हिवाळा आरोग्यदायी ऋतू

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Tuesday, 1 January 2019

शिशिर व हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा हा पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो. ही पायाभरणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे भाग असते. आहार, व्यायाम, उपचार अशा प्रकारे तिन्ही बाजूंनी जर हिवाळ्यात आवश्‍यक ते बदल केले, तर हिवाळ्याचा आनंदही घेता येईल, शिवाय पुढचे संपूर्ण वर्ष आरोग्यपूर्ण जावे यासाठी तयारी होऊन राहील.

संपूर्ण वर्षभरात सर्वांत चांगला ऋतू कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे हिवाळा. विसर्गकाळातील शिशिर व हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा हा पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये. मात्र ही पायाभरणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे भाग असते. आहार, व्यायाम, उपचार अशा प्रकारे तिन्ही बाजूंनी जर हिवाळ्यात आवश्‍यक ते बदल केले, तर हिवाळ्याचा आनंदही घेता येईल, शिवाय पुढचे संपूर्ण वर्ष आरोग्यपूर्ण जावे यासाठी तयारी होऊन राहील.

हिवाळ्यामध्ये शरीरस्थ अग्नीला निसर्गतः शक्‍ती मिळत असते. म्हणून हिवाळ्यात भूक चांगली लागते, पचन व्यवस्थित होते, असा सर्वांचा अनुभव असतो. म्हणून अष्टांगहृदयात वाग्भटाचार्य म्हणतात, 
अतो हिमेऽस्मिन्‌ सेवेत स्वाद्वम्ललवणान्‌ रसान्‌ ।
...वाग्भट

म्हणजे या ऋतूत गोड, आंबट व खारट चवीच्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा. त्यातही मधुर रस (गोड चव) शरीराचे पोषण करण्यासाठी सर्वश्रेष्ठ असल्याने विशेषतः गोड गोष्टी या ऋतूत खाव्यात. योग्य अशा स्निग्ध पदार्थांचे सेवन करावे. 

यादृष्टीने अधिक विस्तारपूर्वक सांगायचे तर दूध तसेच दुधाचे पदार्थ म्हणजे लोणी, तूप, ताक, अधूनमधून मलई, दही, खरवस, चीज वगैरे खाता येतात. मुख्य जेवणात धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यापासून तयार केलेले विविध प्रकार, डाळी व कडधान्यांपैकी मूग, तूर तर उत्तमच, पण हेमंत ऋतूत मसूर, मटकी व प्रकृतीला अनुकूल असल्यास हरबरा, उडीद, चवळी ही कडधान्येही खाता येतात. भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, दोडका, घोसाळी, पडवळ, बटाटा, टिंडा, भेंडी, पालक, मेथी या भाज्या नित्य वापरण्यास योग्य, तर वांगे, सिमला मिरची, घेवडा, वालाच्या शेंगा या भाज्या अधूनमधून खाता येतात. आमटी, भाजी बनविताना जिरे, हिंग, धणे, मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, वेलची, हळद, कोकम, आले, लसूण अशा मसाल्यांचा योग्य प्रमाणात वापर करता येतो. काकडी, टोमॅटो, गाजर, बीट यांची दही घालून कोशिंबीर करता येते, चवीसाठी ताजी हिरवी चटणी, लोणचे, पापड खाता येतात, ऋतुनुसार बाजारात मिळणारी उत्तम फळे, ड्रायफ्रुट पैकी बदाम, खजूर, खारीक, काजू, अंजीर, मनुका, जरदाळू, अक्रोड उचित प्रमाणात खाता येतात. लाडू, बर्फी, खीर, खोबऱ्याची वडी, डिंकाचा लाडू, दुधी हलवा, साखर-केशरी भात असे गोड पदार्थ खाण्यात ठेवता येतात. 

यालाच जोड म्हणून या दिवसात आयुर्वेदिक रसायनांचे सेवन केले तर ते आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असते. तसे पाहता रसायन पूर्ण वर्षभर खाणे उत्तमच असते, पण पचनशक्‍ती उत्तम असलेल्या कालावधीत रसायन सेवनाचा सर्वोत्कृष्ट उपयोग होत असल्याने हिवाळ्यात रसायन सेवन करणे श्रेयस्कर होय. च्यवनप्राश, धात्री रसायन, ‘सॅन रोझ’, ‘मॅरोसॅन’ ‘संतुलन चैतन्य कल्प’, शतावरी कल्प यासारखी रसायने हिवाळ्यात अवश्‍य सेवन करावीत अशी होत.

हिवाळ्यात त्वचेची काळजी सुद्धा विशेषत्वाने घ्यावी लागते. कारण थंड व कोरड्या हवेमुळे त्वचासुद्धा कोरडी रखरखीत होत असते. मात्र सुरुवातीपासून नीट काळजी घेतली तर त्वचा निरोगी ठेवता येऊ शकते. थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग. रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला अभ्यंग तेलासारखे त्वचेला स्निग्धता देणारे, शिवाय त्वचेमार्फत आत जिरून रस, रक्‍त, मांस या धातूंपर्यंत काम करणारे तेल लावले तर त्वचेला आतून-बाहेरून आवश्‍यक ते सर्व पोषण मिळते, नियमित अभ्यंगाइतकाच दुसरा प्रभावी उपाय म्हणजे उटण्याचा वापर. उटण्यामध्ये अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, हळद, दारुहळद अशा अनेक उत्तमोत्तम वनस्पतींचे मिश्रण असते, ज्या त्वचेला स्वच्छ तर करतातच, पण त्वचेवरील दोष दूर करण्यासही समर्थ असतात. उटण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे त्वचेला उचित स्निग्धता मिळते, वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो. सॅन मसाज पावडरसारखे उटणे या दृष्टीने उत्तम होय.

हिवाळ्यात उटणे लावताना किंवा मुखलेप लावताना त्यात पाण्याऐवजी दूध-दुधाची साय टाकण्याचा अधिक उपयोग होऊ शकतो. अभ्यंग, उटणे, या प्रकारचे विशेष लेप यांची व्यवस्थित योजना केली तर हिवाळ्याचा दुष्परिणाम त्वचेला भोगावा लागणार नाही हे निश्‍चित. हिवाळ्यामध्ये तळपाय विशेषतः टाचांना भेगा पडणे, शरीरात अतिरुक्षता वाढल्याने भेगांमधून रक्‍त येणे ही सुद्धा तक्रार आढळतात. यावर नियमित पादाभ्यंग उत्तम असतो. त्यातही पादाभ्यंगासाठी शतधौत घृत वापरण्याचा अजून चांगला गुण येताना दिसतो. हिवाळ्याचा परिणाम ओठांवरही होतो. ओठ फुटणे, दोन ओठ कडेला मिळतात त्या ठिकाणी बारीकशी चीर जाणे असे त्रास हिवाळ्यात होताना दिसतात. ओठ फुटू नये यासाठी ओठांवर दुधावरची साय लावणे उत्तम असते. ओठांच्या कडेला चीर पडणे हा प्रकार खूप वेदनामय असू शकतो. बोलताना, खाता-पिताना ओठाची हालचाल झाली की त्या ठिकाणी वेदना होतात. यावर घरचे ताजे लोणी किंवा घरचे साजूक तूप लावून ठेवण्याचा फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर दोन-तीन थेंब तूप लावण्यानेही ओठांना चीर जाण्याची प्रवृत्ती कमी होते असा अनुभव आहे.
एकंदर त्वचा कोरडी झाली तर त्याचा परिणाम गुदाच्या आसपासच्या त्वचेवरही होतो. विशेषतः फिशर म्हणजे गुदाला भेगा पडून शौचाच्या वेळेला आग होणे, वेदना होणे, या प्रकारचा त्रास होऊ शकतो. यावर गुदभागी व्रणरोपण तेल किंवा सॅन हील मलम सारखे औषधी तुपापासून बनविलेले मलम लावण्याचा उपयोग होतो. हिवाळ्याची सुरुवात झाल्यावर लगेचच रोज रात्री झोपण्यापूर्वी गुदभागी दोन थेंब एरंडेल तेल लावण्यानेही या प्रकारचा त्रास होण्यास प्रतिबंध होतो.

आयुर्वेदाने हिवाळ्यात करायला सांगितलेला आहार सुद्धा त्वचेला पोषक असतो. आहाराच्या माध्यमातून आतून पुरेशी स्निग्धता मिळाली की त्यामुळे त्वचा फुटण्यास, कोरडी पडण्यास उत्तम प्रतिबंध होतो.
स्टॅमिना वाढण्यासाठी, एकंदर शरीरशक्‍ती वाढण्यासाठी हिवाळ्यात व्यायाम करणे हे सुद्धा उत्तम असते.  
शरीरोपचयः कान्तिर्गात्राणां सुविभक्‍तता ।
स्थिरो भवति मांसं च व्यायामाभिरतस्य च ।।
...सुश्रुत सूत्रस्थान

योग्य व्यायामाने शरीरउपचय उत्तम होतो म्हणजे शरीराला सौष्ठव, सुडौलत्व प्राप्त होते. बाह्यतः मांसपेशी, स्नायू संविभक्‍त दिसू लागतात व मुख्य म्हणजे मांसधातू स्थिर राहतो. अर्थातच स्थिर मांसधातूमुळे शक्‍ती-स्फूर्ती वाढतात, वय वाढले तरी तारुण्याचा अनुभव घेता येतो. 

व्यायामामध्ये खेळाचाही समावेश करता येतो. खेळाने व्यायामाबरोबरच मनावरचा ताणही नाहीसा होतो. मनाची एकाग्रता, अचूकता, चतुरता, त्वरित निर्णय घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची क्षमता वाढते. क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस, फूटबॉलसारख्या मैदानी खेळांमुळे शारीरिक ताकद वाढते, स्टॅमिना वाढतो. रक्‍ताभिसरणाला मदत मिळाली की शरीराला आपोआप ऊबही मिळते. 
अति प्रमाणात व्यायाम सर्वांसाठीच वर्ज्य आहे. मात्र त्यातही आयुर्वेदाने विशेषतः पुढील परिस्थितीत विशेष काळजी घ्यायला सांगितली आहे. 
वातपित्तामयी बालो वृद्धोऽजीर्णो च तं त्यजेत्‌ ।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान

वात वा पित्त प्रकृती असणाऱ्यांनी किंवा वातदोष-पित्तदोषाचे असंतुलन असणाऱ्यांनी, लहान वयात म्हणजे साधारणतः पंधरा-सोळाव्या वर्षांपर्यंत तसेच वृद्धांनी म्हणजे सत्तर-पंच्याहत्तर वर्षांनंतर व्यायाम जपून करावा. 

व्यायाम सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीही हा ऋतू उत्तम आहे. हिवाळ्यात यथाशक्‍ती पण सर्वाधिक प्रमाणात व्यायाम करता येतो. उन्हाळ्यात मध्यम प्रमाणात तर पावसाळ्यात कमीत कमी व्यायाम केलेला चांगला असतो. ऋतूनुसार व्यायामाचे प्रमाण कमी-अधिक केले तरी व्यायाम करण्यात नियमितता हवी.

उपचारांमध्ये रसायन सेवन, अभ्यंग तसेच पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी करून घेणे हे महत्त्वाचे ठरतात. सर्व रसायनगुणांनी परिपूर्ण असा जो आवळा, तो सुद्धा हिवाळ्यात मिळतो हा केवल योगायोग नसतो. आवळ्याप्रमाणे रसायनगुणांनी परिपूर्ण असे इतरही अनेक कंद या ऋतूत तयार होतात. अशा सर्व द्रव्यांपासून बनविलेला च्यवनप्राश, धात्री रसायन, संतुलन आत्मप्राश, संतुलन सुहृदप्राश, मॅरोसॅन वगैरे रसायने घेणे, कमीत कमी घरच्या घरी डिंकाचे लाडू, पंचामृत तयार करून घेणे हे हिवाळ्यात उत्तम असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter healthy seasons