गरोदरपणातील लसीकरण 

डॉ. सुरभी सिद्धार्थ
Friday, 11 October 2019

गरोदर स्त्रियांनी कोणत्या लसी घ्याव्यात व कोणत्या टाळाव्यात याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. या लसी गर्भारपणात त्या स्त्रीचे आणि बाळाच्या जन्मानंतर लसीकरणापर्यंत त्या बाळाचे संरक्षण करीत असतात. 

गरोदर स्त्रियांनी कोणत्या लसी घ्याव्यात व कोणत्या टाळाव्यात याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. या लसी गर्भारपणात त्या स्त्रीचे आणि बाळाच्या जन्मानंतर लसीकरणापर्यंत त्या बाळाचे संरक्षण करीत असतात. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, लसीकरणाच्या अभावी होणारे संसर्गजन्य आजार मातामृत्यू, अर्भकमृत्यू व बालकांच्या मृत्यूंसाठी, तसेच व्यंगांसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. गरोदर स्त्रीमधील रोगप्रतिकाराच्या प्रतिसादामध्ये बदल झाल्यास रोगजन्य घटकांना दिल्या जाणाऱ्या विशिष्ट रोगप्रतिकारक प्रतिसादाच्या विकासात हस्तक्षेप होतो आणि अंशतः समान असलेली गुणसूत्रे असलेले (सेमी-अलोजेनीक) अर्भक आपल्या शरीरात बाळगणे स्त्रीला शक्य व्हावे यासाठी स्त्रीच्या रोगप्रतिकार यंत्रणेत बदल होणे आवश्यकच असते. त्यामुळे गरोदर स्त्रीने लसीकरण घेतल्यास तिला लसीकरणाद्वारे प्रतिबंध होऊ शकणाऱ्या संसर्गांपासून थेट संरक्षण मिळते आणि गर्भाचेही संरक्षण होतेच. 

लसीकरणामुळे गर्भार स्त्रीला व नंतर लसीकरणामुळे प्रतिबंध करता येऊ शकणाऱ्या आजारांपासून तिच्या बाळाला संरक्षण मिळते. गरोदरपणात लसीकरण झालेल्या मातांद्वारे प्रादुर्भावाशी लढा देणारी प्रथिने, यांना प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) असे म्हटले जाते, त्यांच्या बाळांपर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे बाळाला या जगात आल्यानंतरचे पहिले काही महिने विशिष्ट आजारांपासून अंशत: संरक्षण मिळते. या काळात बाळ खूप लहान असल्याने त्याला थेट या लसी देणे शक्य नसते. यामुळे तुम्हाला गर्भारपणाच्या संपूर्ण काळात संरक्षण मिळतेच. गरोदरपणात फ्लू शॉट किंवा धनुर्वाताची लस घेतल्यास मातेला संपूर्ण गर्भारावस्थेत संरक्षण मिळते आणि तिच्या बाळालाही जन्मापासून लसीकरणापर्यंतच्या काळात संरक्षण मिळते. हे महत्त्वाचे आहे, कारण, फ्लू किंवा आचके देत येणारा खोकला अर्भकासाठी घातक ठरू शकतात. 
 

स्त्रियांना गरोदरपणात कोणत्या लसी घेणे गरजेचे आहे? 
जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा तीन लसी दिल्या जातात. (या लसी इनअॅक्टिव्हेटेड असतात, म्हणजेच त्यात जिवंत विषाणू नसतात). यापैकी दोन धनुर्वाताला प्रतिकार करणाऱ्या तर एक फ्लूला प्रतिकार करणारी आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ या लसी घेण्याचा सल्ला देतात. आता एक टीडी व एक टीडॅप दिली जाते. (धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला प्रतिकारक लसी) 

- फ्लू (इन्फ्लुएंझा) शॉट: फ्लूचा प्रतिबंध करणारी लस घेणे ही आता काळाची गरज झाली आहे, कारण, गरोदरपणात स्त्रीला फ्लू झाल्यास त्यातून बरीच गुंतागुंत निर्माण होऊ शकते. फ्लू झाल्यास दिवस भरण्यापूर्वी कळा सुरू होऊन लवकर बाळंतपणाचा धोका असतो. याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. याशिवाय, गर्भारावस्थेत फ्लूची लस घेतल्यास तुमचे व तुमच्या पोटातील बाळाचे फ्लूपासून संरक्षण होतेच आणि तुमचे बाळ जन्माला आल्यानंतरही त्याला काही महिन्यांपर्यंत फ्लूपासून संरक्षण मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे न्युमोनियासारख्या (फुप्फुसांना होणारा संसर्ग) जटील आजारांचा धोकाही कमी होतो. म्हणूनच ही लस फ्लूची साथ सुरू असताना गरोदर असलेल्या स्त्रियांनी घेणे उत्तम. फ्लू शॉटही निष्क्रिय विषाणूंपासून तयार केला जातो. त्यामुळे तो गरोदर स्त्री व तिचे बाळ या दोहोंसाठी सुरक्षित असतो. 

- धनुर्वातासाठी (टिटॅनस) लस: प्रत्येक गरोदरपणात या लसीचा एक डोस घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे नवजात अर्भकाला विचित्र खोकल्यापासून संरक्षण मिळते. मातेने टिटॅनसची लस कधी घेतली आहे याला महत्त्व नाही. तरीही आदर्श परिस्थितीत, गरोदरपणाच्या सव्वीसाव्या-सत्ताविसाव्या आठवड्यात ही लस दिली जाते. 

गरोदरपणात लस घेणे सुरक्षित आहे का? 
ज्या लशींमध्ये मृत ( इनअॅक्टिव्हेटेड) विषाणू असतात, त्या गरोदर स्त्रीला दिल्या जाऊ शकतात. गरोदरपणात ज्या लसी घेण्याचा सल्ला दिला जातो, त्या घेणे उत्तम. प्रश्न फक्त फ्लूच्या लसीचा आहे आणि ती गरोदर स्त्रीला काळजीपूर्वक दिली गेली पाहिजे. कारण, फुप्फुसांचे विकार, खोकला, सर्दी, ताप असलेल्या गरोदर स्त्रियांना ही लस दिली जाऊ नये. 

या लसी टाळाव्या : 

● हेपॅटिटिस बी 

● हेपॅटिटिस ए 

● गोवर 

● एमएमआर 

● कांजण्या 

● नागीण (व्हरिसेला-झोस्टर) (या लशींमध्ये जिवंत विषाणूंचा समावेश असतो आणि त्यामुळे त्या आई व बाळासाठी प्राणघातक ठरू शकतात) 

‘ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजी़’विषयक एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, नियमित प्रसूतीविषयक काळजीमध्ये गरोदरपणातील लसीकरण हा महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. यामुळे मातेसोबत गर्भाचे तसेच नंतर अर्भकाचे रक्षण होते. प्रौढ लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यातील गृहीत धरलेल्या व प्रत्यक्ष अडथळ्यांचा विचार करता आणि गरोदर स्त्री व अर्भकामधील लसीकरणाने टाळता येण्याजोग्या आजारांचे आरोग्यावर होणारे परिणाम बघता, प्रसूतीतज्ज्ञ तसेच स्त्रीरोगतज्ज्ञांनी गरोदर स्त्रियांच्या लसीकरणाबाबतच्या शिक्षणासाठी तसेच त्याच्या प्रशासनासाठी सक्रिय भूमिका घेणे गरजेचे आहे. 
 

अनेक स्त्रिया गर्भारावस्थेत लस घेणे टाळतात, कारण, यामुळे बाळाला धोका पोहोचेल असे त्यांना वाटत असते. मी त्यांना सांगेन की, या लसी अजिबात धोकादायक नाहीत आणि त्यामुळे गरोदर स्त्री तसेच तिच्या बाळाची रोगप्रतिकार यंत्रणा मजबूत होण्यात मदत होते. याशिवाय, प्राणघातक आजारांचा सामना करणाऱ्या बाळांना या लशींमुळे झपाट्याने बरे होण्यात मदत मिळते. म्हणूनच, तुम्ही गर्भधारणेसाठी नियोजन करत असाल, तर तुम्हाला गरोदरपणात घ्याव्या लागणाऱ्या लशींबद्दल आधीच डॉक्टरांशी चर्चा करावी लागेल. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VACCINES DURING PREGNANCY ARTICLE WRITTEN BY DR SURABHI SIDDHARTHA