ताकद टॉनिकची! 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 14 April 2017

मन ज्या वेळी प्रसन्न किंवा आनंदी असते, त्या वेळी ते शरीरामध्ये स्फूर्ती वाढविण्याचे काम करते, हेही आपल्या सर्वांच्याच अनुभवाचे आहे. पण उत्साह टिकून राहावा, वाढावा किंवा जीवनाचे मर्म सापडावे या दृष्टीने जीवनसत्त्वाचा शोध आणि उपयोग करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. अनुत्साह प्रत्येक वेळी मानसिक पातळीवरच असतो असे नाही, तर तो शारीरिक अशक्‍ततेमुळेही प्रतीत होऊ शकतो. अशक्‍तपणा कुठल्या धातूत, कुठल्या मर्यादेत आहे व कुठल्या कामासाठी आहे याचा विचार आयुर्वेद करतो. अशक्‍तपणा कसला आहे, कुठल्या धातूचा आहे, रसधातूचा, रक्‍तधातूचा की वीर्यधातूचा, हे अभ्यासून आयुर्वेदात उपाय सुचविलेला असतो. 

नुसते जगणे म्हणजे जीवन नव्हे, तर जीवन सुशोभित करून, जीवन एक उत्सव समजून जगण्याचा आनंद घेणे हेच खरे "जीवन'. अर्थात आसुरी आनंद व सात्त्विक आनंद असे आनंदाचे प्रकारही असू शकतात. पण उच्च अभिरुची, उच्च संस्कृती व निर्भेळ सृजनात्मक आनंद ही कल्पना अभिप्रेत असलेला आनंद म्हणजे त्या जीवनाचे सत्त्व. म्हणून आपण सर्व वस्तूत जीवनसत्त्व शोधतो. 

एखाद्या वेळी एखाद्या कामासाठी मनाची तयारी झाली की शरीरात एक प्रकारचा उत्साह संचारतो. मनाची एवढी ताकद निश्‍चितच असते. किंबहुना, प्रसन्न मन हे सर्वांत मोठे व्हिटॅमिन व सर्वांत मोठे ताकदीचे औषध आहे. पण त्याबरोबरीने शारीरिक तयारी नसली किंवा तेवढी ताकद शारीरिक पातळीवर नसली तर मग उत्साह टिकून राहत नाही, पुढे पुढे कायमच निरुत्साही स्वभाव बनायला लागतो आणि मग उत्साह व ताकद वाढविण्याच्या मागे सारखे धावावे लागते. 

छान आकर्षक वाटले तरी "तेरड्याचा रंग तीन दिवस' म्हणतात. काही द्रव्यघटक अशी असतात, की जी शरीराला तात्पुरते प्रोत्साहन देतात, तात्पुरती ताकद एकवटतात. जसा नशेत असलेला मनुष्य भलताच शौर्याचा आव आणून बोलू लागतो, तसेच काहीसे याबाबतीतही होते. पण थोड्याशा कालावधीपुरता उत्साह म्हणजे काही खरी ताकद व खरी शक्‍ती नव्हे. उत्साह सतत असावा व मनोधारणा तशी असावी. शारीरिक आरोग्य व स्फूर्ती असेल त्या वेळी मनाचाही उत्साह असतो व आनंद घेण्याची क्षमता वाढलेली असते. तसेच मन ज्या वेळी प्रसन्न किंवा आनंदी असते त्या वेळी ते शरीरामध्ये स्फूर्ती वाढविण्याचे काम करते, हेही आपल्या सर्वांच्याच अनुभवाचे आहे. पण उत्साह टिकून राहावा, वाढावा किंवा जीवनाचे मर्म सापडावे या दृष्टीने जीवनसत्त्वाचा शोध आणि उपयोग करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. तात्पुरता किंवा एका विशिष्ट प्रसंगापुरता उत्साह वाढवायचा असला, तरी उपाययोजना करताना नैसर्गिक आणि शरीराला व एकूण सर्व वातावरणात आरोग्याला सोसवेल अशा पदार्थांचा उपयोग करून घेण्याचा सल्ला आयुर्वेदाने दिला. 

अनुत्साह प्रत्येक वेळी मानसिक पातळीवरच असतो असे नाही, तर तो शारीरिक अशक्‍ततेमुळेही प्रतीत होऊ शकतो. अशक्‍तपणा कुठल्या धातूत, कुठल्या मर्यादेत आहे व कुठल्या कामासाठी आहे याचा विचार आयुर्वेद करतो. अशक्‍तपणा कसला आहे, कुठल्या धातूचा आहे, रसधातूचा, रक्‍तधातूचा की वीर्यधातूचा, हे अभ्यासून आयुर्वेदात उपाय सुचविलेला असतो. अनेकदा असे दिसते, की हृद्रोग्यांच्या हृदयाला पुरेसा रक्‍तपुरवठा होत नसल्यामुळे त्यांचे अन्नपचन मंदावते, एकूणच ताकद कमी होते. अशा वेळी त्यांना जर नुसता व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्यायचा सल्ला दिला, तर हुरूप आल्यासारखे वाटेल, पण त्यामागे हृदयाचा कमकुवतपणा लपवला जाईल व यातूनच शेवटी अचानक हृदय दगा देण्याचा संभव वाढू शकेल. 
सध्या यौवनशक्‍ती देणाऱ्या, म्हणजे खरं तर शक्‍ती नव्हेच, पण शक्‍ती नसतानाही उत्साह देणाऱ्या, अचानक माणसाला घोड्यावर बसविणाऱ्या औषधी द्रव्यांच्या सेवनाचा मोह वाढत आहे. व्हिटॅमिन्स म्हणून जी उत्तेजक, उत्साहवर्धक, शक्‍तिवर्धक अशा द्रव्यांच्या अति सेवनाने किंवा अनेक दिवसांपर्यंत केवळ त्यांच्याच भरवशावर राहिल्याने किंवा त्यांची शक्‍ती ही आपली शक्‍ती आहे, असे समजून वेळ निभावण्याने ऐन वेळेला घात होण्याचा संभव असतो. म्हणून साधी सोपी नैसर्गिक अन्नांश असलेली जीवनसत्त्वे रोजच्या वापरात ठेवली तर फायद्याचे असते. 

यासाठी आयुर्वेदाने बरेच उपाय सुचवले आहेत, की ज्यामुळे त्या वेळेचे काम तर भागेलच, पण शरीराचे नुकसान न होता आरोग्यप्राप्ती होऊन आपल्याला अन्नातील सत्त्वांची, मिळणाऱ्या उत्साहाची जाणीव पूर्णतः मिळून सात्त्विक जीवनाची वाटचालही चांगली होईल. प्रवास वगैरे करताना कधी मिनरल्स, व्हिटॅमिन्स घ्यायची गरज पडली, तर ती डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घेणे चांगले. 
भौतिक पातळीवर शारीरिक संपन्नतेसाठी, सत्त्वपूर्ण जीवन जगण्यासाठी रसायनांचे सेवन कायम करावे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे मनाला चांगल्या मार्गाने व व्यवस्थित जीवनाचा आनंद घेता येण्यासाठी जीवन अभिरुचीसंपन्न असावे असे सांगितले आहे. "मना सज्जना भक्‍तिपंथेचि जावे' असे समर्थांनी म्हटले आहे. जीवनाला मन विटणार नाही अशी इच्छा असणाऱ्यांनी सज्जन असणे आवश्‍यक असते. सज्जन असणे म्हणजे जनसमुदायाशी एकरूप होऊन राहणे. यानंतर समर्थ म्हणतात, ""जीवनात भक्‍तिरस असल्याशिवाय जीव व आत्मा यांना रस मिळणार नाही. भक्‍तिरसात डुंबल्यावरच परमानंद म्हणता येईल असा आनंद मिळेल.'' 

आयुर्वेदाने अनेक रसायनांचा उल्लेख केलेला आहे. विशेष रसायन म्हणून नाना तऱ्हेचे लेह, कल्प, औषधे सांगितली आहेत, जी घेतल्यावर मनुष्य दीर्घायुषी होईल, नुसताच दीर्घायुषी होईल असे नाही तर जेवढा काळ तो जगेल तेवढ्या काळाची गुणवत्ता वाढेल. जीवनाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत जीवनाचा व या सृष्टीत असलेल्या सर्व वस्तूंचा रसास्वाद घेता येईल. मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा तो रसयुक्‍त काळ किती जगला, त्याने जीवनाचा रसास्वाद कसा घेतला, जीवनाचा आनंद कसा उपभोगला यावरच दीर्घायुष्याची खरी किंमत ठरू शकते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tonic dr balaji tambe family doctor