स्वागत वसंत ऋतूचे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spring is most beautiful season in terms of natural beauty

कालीदासासारख्या अभिजात कविश्रेष्ठाने वसंत ऋतूला ‘ऋतुराज’ वा ‘मधुमास’ म्हणून संबोधलेले आहे.

स्वागत वसंत ऋतूचे!

- डॉ. भाग्यश्री झोपे

निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने विचार केला तर वसंत ऋतू हा षड्ऋतूंमधील सर्वांत सुंदर ऋतू होय. कालीदासासारख्या अभिजात कविश्रेष्ठाने वसंत ऋतूला ‘ऋतुराज’ वा ‘मधुमास’ म्हणून संबोधलेले आहे.

आयुर्वेदातही वसंताची चाहूल लागल्याचा लक्षण सांगताना, झाडांना पालवी येते, पळस, बकुळ, आंबा, अशोक, कमळ वगैरेंना फुले येतात आणि दशदिशा निर्मळ व सुंदर भासू लागतात असे वर्णन केलेले आहे.

अशा या निसर्गसौंदर्याने फुललेल्या वसंताचा आनंद घ्यायचा असला तर त्याच्या आगमनापूर्वीच थोडी तयारी करून ठेवणे आवश्‍यक असते. आयुर्वेदात ऋतुसंधी असा एक पारिभाषिक शब्द आहे. निसर्गातील बदल क्रमाक्रमाने होत असतात.

एक महिना संपला व दुसरा सुरू झाला की कॅलेंडरचे पान बदलता येते पण ऋतू मात्र तसा एकाएकी बदलत नाही. आधीच्या ऋतूतील हवामान क्रमाक्रमाने बदलते व पुढच्या ऋतूचे वेध लागतात. या बदलाला ‘ऋतुसंधी’ असे म्हणतात. हा संधिकाळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून अवघड असतो म्हणून सहसा हवामान बदलले की आजारपण येते असा अनेकांचा अनुभव असतो.

ऋतुसंधीची लक्षणे सुरू झाली की त्यानुसार आहार-आचरणात बदल केला तर मात्र हा त्रास, आजारपण टाळता येऊ शकते. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर थंडी कमी होऊ लागते म्हणजेच वसंताची सुरुवात होते.

वातावरणात वसंतागमनाचा उत्साह असला तरी आपणही आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने काही बदल करणे आवश्‍यक असते. शिशिर ऋतूतील थंडीमुळे शरीरात कफदोष साठून राहिलेला असतो, जो वसंतात वाढणाऱ्या उष्णतेमुळे वितळणार असतो.

वितळलेला अथवा द्रवीभूत झालेला कफदोष हा अग्नीलाही मंद करणारा असतो. या सर्व बदलांमुळे आजारपण येण्याची विशेषतः सर्दी-खोकला होण्याची शक्यता मोठी असते. अनेकांना असे वाटते की एवढी थंडी होती तेव्हा सर्दी खोकला वगैरे काही त्रास झाला नाही, मात्र, ऋतू बदलला, उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि आता कशी काय सर्दी झाली?

तर याचे उत्तर आयुर्वेदाचा अभ्यास केल्यानंतर कळते. यामुळे आयुर्वेदात ऋतुचर्या समजावताना सांगितले आहे, ‘गुरुशीतदिवास्वप्न-स्निग्धाम्लमधुरांस्त्यजेत्‌’॥ या ऋतूत गुरू (पचायला जड) थंड, स्निग्ध (तेलकट, चरबीयुक्त), आंबट, गोड पदार्थ खाणे टाळावेत तसेच दिवसा झोपू नये.

वसंताचे वेध लागताच क्रमाक्रमाने आहारात हे बदल करणे चांगले असते. याउलट, हळूहळू कडू, तिखट, तुरट गोष्टींचा आहारात समावेश करणे, उष्ण वीर्याचे पदार्थ सेवन करणे, पचण्यास सोपे, फार स्निग्ध नसलेले अन्न सेवन करणे हितावह असते.

उदाहरणार्थ पदार्थ तळून न घेता भाजून घेणे, दह्याऐवजी फोडणी दिलेले ताक पिणे, साध्या पाण्याऐवजी सुंठ टाकून उकळलेले कोमट पाणी पिणे, जेवणात आले- हळदीचे, आवळ्याचे लोणचे किंवा पुदिना-कोथिंबिरीची ताजी चटणी समाविष्ट करणे, मधल्या वेळेला साळीच्या लाह्यांचा किंवा पोह्यांचा चिवडा खाणे यासारखे बदल करता येतात.

हिवाळा संपून हवेत उष्णता जाणवायला लागण्याच्या या काळात घराघरांत असायला हवे ते सितोपलादी चूर्ण. घरातील लहान बालकापासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत कुणीही सितोपलादी चूर्ण घेऊ शकते. यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते, अग्नी प्रदीप्त होण्यास मदत मिळते. सर्दी-खोकला होऊ नये यासाठी आणि झाल्यावरही सितोपलादी चूर्ण उपयोगी असते.

वसंत ऋतूचे वेध लागल्या लागल्या अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण पाण्यासह घेता येते. सर्दी-खोकला झाल्यावर घ्यायचे झाल्यास मधात मिसळून घेण्याचा अधिक चांगला फायदा होतो. असेच अजून एक घराघरांत असावा असा कल्प म्हणजे सॅन अमृत हर्बल ब्रू. यातील सर्व घटकद्रव्ये कफदोषाला संतुलनात आणणारी पण तरीही शरीरात उष्णता वाढू न देणारी अशी आहेत.

दीड कप पाण्यात एक चमचा मिश्रण टाकून ५-७ मिनिटांसाठी उकळून चहा तयार करता येतो. चवीलाही छान लागतो. सॅन अमृत पासून बनविलेला हर्बल चहा रोज दिवसातून एकदा नियमितपणे घेण्याने घरातील लहान मुलांनाही साधी सर्दी सुद्धा होत नाही असा आजवर अनेकांचा अनुभव आहे.

मध हे कफदोषावरचे परमऔषध म्हणजे श्रेष्ठ औषध सांगितलेले आहे. शुद्ध मध असला तर तो चवीला गोड असूनही कफाचे शमन करतो, शरीरातील मेदधातूचे लेखन करतो. मधुमेही व्यक्तीलाही घेता येतो.

कफप्रकोप होण्याच्या या काळात कोमट पाण्यात चमचाभर मध घेणे, जेवताना फुलका किंवा भाकरीवर तूप- साखरेच्या किंवा गूळ-तुपाच्या ऐवजी चमचाभर मध लावून पुरचुंडी करून घेणे, वेलची केळ्याचे काप करून त्यावर मध टाकून घेणे याप्रकारे मधाचे सेवन करता येते.

फक्त मधाचा आणि उष्णतेचा संयोग होणे अपायकारक असल्याने पाण्यात, फुलक्यावर किंवा ब्रेडवर वगैरे मध घेण्यापूर्वी पाणी, फुलका गरम नाही ना याची खात्री केलेली असावी. रोज सकाळी च्यवनप्राश, आत्मप्राशसारखे रसायन घेणे, घरात रोज १-२ वेळा धूप करणे, यासाठी वावडिंग, कापूर, कडुनिंबाची वाळलेली पाने, ओवा, गुग्गुळ या गोष्टी वापरता येतात किंवा तयार संतुलन टेंडरनेस धूप, प्युरिफायर धूप वापरता येतात.

वारंवार सर्दी खोकला किंवा दम्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी या दिवसांत आठवड्यातून १-२ वेळा वाफारा घेणे हे सुद्धा चांगले होय. तरीही सर्दीची लक्षणे दिसू लागली, खोकला होणार असे वाटू लागले तर लवकरात लवकर छातीला अभ्यंग तेलासारखे तेल लावून वरून रुईच्या पानांचा शेक करणे, रुईची पाने उपलब्ध नसल्यास ओव्याच्या पुरचुंडीने शेकणे उपयोगी पडते.

वैद्यांच्या सल्ल्याने संशमनी वटी, त्रिभुवनकीर्ती, ज्वरांकुशसारखी औषधे घेण्याचाही उपयोग होतो. दिवसा झोपल्याने शरीरातील कफ-पित्त दोष वाढतात असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. अर्थातच वसंत ऋतूत दिवसा झोपणे नक्की टाळायला हवे.

सकाळी सुद्धा सूर्योदयाच्या आसपास उठणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार घालणे, चालायला जाणे, अनुलेम-विलोमसारख्या सोप्या श्र्वसनक्रिया करणे हे सुद्धा या ऋतूत अधिक श्रेयस्कर होय.

दही, चक्का, चीज, पनीर, बाजारात मिळणारे बटर, दूध-साखरेपासून बनविलेल्या मिठाया, श्रीखंड वगैरे कफदोष वाढविणारे पदार्थ या ऋतूत सेवन करणे टाळणे चांगले. घरी बनविलेली खीर वा शिरा, दुधीहलवा, गाजरहलवा, केशरभात अशा गोष्टी अधून मधून आणि शक्यतो जेवणानंतर न घेता जेवणाच्या सुरुवातीला सेवन करमे उत्तम होय.

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे म्हणतात त्याप्रमाणे स्वतः निसर्ग ज्या ऋतूत रंगपंचमी खेळतो आणि वातावरण उल्हसित करतो त्या ऋतूचा आनंद घ्यायचा असला त्यासाठी आयुर्वेदातील आहार-आचरण-औषधांच्या त्रिसूत्रीतून आरोग्य नक्कीच जपता येईल.

टॅग्स :health