेले आयुर्वेदिक काजळ डोळ्यांना लावण्याचाही उपयोग होईल.

माझा मुलगा तीन वर्षांपूर्वी जुलाब, उलट्या, ताप या लक्षणांमुळे हॉस्पिटलमध्ये आठवडाभरासाठी भरती होता. मात्र, तेव्हापासून त्याला शौचातून सतत चिकट होते. आव कमी-अधिक प्रमाणात पडत असते. प्रमाण वाढल्यास कधीतरी रक्‍त पडते. यासाठी वर्षभर ॲलोपॅथीची औषधे घेतली, त्यामुळे दोन-तीन दिवस फरक पडतो, नंतर पुन्हा तसाच त्रास होतो. कृपया काही उपाय सुचवावा.
.... स्मिता

उत्तर - या वयात होणारा अशा प्रकारचा पचनाचा त्रास भावी आरोग्यासाठी चांगला नाही. तीन वर्षे होऊन गेली आहेत, आता तो मुळापासून बरा करण्यासाठी योग्य ते उपचार घ्यायलाच हवेत. यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे, विशेष बस्ती उपचार करून घेणे सर्वांत चांगले. कारण आत्तापर्यंत घेतलेल्या तीव्र, रासायनिक औषधांचा शरीरावर झालेला दुष्परिणाम निघून जाणे आवश्‍यक होय. बरोबरीने मुलाला जेवणानंतर घरी बनविलेल्या ताज्या व गोड ताकात पाव-पाव चमचा लवणभास्कर चूर्ण देण्याचा उपयोग होईल. जेवणानंतर अर्धा अर्धा चमचा बिल्वावलेह किंवा ‘बिल्वसॅन’ अवलेह घेणे, कुटजघनवटी तसेच प्रवाळपंचामृत घेणे हेसुद्धा चांगले. मुलाला काही दिवस रात्रीच्या जेवणात गहू देणे बंद करणे, एरवीही दही, पनीर, मांसाहार, अंडी, सोयाबीन, चवळी, पावटा, मटार वगैरे पचण्यास जड गोष्टी टाळणेच चांगले. 

मी २३ वर्षांची विद्यार्थिनी आहे. मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. माझी पाळी दोन-अडीच महिन्यांनी येते. यासाठी मी दोन-तीन डॉक्‍टरांकडून उपचार घेतले. उपचार चालू असेपर्यंत पाळी नियमित येते, मात्र नंतर पुन्हा अनियमित येते. याशिवाय घरच्या घरी जिरे, तीळ, पपई खाणे, शतावरी कल्प, योगासने वगैरे सर्व उपाय करते. कृपया मार्गदर्शन करावे. फेमिसॅन तेल व फेमिनाइन बॅलन्सही घेते आहे.
..... वाणी

उत्तर - बऱ्याचदा गोळ्या घेऊन पाळी आणण्याची सवय लागली, की नैसर्गिक उपचारांनी पाळी वेळच्या वेळी येण्यास अधिक वेळ द्यावा लागतो. यादृष्टीने वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे व नेमकी औषधे चालू करणे हे उत्तम होय. पिचू, आसव, शतावरी कल्प घेत राहणे चांगलेच आहे. योगासनांमुळे, तसेच नियमित चालण्यामुळे स्त्रीसंतुलनात मदत मिळते असा अनुभव आहे. आठवड्यातून दोन वेळा खालून ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे, ‘स्त्री-संतुलन’ हे खास स्त्री-आरोग्यासाठी तयार केलेले संगीत ऐकण्याचाही फायदा होईल. 

मला रक्‍तदाब, मधुमेह वगैरे काहीही नाही; मात्र सकाळी उठल्यावर पोट नीट साफ होत नाही, शिवाय नाश्‍ता करेपर्यंत गॅसेस जाणवतात. प्रवासातही सहसा गॅसेस होतात. अशा वेळी हाजमोला, हरडे वगैरे घेतले की बरे वाटते. पोट साफ होण्यासाठी औषध मी घेत नाही, कारण अशा औषधांची सवय लागते. तरी कृपया उपाय सुचवावा.
.... वैद्य

उत्तर - सगळ्याच पोट साफ होण्यास मदत करणाऱ्या औषधांची शरीराला वा पोटाला सवय लागते असे नाही. जी औषधे आतड्यातील मल फक्‍त बाहेर काढून टाकण्याचे काम करतात, ती औषधे रोज घेणे चांगले नसते. किंवा जी औषधे नियमित वापराने आतडीला कोरडेपणा आणतात, तीसुद्धा रोज घेणे चांगले नसते. कारण त्यामुळे पोट साफ होण्यासाठी औषध घ्यावेच लागते. मात्र सर्वच औषधे अशी नसतात. पचन सुधारून आतड्यांमधली उष्णता व कोरडेपणा कमी करून, आतड्यांमध्ये मृदुुता तयार करून मलप्रवृत्ती होण्यास मदत करणारी औषधे घेण्याची सवय लागत नाही, तसेच त्याचे काही दुष्परिणामही नसतात. उदा. जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण, ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याची सवय लागत नाही असे दिसते. बरोबरीने पचनक्षमता सुधारण्यासाठी ‘संतुलन अन्नयोग’ या गोळ्या घेणे चांगले. यामुळे गॅसेस होणेसुद्धा कमी होईल. जेवणापूर्वी आले-लिंबाचा चमचाभर रस घेण्यानेही गॅसेसचा त्रास कमी होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com