अन्नपानविधी शमीवर्ग

Lentil
Lentil

निरोगी व्यक्‍तींसाठी मूग, तूर, मटकी, मसूर, कुळीथ ही कडधान्ये अनुकूल असतात. यांचे वरण, आमटी, कढण, उसळ असे पदार्थ बनवता येतात. मुगाचे किंवा तुरीचे वरण किंवा आमटी रोज आहारात ठेवली तरी चालते. आठवड्यातून दोन वेळा मुगाची उसळ, एका कुळीथ, एकदा मटकी व एकदा मसूर याप्रकारे उसळही करता येते. 

येथे आपण मसूर व चणे यांची माहिती घेऊ या. 

मसूर 
अख्खे मसूर काळसर रंगाचे असतात. मात्र मसुराची डाळ आकर्षक केशरी रंगाची असते. मुगाच्या तुलनेत मसूर थोडे अधिक वातूळ असते, मात्र आठवड्यातून एखाद्या वेळी, तरुण मंडळींसाठी आठवड्यातून दोनदा उसळ किंवा आमटीसाठी उत्तम असते. 
मसुरा मधुरा शीता ग्राहिणी वातकारका । 
लघ्वी रुक्षा च वर्ण्या च बल्या बृंहणकारिणी ।। 
...निघण्टु रत्नाकर 

मसूर चवीला मधुर, वीर्याने शीत व पचायला हलके असतात, रुक्ष गुणाचे असल्याने वातकर असतात. मात्र ताकद वाढवितात, धातूंसाठी पौष्टिक असतात. मसुराचा लेप वर्ण्य असतो. 

मसुराच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला कडू असून पचायला हलकी असते. 

मसूर उलटीवर औषधाप्रमाणे उपयोगी असतात. अख्खे मसूर नीट भाजून घेऊन त्यांचे पीठ केले व ते डाळिंबाच्या रसात मिसळून थोडे-थोडे घेतले तर उलट्या थांबतात. जुलाब होत असल्यास "लंघन' सर्वश्रेष्ठ असते. परंतु जेव्हा भूक लागेल तेव्हा मसुराचे यूष करून त्यात जिरे पूड, चवीपुरते मीठ, लिंबाचा रस मिसळून भुकेच्या प्रमाणात घेण्याचा उपयोग होतो. मसुराचे यूष बनविण्याची पद्धत - एक भाग मसूर सोळा पट पाण्यात शिजवण्यास ठेवावे, मसूर नीट
शिजले की त्यात इतर द्रव्ये टाकून, गाळून घेऊन गरम गरम प्यायला द्यावे. 

कधी बांधून, कधी पातळ शौचाला होत असेल तर मसुराची उसळ किंवा मसुराची आमटी आहारात घेणे हितावह असते. ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी, मसुराची पातळ आमटी व जिरे-कढीपत्त्याची फोडणी दिलेले ताक असा आहार घेतला तर उपयोग होतो. 

लघवीला जळजळ होत असली, कमी प्रमाणात होत आहे असे वाटत असले तर मसूर व कुळीथ निम्मे-निम्मे घेऊन त्याचे पातळ कढण करून त्यात धणे-जिरे पूड व चवीपुरते सैंधव मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 
फार घाम येत असला तर मसूर व कुळीथ भाजून तयार केलेले पीठ समभाग घेऊन एकत्र करून ठेवता येते. स्नानाच्या वेळी दोन-तीन चमचे हे मिश्रण त्यात पाव चमचा तुरटीचे चूर्ण मिसळून अंगाला चोळून लावण्याने गुण येतो. 
निरोगी व्यक्‍तींसाठी मूग, तूर, मटकी, मसूर, कुळीथ ही कडधान्ये अनुकूल असतात. यांचे वरण, आमटी, कढण, उसळ वगैरे पदार्थ बनवता येतात. मुगाचे किंवा तुरीचे वरण किंवा आमटी रोज आहारात ठेवली तरी चालते. आठवड्यातून दोन वेळा मुगाची उसळ, एका कुळीथ, एकदा मटकी व एकदा मसूर याप्रकारे उसळही करता येते. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी कुळथाचे प्रमाण कमी ठेवणे श्रेयस्कर असते. सहसा या सर्व कडधान्यांची शरीरात रुक्षता वाढविण्याची प्रवृत्ती असल्याने वरून तूप घेऊन ओल्या खोबऱ्याचा वापर करून आमटी किंवा उसळ बनविणे चांगले होय. 

हरबरा - चणे 
हरबरा किंवा चणे हे असेच एक कडधान्य. साधारणतः ताजा हरबरा व सुकलेले चणे असे म्हटले जाते. ऋतुपरत्वे ओला हरबरा मिळतो, तो भाजून किंवा नुसता खाल्ला जातो किंवा उसळ बनवली जाते. ताज्या हरबऱ्याचे गुण याप्रमाणे होत, 
आमस्तु चणकः शीतो रुच्यश्च तुवरो मधुः । 
तपर्णो कफकरो धातुवृद्धिकरो गुरुः ।। 
किञ्चित्कटुस्तृषादाहशोषाश्‍मरिविनाशकः। 
...निघण्टु रत्नाकर
 
ओला म्हणजे ताजा हरबरा रुचकर, चवीला गोड, किंचित तुरट असतो, वीर्याने शीत असतो, पचायला जड असतो मात्र कफ वाढवतो, धातूंची वृद्धी करतो, शरीराला तृप्त करतो, तहान, दाह, शोष व मूतखडा यांचा नाश करतो. 
हरबऱ्याच्या कोवळ्या पानांचीही भाजी केली जाते, पानांचा रस त्वचेला चोळून लावल्यास खाज सुटणे, गांधी उठणे या तक्रारी कमी होतात. 

कोवळे हरबरे भाजून खाल्ले असता पचायला तितकेसे जड राहात नाहीत. कोवळे हरभरे अगोदर सालासकट भाजून घेतले, सोलून नंतर त्यात लिंबू, मीठ, मिरपूड मिसळून नीट चावून खाल्ले तर तोंडाला रुची येते, अन्न घेण्याची इच्छा होते. 
सुकवलेले हरबरे म्हणजेच चणे मात्र वातकर असतात. त्यांचा माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ या. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com