रोज सकाळी चहा-पोळी ?

संतोष शेणई
Friday, 21 September 2018

मोठ्या शहरातून पती-पत्नी दोघेही नोकरदार असलेल्या कुटुंबात चहा-पोळी ही न्याहारी लोकप्रिय झालेली दिसते. ही न्याहारी सोयीची, पोटभरतीची जरूर आहे, पण योग्य आहे का? आपणच करा विचार.

मोठ्या शहरातून पती-पत्नी दोघेही नोकरदार असलेल्या कुटुंबात चहा-पोळी ही न्याहारी लोकप्रिय झालेली दिसते. ही न्याहारी सोयीची, पोटभरतीची जरूर आहे, पण योग्य आहे का? आपणच करा विचार.

सध्याच्या जीवनशैलीत वावरायचे तर घरातील पती-पत्नी दोघांनाही नोकरी-धंदे करावेच लागत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच दोघांचीही धावपळ सुरू झालेली असते. घरातले आवरायचे, स्वतःचे सावरायचे आणि कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचायचे, ही एक कसरतच सुरू होते. स्त्रियांना तर ही धावपळ करताना आपला व पतीचा दुपारचा डबा, मुलांचे डबे, घरात आणखी कोणी असतील तर त्यांच्यासाठी दुपारचे जेवण हेही साधायचे असते. या धावपळीत सकाळी न्याहारीही करायची असते. मग त्यासाठी एक सोयीचा पर्याय किंवा शॉर्ट कट समोर येतो. डब्यासाठी पोळी-भाजी केलेली असतेच, मग न्याहारीसाठीही चहाबरोबर पोळी खाऊन घ्यायची. ही न्याहारी सोयीची, पोटभरतीची जरूर आहे, पण योग्य आहे का?

सकाळी लवकर न्याहारी गरजेची असतेच. रात्रीच्या जेवणानंतर आपण जवळजवळ दहा-बारा तास काही खाल्लेले नसते. त्यामुळे न्याहारीची गरज असतेच. तसेच पुढे दिवसभर काम करायचे तर त्यासाठी आवश्‍यक उर्जा मिळवण्यासाठीही न्याहारी करण्याची गरज असते. पण म्हणून चहा-पोळी खाण्याचा पर्याय योग्य नाही. कित्येकदा रात्री उरलेली पोळीही चहासोबत खाल्ली जाते. यामुळे शरीरात काय घडते ते पाहू. चहामध्ये टॅनिन, कॅफिन, स्ट्रिक्‍टीन व निकोटिन हे घटक असतात. मोकळ्या पोटी चहा प्यायल्यावर या घटकांचा आपल्या शरीरातील पेशींवर दुष्परिणाम होतो, तसेच पित्त बळावते. तसेच चहाबरोबर पोळी खाल्यानंतर पोळीतील कॅल्शियम व लोह आपल्या शरीरात मिसळत नाही. चहातील घटक या प्रक्रियेत आड येतात. म्हणजे पोळी खाल्यानंतर त्यातील भरपूर प्रमाणात असणारी कर्बोदके आपल्याला मिळतात. थोडीफार प्रथिने मिळतात. पण या घटकांखेरीज न्याहारीतून मिळणे आवश्‍यक असलेले स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे आपल्याला चहा-पोळीतून मिळत नाहीत. त्यामुळे चहा-पोळीच्या न्याहारीने पोट भरले, शरीराला थोडीफार उर्जा मिळाली, तरी आरोग्यासाठी ती पुरेशी ठरत नाही. शरीराला आवश्‍यक सर्व घटक चहा-पोळीच्या न्याहारीतून शरीराला मिळत नसल्याने शरीराच्या पोषणासाठी ती पूरक ठरत नाही.

पोळीऐवजी चहाबरोबर बेकरी उत्पादने खाणेही लाभकारक नसते. काहींना सकाळी सकाळी उठल्यावर चहा व बिस्किट खायची सवय असते. वजन वाढू नये म्हणून अनेकजण चहासोबत हेल्दी बिस्किटे, हाय फायबर बिस्किटे व साधे टोस्ट असे पर्याय शोधतात, पण रात्री दहा-बारा तास काहीही न खाल्यामुळे घडणारा उपवास चहा-बिस्किटे किंवा टोस्ट खाऊन सोडल्याने शरीराला योग्य पोषण मिळत नाही. त्याचबरोबर पित्ताचा त्रास होण्याचीही शक्‍यता वाढते. बिस्किटे व टोस्ट यांमध्ये मिठाचे व साखरेचे प्रमाण अधिक असते. तेही शरीरासाठी हितावह नसते. म्हणून सकाळी चहा-टोस्ट किंवा चहा-बिस्कीट हा पर्यायही योग्य ठरत नाही.  

यावर एक पर्याय आहे. डब्यासाठी भाजी केलेली असतेच. त्यामुळे न्याहारीही भाजी-पोळीची करायची. म्हणजे शरीराला भाजी-पोळीतील योग्य पोषक तत्त्वे शरीराला मिळतील. नंतर थोडा वेळ मध्ये जाऊ देऊन चहा घेतला तरी चालेल. पोट भरलेले असताना थोडा व फार न उकळलेला चहा घेतला तर तो शरीरासाठी हितकारक ठरेल. असे केल्याने शरीराला पोषक आहारही मिळेल व वेळही वाचेल. तसेच चहा-पोळी ही जोडी टाळून अंडी-पोळीचा रोल, गूळ-तूप-पोळीचा रोल, तूप-साखर घातलेला पोळीचा लाडू, सुक्‍या भाजीबरोबरचा पोळी रोल हे पर्याय योग्य ठरतील. अगदी फोडणीची पोळी किंवा पनीर बुर्जी व पोळीही चालेल. 

खूपच घाई असेल तर एखादे फळ खाऊन किंवा मूठभर सुका मेवा व पाणी घेऊन दिवसाची सुरुवात करणे योग्य होईल. एक लक्षात ठेवा, दिवसाची सुरूवात चहा-पोळीने नकोच. शरीरात दिवसभर उर्जा टिकेल, उत्साह व स्फूर्ती वाढेल, अशी पौष्टिक न्याहारी करायची. न्याहारी म्हणजे केवळ पोटभरती नव्हे, रात्रभरचा उपवास सोडणे नव्हे, तर शरीराचे पोषण करणारे, आरोग्य सांभाळणारे, शरीराला उर्जा देणारे योग्य व पुरेसे सर्व घटक देणारी न्याहारी असायला हवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tea Chapati Break Fast