शक्‍तीचे उत्थान व पूजामहोत्सव 

शक्‍तीचे उत्थान व पूजामहोत्सव 

शक्‍तिउपासनेत भौतिक पातळीवर दीपज्योतिज्ञान व ज्ञानपातळीवर मंत्रसंगीताचे गायन या दोन्ही गोष्टींची एकत्र आवश्‍यकता असते. अत्यंत श्रद्धापूर्वक व भक्‍तियुक्‍त हृदयाने ही उपासना करायची असते. तसेच, नवरात्रात शक्‍तिउपासना करत असताना शरीर शुद्ध राहावे या हेतूने स्नान, उपवास हे सर्व आचरणात आणणे आवश्‍यक असते. या शक्‍तीमुळे हृदय उन्मीलन होण्यासाठी व सर्वांमध्ये समत्वभावाचा अनुभव घेण्यासाठी सर्वांना शक्‍ती वाटावी या हेतूने दशमीचा दसरा हा उत्सव साजरा केला जातो. 
 

भाद्रपदातील गणपती उत्सव श्रीगणेशांचे पाण्यात विसर्जन करून संपतो. त्यानंतर काम होते ते आपल्या शरीरातील गुणसूत्रांवर. आई-वडिलांकडून आलेल्या काही गुणांमुळे आणि आपल्या पूर्वजांमुळे काही अडचणी येत असतात. तसेच, समाजात जे वातावरण असते, त्याच्या संस्कारांमुळेसुद्धा काही दोष उत्पन्न होतात. या सर्वांचे निराकरण केले जाते पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये. गुणसूत्रातील दोष, आपल्या पूर्वजांच्या प्रकृतीमुळे येणारे दोष, ज्या वातावरणात आपण वाढलो त्या वातावरणाचे दोष हे सर्व पितृपक्षाच्या पंधरा दिवसांच्या उपासनेतून दूर केले जातात. या सर्व उपासनेमुळे शुद्ध झालेले मन, शरीर व जीव यांना शक्‍ती आणि श्रद्धा मिळण्यासाठी केला जातो नवरात्रातील शक्‍तिमहोत्सव, दुर्गामहोत्सव. 

तन व मनाला शक्‍ती देण्यासाठी येतो नवरात्र महोत्सव. या उत्सवामुळे एकूण जीवनावरची श्रद्धा वाढते, सूक्ष्मावरची श्रद्धा वाढते, तसेच आपल्याला शक्‍तीवर, अज्ञातावर, सूक्ष्मावर किंवा ‘त्या’च्यावर मन शांत करून ध्यान करण्याची प्रेरणा मिळते. या शक्‍तीच्या महोत्सवाला ‘दुर्गा महोत्सव’, किंवा हा महोत्सव नऊ दिवस असल्यामुळे ‘नवरात्र’ असेही म्हटले जाते. 


पृथ्वीतत्त्वाचा म्हणजे जडत्वाचा एकूणच अत्यंत शुद्ध सारभाग म्हणजे सोने. पारा व सोने यांच्या जडपणात साधर्म्य सापडते; पण पारा हा आत काळा रंग साठविलेला आणि विषारीपणाकडे प्रवृत्ती असणारा धातू, तर सोने हा चकाकणारा, अत्यंत शुद्ध आणि जीवन वाढविणारा असा धातू. सुवर्ण हा स्वतःच केवळ शुद्ध आहे असे नव्हे, तर विषाचा नाश करणाराही आहे. म्हणून सुवर्ण हे प्राचीन काळापासून आजपर्यंत मनुष्यमात्राला एक खास, हवेहवेसे वाटणारे, जवळ ठेवावेसे वाटणारे असे द्रव्य होय. 


सोने घेताना ते शंभर टक्के शुद्ध पाहिजे असे आपण म्हणतो; पण शंभर टक्के शुद्ध म्हणून जे सोने येते, त्यावर शिक्का असतो ९९.९९९ असाच, म्हणजे शेवटी ते पूर्ण शंभर टक्के नसतेच. याचे कारण असे, की ही सगळी त्या ‘९’ या आकड्याची किमया असते. ‘९’च्या आकड्याला कितीही वेळा कोणत्याही संख्येने गुणले तरी शेवटी त्याची गोळाबेरीज ‘९’च होते. मधले एक केंद्र (न्यूक्‍लिअस) व आजूबाजूचे आठ हे एक शक्‍तीचे विशिष्ट स्वरूप समजले जाते आणि अशा शक्‍तीसुद्धा नऊ आहेत हे लक्षात येऊ शकते. नवदुर्गा, अष्टभुजा या नावांवरून हे लक्षात येईल. जिवाची मनुष्यमात्रापर्यंतची वाटचाल पूर्ण होण्यासाठी म्हणजे गर्भधारणेपासून बालकाचा जन्म होण्यासाठीसुद्धा नऊ महिने, नऊ दिवस इतका कालावधी लागणे अपेक्षित असते. हा कालावधी कमी- जास्त होणे म्हणजे दिवस भरण्यापूर्वी जन्म होणे किंवा दिवस भरून गेल्यानंतरसुद्धा जन्म न होणे ही विकृती समजली जाते. अशाप्रकारे जीवोत्पत्ती होताना ‘९’च्या क्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय संस्कृतीने शरद ऋतूमध्ये ‘९’रात्र अर्थात नवरात्राची योजना केलेली दिसते. 

‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ म्हणजे निसर्गातील सर्व तत्त्वे एकरूप होऊन अन्न तयार होते आणि या अन्नातूनच शरीर तयार होत असते. तेव्हा अन्न महत्त्वाचे असले तरी शरीराला चैतन्याचा स्पर्श अग्नीमुळेच होत असतो. मंदाग्नी म्हणजे अन्नपचन न होणे, किंवा पित्ताचे असंतुलन. अग्नी फार मंद असून चालत नाही, तसेच भडकलेला असूनही चालत नाही. तो जेवढा पाहिजे तेवढाच असला तर त्याची सृजनात्मक गुणवत्ता दिसून येऊ शकते. शारीरिक पातळीवर प्रकुपित होणाऱ्या पित्ताचे शमन करण्यासाठी शरद ऋतूतील चांदण्याचा किंवा इतर काही पित्तशामक द्रव्यांचा उपयोग करता येतो. मात्र पावसाळ्यात अनेक दिवस सूर्यदर्शनाच्या अभावामुळे आलेले मानसिक जाड्य दूर करण्यासाठी बाह्य अग्नीची उपासना, शक्‍तीची उपासना महत्त्वाची ठरते. या शक्‍तीच्या उपासनेत थोडीशी माती घेऊन त्यावर धान्य टाकून त्यावर पाण्याने भरलेला मातीचा कलश ठेवणे अशी एक कृती सांगितलेली आहे, जेणेकरून जीवोत्पत्ती कशी होते, अन्न कसे तयार होते, सृष्टी कशी तयार होते याची प्रचिती यावी. शक्‍ती अनेक प्रकारे प्रकट होत असते. एखादी वस्तू हाताने उचलून ठेवता येते किंवा फार जड असली तर जोर लावून सरकवता येते हे जेवढे खरे, तेवढेच हे मनःसामर्थ्यानेसुद्धा करता येणे शक्‍य आहे हे समजणे महत्त्वाचे होय. त्यामुळे भौतिक पातळीवर, शक्‍तीच्या पातळीवर अग्निध्यान व आध्यात्मिक पातळीवर मंत्रसंगीत यांचा श्रद्धेच्या रूपाने उपयोग करून घेतला जातो. स्नान, उपवास वगैरे शरीरशुद्धीचे उपचार सांगितलेले असतात आणि शक्‍तीचे आवाहन, शक्‍तीचे पूजन हेसुद्धा करायचे असते. त्रिगुणात्मक शक्‍ती म्हणजे श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती यांची उपासना सांगितलेली असते. 

शक्‍तिउपासनेत भौतिक पातळीवर दीपज्योतिज्ञान व ज्ञानपातळीवर मंत्रसंगीताचे गायन या दोन्ही गोष्टींची एकत्र आवश्‍यकता असते. अत्यंत श्रद्धापूर्वक व भक्‍तियुक्‍त हृदयाने ही उपासना करायची असते. तसेच, नवरात्रात शक्‍तिउपासना करत असताना शरीर शुद्ध राहावे या हेतूने स्नान, उपवास, हे सर्व आचरणात आणणे आवश्‍यक असते. या संपूर्ण शक्‍तीचे स्वरूप कळावे, शक्‍तीचे चलन व्हावे आणि ती आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी शक्‍ती मूर्तिस्वरूपात स्थापन करणे, तसेच नवरात्रीचे नऊ दिवस २४ तास दीप प्रज्वलित ठेवणे, हवन करणे, निसर्गाची मदत व्हावी यासाठी देवीला प्रिय असणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींची पाने, फुले देवीला वाहणे, अन्नदान करणे, कुमारी पूजन या गोष्टी केल्या जातात. याचा उपयोग स्त्री-प्रतिष्ठा वाढण्यासाठीपण होतो. शक्‍तीचे उत्थान व्हावे व ती शक्‍ती शरीरात चलित व्हावी या हेतूने अनेकांनी जमून स्वतःभोवती व वर्तुळात घडाळ्याच्या दिशेने वा घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने गोल गोल फिरत नृत्य करण्याचा प्रघात आहे. या नृत्यप्रकाराला गरबा किंवा रिंगण नृत्य असे म्हणतात. शक्‍तीला आकृष्ट करून त्या शक्‍तीचे आवर्तिकी उत्थापन व्हावे या हेतूने नृत्याच्या मध्यभागी दीप ठेवला जातो. तसेच, वातावरणाच्या शुद्धतेसाठी रोज सायंकाळी धूप केला जातो. अशा प्रकारे या देवीच्या तिन्ही रूपात असलेल्या शक्‍तीची उपासना या दिवसांमध्ये केली जाते. या दिवसांत आजूबाजूच्या सर्वांना घरी बोलावण्याने सामाजिक शक्‍तीचे पाठबळ मिळते. दिवसभर केलेल्या उपासनेमुळे तयार झालेल्या शक्‍तीला आपल्यामध्ये आकृष्ट करण्यासाठी सायंआरती वगैरेंचे आयोजन केले जाते. अशा प्रकारे नऊ दिवस शक्‍तिउपासना केल्यानंतर स्थापन केलेल्या देवतेच्या मूर्तीचे जलात विसर्जन करणे हेही महत्त्वाचे असते. 

यानंतर या शक्‍तीमुळे हृदय उन्मीलन होण्यासाठी व सर्वांमध्ये समत्वभावाचा अनुभव घेण्यासाठी सर्वांना शक्‍ती वाटावी या हेतूने दशमीचा दसरा हा उत्सव साजरा केला जातो. या सगळ्यांमुळे शरीरातील दोष गेले, अहंकाराचा नाश झाला व नित्यानंद- परमानंदाचा अनुभव मिळाला, की या उत्सवांचे सार्थक होते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com