निरागसपणाचे शोषण थांबवण्यासाठी...

डॉ वैशाली देशमुख
Friday, 18 October 2019

वाचावं असं!
 

वाचावं असं!
 
लैंगिकता हा विषय इतका नाजूक आणि विवाद्य, की त्यावर फार कमी वेळा बोलणे होते, त्यातून लहान मुलांच्या बाबतीत तर या विषयावर बोलायला आपला जीव बिलकूल धजावत नाही.
इतकेच नव्हे, तर या दोन्ही गोष्टी एका श्‍वासात म्हणायलासुद्धा नको वाटते. पण वाळूत मान खुपसून बसले म्हणून सत्य नाहीसे होत नाही. तसेच काहीसे या बाबतीतही झालेय. लहान मुलांवरच्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढला लागले आहे. ते अधिकाधिक समाजासमोरही येत आहे. काही मोजके लोक आणि स्वयंसेवी संस्था यासाठी जीव झोकून काम करत आहेत. डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले या त्यातल्याच एक. बाल शल्यचिकित्सेसारख्या क्षेत्रात काम करत असताना अशा प्रकारच्या घटना त्यांनी हाताळल्या. त्या शल्यविशारद असल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या केसेस म्हणजे काहीशा टोकाच्या असणार. ज्यांना शस्त्रक्रियेची गरज लागते, अशा संवेदनशील मन अशा वेळी स्वस्थ बसू शकत नाही. या घटनांविषयी जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. 

पुस्तक चार भागांत विभागले आहे. "अत्याचारांचे प्रकार,' "काही गंभीर सामाजिक समस्या व रूढी. "अत्याचार होऊ नयेत म्हणून' आणि "अत्याचाराची घटना घडल्यास.' या अशा घटना किती प्रकारे. किती तऱ्हेच्या लोकांकडून आणि किती वेगवेगळ्या परिसरात घडतात, घडू शकतात हे वाचून सुन्न व्हायला होते. 

पुस्तकाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अत्याचार झाल्यावर काय करावे याची दिलेली माहिती. अगदी पीडित मुलांशी काय आणि कसे बोलावे, इथपासून बारीकसारीक सूचना यात आहेत. ही वेळ अतिशय मानसिक खळबळीची असते. आपल्या मुलाविषयीची काळजी आणि दुःख, त्या नराधमाविषयीची चीड, लोक काय म्हणतील याची भीती आणि "आता काय करायचे' हे न समजून आलेली हतबलता यामुळे साहजिकच पालक गोंधळून जातात. या पुस्तकात ही माहिती पायरी पायरीने समजावून दिली आहे. त्यामुळे अशा प्रसंगात काय करावे, याबाबत खूप मदत होईल. 

मुलांवरील अत्याचाराची योग्य प्रकारे दखल घेता यावी म्हणून "POCSO' हा कायदा आला. आधीच लैंगिक अत्याचारांच्या अशा घटनांमधून मुलांना मानसिक धक्का बसलेला असतो. त्यात तपासक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया भर टाकतात. आता मात्र या कायद्याने बालकेंद्रित विचार करून मुलांसाठी ही प्रक्रिया कमीत कमी त्रासदायक होईल याची काळजी घेतली आहे. हा अत्याचार लक्षात आलेली व्यक्ती किंवा पालक यांनाही माहिती देणे बंधनकारक केले आहे. आत्तापर्यंत दडपल्या जात असलेल्या जास्तीत जास्त घटना प्रकाशात याव्या. मुलांना न्याय मिळावा आणि गुन्हेगारांना वचक बसावा यासाठी या कायद्यात तरतुदी केल्या आहेत. या कायद्याविषयी वैद्यकीय शाखांमधील व्यक्तींनाही फारशी माहिती नसते. डॉ. मीनाक्षी यांनी ही माहिती यात सविस्तर दिली आहे. 

"उपचारापेक्षा प्रतिबंध बरा!' बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधक उपाय लेखिकेने सुचवले आहेत. त्यात विस्तृतपणे चर्चा केलेल्या विविध पैलूंची माहिती इथे देण्यापेक्षा पुस्तकातून मुळापासूनच वाचायला हवी. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांचा संकेतस्थळांसह परिचय त्यांनी करून दिला आहे. शिवया मुलांना प्रशिक्षित करण्यास पालकांना उपयुक्त ठरू शकणाऱ्या काही ऍप्सची माहितीही दिली आहे. 

त्यांचे या क्षेत्रातले नैपुण्य वापरून समोर आलेल्या केसेस यशस्वीरीत्या हाताळणे हेच खरे तर खूप मोठे काम आहे. पण तेवढ्यावरच न थांबता डॉक्‍टरांनी त्या केसेसच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. त्या योग्य प्रकारे पुस्तकरूपात मांडल्या आणि त्यातून ही सुटसुटीत पुस्तिका तयार झाली. डॉ. मीनाक्षींची तळमळ यातून दिसून येते. या विषयावर आपण सगळ्यांनी जागरूक होऊन आपला खारीचा वाटा उचलला तर या पुस्तकाचे खरेच सार्थक होईल, असे वाटते. 

जपूयात निरागस बालपण - डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले 
रोहन प्रकाशन, पुणे 
किंमत ः 100 रुपये. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To stop the exploitation of innocence ... article written by Dr Vaishalee Deshmukha