सोमयोग (3) : ज्ञानं महेश्वरात्‌ इच्छेत्‌। 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 27 December 2019

शरीराने घेतलेले कष्ट शरीरालाच सहन करावे लागतात, तर मेंदू ही जी संगणकाप्रमाणे असणारी व्यवस्था आहे, ती उत्तम तऱ्हेने कार्यक्षम राहण्यासाठी तसेच मेंदूचे जे भौतिक अस्तित्व असते ते व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. एखादा विषय समजणे, लक्षात घेणे, लक्षात ठेवणे, लक्षात ठेवलेले पुन्हा सांगता येणे, तो व्यवहारात अनुभवणे यासाठी मेंदूला तेवढी शक्‍ती द्यावी लागते. 
 

शरीराने घेतलेले कष्ट शरीरालाच सहन करावे लागतात, तर मेंदू ही जी संगणकाप्रमाणे असणारी व्यवस्था आहे, ती उत्तम तऱ्हेने कार्यक्षम राहण्यासाठी तसेच मेंदूचे जे भौतिक अस्तित्व असते ते व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. एखादा विषय समजणे, लक्षात घेणे, लक्षात ठेवणे, लक्षात ठेवलेले पुन्हा सांगता येणे, तो व्यवहारात अनुभवणे यासाठी मेंदूला तेवढी शक्‍ती द्यावी लागते. 
 

मागच्या वेळी आपण `सोमयोग (2) - शरीरस्थ अग्निसंतुलन` हा विषय पाहिला. यानंतर आपण पुढच्या विषयाचा म्हणजे `ज्ञानं महेश्वरात्‌ इच्छेत्‌` या विषयाचा अभ्यास करणार आहोत. 

पुन्हा एकदा एका गोष्टीची आठवण करून घेणे आवश्‍यक आहे की, मनुष्याच्या ज्या मुख्य गरजा असतात, त्यामध्ये जीवन हे चालू राहणे आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोचवता येणे हे अग्रणी असते. त्यासाठी आरोग्य, अन्न, संरक्षण या गोष्टींची ही पहिली आवश्‍यकता असते. या पुढची दोन क्रमांकाची आवश्‍यकता असते ती साधनसामग्रीची, संपत्तीची, समृद्धीची. मनुष्याला राहते घर लागते तसेच समाजाचा आधार असावा लागतो. तिसऱ्या स्थानावर मनुष्याला काही सृजनात्मक, रचनात्मक काम करण्यासाठी ज्ञानाची आवश्‍यकता असते, प्रत्येक गोष्टीत वाढ होत राहणेही आवश्‍यक असते आणि आपल्यामुळे इतरांचा काय फायदा होईल याचा विचार करून त्यासाठीही प्रयत्न करावे लागतात. चौथ्या स्थानावर अध्यात्म म्हणजे आत्मशांती मिळण्यासाठी मनुष्याला बाह्य विश्वाबरोबर स्वतःच्या जाणिवा, कल्पना यांचे संतुलन ठेवण्यासाठी अंतर्प्रज्ञा जागृत करणे आवश्‍यक असते, समाजाशी तसेच स्वतःशी संवाद करण्याची आवश्‍यकता असते, वैश्विक दृष्टी मिळण्याची आवश्‍यकता असते. वरील चारही गोष्टी स्वतःजवळ असताना त्यांचे बंधन तयार होणार नाही आणि मुक्‍तपणे जगता येईल याचीसुद्धा आवश्‍यकता असते. म्हणजे जीव कशात तरी अडकून राहू नये, तर "आता विश्वात्मके देवे' या प्रार्थनेप्रमाणे सर्वांभूती समभाव ठेवता येणे आवश्‍यक असते. भारतीय शास्त्रांनुसार केवळ जगत असतानाच या स्वातंत्र्याची आवश्‍यकता असते असे नव्हे, तर मृत्यूनंतरही जीव कशात अडकू नये, यासाठी योजना करणे आवश्‍यक ठरते.
 
`ज्ञानं महेश्वरात्‌ इच्छेत्‌' असे म्हणताना ज्ञानामध्ये तीन क्रमांकापर्यंतच्या सर्व गोष्टी येतात. सर्व ज्ञानियांचे ज्ञाते असणारे ते महेश्वर! शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकापासून ते प्रत्यक्ष शिक्षण, प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान, गूढ ज्ञान असे पायरीपायरीने श्रेष्ठ ज्ञान देणारे गुरू, त्यावरती असणारे सद्‌गुरू आणि या सर्वांच्या वर असणारे मोठे ईश्वर म्हणजे महेश्वर. ज्ञानाचा आदर करणे, ज्ञान मिळविण्याची इच्छा बाळगणे, वाटेल ती किंमत देऊन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक असते. आपण सर्वजण जाणतो की श्रीशंकरांनी डमरू वाजवून ध्वनीच्या माध्यमातून व्याकरणाची सूत्रे सांगितली, योगविद्या दिली, संगीत, नाट्य आदी कला दिल्या. प्रत्यक्ष महेश्वर आपल्याला ज्ञान देतीलच, कारण त्यांचे वास्तव्य कणाकणांत असते, आपल्या शरीरात असते, पर्यायाने आपल्या मेंदूमधील केंद्रातही असतेच. परंतु त्यांच्या व्यापक स्वरूपामध्ये म्हणजे समाजामध्ये, आपल्या आजूबाजूलासुद्धा शिक्षकांपासून सद्‌गुरूंपर्यंत अनेक मंडळी आपल्याला ज्ञान द्यायला तयार असतात. 
मात्र, ज्ञानाची कास धरून शिक्षकांपर्यंत जाणे आणि श्रीमद्‌भगवद्‌गीतेत अर्जुनाने श्रीकृष्णांना जसे "शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌" असे सांगितले तसे शिष्य बनून शिक्षकाकडे स्वतःहून जाणे आवश्‍यक असते आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सामान्य ज्ञान, व्यवहारज्ञान, उपजीविकेची साधने मिळविण्यासाठीचे ज्ञान हे प्रत्येकाला आवश्‍यक असते. प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे ते मिळवतही असतो. मात्र या पलीकडे असणाऱ्या ज्ञानशाखांमधील ज्ञान मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, विशेष अभ्यास करावा लागतो, अगदी झटावे लागते. विद्यार्थी विद्यापीठात शिकायला जातात आणि तेथे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतात. काही विद्यार्थी गणित, खगोलशास्त्र, मनुष्यशरीराचे शास्त्र अशा अवघड विषयांचे ज्ञान मिळवितात व मानवतेला अधिक उपयोगी पडण्यासाठी प्रयत्न करतात. हीच ती ज्ञानसाधना. यासाठी एक गोष्ट नक्की की ज्ञान आहे तेथे नमस्कार करण्याची तयारी हवी, तशी श्रद्धा हवी, भक्ती हवी. 

ज्ञानसाधना म्हटली, की महेश्वरांचे नाव अशासाठी येते की, ज्ञान नुसते पुस्तकी नसावे, ज्ञान नुसते स्मृतीत साठवलेले नसावे. पुस्तकात असलेले ज्ञान पुस्तक उघडून जसे पाहता येते, तसे स्मृतीमध्ये साठविलेली माहिती रटण करून बोलून दाखविता येते. पण याचा अर्थ ते ज्ञान त्या व्यक्‍तीला कळले, त्याने ते अनुभवले आहेत असा होत नाही. जे अनुभवले ते खरे ज्ञान. हे लक्षात घेतले तर ज्ञानं महेश्वरात्‌ इच्छेत्‌ ही गोष्ट लक्षात येईल. आपल्याहून अधिक शिकलेल्या, आपल्याहून अधिक ज्ञानी व्यक्‍तीला भेटण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. असे असताना सर्व ईश्वरांचा ईश्वर, सर्वांचा अधिपती असलेल्या महेश्वरापर्यंत पोचण्यासाठी नुसते हार-तुरे देण्याची उपासना करून चालत नाही, तर त्यांना सूक्ष्मपणे आणि तत्त्वतः जाणणे आवश्‍यक असते. महेश्वरांशी संपर्क साधण्यासाठी स्वतःच्या मेंदूची व शरीराचीही तयारी हवी. शरीराने घेतलेले कष्ट शरीरालाच सहन करावे लागतात, तर मेंदू ही जी संगणकाप्रमाणे असणारी व्यवस्था आहे, ती उत्तम तऱ्हेने कार्यक्षम राहण्यासाठी तसेच मेंदूचे जे भौतिक अस्तित्व असते ते व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. एखादा विषय समजणे, लक्षात घेणे, लक्षात ठेवणे, लक्षात ठेवलेले पुन्हा सांगता येणे, तो व्यवहारात अनुभवणे यासाठी मेंदूला तेवढी शक्‍ती द्यावी लागते. 

शरीर निरोगी राहावे, ताकदवान राहावे या हेतूने प्रत्येक व्यक्‍ती प्रयत्नशील असते, परंतु मेंदूच्या ताकदीसाठी, मेंदूचे कार्य नीट व्हावे यासाठी मेंदूची काळजी घेणे अधिक आवश्‍यक असते. पोटात अन्न ढकलता येते तसा मेंदूसाठी असलेला पोषक आहार मेंदूत ढकलता येत नाही. त्यासाठी आयुर्वेदशास्त्राने सांगितल्यानुसार प्रयत्न करावा लागतो. 
हे सर्व ऐकल्यावर वाटू शकते की अरे बापरे हा तर सर्व एक मोठा विधी आहे, परंतु यात मोठे असे काही नाही, अवघड असेही काही नाही. ज्याप्रमाणे मूल पहिलीत गेल्यावर पुढे शिकत शिकत ती व्यक्ती डॉक्‍टरेटपर्यंत जाते व प्रयत्न करत राहिल्यास बरोबरीने अनेक गोष्टी करू शकते. त्याप्रमाणे सुरुवात करणे महत्त्वाचे असते, त्याचे महत्त्व ओळखणे गरजेचे असते, कारण ज्ञानाशिवाय जीवन आनंदमय करता येणार नाही. तेव्हा ज्ञानोपासना ही इतर सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे हे समजून घेतल्यास कार्यभाग अगदी सोपा व सरळ होईल हे निश्‍चित. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Somyog (3) : Dnyanam Maheshwarat ichchet article written by Dr Shree Balaji Tambe