#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Tuesday, 9 October 2018

मी १६ वर्षांचा असून, माझे वजन फार कमी म्हणजे ३९ किलोच आहे. कृपया वजन वाढविण्यासाठी उपाय सुचवावा, तसेच माझ्या नखांवर कधी कधी पांढरे डाग येतात, एक नाकपुडी सतत चोंदलेली असते, यावरही उपाय सुचवावा.
....प्रशांत

मी १६ वर्षांचा असून, माझे वजन फार कमी म्हणजे ३९ किलोच आहे. कृपया वजन वाढविण्यासाठी उपाय सुचवावा, तसेच माझ्या नखांवर कधी कधी पांढरे डाग येतात, एक नाकपुडी सतत चोंदलेली असते, यावरही उपाय सुचवावा.
....प्रशांत

उत्तर - एकंदर सर्व लक्षणांचा विचार करता, शरीरशक्‍ती वाढणे गरजेचे आहे असे वाटते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नियमित अभ्यंग करण्याचा फायदा होईल. यासाठी ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तीळ तेल’ वापरणे चांगले, कारण यातील तीळ तेलाने वातदोषाचे शमन होऊ शकते, तर आतील वनस्पतींमुळे शरीरशक्‍ती वाढण्यास मदत मिळू शकते. सकाळ- संध्याकाळ तूप-साखरेसह एक-एक चमचा ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचाही उपयोग होईल. मात्र, तूप घरी बनविलेले साजूक असावे. रोज सकाळी च्यवनप्राश किंवा ‘सॅनरोझ’सारखे रसायन घेण्याने नखांवरचे पांढरे डाग कमी होतात असा अनुभव आहे. रोज एक-दोन कप दूध, त्यात खारीक चूर्ण, ‘संतुलन चैतन्य कल्प’ टाकून घेण्याचाही उपयोग होईल. नाक चोंदू नये यासाठी नस्य करणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर लगेच नाकात ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकता येतील. आठवड्यातून एक-दोन वेळा गरम पाण्याचा वाफारा घेण्याचाही फायदा होईल.

मी ४४ वर्षांची आहे. माझी पाळी चाळिसाव्या वर्षी बंद झाली. मात्र त्या दरम्यान माझ्या पतींचे निधन झाल्यामुळे मला नैराश्‍याचा त्रासही सुरू झाला व त्यासाठी उपचार घ्यावे लागले. यामुळे माझे वजनही वाढले. सध्या मला कोणत्याही गोळ्या घ्याव्या लागत नाहीत, मात्र दोन महिन्यांपासून मला पुन्हा एकदा पाळी आली. स्त्रीतज्ज्ञांनी तपासण्या केल्या, त्यात काहीच दोष सापडला नाही. मात्र, त्यांनी अशी पाळी येणे चांगले नाही असे सांगितले. मला इतर काहीच त्रास नाही, फक्‍त मन शांत राहात नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
.... राजश्री

उत्तर - अचानक आलेल्या मानसिक ताणामुळे पाळीमध्ये खंड पडू शकतो. सर्व तपासण्या व्यवस्थित आहेत, तेव्हा काही त्रास न होता पाळी येत असली, तर चिंता करण्याची आवश्‍यकता नाही. मनाचा व स्त्रीसंतुलनाचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. त्यामुळे ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे, अनुलोम-विलोम प्राणायाम करणे, सूर्यनमस्कारासारखी योगासने करणे हे मानसिक व स्त्रीसंतुलन या दोन्ही पातळ्यांवर मदत करू शकेल. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोधारा, नस्य करून घेणे, शास्त्रशुद्ध पंचकर्म करून घेणे, मनाच्या माध्यमातून स्त्रीसंतुलनास मदत करणारे ‘स्त्री संतुलन’ हे म्युझिक ऐकणे हेसुद्धा चांगले. बरोबरीने ‘सॅनब्राह्मी गोळ्या’ व ‘संतुलन रिलॅक्‍स सिरप’ घेण्याचाही उपयोग होईल.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोजच्या स्वयंपाकात कोणते तेल वापरावे? कृपया सल्ला द्यावा.
... स्मिता दलाल 

उत्तर - लठ्ठपणा कमी व्हावा, तसेच एकंदर आरोग्य चांगले राहावे यासाठी तेलाचा वापर मर्यादित असणे श्रेयस्कर होय. त्यातल्या त्यात कोल्ड प्रेस पद्धतीने बनविलेले खोबरेल किंवा शेंगदाण्याचे तेल कमीत कमी प्रमाणात वापरता येईल. किंवा फोडणीसाठी घरी बनविलेले साजूक तूप वापरता येईल. तसेच, फक्‍त तेलात बदल करण्याने लठ्ठपणा कमी होईल असे नाही, तर यासाठी पंचकर्म, नियमित योगासने व चालणे, पथ्यकर आहार आणि औषधोपचार अशा चतुःसूत्रीद्वारे उपचार करावे लागतात, असा अनुभव आहे. शास्त्रोक्‍त पंचकर्म करून घेतल्यावरही लेखन बस्ती, उद्वर्तन, अभ्यंग वगैरे उपचार घेत राहिल्यास क्रमाक्रमाने वजन कमी करता येऊ शकते.

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी नियमित वाचतो. यातील सल्ला मला बऱ्याचदा उपयोगी पडला आहे. गेल्या महिन्यापासून माझे दोन्ही गुडघे खूप दुखतात. सतत वेदना सुरू राहतात. मांडी घालून बसता येत नाही. मी गुडघ्यांचे व्यायामसुद्धा करतो. नी-कॅपही वापरतो. कृपया काही उपाय सुचवावा.
.... नाईक 

उत्तर - गुडघ्यांचे व्यायाम करायला, नी-कॅप घालायला हरकत नाही. मात्र, बरोबरीने गुडघ्यातील झीज भरून काढण्यासाठी उपचार होणे गरजेचे होय. यादृष्टीने दिवसातून तीन वेळा हलक्‍या हाताने ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावता येईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा अगोदर तेल लावून वरून निर्गुडी, एरंड, शेवगा, सागरगोटा यापैकी मिळतील ती पाने वाफवून त्यांचा गुडघ्यांना शेक करण्याचाही उपयोग होईल. संतुलनचा अस्थिसंधी पॅक मिळू शकतो. यातील मूठभर मिश्रण कढईमध्ये ‘संतुलन शांती सिद्ध तेला’मध्ये गरम करून त्याची पुरचुंडी बांधून त्याने गुडघे शेकण्याचा उपयोग होताना दिसतो. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली जानुबस्ती घेण्याचा फायदा होईल. तसेच, ‘संतुलन वातबल’ गोळ्या, तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, रास्नादी काढा, दशमूलारिष्ट घेण्याचाही उपयोग होईल. 

माझे वय ४४ वर्षे आहे. वजन कमी करण्यासाठी या वयात जिममध्ये जाणे चांगले का योगासने करणे चांगले? व्यायाम केला की माझे अंग फार दुखते.
... सुखदा

उत्तर - वजन कमी करण्यासाठी किंवा एकंदर फिटनेससाठीसुद्धा नियमित योगासने, चालणे, पोहणे या प्रकारचे व्यायाम करणे अधिक चांगले असते. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नसतात आणि काही कारणास्तव यात खंड पडला तरी त्यामुळे त्रास होत नाही. शिवाय, योगासनांमुळे शरीराबरोबरच मनाचे संतुलनही साध्य होत असते, स्त्रीसंतुलनावरही सकारात्मक परिणाम होत असतात. त्यामुळे योगासने करणे कधीही उत्तम होय. व्यायामानंतर अंग दुखू नये यासाठी एकदम खूप वेळ व्यायाम न करता व्यायामाचा वेळ क्रमाक्रमाने वाढवत नेणे, उत्तरोत्तर अवघड योगासने करणे हे चांगले. अभ्यंग करून नंतर योगासने, व्यायाम केला तर त्याचे फायदे अधिक होतील, शिवाय अंग दुखणेही टाळता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question answer dr balaji tambe