सोमयोग (1) : आरोग्य तन-मन-धनाचे 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 13 December 2019

सूर्यापासून आरोग्याची इच्छा धरावी. सूर्याबरोबर किंवा थोडे सूर्योदयापूर्वीच उठावे. आपणही सूर्याबरोबर चाललो तर सूर्य जसा कोटी कोटी वर्षे तेजवान आहे, सर्वांना हवाहवासा आहे, तसेच आपले आरोग्य राहील. रोज काही वेळ तरी सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे आरोग्यदायी असते. सूर्यप्रकाश नसेल अशा वेळी सूर्याचा प्रतिनिधी असलेल्या दिव्याच्या ज्योतीवर ध्यान करणे, तिच्या प्रकाशात बसणे हिताचे ठरते. 

सूर्यापासून आरोग्याची इच्छा धरावी. सूर्याबरोबर किंवा थोडे सूर्योदयापूर्वीच उठावे. आपणही सूर्याबरोबर चाललो तर सूर्य जसा कोटी कोटी वर्षे तेजवान आहे, सर्वांना हवाहवासा आहे, तसेच आपले आरोग्य राहील. रोज काही वेळ तरी सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे आरोग्यदायी असते. सूर्यप्रकाश नसेल अशा वेळी सूर्याचा प्रतिनिधी असलेल्या दिव्याच्या ज्योतीवर ध्यान करणे, तिच्या प्रकाशात बसणे हिताचे ठरते. 

समस्त प्राणिमात्रांना काय हवे असते? तर प्राणिमात्रांना हवे असते अन्न व संरक्षण. उत्क्रांत झालेल्या मनुष्याची, ज्याची स्मृती, धृती, मेधा, प्रज्ञा यांच्यापर्यंत पोचण्याची सोय झालेली आहे, त्याची मागणी काय आहे? 
सध्या आरोग्य, आरोग्य आणि आरोग्य हीच चर्चा सारखी ऐकण्यात येते. खावे काय, व्यायाम किती करावा, चालायला सकाळी जावे की संध्याकाळी, कुठले अन्न खावे याचे मार्गदर्शन केलेले दिसते. परंतु, आरोग्यासाठी फक्‍त खाणे आणि व्यायाम एवढेच आवश्‍यक आहे का? आणि केवळ आरोग्य, त्यातही पुन्हा नुसते शरीराचे आरोग्य, एवढीच आपली मागणी आहे का? शरीराचे आरोग्य उत्तम असले की आपली मागणी पूर्ण झाली असे म्हणायचे का? तर नाही. 

आरोग्य चार प्रकारचे असते. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आपल्याला लागणाऱ्या भोवतालच्या साधनसामुग्रीचे आरोग्य आणि त्याचबरोबरीने आत्मसमाधानरूपी आरोग्य असावे लागते. म्हणूनच आरोग्य, ऐश्वर्य, आत्मसमाधान (शांती) व तेजस्विता या चार गोष्टी जीवनात अत्यावश्‍यक असतात. शारीरिक आरोग्यातला एक महत्त्वाचा भाव म्हणजे शक्ती. जीवन जगताना पदोपदी शक्तीची आवश्‍यकता असते. शक्‍ती म्हणजे नुसती मनगटातील शक्‍ती नव्हे, तर मनुष्याला मानसिक शक्‍तीसुद्धा तेवढीच गरजेची असते. या मानसिक शक्‍तीच्या मदतीनेच आपल्याला राग, द्वेष वगैरे मानसिक असंतुलनावर वा मानसिक अनारोग्यावर संयम मिळविता येईल.
मनुष्याला समाजात स्थान हवे असते, मित्रमंडळी तसेच नातेवाईक यांना जोडता येणे जमावे लागते. नुसते माणसांशीच नव्हे, तर आजूबाजूच्या सर्व वातावरणाशी जमवता यावे लागते. परमेश्वराने एवढे मोठे विश्व निर्माण केलेले आहे, त्या संपूर्ण विश्वाशी समरस होणे जमले तरच मनुष्याला आत्मशांती मिळू शकते. यानंतर येते ते तेज. यशस्वी जीवन जगण्यासाठी मनुष्याला आत्मतेज आवश्‍यक असते. सध्या भौतिक जगाची व्यवस्था चालवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या विषयावर खूप चर्चा होताना दिसते. मात्र केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्व काही साध्य होणार नाही, तर नैसर्गिक बुद्धिमत्ता (नॅचरल कॉस्मिक इंटेलिजन्स-प्रज्ञा) जोपासावी लागेल. आणि यासाठी मनुष्याला आतल्या "स्व'शी संवाद साधता यावा लागेल, "स्व'बरोबर राहता यावे लागेल, "स्व'शी घट्ट मैत्री करावी लागेल. अशा प्रकारे स्वतःशी व बाह्यविश्वाशी एकात्मता अनुभवायची असेल तर त्यासाठी इलाज काय आहे? याचे उत्तर एकच - "सोम'योगाचा अभ्यास व कृती. 

आपल्या भारतीय परंपरेतील वेदांनी सांगितलेल्या कल्पना व आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेऊन केलेले एक सूत्र आहे, 
आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌ धनम्‌ इच्छेत्‌ हुताशनात्‌ । 
ज्ञानं महेश्वरात्‌ इच्छेत्‌ मोक्षम्‌ इच्छेत्‌ जनार्दनात्‌ ।। 

या श्लोकाचे प्रात्यक्षिक म्हणजे "सोमयोग.' आरोग्याची इच्छा सूर्यापासून करावी, धनसंपत्तीसाठी अग्नीदेवाची उपासना करावी, ज्ञानाची प्रार्थना महेश्वर म्हणजे शिवशंकरांकडे करावी, तर मोक्षासाठी जनता जनार्दनाची सेवा करावी. 

याठिकाणी मोक्ष हा शब्द ऐकल्याबरोबर घाबरून जायचे कारण नाही. मोक्ष ही बाह्यजगताकडे पाहण्याची व आतमध्ये स्वतःकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे. जी मिळाल्यानंतर आपण "स्व'मधे एकरूप होतो, आनंदमय अवस्थेला प्राप्त होतो. हाच मोक्ष होय. 

"आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌' म्हणजे सूर्यापासून आरोग्याची इच्छा धरावी. सूर्याबरोबर किंवा थोडे सूर्योदयापूर्वीच उठावे. आपणही सूर्याबरोबर चाललो तर सूर्य जसा कोटी कोटी वर्षे तेजवान आहे, सर्वांना हवाहवासा आहे, तसेच आपले आरोग्य राहील. सूर्योदयापूर्वी शरीरात वातदोष जास्ती कार्यप्रवण असतो, त्या वेळी मलविसर्जन झाले तर ते सहजपणे होते, मलावरोधाची अडचण राहात नाही. रोज काही वेळ तरी सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे आरोग्यदायी असते. सूर्यप्रकाश नसेल अशा वेळी सूर्याचा प्रतिनिधी असलेल्या दिव्याच्या ज्योतीवर ध्यान करणे, तिच्या प्रकाशात बसणे हिताचे ठरते. ही सवय टिकावी या दृष्टीने सूर्य असो वा नसो, रोज ज्योतिध्यान करणे आवश्‍यक असते. सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कार ही श्वास, गती व अनेक योगासनांना बरोबर घेऊन जाणारी क्रिया आहे. त्यामुळे या क्रियेमुळे सूर्योपासना होते. 

शरीरात "ड' जीवनसत्त्वाची ("डी' व्हिटॅमिनची) कमतरता आहे, असे सध्या अनेक वेळा ऐकू येते. डी व्हिटॅमिन मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात बसायला आपल्याला वेळ नसतो व त्यामुळे डी व्हिटॅमिनच्या गोळ्या खायची वेळ येते. शरीराला या गोळ्यांमधला किती भाग खरोखर मिळतो हे एक मोठे कोडे आहे. दोन भुवयांमध्ये सूर्याची कल्पना करून, सूर्याचे ध्यान करून प्रत्येक सूर्यनमस्काराला ॐ मित्राय नमः, ॐ रवये नमः, ॐ सूर्याय नमः, ॐ श्रीभानवे नमः, ॐ खगाय नमः, ॐ पूष्णे नमः, ॐ हिरण्यगर्भाय नमः, ॐ मरीचये नमः, ॐ आदित्याय नमः, ॐ सवित्रे नमः, ॐ अर्काय नमः व ॐ भास्कराय नमः असे मंत्र म्हणत बारा सूर्यनमस्कार घालावेत. 
सूर्यनमस्कार घालत असताना समोर भांड्यात थोडेसे पिण्याचे पाणी ठेवावे. या पाण्यावर सूर्यप्रकाश पडला तर अधिक चांगले. 
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने । 
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्य्रं नोपजायते ।। 

आणि 
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्‌ । 
सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्‌ ।। 

सूर्यनमस्कार घालून झाल्यावर हे पाणी प्यावे. 
सूर्यप्रकाश असला तर थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसावे, थोडा वेळ सूर्याकडे तोंड करून तर काही वेळ सूर्याकडे पाठ करून बसावे. शक्‍य असेल तर उघड्या कोवळा सूर्यप्रकाश घ्यावा किंवा सैल, पातळ कपडे घातलेले असावेत. आरोग्यासाठी यकृताची (लिव्हरची) कार्यप्रवणता उत्तम असावी लागते.

सूर्यशक्‍तीमुळे नाभीच्या ठिकाणी असलेले मणिपूर चक्र व यकृताचे संतुलन होत असते. सूर्योपासनेसाठी भारतीय वैदिक परंपरेत अनेक क्रिया व उपाय सांगितले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soma Yoga (1) : Health of Body, Mind and Wealth article written by Dr Shree Balaji Tambe