घाम 

balaji-tambe
balaji-tambe

घाम येणे ही शरीरातील एक प्राकृत क्रिया होय. उष्णता व घाम यांचा संबंध सर्वांच्याच परिचयाचा आहे. आयुर्वेदात घाम हा मलस्वरूप सांगितलेला आहे. 

रोमकूपेभ्यस्त्वग्रन्ध्रेभ्यो निष्पतदुदकस्वरूपं मलद्रव्यम्‌ । ...चरक चिकित्सास्थान त्वचेवरील रोमकूपांमधून बाहेर येणारे पाण्यासारखे मलद्रव्य म्हणजे घाम होय. 

मलभाग शरीरातून बाहेर जाणे अपेक्षित असले, तरी प्रत्येक मलाचे आपले एक नियत कार्य असते. आयुर्वेदात पुरीष म्हणजे विष्ठा, मूत्र म्हणजे लघवी आणि स्वेद म्हणजे घाम हे तीन मुख्य मल सांगितले आहेत. हे मल वेळच्या वेळी शरीराबाहेर उत्सर्जित होणे आवश्‍यक असते; मात्र त्याबरोबरच या प्रत्येकाचे आरोग्यरक्षणामध्ये योगदानही असते. 

स्वेदाचे कार्य समजून घेण्यासाठी अगोदर "क्‍लेद' ही आयुर्वेदातील परिभाषा समजून घ्यावी लागेल. शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले असते. आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने या पाचही तत्त्वांमध्ये संतुलन असणे आवश्‍यक असते. एखादे महाभूत प्रमाणापेक्षा वाढले किंवा कमी व्हायला लागले, की असंतुलनाची व रोगाची सुरवात होते. क्‍लेद म्हणजे शरीरातील प्राकृत ओलावा. शरीरातील जल महाभूत बिघडले तर क्‍लेदाचेही संतुलन बिघडून विविध समस्या उद्भवू शकतात. उत्तम आरोग्यासाठी शरीरात क्‍लेद योग्य स्वरूपात व योग्य प्रमाणात असणे आवश्‍यक असते. 

त्रस्य क्‍लेदवाहनम्‌ । स्वेदस्य क्‍लेदविधृतिः । ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान 
शरीरात आवश्‍यक तो क्‍लेद कायम ठेवून उरलेला जलांश शरीराबाहेर काढण्याचे काम मूत्राद्वारे होत असते, तर स्वेदाद्वारे क्‍लेदाचे धारण केले जाते, म्हणजे त्वचेमधील स्वाभाविक आर्द्रता, ओलावा घामामुळे टिकू शकतो. घामाचा उपयोग सुश्रुतसंहितेत याप्रमाणे सांगितला आहे, 
तत्कार्यम्‌ - शरीरार्द्रता त्वक्‍सौकुमार्यञ्च । ...सुश्रुत सूत्रस्थान 
शरीरात ओलावा टिकविण्याचे आणि त्वचा सुकुमार, कोमल ठेवण्याचे कार्य घामामुळे होत असते. 

घाम हा मेदधातूचा मल म्हणून तयार होतो असेही आयुर्वेदात सांगितले आहे. म्हणूनच मेदधातू वाढून जाड झालेल्या व्यक्‍तींमध्ये घामाचे प्रमाण अधिक असते. जाड व्यक्‍तीप्रमाणे पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तीलाही घाम अधिक प्रमाणात येतो. शिवाय, घाम हे पित्ताचे स्थान असल्याने घामाला पित्तदोषाच्या ठायी असणारा "विस्र'गुण म्हणजे एक प्रकारचा तीव्र वास असतो, तोही पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तीमध्ये इतरांच्या मानाने अधिक असतो. 
आहारावरही घामाचे प्रमाण तसेच स्वरूप अवलंबून असते. शरीरस्थ अग्नीकडून आहाराचे पचन झाले, की त्यातील सत्त्वांश धातुपोषणाच्या कामाला लागतो आणि उरलेल्या मलांशातील घन भाग विष्ठेच्या रूपात, तर द्रवभाग मूत्र व स्वेदाच्या रूपाने शरीराबाहेर टाकला जातो. म्हणून साधा, सात्त्विक आहार घेणाऱ्यांना घाम कमी प्रमाणात येतो व घामाला वास किंवा घामाचा डाग पडणे वगैरे त्रास होत नाहीत. चमचमीत, तिखट, विशेषतः कांदा, लसूण फार प्रमाणात खाणाऱ्यांच्या, मांसाहार नियमित करणाऱ्यांच्या घामाचे प्रमाणही जास्त असते व घामाला तीव्र गंधही असू शकतो. 

मूत्र व स्वेद हे दोन्ही मल क्‍लेदाशी संबंधित असल्याने एकमेकांना पूरक असतात. म्हणजे मूत्रवहस्रोतसाची कार्यक्षमता काही कारणास्तव कमी झाली व शरीरातील अनावश्‍यक क्‍लेद मूत्रावाटे संपूर्णपणे बाहेर जाऊ शकला नाही, तर तो क्‍लेद स्वेदामार्फत शरीराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, त्यामुळे घामाचे प्रमाण वाढते. अशा वेळी हाताचे तळवे सदैव ओलसर राहणे, पाय जमिनीवर ठेवला तर त्या ठिकाणी ओले होणे, हाताच्या बोटांना धार लागल्याप्रमाणे टपटप घाम येणे अशी लक्षणे दिसू शकतात. यासाठी घामाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच मूत्रवहस्रोतसाची कार्यक्षमता वाढण्याचे उपचार करणे आवश्‍यक असते. 

घामाचा डाग पडणे बहुधा शरीरात पित्तदोष वाढण्याचे निदर्शक असते. विशेषतः रक्‍तधातूमध्ये बिघाड झाला असला, रक्‍तामधले पित्त अतिप्रमाणात वाढले असले, तर त्यामुळेही घामाला वास येणे, घामाचा डाग पडणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. 

घाम अजिबात न येणे किंवा त्वचेवरील विशिष्ट ठिकाणी घाम मुळीच न येणे हे त्वचारोग होणार असल्याचे निदर्शक असते. घामाचे प्रमाण कमी झाले तर त्यामुळे पुढील लक्षणे दिसू शकतात, 
स्वेदे रोमच्युतिः स्तब्धरोमता स्फुटनं त्वता । व्यायामाभ्यञ्जनस्वेदमद्यैः स्वेदक्षयोद्भवान्‌ ।। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान 
स्वेद क्षीण झाला, तर त्यामुळे त्वचेवरील रोमकूपांचा अवरोध होतो, त्वचा कोरडी होते, त्वचेवर भेगा पडू शकतात, अंगावरील केस गळू शकतात व स्पर्शज्ञान व्यवस्थित होऊ शकत नाही. 
अन्नवहस्रोतस, मूत्रवहस्रोतस वगैरे स्रोतसांप्रामणेच आयुर्वेदात स्वेदवहस्रोतसेही वर्णन केली आहेत. 
स्वेदवहानां स्रोतसां मेदो मूलं लोमकूपाश्‍च । ...चरक विमानस्थान 
स्वेदवहस्रोतसाचे एक मूळ असते मेदधातू, तर दुसरे असते त्वचेवरील रोमकूप. 

प्रदुष्टांना तु खल्वेषामिदं विशेषविज्ञानं भवति, तद्यथा अस्वेदनम्‌ अतिस्वेदनम्‌ पारुष्यमतिश्‍लक्ष्णतामङ्‌गस्य परिदाहं लोमहर्षं च दृष्ट्‌वा स्वेदवहान्यस्य प्रदुष्टानीति विद्यात्‌ । ...चरक विमानस्थान 
या स्वेदवहस्रोतसामध्ये बिघाड झाला तर त्यामुळे पुढील लक्षणे उद्भवू शकतात, 

- घाम अजिबात येत नाही किंवा अतिप्रमाणात येतो 
- त्वचा रखरखीत होते किंवा अतिगुळगुळीत व चिकट होते 
- त्वचेचा दाह होतो 
- अंगावर अकारण रोमांच उभे राहतात 
स्वेदवहस्रोतसांमध्ये बिघाड होण्याची कारणे पुढीलप्रमाणे, 
व्यायामादतिसन्तापात्‌ शीतोष्णाक्रमसेवनात्‌ । स्वेदवाहीनि दूष्यन्ति क्रोधशोकभयैस्तथा ।। ...चरक विमानस्थान 
- अति व्यायाम करणे 
- उन्हात किंवा अग्नीजवळ थांबणे 
- एखादी थंड वस्तू सेवन केल्यावर लगेचच गरम पदार्थ घेणे 
- राग, शोक, भय या मानसिक भावांच्या आहारी जाणे 

तेव्हा घामाचे क्‍लेदधारणाचे काम योग्य व्हावे असे वाटत असेल, घामाचा वास येणे, घाम अतिप्रमाणात येणे वगैरे तक्रारींपासून दूर राहायचे असेल, तर त्यासाठी या कारणांपासून दूर राहणे इष्ट होय. 

उन्हाळ्यामध्ये तसेच व्यायाम केल्याने, उन्हात किंवा अग्नीच्या संपर्कात राहिल्याने आपोआपच घाम येतो; पण मुद्दाम घाम आणणे हा एक उपचार असतो. आयुर्वेदात याला "स्वेदन' म्हणतात. वात तसेच कफदोषावर काम करण्यासाठी स्वेदन उत्तम असते. पंचकर्म म्हणजे शरीरशुद्धीच्या आधी शरीरातील विषद्रव्ये, विजातीय द्रव्ये सुटी करण्याकरितासुद्धा स्वेदन उपचार अत्यावश्‍यक असतो. 

शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वेदन करण्याने शरीराला आलेला जडपणा कमी होतो, जखडलेपण दूर होते, वेदना शमतात, त्वचा सतेज व कोमल होण्यास मदत मिळते, भूक लागते व पचन सुधारते. स्वेदनाचे अनेक प्रकार असले तरी त्यात बाष्पस्वेदन (म्हणजे पाण्याच्या वा काढ्याच्या वाफेने स्वेदन) करण्याची पद्धत सर्वाधिक रूढ आहे. या पाण्यात वातशामक, पित्तशामक किंवा कफशामक द्रव्यांच्या अर्काचे किंवा तेलाचे काही थेंब टाकल्यास त्या वाफाऱ्याने अनुक्रमे वात, पित्त व कफदोषावर विशेषत्वाने काम होऊ शकते. आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने, त्वचा सतेज होण्याच्या दृष्टीने, शरीरशक्‍ती- स्टॅमिना वाढविण्याच्या दृष्टीने जे स्वेदन घेतले जाते, त्यातही विशिष्ट द्रव्यांचे अर्क टाकल्यास अधिक चांगला गुण येतो, हा अनुभव आहे. 
अतिप्रमाणात घाम येणे मात्र धोकादायक असू शकते. यामुळे शरीरातील जलतत्त्व व क्षार झपाट्याने कमी होऊन प्रचंड थकवा, अंग गळून जाणे, चक्कर, क्वचितप्रसंगी बेशुद्धीसुद्धा येऊ शकते. त्यामुळे स्वेदन उपचार करताना, व्यायाम वगैरे शारीरिक क्रिया करताना किंवा तापासारख्या आजारात मुद्दाम घाम आणण्यासाठी प्रयत्न करताना घाम अतिप्रमाणात येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. 

घामाला तीव्र वास येणे ही तक्रार बरीच त्रासदायक असते. बाहेरून स्प्रे, सुगंधी अत्तरे वगैरे लावली, तरी त्याचा परिणाम फार वेळ टिकत नाही. यासाठी सुरवातीला पाहिल्याप्रमाणे आहारात उग्र वासाची द्रव्ये, मांसाहार वगैरेंचे प्रमाण कमी करणे उत्तम असते. बरोबरीने पित्तशमनासाठी गुलकंद, मोरावळा, कामदुधासारखी औषधे, रक्‍तशुद्धीसाठी मंजिष्ठा- अनंत मिश्रण, सारिवासव, पुनर्नवासव घेणेही श्रेयस्कर असते. याशिवाय अंघोळीच्या वेळी अनंत, वाळा, ज्येष्ठमध, चंदन वगैरे शीतल व सुगंधी द्रव्ये मिश्रित करून तयार केलेले उटणे किंवा तयार "सॅन मसाज पावडर'सारखे उटणे वापरण्याचा प्रत्यक्षात खूप चांगला गुण येताना दिसतो. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com