खाद्यभ्रमंती : ‘कुटुंबे’वत्सल स्वादयात्रा

Thali
Thali

होळीच्या निमित्तानं श्रीवर्धनला गेलेल्या अनिकेत वैद्य या मित्राचा अचानक फोन आला. तुमच्या आवडत्या ठिकाणी आलोय जेवायला, असं म्हणून त्यानं मला एकदम कोड्यात टाकलं. मला काही अंदाज येईना. तेव्हा त्यानंच जास्त न ताणता स्वतःहून सांगून टाकलं, की त्यानं हरिहरेश्वरच्या कुटुंबे यांच्याकडे मस्त आडवा हात मारलाय आणि ताणून देण्यासाठी सज्ज झालाय. 

आंब्याची (कैरीची) डाळ, साधं लोणचं, खजुराचं गोड लोणचं, पापड-कुरडया, आमटी, वालाची उसळ, भेंडीची भाजी, पुरणपोळी आणि नारळाचं दूध, साधी पोळी आणि भात... पान असं साग्रसंगीत सजल्यानंतर जेवण रंगणार नाहीतर काय होणार. ‘आला होळीचा सण लय भारी, चल खाऊया...’ असं म्हणत वैद्यबुवा निद्रादेवीची आराधना करायला मोकळे झाले होते. दिवस कोणताही असो, कुटुंबे यांच्याकडे अगदी नेहमीचं साधं जेवल्यानंतरही पंचपक्वान्नांचं जेवण जेवल्याची अनुभूती येते.

ताम्हिणी घाटातील खड्डे, वाहतूक कोंडी, दारूडे आणि प्रेमीयुगुलांची गर्दी यांना चुकवत चुकवत आपण एकदा का मुंबई-गोवा महामार्ग ओलांडला, की मग आपल्याला कुटुंबे यांच्याकडील जेवणाचे वेध लागतात. हरिहरेश्वरच्या अलीकडे दोन-तीन किलोमीटर अंतरावरील मारळ गावात कुटुंबे यांची खाणावळ आहे. खरंतर राहण्याचीही व्यवस्था आहे; पण आम्ही फक्त जेवायलाच तिथं जातो. कुटुंबे यांच्याकडे जेवणं म्हणजे स्वर्गीय अनुभूती. स्वादाला दिलदारपणाची साथ. स्वादिष्ट भोजन करणं ही जशी कला आहे, तसंच लोकांना आग्रह करून मनापासून खिलवणं, हीदेखील एक कला आहे. कुटुंबे कुटुंबीयांकडे या दोन्ही कला पुरेपूर आहेत. 

हरिहरेश्वरला गेल्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन आणि कुटुंबे यांच्याकडे भोजन हे दोन्ही एकदम ‘मस्ट’. त्यातही सकाळच्या नाश्त्याला आंबोळी आणि दुपारच्या जेवणाला मोदक हे आधीच ऑर्डर करून ठेवलं असेल, तर मग तुमची कोकणस्वारी संस्मरणीय होणार म्हणूनच समजा. लसणाचे बारीक बारीक तुकडे घातलेल्या गरमागरम आंबोळ्या तुमच्या दिवसाची सुरुवात एकदम झकास करून टाकतात. सोबतची चटणीही वारंवार खावीशी वाटणारी. एकदा का न्याहारी झाली, की मग तुम्ही देवदर्शनाला किंवा समुद्रकिनाऱ्यावर जायला मोकळे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुपारच्या जेवणात वाल, बिरडं, मटकी किंवा मुगाची उसळ, बटाट्याची सुकी, भेंडीची परतून किंवा वांग्याची रस्सा भाजी, आळूची भाजी आणि चिंचगुळाची आमटी... सर्वांमध्ये खोवलेल्या नारळाचा मुक्तहस्ते केलेला वापर आणि त्यामुळे वाढलेली पदार्थांची गोडी. बरोबर घडीच्या गरमागरम मऊसूद पोळ्या. थेट तव्यावरून ताटात. 

सोबतीला कधी मिरगुंडं, कधी वेगवेगळे पापड, कधी कुरडया, तर कधी आळूची वडी. कधी काकडीची तर कांदा-टोमॅटोची कोशिंबीर. ओल्या नारळाची तर कधी कैरी कांद्याची चटणी. मोसमानुसार आंब्याची डाळ वगैरे. आंब्याचं, लिंबाचं किंवा खजुराचं लोणचं नि उसळी मिरची हे तोंडी लावण्याचे पदार्थदेखील घरगुती आणि प्रेमात पाडणारे. सरतेशेवटी पांढरा भात. कधीतरी रात्रीच्या जेवणात कुळथाचं पिठलं नि भाकरी आणि कढी-खिचडी. जेवण संपताना सोलकढीची वाटी किंवा अमर्याद ताक मिळालं म्हणजे माणूस स्वर्गीय सुखाच्या दिशेनं मार्गस्थ होतो. अशा पद्धतीचं सर्व रसरंगसंपन्न जेवण असेल, तर मग आणखी काय पाहिजे आयुष्यात... 

हे झालं नेहमीचं साधं जेवण. जर तुम्ही आधीच पुरणपोळी किंवा उकडीच्या मोदकांचं सांगितलं असेल, तर मग विचारूच नका. तुम्ही खात राहायचं आणि कुटुंबे वाढत जाणार. तुम्ही खाऊन कंटाळाल; पण ते वाढून थकणार नाहीत. पुरणपोळी नि मोदकावर साजूक तुपाची धार धरतानाही हात आखडला जाणार नाही. अशा पद्धतीचं प्रेम हीच कुटुंबे यांची खासियत आहे. हे प्रेमच आपल्याला त्यांच्याकडे खेचून नेतं. मध्यंतरी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा कुटुंबे यांना खूप मोठा फटका बसला; पण त्यावर मात करून कुटुंबे पुन्हा एकदा जिद्दीनं, नव्या जोमानं कामाला लागलेत. माता अन्नपूर्णा ज्यांच्यावर प्रसन्न आहे, अशा कुटुंबे यांना आणखी उंच भरारी घेण्यात आज ना उद्या नक्की यश येणार, हे फक्त मीच नाही, तर त्यांच्याकडे जेवलेली प्रत्येक व्यक्ती अगदी सहजपणे सांगू शकेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com