खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!

विवेक मेतकर
Sunday, 21 February 2021

विदर्भ-वऱ्हाडात ज्याला आपण रोडगा म्हणतो, तोच राजस्थानात गेला की तेलातुपात घोळून दालबाटी होतो आणि बिहारात गेला की वांग्याच्या भरीतासोबत खाल्ल्या जाणाऱ्या सत्तूच्या पीठाने बनविलेला, लिट्टी चोखा होतो.

अकोला : राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे. अशातच अनेक मित्र आणि कुटुंबांणी आखलेल्या रोडग्यांच्या बेतावरून पाणी फिरलं. तुम्ही कदाचित रोडग्यांबद्दल ऐकलं असेल किंवा खालले सुध्दा असतील.  नसतील तर नवलंच! 

नागपूर, विदर्भ आणि वऱ्हाडात असा एकही माणूस नसेल, ज्याला रोडगे माहिती नाहीत आणि आवडत नाहीत. 

अगदी देवीच्या भारूडात भवानी आई रोडगा वाहीन तुला, अशी जी आळवणी केली जाते त्यातील रोडगा हा पदार्थ वऱ्हाडातील ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य अंग मानला जातो.  

आपल्या महाराष्ट्रात अगदी जिवा भावाचा एक भाग म्हणजे विदर्भ वऱ्हाड.. तिथला पाहुणचार म्हणजे काही औरच असतो ना बे. खरंच फार प्रेमळ लोक आहेत इथे.

तसंही आपल्या देशातील एका प्रांतात विशिष्ट पद्धतीने बनविलेला पदार्थ हा दुसऱ्या प्रांतातही थोड्याफार फरकाने बनविला जात असल्याचे आपण पाहतो. जसे, महाराष्ट्रातील पुरणपोळी आंध्रात बुरेलू नावाने तळल्या जाणाऱ्या गोड बोंडाच्या रुपात पहायला मिळते किंवा दिवाळीचा दिमाखदार अनरसा तामिळनाडूसह अन्य दाक्षिणात्य राज्यांत अद्दरस्सम नावाने काळे तीळ लावून आवडीने चाखला जातो. रोडगाही याला अपवाद नाही.

रोडगे पार्टी साठी इमेज परिणाम

प्रांतानुसार बदलतंय नाव - 

विदर्भ-वऱ्हाडात ज्याला आपण रोडगा म्हणतो, तोच राजस्थानात गेला की तेलातुपात घोळून दालबाटी होतो आणि बिहारात गेला की वांग्याच्या भरीतासोबत खाल्ल्या जाणाऱ्या सत्तूच्या पीठाने बनविलेला, लिट्टी चोखा होतो.

रोडगे पार्टी साठी इमेज परिणाम

खाद्य कल्पनेचा अविष्कार - 

प्राचीन काळात युद्धावर निघालेल्या सैनिकांनी कदाचित हा पदार्थ प्रथम तयार केला असावा किंवा देशाटनाला जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या खाद्यकल्पनेचा तो अविष्कार असावा असे वाटते.

अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार व परतवाडा, दर्यापूर, अकोट, शेगाव, तेल्हारा, मोताळा,  तालुक्यांदरम्यान धार्मिक आणि नैसर्गिक ठिकाणांनव रोडग्यांचा बेतच असतो. तसं मुंबई, पुणे सारख्या शहरातही हा घरातच बनतो पण रोडगे खाण्याची खरी मजा तर आहे. शेतात किंवा बाहेर एखाद्या रम्य स्थळी.

वऱ्हाडातील बहिरम, शेगाव आणि वारी हनुमान  या धार्मिक स्थळावर या रोडग्याचे महत्त्व अधोरेखित होते. या ठिकाणांवर जाणे म्हणजे रोडगा व वांग्याची तिखट, चमचमीत भाजी खाणे हे प्रसाद ग्रहणाएवढेच महत्त्वपूर्ण असते.

रोडगा म्हणजे कणकेच्या जाड पोळ्याचे एकावर एक जाड थर लावून ती गुंडाळी गोवऱ्यांवर भाजून बनवलेला पदार्थ होय. रोडगा हा लहान मोठ्या अशा दोन आकारात बघायला मिळतो. काही रोडगे हे छोट्याशा गोळ्याच्या स्वरुपातले तर काही भल्या थोरल्या आकारातले.

रोडगा बनवण्याचे काम प्रामुख्याने पुरुषांचेच. रोडग्यासाठी लागणारे गव्हाचे पीठ हे जाडसरच असायला हवे. त्यात ओवा, तीळ व तेल टाकून ते भिजवले जाते. त्याच्या जाडसर पोळ्या लाटून त्या पोळांना एकमेकांवर रचून त्याचा पुन्हा गोळा तयार केला जातो. हा गोळा मग गोवऱ्यांवर ठेवून भाजला जातो.

भाजलेले रोडगे एका पोत्यात ठेवून रगडले की त्यावरची राख व माती निघून जाते. मग हा गरमागरम रोडगा फोडून त्याचा एकेक तुकडा पंगतीत वाढला जातो. रोडग्यासोबत वांग्याची भाजी असा निश्चित मेनू असतो. रोडगा तीन ते चार दिवस टिकणारा असल्याने तो प्रवासातही नेता येतो.

काही सुगरणी रोडग्याच्या मधल्या भागाचा चुरा करून त्यात गूळ घालून त्याचे लाडूही बनवतात. असे हे रोडगे आणि आलूवांग्याचा रस्सा (खास वैदर्भीय शब्द) बहिरमच्या यात्रेत तात्पुरत्या उभारलेल्या एखाद्या राहुटीत बसून खाल्ले की आपण आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून आहोत याचेही मग एक समाधान मिळवता येऊ शकते.

नक्की करून बघा. फार सुंदर चवदार लागतात.

रोडगे पार्टी साठी इमेज परिणाम

साहित्य- 
गव्हाचे पीठ, ओवा, मीठ, साजूक तूप.

कृती-
१) पिठा मध्ये ओवा, मीठ आणि थोडेसे तेल घालून मळून घ्या .
२) कणिक रवाळ असल्यामुळे तिला मुरायला वेळ लागतो .अर्धा तास झाकून ठेवा.
३)कणकेचा उंडा घेऊन तळहातावर थापून थापून जाडसर गोल पोळी करा .
४) परत उंडा घेऊन आधीच्या पोळीपेक्षा छोटी पोळी करा .परत एक उंडा घ्या तिची हातावरच पोळी करून आपण घडीची पोळी करतो तसे त्रिकोणी फोल्ड करा.क्रमाने असे ठेवा.
५) प्रत्येक पोळीला जरा जास्त तेल लावा .सर्व भाग वरच्या दिशेला जॉईन करा.
६) वर जुळवल्यावर जरा हातानी प्रेस करा.
अशाप्रकारे सर्व रोडगे बनवून घ्या.
७) पेटत्या चुली वर कढईत रोडगे ठेवा . Side ने भरपूर तूप सोडा. मध्ये मध्ये पलटवून द्या. दोन्ही बाजूनी शिजले कि काढून घ्या.
वांग्याच्या भाजीसोबत आणि वारणासोबत वाढा.

आणि जेवणानंतर अगदी विदर्भातील पद्धती प्रमाणे पाहुण्यांच्या समोर पान सुपारी आणि सौफ चा डब्बा आणायला विसरू नका

 

तळटीप: साजूक तुपाची धार जेवढी जास्त तेवढी चव भारी. म्हणून डाएट गया तेल लेने म्हणा आणि तुपाची धार सोडून फुल्ल हापसा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola food varhadi recipe of rodage in amravati nagapur rigon