सोम उपासना 

Som Upasana
Som Upasana

आयुष्यात काहीही करायचे असेल तर त्यासाठी आरोग्य ही प्राथमिक गरज असते आणि म्हणून सोम उपासनेची सुरुवात होते ती शरीराची काळजी घेण्यापासून. 


आरोग्य, ऐश्वर्य, आत्मसमाधान आणि तेजस्विता या सर्वांचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी ‘सोम’ उपासना हा सोपा व प्रभावी मार्ग होय. प्राचीन भारतीय ज्ञान-विज्ञानावर आधारलेला ही सोम उपासना आयुर्वेद व योग या जीवनोपयोगी शास्त्रांचाही समावेश करून घेते. मागच्या काही आठवड्यांमध्ये आपण योगासने, मुद्रा यांची माहिती घेतली. आज महत्त्वाच्या आयुर्वेदीय संकल्पनांचा विचार करू या. 
सोम उपासनेची सुरुवात होते ती शरीराची काळजी घेण्यापासून, कारण आयुष्यात काहीही करायचे असेल तर त्यासाठी आरोग्य ही प्राथमिक गरज असते. आणि म्हणून सोम उपासनेत आयुर्वेदाची भूमिका महत्त्वाची असते. 

आयुर्वेद हे असे प्राचीन शास्त्र आहे, जे आरोग्य, रोग, योग होण्यामागची दृश्‍य-अदृश्‍य कारणे, रोग होऊ नये यासाठी घ्यायची काळजी, शरीरपोषण वगैरे संदर्भात सखोल मार्गदर्शन करते. खरे तर आयुर्वेद हा सर्वांगीण जीवन जगण्याचा मार्ग आहे. 

आयुर्वेदात शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत, अंतःस्रावी यंत्रणेपर्यंत (ज्याला आयुर्वेदात अग्नी असे संबोधलेले आहे), शरीरात घडणाऱ्या सर्व क्रियांना जबाबदार असणाऱ्या तत्त्वांपर्यंत, इतकेच नाही तर मनापर्यंत पोहोचण्याची सुद्धा क्षमता आहे. आयुर्वेदामुळे शरीरक्रियेतील बिघाड बरा होऊ शकतो, तसेच शरीरातील कोणतेही असंतुलन, जे रोगाला निमंत्रणस्वरूप असते, ते दूर करता येते. आयुर्वेद शरीरातील सर्व घटकद्रव्ये सुसंवाद प्रस्थापित करू शकतो. 

आयुर्वेदातील संकल्पनांच्या मदतीने प्रकृती म्हणजे शरीराच्या मूळ जडणघडणीत सुधारणा करता येते, रोगापासून मुक्‍ती मिळविता येते, आयुष्यातील वळणांवर शरीर व मनात जे बदल होतात ते पार करताना संतुलन कायम राखता येते, मेदवृद्धी, गाठ, सिस्ट वगैरे शरीरात होणाऱ्या बदलांवर उपचार करता येतात. आयुर्वेदातील उपचारपद्धती या पूर्णतः नैसर्गिक असतात. विश्वातील प्रत्येक वस्तू पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश यांच्या एकत्रीकरणातून बनलेली आहे, ही या शास्त्रातील एक मुख्य संकल्पना. या संकल्पनेच्या मदतीने आपण आपल्या भोवती असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची उदा. जमीन, पाणी, खनिजे, प्राणी, वनस्पती वगैरे सर्वांची प्रकृती व त्यांची गुणवैशिष्ट्ये जाणून घेऊ शकतो. याच धर्तीवर व याच संकल्पनेतून आयुर्वेदात शरीर, मन, जीवात्मा यांची गुणवैशिष्ट्येही समजावलेली असतात. आयुर्वेदाची ही एक अनन्यसाधारण विशेषता होय, जिच्यामुळे हे शास्त्र आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व गोष्टी तसेच आपल्या अंतरंगात असणारी सर्व तत्त्वे यांना एकाच तात्त्विक संकल्पनेनुसार जाणून घेतो, आपल्या आतपर्यंत पोहोचून उपचार करू शकतो, रोगाचे मूळ कारण (संप्राप्ती) शोधून काढू शकतो. शिवाय आयुर्वेदिक औषधे शरीरात गेल्यावर परकीय किंवा बाह्य उरत नाहीत, तर ती शरीरात सहजपणे एकजीव होऊन जातात. एखाद्याने चुकून जरी प्रकृतीला अनुकूल नसणारे आयुर्वेदिक औषध घेतले तरी त्याचा त्रास होत नाही. एखाद्या वेळी जास्ती खाण्याने जेवढा त्रास होईल तशाच स्वरूपाची अस्वस्थता काही वेळासाठी जाणवते, मात्र त्यातून गंभीर असे काही घडत नाही. काही मोजकी ‘विशेष’ प्रकारची औषधे वगळता बहुतेक आयुर्वेदिक औषधांचे दुष्परिणाम (साइड इफेक्‍टस्‌) नसतात. 

 

कायाकल्प 
आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी वयाच्या पस्तिशीच्या दरम्यान पहिल्यांदा व नंतर पन्नासाव्या, साठाव्या, सत्तराव्या वर्षी शरीरशुद्धी करून घेण्यास आयुर्वेदाने सुचवले आहे. निसर्गनियमानुसार शरीराची रोजच्या रोज शुद्धी होत असली तरी संपूर्ण शरीराची जाणीवपूर्वक व विशिष्ट पद्धतीने शुद्धी करणे कितीतरी पटींनी अधिक प्रभावी असते. जसे आपण रोज घर साफ करतोच, परंतु काही विशेष प्रसंग, सण-समारंभाच्या अगोदर घराची अधिक बारकाईने, घरातील काना-कोपऱ्याची सफाई करतो, तसेच शरीराच्या बाबतीतही आतून व प्रत्येक पेशीची शुद्धी होणे आवश्‍यक असते. 

आयुर्वेदाला केवळ शरीर निरोगी असणे एवढेच अभिप्रेत नाही, तर बरोबरीने चिरतारुण्याचा लाभ व्हावा, निरोगी दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी हे सुद्धा अपेक्षित असते. यालाच आयुर्वेदात ‘कायाकल्प’ असे म्हटलेले आहे.

कायाकल्पाच्या मदतीने शरीराचे पुनर्जीवन होऊ शकते, वय वाढल्यामुळे शरीरात होणारे बदल थांबवता येतात, असा हा कायाकल्प साधता येतो तो पंचकर्माने. थोडक्‍यात सांगायचे तर पंचकर्म म्हणजे शरीरातील धातू व पेशींचे महाभूतांच्या पातळीवर शुद्धीकरण. 
पंचकर्म शब्दाचा अर्थ बहुतेक वेळा पाच प्रकारचे उपचार असा केला जातो. परंतु पंचकर्म म्हणजे पंचतत्त्वांची शुद्धी. म्हणून आत्मसंतुलनमध्ये केल्या जाणाऱ्या पंचकर्माला ‘संतुलन पंचकर्म’ असे म्हटले जाते. यामध्ये शरीरातील सर्व दोषांना क्रमाक्रमाने व शास्त्रशुद्ध पद्धतीने संतुलित केले जाते. उदा. कफदोष, जो पृथ्वीतत्त्व व जलतत्त्वाशी संबंधित असतो तो पंचकर्मातील वमन प्रक्रियेद्वारे संतुलित केला जातो. पित्तदोष ज्याचे मूळ अग्नित्तत्व व जलतत्त्वात असते, त्यावर विरेचनाच्या मदतीने काम करता येते. तर वातदोष, जो वायुतत्त्व व आकाशत्तत्वाशी संबंधित असतो, तो बस्तीच्या माध्यमातून पूर्ववत करता येतो. पित्तदोषाच्या व्यतिरिक्‍त शरीरात ‘अग्नी’ हे सुद्धा एक तत्त्व असते व याचा शरीरातील संप्रेरक संस्थेशी संबंध असतो. आणि यावर योगशास्त्राच्या मदतीने काम करता येते. पिच्युटरी व पिनिअल ग्रंथीवर काम करण्यासाठी विशेष औषधी द्रव्यांनी संस्कारित तुपाचे योजना करता येते. 
व्यक्‍तीचे मन व तिचे स्वतःचे अस्तित्व यांना जोडणारा दुवा म्हणजे आकाशतत्त्व. यावर विशेष स्वास्थ्यसंगीत व ध्यानाच्या मदतीने उपचार करता येतात. ‘संतुलन पंचकर्म’ हे या संकल्पनेवर आधारलेले असून त्यामुळे ती एक पूर्ण वेळ निवासी उपचार पद्धत आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात, शांत वातावरणात, शुद्ध व मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश यांच्या सोबतीने, विशेष आहारयोजनेने युक्‍त असे संतुलन पंचकर्म करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. 

यामुळे आरोग्याच्या संतुलनाबरोबर शरीरातील रोग बरा होण्याची प्रक्रियाही सुरू होते. यौवनप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या संपूर्ण कायाकल्प उपचारामध्ये याच्याही पुढचे कुटिप्रावेशिक, म्हणजे विशेष प्रकारच्या निवासात एकांतात व स्वतंत्रपणे राहणे आणि रसायनसेवन म्हणजे वीर्यवान व कायाकल्प करण्यास सक्षम रसायनांचे सेवन करणे अशा उपचारांचा समावेश असतो. मात्र प्रदीर्घ रोगांवर किंवा एरवी बरे होण्यास अवघड समजल्या जाणाऱ्या विकारांवर संतुलन पंचकर्माच्या मदतीने अप्रतिम उपयोग होताना दिसतो व शरीराचे पुनर्जीवनही यशस्वी होताना दिसत. 

शरीरातील सर्व अडथळे दूर झाले की सर्व स्रोतसांतील अभिसरण विनाव्यत्यय होऊ लागते, तेव्हा अंतरंगापर्यंत म्हणजेच ‘स्व’पर्यंत पोहोचणे सोपे होते. अन्यथा अगदी पहिल्या म्हणजे शारीरिक पातळीवर गाडी अडेल असा त्यातून पुढे वाट काढायला आयुष्य खर्ची पडू शकेल. आयुर्वेदात शरीराच्या बरोबरीने मनाच्या विकृतीवर म्हणजे नकारात्मकता व मनाची चुकीच्या दिशेने प्रवृत्ती होणे यावरही उपाय सुचवलेले आहेत. 

योग्य आहार 
आहारात स्वतःच्या प्रकृतीला अनुकूल अन्नपदार्थांचा समावेश असावा. प्यायचे पाणी उकळलेले असले तर ते शरीरात सहजतेने स्वीकारले जाते. आयुर्वेदात उल्लेख आहे की पाण्याचा एक अष्टमांश काढा करून घेतला म्हणजे पाणी एक अष्टमांश उरेपर्यंत उकळून घेतले तर ते औषधाप्रमाणे किंवा अमृताप्रमाणे गुणकारी ठरते. रोजचे प्यायचे पाणी कमीतकमी वीस मिनिटांसाठी उकळून घेतलेले असावे. असे उकळून घेतलेले पाणी उन्हाळ्यात माठात ठेवून थंड करून घेण्यास हरकत नाही, पण फ्रीजमध्ये किंवा बर्फ टाकून अगदी थंडगार केलेले पाणी पिणे योग्य नाही. अशा थंडगार पाण्याने शरीरात वातदोषाशी संबंधित त्रास वाढू शकतात. 

मेंदूसाठी पोषक अन्न 
आहारात मेंदूला शक्‍ती देणारे अन्न नक्की असावे. या अन्नामुळे सोमरसाची (मेंदूजल -सेरेब्रोस्पायनल फ्लुइड) निर्मिती व प्रमाण सुधारण्यास मदत मिळते. मेंदूजलाच्या आरोग्यासाठी आणि शुद्धीसाठी त्याला योग्य पोषण मिळत राहणे गरजेचे असते. पूर्वी पाहिल्याप्रमाणे ‘स्व’पर्यंत पोहोचण्यासाठी हे सोम म्हणजे मेंदूजल मदत करणारे असते. 
सोमजलासाठी सर्वोत्तम पोषक अन्न म्हणजे पंचामृत, ज्याच्या नावातच पाच अमृतांचा उल्लेख आहे. तूप, मध, भारतीय पद्धतीने विरजलेले दही, उसाची साखर प्रत्येकी एक-एक चमचा आणि चार-पाच चमचे दूध एकत्र केले की पंचामृत तयार होते. यातच थोडे केशरही घालता येते साध्या साखरेऐवजी संतुलनचे शतावरी कल्प किंवा अमृतशर्करा (केशर व सुवर्णवर्खयुक्‍त) घेण्याने पंचामृताचे गुण वृद्धिंगत होतात. 

‘सोम’जलासाठी साजूक तूप हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. भारतीय वंशाच्या गाईच्या दुधावरची साय एकत्र करून त्यापासून पुढील पद्धतीने तूप बनविणे सर्वांत चांगले. असे दूध मिळणे अगदीच अशक्‍य असेल तर होमोजिनायझेशन प्रक्रिया न केलेले दूध वापरणे आवश्‍यक. दुधापासून तूप बनविण्याची पद्धत अशी आहे, दूध तापवून वर आलेली साय दूध थंड झाले की वेगळी करून साठवावी. ही साय फ्रीजरमध्ये ठेवता येते. पुरेशा प्रमाणात (तीन-चार दिवसांची किंवा साधारण अर्धा किलो) साठली की त्यात भारतीय परंपरेचे विरजण (राईट चर्निंग प्राणिज बॅक्‍टेरिया) त्याचे दही बनवावे. दही रवीच्या साहाय्याने घुसळून लोणी वेगळे करावे. हे लोणी नीट धुवून, कढवून तयार झालेले तूप ते साजूक तूप. 

घरातील प्रत्येकाने जेवणाबरोबर असे साजूक तूप किमान पाच-सहा चमचे या प्रमाणात खाणे चांगले. यामुळे मेंदूजल निरोगी राहण्यास पर्यायाने शरीर व मनाची काळजी घेण्यास सक्षम होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com