#FamilyDoctor उच्चार आणि आवज

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Thursday, 13 September 2018

आवाज आणि उच्चार हे शुक्रधातूवरही अवलंबून असतात. विशेषतः बोलण्यातली ताकद, एकसंधता, स्पष्टता शुक्राशी संबंधित असतात. मोठ्या वयात तोतरेपणा किंवा अडखळत बोलण्याचा त्रास होत असल्यास शुक्रधातूची शक्‍ती वाढवण्यावर भर द्यावा लागतो. जन्मतः तोतरे बोलणाऱ्या मुलांच्या बाबतीतही पुरुषबीज-स्त्रीबीजाची अशक्‍तता,हे कारण असू शकते. 

भाषेचा विकास झाला तो एकमेकांशी सुसंवाद होण्यासाठी. लिहिणे, वाचणे याच्याही आधी येते ते बोलणे आणि यासाठी आवाज, चांगले उच्चार हे आवश्‍यक असतात. व्यक्‍तीने उच्चारलेल्या एका वाक्‍यावरून सुद्धा तिचा अंदाज घेता येऊ शकतो, इतका उच्चारांचा प्रभाव असतो. निदान करताना वैद्यांनासुद्धा रुग्णाचा आवाज ऐकून बऱ्याच गोष्टी समजून घेता येतात. तेव्हा उच्चार चांगले असावे, आवाज चांगला राहावा यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते. 

उच्चार करणे अर्थात बोलणे ही क्रिया वातदोषाच्या आधिपत्याखाली येते.

प्रवर्तको वाचः । वाणीचे प्रवर्तन हे वाताचे एक कार्यच सांगितलेले आहे. त्यातही वातदोषाच्या पाच प्रकारांपैकी उदानवायू हे कार्य मुख्यत्वे करतो.

तेन भाषितगीतादिविशेषोऽभिप्रवर्तते ।
...सुश्रुत निदानस्थान
बोलणे, गाणे वगैरे क्रिया उदानाकरवी होतात. 

उच्चार, वाणी  शुद्ध आणि स्पष्ट असण्यासाठी उदान वायू संतुलित असावा लागतो. उदान वायूचे स्थान नाभीपासून ते घशापर्यंत असते. उच्चाराचा उगम नाभीपासून होत असतो. स्वरयंत्र, जीभ, गाल, ओठ यांच्यामुळे त्याला आकार येत असला, अर्थपूर्ण शब्द तयार होत असला, तरी त्याची सुरवात नाभीपासून होत असते. 

उच्चार प्रकट करण्यासाठी ‘वागिन्द्रिय’ या कर्मेंद्रियाची योजना केलेली आहे व ते जिभेमध्ये असते, असेही सांगितले आहे. म्हणूनच शब्द उच्चारामध्ये जिभेला खूप महत्त्व आहे. जीभ जड झाली तर उच्चारही जड होऊ शकतात. सुपारी, तंबाखू, अफू वगैरे व्यसनांमुळे जीभ जड होऊ शकते. अशा वेळी व्यसन सोडणे महत्त्वाचे असते. कफाच्या पाच प्रकारांपैकी ‘बोधक कफ’ हा जिभेत असतो. कफदोषाच्या असंतुलनामुळे बोधक कफ अति प्रमाणात वाढल्यासही जीभ जड होऊन उच्चार बिघडू शकतात. अशा वेळेला मध व हळद एकत्र करून जिभेला चोळावे, सुटलेली लाळ थुंकून टाकावी व नंतर गरम पाण्यात हळद व मीठ टाकून त्याच्या गुळण्या कराव्यात. सुंठीचे चूर्ण व सैंधव मीठ एकत्र करून जिभेवर लावल्यास जिभेतील वाढलेला अतिरिक्‍त कफ कमी होऊन जिभेतला जडपणा कमी व्हायला मदत मिळते.

लहान मुले बोलायला सुरवात करतात, तेव्हा ‘र’, ‘ण’, ‘ळ’ वगैरे उच्चार व्यवस्थित करू शकत नाहीत, मात्र जसजसे वय वाढेल तसतसे उच्चार स्पष्ट व्हायला हवेत. तसे न झाल्यास अक्कलकऱ्याच्या फुलाचे वा जटामांसीचे बारीक चूर्ण जिभेवर चोळण्याचा फायदा होतो. लहान मुलांना गुटीतून वेखंड चाटवल्याने त्यांचे उच्चार स्पष्ट व्हायला मदत होते.

घशामध्ये बिघाड झाला तरी आवाज व उच्चार बिघडू शकतात. आयुर्वेदाने घशाच्या बाबतीत मुख्यत्वे ‘कण्ठोद्‌ध्वंस’ व ‘कंण्ठोपलेप’ असे दोन रोग मुख्यत्वे सांगितले आहेत. कण्ठोद्‌ध्वंस मध्ये वातदोषाचे असंतुलन असते. त्यामुळे घशात खवखवते, सारखे खोकावेसे वाटते किंवा सारखा ठसका लागतो. तर कण्ठोपलेपात कफदोषाचा संबंध असतो. यात घशात कफ चिकटून लपेटून राहिल्यासारखा वाटतो व शब्द उच्चारायला कष्ट होतात.

याखेरीज आयुर्वेदामध्ये ‘वाक्‌संग’ नावाचा एक वातविकार सांगितला आहे. वाक्‌संग म्हणजे उच्चार करण्याची असमर्थता. वातदोषाच्या प्रकोपामुळे हा विकार होऊ शकतो. अर्धांगवात किंवा इतर मेंदूच्या काही विकारांत असे लक्षण अनेकदा दिसते. यामध्ये जिभेपेक्षाही अधिक दोष मेंदूत असल्याने त्यानुसार उपाययोजना करावी लागते.

स्वर नाभीपासून उत्पन्न झाला तरी त्याला ठराविक उच्चारामध्ये परिवर्तित करण्यासाठी तोंड व ओठ, गाल व दातांची आवश्‍यकता असते. जन्मतःच फाटलेला ओठ किंवा दुभंगलेले टाळे असले तर उच्चार व्यवस्थित होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत बहुधा तज्ज्ञांच्या सल्ल्याने शल्यकर्मासारख्या उपायांची योजना करावी लागते. म्हातारपणात किंवा बालवयात दात नसल्याने उच्चार स्पष्ट होत नाहीत.

घशाला तसेच स्वराला हितकारक औषधांचा कण्ठ्य गण चरकसंहितेत सांगितला आहे.

सारिवेक्षुमूलमधुकपिप्पलीद्राक्षाविदारी कैटर्यहंसपादी बृहतीकण्टकारिक इति दशेमानि कण्ठ्यानि भवन्ति ।
...चरक सूत्रस्थान

अनंत मूळ, उसाचे मूळ, ज्येष्ठमध, पिंपळी, मनुका, विदारी कंद, कायफळ, हंसपादी, बृहती (डोरली) आणि कंटकारी (रिंगणी) या दहा औषधांची आवाज सुधारण्यास मदत मिळते.

आवाजासाठी, उच्चारासाठी पुढील द्रव्येसुद्धा उपयुक्‍त असतात. 

 स्वरामयं हन्यथ पौष्करं वा - पुष्करमूळ चघळल्यास स्वर सुधारतो.
 स्वरवर्णकृत्‌  - ज्येष्ठमध स्वराला हितकारक असते, ज्येष्ठमध घशासाठी व आवाजासाठीही उपयुक्‍त असते. ज्येष्ठमध चघळता येते किंवा त्याचा कोमट काढा घेता येतो.

 स्वर्या स्मृतिप्रदा ब्राह्मी  -  ब्राह्मीसुद्धा स्वराला हितकारक असते. शुक्रधातू वाढवून आवाज सुधारण्यासाठी ब्राह्मीचा उपयोग होतो.

 द्राक्षा स्वरभेदक्षतक्षयात्‌ - सुद्धा ब्राह्मीप्रमाणे शरीरशक्‍ती, शुक्रधातूची शक्‍ती वाढवून आवाजाला हितकारक ठरतात.

 वासको वातकृत्‌ स्वर्यः - अडुळसा पित्त व कफदोषाचे शमन करून स्वर सुधारण्यास मदत करतो.

आवाज आणि उच्चार हे शुक्रधातूवरही अवलंबून असतात. विशेषतः बोलण्यातली ताकद, एकसंधता, स्पष्टता शुक्राशी संबंधित असतात. मोठ्या वयात तोतरेपणा किंवा अडखळत बोलण्याचा त्रास होत असल्यास शुक्रधातूची शक्‍ती वाढवण्यावर भर द्यावा लागतो. 

जन्मतः तोतरे बोलणाऱ्या मुलांच्या बाबतीतही पुरुषबीज-स्त्रीबीजाची अशक्‍तता हे कारण असू शकते. 

कदाचित म्हणूनच रसायनसेवनाच्या फायद्यामध्ये वाक्‌सिद्धीचा अंतर्भाव केला आहे. वाक्‌सिद्धी म्हणजे ज्याप्रमाणे बोलावे त्याप्रमाणे घडणे. रसायन सेवनाने शुक्रधातूसह सर्व धातू शुद्ध झाले, पोसले गेले, आपापल्या गुणांनी संपन्न झाले की उच्चारलेले शब्द प्रत्यक्षात येणे शक्‍य होते, असा उल्लेख सापडतो.

‘वाक्‌सिद्धी’ म्हणजे जसे बोलावे तसे घडणे. यालाच ‘बत्तिशी खरी ठरली’ असे म्हटले जाते. म्हणजेच तोंडात सर्व दात शाबूत असताना उच्चार बरोबर होत असतात व म्हणून स्पष्ट उच्चाराचे महत्त्व समजून येते. जे बोलले जाते त्याचे उच्चार जर स्पष्ट होत नसतील तर ऐकणाऱ्याचा गैरसमज होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ‘सांगितले एक व केले दुसरे’ असे होऊ शकते. उच्चारामागची वाणी म्हणजे नाद किंवा शब्द, त्याचे परा, पश्‍यंती, मध्यमा व वैखरी असे चार प्रकार सांगितले आहेत. स्पष्ट उच्चारासाठी या चारींपैकी कुठल्याही पातळीवर दोष असून चालत नाही.

वाणीतील दोष म्हणजेच उच्चारातील दोष दूर व्हावेत म्हणून जसे औषधोपचार सुचवले तशीच ‘स्पीच थेरपी’ म्हणजेच ‘उच्चार उपचारपद्धती’ पण सुचवलेली असते.
लहान मुलांशी अगदी सुरवातीला म्हणजे आई-बाबा अशा शब्दांपर्यंत बोबडे उच्चार करून बोलले तरी चालू शकते, पण लहान मुलांशी अत्यंत स्पष्ट उच्चार करूनच बोलणे आवश्‍यक असते. कारण ऐकण्याचा बोलण्याशी व उच्चाराशी शंभर टक्के संबंध असतो. लहानपणीच मुलांना सोपी व अवघडसुद्धा कविता, स्तोत्रे, परवचे-पाढे, शिकवण्याने व म्हणायला लावण्याने नुसतेच उच्चार सुधारतात असे नव्हे तर स्मरणशक्‍ती वाढते. 
तेव्हा उच्चार स्पष्ट असले तरच बोलण्याचे सार्थक होऊ शकते. शिवाय ते आरोग्याचेही एक लक्षण असते. यादृष्टीने स्वतःच्या उच्चारांकडे लक्ष गेणे, आवाजाची नीट काळजी घेणे महत्त्वाचे होय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speech and voice