सूज आणि पुनर्नवा

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 20 April 2018

पुनर्नवा या नावातच गोडवा आहे. पुन्हा नव्यासारखे करून देणे हा हिचा गुण. पुनर्नवा शरीरातील प्रत्येक पेशीला पुनरुज्जीवन, तारुण्य व जीवदान देते. सूज कमी करण्यासाठी पुनर्नवा अतिशय उपयोगी असते.

मध्यंतरी शेतावर गेलो असताना अंधारात पायात दोरीसारखे काही तरी आले व अडखळायला झाले. मग लक्षात आले, की ती दोरी नव्हती, तर त्या होत्या पुनर्नवा या वनस्पतींच्या वेलींच्या काड्या. सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे बरीचशी पाने सुकलेली होती, उरल्या होत्या फक्‍त दोऱ्या. पुनर्नवा या नावात गोडवा आहे. पुनर्वसू, पुष्य ही नक्षत्रे जशी छान तशी ही वनस्पती पुनर्नवा. पुन्हा नव्यासारखे करून देणे हा हिचा गुण. एक लक्षात ठेवायला हवे की सोन्याच्या बांगड्या पुन्हा नव्यासारख्या चकाकतील या हेतूने दुकानात दिल्या, तर तेथील कामगार बांगड्या कुठल्या तरी ॲसिडमध्ये टाकतात, बांगड्या पुन्हा नव्यासारख्या दिसायला लागतात, परंतु यात सोने कमी होते. पुनर्नवाचे तसे नाही. पुनर्नवा शरीरातील प्रत्येक पेशीला पुनरुज्जीवित, तारुण्य व जीवदान देते. पेशीमध्ये नको असलेली द्रव्ये साठली की पेशी मोठी होते, असे आपण म्हणण्यास हरकत नसावी. केवळ एखादी पेशी नाही तर शरीरातील कुठल्यातरी ठिकाणी सूज आली तर तो भाग लाल होतो. गांधीलमाशीसारखा एखादा कीटक चावला तर तेथे सूज येते, ती बाहेरून दिसतेही. चेहरा बदबदीत होणे हीसुद्धा एका प्रकारची सूजच होय. यकृत नीट काम करत नसले किंवा प्रत्यक्ष यकृतावर सूज आली असली, तर पुनर्नवा या वनस्पतीचा उत्तम उपयोग होतो. पायावर सूज आहे, चेहऱ्यावर सूज आहे, असा त्रास घेऊन अनेकदा लोक येतात. मूत्र साफ होत नसले, रक्‍तदाब वाढलेला असला, मधुमेह असला, हृदय नीट काम करत नसले, तर अशा विविध कारणांमुळे पायावर सूज येते. अशी सूज असली तर आयुर्वेदात उत्तम इलाज आहे का असे अनेकदा विचारले जाते. निदान बरोबर झाले तर आयुर्वेदात सगळ्या रोगांवर इलाज असतो. पण पुरवणीत उपचारांसंबंधी विशिष्ट मर्यादेपर्यंतच सूचना देता येतात.

सांगायचा हेतू असा, की पुरवणीत विचारले जाणारे अशा प्रकारचे प्रश्न वाचून डोळ्यांसमोर उभी राहते ती वनस्पती पुनर्नवा. दाभणाच्या जाडीच्या काड्यांना बारीक पाने असतात, या काड्या मार्च-एप्रिलमध्ये जमिनीवर पसरलेल्या असतात. पुनर्नवा सूज कमी करण्यासाठी उपयोगी असते. पुनर्नवाच्या चूर्णात थोडी साखर घालून खाणे, किंवा काढा करून तो घेणे या स्वरूपात पुनर्नवा घेता येते. पायांवर सूज असली तर याच काढ्यात पाय बुडवून बसता येते. चेहऱ्यावर, गुडघ्यावर सूज असली, तर या काढ्यात वस्त्र बुडवून त्याने हलके हलके शेक करता येतो. पुनर्नवासव अशी एक अत्यंत उत्तम योजना आयुर्वेदाने सांगितलेली आहे. वनस्पती रस, चूर्ण, फांट, काढा अशा विविध प्रकारात वापरता येत असली तरी आसव बनवून घेणे हे सर्वोत्तम असते. आसवाच्या प्रक्रियेत काही प्रमाणात मद्य (अल्कोहोल) तयार होते. तयार झालेल्या आसवात सात-आठ टक्के अल्कोहोल असू शकते. या अल्कोहोलमुळे औषध रक्‍तात मिसळायला मदत होते. म्हणून आयुर्वेदात आसवांना खूप महत्त्व दिलेले आहे. आसवांचा दुसरा एक मोठा फायदा असा की आसवे दीर्घकाळपर्यंत साठवता येतात. आसवे जेवढी जुनी होतात तेवढी अधिक चांगली होतात. आसवांमध्ये मद्याचे प्रमाण फार कमी असल्यामुळे, आसवांचा मद्यपानासाठी उपयोग होत नाही व नशाही होऊ शकत नाही. पुनर्नवासव, उशीरासव, कुमारी आसव अशी आसवे कायम घरात असावीत. ती गरजेनुसार घेता येतात. मात्र आसवे नीट प्रक्रियेनुसार केलेली असावीत. गुळाच्या पाण्यात थोडा काढा टाकून त्यात वरून अल्कोहोल मिसळून केलेली नसावीत. दिवसातून दोन-तीन वेळा पुनर्नवासव घेता येते. दोन टेबलस्पून आसवात साधारण तेवढेच कोमट पाणी टाकून आसव घ्यावे. रात्री झोपण्याच्या आधी कमीत कमी दोन तास अगोदर घ्यावे. कारण रात्री झोपतेवेळी घेतल्यास रात्री मूत्रविसर्जनासाठी उठायला लागण्याची शक्‍यता असते. पुनर्नवासवामुळे मूत्रपिंड, यकृत, शरीरातील कुठेही असलेली सूज यांना फायदा होतो. 

सूज उतरवण्यासाठी गोक्षुराचे चूर्ण, गोक्षुरादी चूर्ण ही औषधे प्राथमिक उपचारासाठी (फर्स्ट एड) खूप महत्त्वाची आहेत. ही औषधे कमी-जास्त झाली तरी कुठलाही त्रास होत नाही. गोक्षुराचे चूर्ण घेतल्यानेही सूज कमी व्हायला मदत होते. सूज असल्यास मीठ जास्त प्रमाणात सेवन करू नये, तेल-तिखट अतिप्रमाणात खाऊ नये, जागरण करू नये.  

स्त्रियांच्या बाबतीत रक्‍त कमी असणे व चेहऱ्यावर सूज असणे या दोन्ही तक्रारी हातात हात घालून असतात. धात्री रसायन हा अवलेह स्त्रियांसाठी उत्तम असतो. तेव्हा स्त्रियांनी धात्री रसायन सेवनात ठेवावे. लोहाचे औषध बऱ्याच वेळा उष्ण पडू शकते. त्याऐवजी मनुका हे घटकद्रव्य असलेले धात्री रसायन घेता येते. काळ्या मनुका खाणे, त्या भिजत घालून त्याचे पाणी पिणे हे उपचार करता येतात. सुवर्णमाक्षिकासारखे औषध थंड अनुपानाबरोबर घेण्याचाही उपयोग होतो, पण यासाठी वैद्यांचा सल्ला घेणे आवश्‍यक असते.

बीटरूट सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढते असा अनेकांचा समज असतो, परंतु खरे तर बीटरूटच्या पानांमध्ये लोह असते. टोमॅटो सेवन केल्यानेही हिमोग्लोबिन वाढते असा समज आहे. पालक, मेथी वगैरेंमध्येही लोह असल्याने या गोष्टी सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढते. पण या गोष्टी सातत्याने अनेक दिवस सेवन केल्यास परिणाम दिसतात. त्यापेक्षा वैद्यांच्या सल्ल्याने औषध घेतल्यास त्वरित गुण मिळतो.  

अंगावर पांढरे जाणे, लाल जाणे यामुळे स्त्रियांच्या चेहऱ्यावर फिकटपणा येऊ शकतो. हिमोग्लोबिन कमी होऊ शकते, असे झाले की सूज वाढायला सुरवात होते. यासाठीही इलाज करणे आवश्‍यक असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spinach fenugreek health