esakal | योगदिनाचा तिसरा वाढदिवस
sakal

बोलून बातमी शोधा

yoga day

योगदिनाचा तिसरा वाढदिवस

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

श्रीमद्‌भगवद्‌गीतेत विषादयोगापासून कर्मयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, पुरुषोत्तमयोग, भक्‍तियोग, दैवासुरसंपदविभागयोग, मोक्षसंन्यास-योग असे अनेक प्रकारचे, जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे व विविध व्यक्‍तिमत्त्वांना अनुकूल असे योगाचे प्रकार सांगितलेले आहेत. मात्र मुख्य व्याख्या करताना, दैनंदिन जीवनात "योगः कर्मसु कौशलम्‌' म्हणजेच "जीवन जगण्याची पूर्ण कला अवगत असणे' हा योग व "समत्वं योग उच्यते' म्हणजे "एकात्म अवस्थेत संतुलित असणे' या ध्येयप्राप्तीचा योग सांगितलेला आहे.

योगदिनाचा तिसरा वाढदिवस - 21 जून 2017
भारतीय योग ही शरीर, मन आणि आत्मा यांना आरोग्य देणारी पद्धती आहे आणि म्हणूनच धर्मनिरपेक्ष आहे. सर्व जगात योगाची आवश्‍यकता आहे हे लक्षात घेऊन तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा योगदिवस ठरवून योगाची माहिती जागतिक पातळीवर पोचवली. याचे उद्देश दोन होते. नवीन नवीन येणाऱ्या शारीरिक, मानसिक त्रासांना व रोगांना आवर घालणे, त्याच बरोबर मनुष्यमात्राची मानसिकता बदलणे आणि हिंसाचार कमी करून समाजात बंधुभाव वाढवणे. समाजात एकी व एकरूपता आणून स्वास्थ्य मिळविण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललेले आहे.

21 जून 2017 या योगदिनाच्या तिसऱ्या वाढदिवसासाठी भारत सरकारने योगाचे मानकीकरण (प्रोटोकॉल) करण्याच्या दृष्टीने एक पुस्तिका प्रसिद्ध केली. ही पुस्तिका आयुर्वेद, युनानी, योग, सिद्ध, होमिओपॅथी यांच्याशी संबंधित असणारी सरकारी संस्था "आयुष' हिच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली. एका दृष्टीने हा एक चांगला योग आहे. आज जगभर करमणुकीचे महत्त्व वाढत असताना योगाकडेही करमणूक म्हणून पाहण्याचा प्रयत्न बरेच जण करत असतात. या पार्श्वभूमीवर पतंजली मुनींना व भारतीय ऋषीमुनींना प्राचीन काळापासून अभिप्रेत असलेला योग व्यवस्थितपणे जगासमोर मांडणे हा उद्देश या पुस्तिकेमुळे साध्य झालेला आहे. सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास संतुलित करण्यासाठी योगाचा उपयोग होईल हेही या पुस्तिकेत नमूद केलेले आहे. या दृष्टीने या पुस्तिकेचा खूप मोठा उपयोग होईल. योगाचे मानकीकरण असलेले पुस्तक असावे ही अनेक वर्षांपासूनची आवश्‍यकता आता पूर्ण झालेली आहे.

ज्यांना योगासने करण्यात शारीरिक अडचण आहे त्यांनाही करता येईल अशी "संतुलन क्रियायोग' ही एक योगावर आधारलेली, परंतु मूळ शास्त्रात कोणतीही विकृती न करता, योगोपचार पद्धती 1972 मध्ये मी "संतुलन'तर्फे पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली, त्याचा फायदा आजवर अनेकांनी उचललेला आहे. ज्यांना रोज सर्व आसने करण्यासारखी नाहीत किंवा जमत नाहीत त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार किंवा संतुलन क्रियायोगातील विश्वप्रार्थना हा एक पर्याय असतो आणि दीर्घश्वसन हा प्राणायामासाठी पर्याय असतो.

जीवनाशी मनुष्याला जोडण्याचा व त्यापूर्वी मनुष्याची स्वतःची दोन अर्धी अंगे जोडण्याचा म्हणजेच एकत्रीकरणाचा "लग्न' हा प्रयोग. म्हणून त्याला "लग्नाचा योग' असे म्हणतात. अर्थात बऱ्याच जणांच्या बाबतीत योगाशी संबंध हा असा एकदाच येतो. खरं तर लहानपणी व तारुण्यात योगसंबंध ठेवला तर पुढे येणारा शरीरसंबंध योग चांगला चालतो. लग्न झाल्यावर आयुष्यभर पातंजल योगाची जर साथ ठेवली तर सर्वच इतर योग वेळेवर येतात, त्यासाठी योगायोगावर अवलंबून राहावे लागत नाही.

योग हा शब्द "जोडणे' (युज्‌) या धातूपासून तयार झालेला आहे. विघटनाची, विनाशाची क्रिया आणि शरीराच्या बाबतीत विशेषत्वाने क्षरणाची क्रिया ही साहजिकच चालू असते. त्यामुळे संघटित राहून एकरूप होणे या क्रियेस योग हा शब्द फार समर्पक आहे व त्याचे जीवनातील स्थान हे अत्युच्च आहे. इतकेच नव्हे तर, योग हे जीवनाचे मुख्य ध्येय आहे. उत्क्रांतीची व उन्नतीची क्रिया विशेष यत्नांनी साधावी लागते. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. हे काही सहजासहजी होणारे काम नव्हे. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत विषादयोगापासून कर्मयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, पुरुषोत्तमयोग, भक्‍तियोग, दैवासुरसंपदविभागयोग, मोक्षसंन्यास-योग असे अनेक प्रकारचे, जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे व विविध व्यक्‍तिमत्त्वांना अनुकूल असे योगाचे प्रकार सांगितलेले आहेत. मात्र मुख्य व्याख्या करताना, दैनंदिन जीवनात "योगः कर्मसु कौशलम्‌' म्हणजेच "जीवन जगण्याची पूर्ण कला अवगत असणे' हा योग व "समत्वं योग उच्यते' म्हणजे "एकात्म अवस्थेत संतुलित असणे' या ध्येयप्राप्तीचा योग सांगितलेला आहे. माणसाचे अस्तित्व शरीर, मन व आत्मा या तिन्ही पातळ्यांवर असते आणि विश्वाशी एकरूपतेचा अनुभव घेण्यापूर्वी या तिन्ही पातळीवर आरोग्य उत्तम राहणे महत्त्वाचे असते. श्री पतंजली महामुनींनी अष्टांगयोगाची रचना करून एकूणच योगमार्ग सुलभ केला. परंतु, सध्या प्रचारात असलेली शरीरातील काही विकृतींवर काम करणारी आसन, प्राणायाम पद्धती म्हणजेच योग ही एवढी छोटी कल्पना न करता यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी असे शून्यापासून अनंतापर्यंत एकरूपता साधणारी अष्टांगयोगाची कल्पना केलेली आहे. ही सर्व अंगे एकाच वेळी आठही अंगांचा अभ्यास करीत आचरणात आणावीत असेही नव्हे व अगदीच पायरी पायरीने एकामागोमाग एक करीत जावे, असेही नव्हे. त्यामुळे सर्व अंगांचा अभ्यास हा योगविद्येत अभिप्रेत आहे. मात्र याची जाणीव एकूण समाजात केव्हा होईल व योग हे एक समाधीपर्यंत एकरूपता अनुभवण्याचे साधन आहे हे केव्हा समजेल व हा योग येईल तेव्हाच खरे. योगाचा अभ्यास जसजसा पुढे जाईल तसतशी एकेक कल्पना पतंजली मुनी पुढे वाढवीत जातात व त्यात "चित्तवृत्तिनिरोधः इति योगः' व "तपः स्वाध्यायः प्रणिधानानि इति क्रियायोगः' ही सूत्रे सांगतात. मन, चित्त या काही वाईट गोष्टी नाहीत. चंचल असणे हा तर मनाचा धर्मच. पण या वृत्तींचे अनुशासन करणे, म्हणजे मनाच्या पलीकडे पाहणे, मनाला आत्म्याच्या आज्ञेत काम करायला लावणे म्हणजे योग. तपस्या आणि त्याग स्वतःच जाणण्याचा "स्व' अभ्यास म्हणजेच प्रेमातून सर्व जग समजून घेण्याची क्रिया. आणि हे सर्व मी करतो आहे, माझ्याभोवती विश्व फिरते आहे, असा समज न करता, त्या परम ईश्वराच्या, परम सत्तेच्या सान्निध्यात किंवा अस्तित्वामुळे घडते आहे, ही ठाम श्रद्धा ठेवणे हा योग. तेव्हा संपूर्ण जीवन हे योगमय करायचे असेल तर आसन प्राणायामाबरोबर त्याग आणि सेवा, अनुशासन आणि प्रेम, म्हणजेच सामाजिक बांधिलकी व सर्वसमभाव म्हणजे सर्वांभूती परमेश्वर ही श्रद्धा असा "योगाभ्यास' करावा लागेल.