खाद्यभ्रमंती : सोलापूरच्या ‘पद्मा’ची पुरीभाजी नि शेवबुंदी

PuriBhaji-and-Shevbundi
PuriBhaji-and-Shevbundi

भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये मिळणारे आणि भारताला जोडण्याचे काम करणारे अनेक पदार्थ आहेत. ज्यामध्ये भात, सामोसा, पाणीपुरी, मासे किंवा वेगवेगळे मांसाहारी पदार्थ आहेत. तसाच भारताच्या कानाकोपऱ्यात मिळणारा आणखी एक पदार्थ म्हणजे पुरीभाजी...

बटाट्याची सुकी डोसा भाजी, पातळ डोसा भाजी, कुर्मा, बटाट्याची सुकी भाजी आणि वरून उसळीचा रस्सा किंवा भाजीचे आणखी एखादे वैविध्य आणि सोबत पुरी... सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही चालणारा आणि भरपेट ठरणारा पदार्थ म्हणजे पुरीभाजी...मध्यंतरी विश्वनाथ गरुडसोबत सोलापूरला जाणे झाले तेव्हा पद्मा या लोकप्रिय फूड जॉइंटमध्ये पुरीभाजी खाणे झाले. मी तरी अशा पद्धतीची भाजी कधीच खाल्ली नव्हती. एकदम हटके... आणि चवीलाही उत्तम.

ही भाजी तयार करताना तेलाचा वापरच केला जात नाही, अशी माहिती मिळाली. भाज्या, कडधान्ये आणि मसाल्याचे पदार्थ यासह एकूण १८ जिन्नस पातळ भाजीत वापरले जातात. पण ओळखू एकही येत नाही. कारण सर्वच पदार्थ स्मॅश करून वापरलेले असतात. आपल्याला खाताना त्यांची चव जाणवते, पण ते दृष्टीस पडत नाहीत. एखाद्या पुरुषाला पगार आणि महिलेला तिचे वय विचारू नये, असे म्हणतात. तसेच हॉटेलवाल्याला सिक्रेट रेसिपी विचारू नये, हे त्याला जोडावेसे वाटते. शेफ किंवा मालक खरी रेसिपी कधीच सांगत नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘पद्मा’मधील भाजीचेही तसेच आहे. नेमके काय दडले आहे, हे समजत नाही. फुटाण्याचे पीठ असते, हे मात्र मालक आवर्जून सांगतात. त्यामुळेच भाजीला विशिष्ट चव आणि रंग येतो. फुटाण्याच्या पिठामुळेच ही भाजी बऱ्यापैकी दाट आणि कमी तिखट बनत असावी. येथील भाजी जशी तेलकट नाही, तशीच फार तिखटही नाही. भाजी अप्रतिमच, पण भाजीचा स्वाद वाढविणारी शेवबुंदी ऑर्डर केली तर मग विचारूच नका. नुसती भाजी न खाता लोक शेवबुंदी या पातळ भाजीत मिक्स करून खातात. आम्हीही खाल्ली. एकदम वेगळे कॉम्बिनेशन... मजा आली. 

सोबत कडक मिरची भजी देखील असते. इथे अनेक जण मिरची भज्यांचा आस्वाद घेत पुरीभाजी एन्जॉय करतात. उपमा वगैरे पण मिळतो, पण तो खायला ‘पद्मा’मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. सर्व पदार्थ पुरेसे स्वस्त. त्यामुळे श्रीमंत व्यापाऱ्यापासून कष्टकरी, कामगार आणि मजूर यांच्यापर्यंत अनेक जण इथे नाश्त्याला हजेरी लावतात... 

शिंगरय्या व्यंकटरमय्या मेरगू यांनी १९५४-५५ मध्ये सोलापुरातील जोडबावी पेठ येथे ‘पद्मा’ सुरू केले. आता म्हणजे साधारण २००१-०२ मध्ये सोलापुरातच दाजी पेठ भागात ‘पद्मा’ची दुसरी शाखा सुरू झालीय. शिंगरय्या यांची तिसरी आणि चौथी पिढी व्यवसायात आहे. तसेच खवय्या ग्राहकांचीही तिसरी आणि चौथी पिढी आस्वाद घ्यायला येते, अशी माहिती शिंगरय्या यांचे नातू शिवकुमार कोंडय्या मेरगू देतात.

सोलापुरात गेल्यावर इडली, डोसा, सुके मटण नि कडक भाकरी आणि शेंगा चटणीचा आस्वाद नक्की घ्याच. पण, ‘पद्मा’ची पुरीभाजी विथ शेवबुंदी खायला अजिबात विसरू नका... वेगळ्या चवीची पुरीभाजी खाल्ल्याचा ‘फील’ नक्की येईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com